न्या य नि र्ण य
(व्दाराः- मा. सौ. रुपाली धै. घाटगे, सदस्या)
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे—
तक्रारदार हे आत्मा स्टील लि. गाजियाबाद, राज्य उत्तर प्रदेश येथे सन 1986 पर्यंत नोकरीत कार्यरत होते. तेथे नोकरीत कार्यरत असताना तक्रारदार यांचा तेथील भविष्य निधी खाते क्र. यूपी/1517/292 असा होता. सदरची नोकरी तक्रारदार यांनी सन 1986 साली सोडली व ते कोल्हापूर येथे स्थलांतरीत झाले. आत्मा स्टील लि. येथे नोकरीस असताना त्यांचे भविष्य निधी खातेमध्ये रु.10,438/- इतकी रक्कम जमा झाली होती. मेरठ उत्तर प्रदेश येथील भविष्य निधी कार्यालयाकडून दि. 20/11/2006 साली वि.प.क्र.1 व 2 यांना पत्र मिळाले की, त्यांनी तक्रारदार यांनी भविष्य निधी खातेमध्ये आलेली रक्कम तक्रारदार यांचे कोल्हापूर येथील भविष्य निधी खाते क्र. एमएच/29104/18 मध्ये जमा केली आहे. तक्रारदार यांनी दि. 18/2/13 रोजी वि.प. यांना पत्र पाठवून विनंती केली की, त्यांनी सदरची रक्कम व्याजासह तक्रारदार यांचे भविष्य निधी खातेमध्ये जमा करावी. परंतु वि.प. यांनी सदर अर्जाची दखल घेतली नाही. तदनंतर तक्रारदार यांनी दि. 8/6/2013 रोजी ऑनलाईन तक्रार केली. सदर तक्रारीस तक्रारदार यांना दि. 0/6/2013 रोजी असे उत्तर मिळाले,
It is informed after processing your grievance the following action has been taken. Sir with reference to above, it is to inform you that verification of tr-in received from UP/4517/292 is under process. The detailed reply will be intimated to member in due course. CSD, SRO, KOLHAPUR
तरी देखील वि.प. तर्फे कोणतीही कार्यवाही झाली नाही. तदनंतर तक्रारदार यांनी पुन्हा दि. 20/10/2014 रोजी लेखी पत्राने तक्रार केली. परंतु त्याचीही दखल वि.प. यांनी घेतली नाही. तदनंतर तक्रारदाराने दि. 14/2/15 व दि.8/9/15 रोजी ऑनलाईन तक्रार केली. परंतु त्याचीही दखल वि.प. ने न घेतलेने तक्रारदार यांनी वि.प. यांना दि. 8/3/2016 व दि. 31/12/16 रोजी रोजी वकीलामार्फत नोटीस पाठविली. परंतु तरीही वि.प. यांनी त्याची दखल घेतली नाही. सबब, वि.प. यांनी तक्रारदार यांचे भविष्य निधी खातेमध्ये व्याजासह रक्कम जमा करावी, तसेच नुकसान भरपाईपोटी वि.प. यांचेकडून रक्कम रु. 65,000/- मिळावेत अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.
2. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत वि.प. यांचे पत्र व फॉर्म के, तक्रारदार यांनी केलेल्या तक्रारींच्या प्रती व त्या पोहोच झाल्याची अभिस्वीकृती, तक्रारदार यांनी वि.प. यांना पाठविलेल्या नोटीसा व त्यांच्या पोचपावत्या इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच तक्रारदाराने पुराव्याचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
3. वि.प.क्र.1 यांनी याकामी तक्रारदाराचे तक्रारअर्जास म्हणणे दाखल केले आहे. वि.प. यांचे कथनानुसार, वि.प.क्र.2 यांचेकडून पत्राची प्रत मिळाली परंतु प्रत्यक्षात रक्कम रु.10,438/- मिळालेली नाही. वि.प.क्र.1 यांनी तक्रारदारास तक्रारदारांनी पाठविलेल्या पत्रांना उत्तरे दिली आहेत परंतु प्रत्यक्षात रक्कम प्राप्त न झालेने तक्रारदाराच्या खातेवर रक्कम जमा करता आलेली नाही. तक्रारदाराच्या पूर्वीच्या भविष्य निधी खाते क्र. UP/4517/292 यावरील जमा रक्कम रु. 10,438/- ही त्यांच्या सध्याच्या खाते क्र. PU/KOL/29104/18 मध्ये हस्तांतरीत झालेली नाही. याबाबत वेळोवेळी पाठपुरावा करुनही वि.प.क्र.2 यांनी कार्यवाही केलेली नाही. सदरची रक्कम वि.प.क्र.2 यांचेकडून प्राप्त झालेनंतर त्याच्या देय दिनांकापासून व्याजासह सदरची रक्कम तक्रारदारांच्या खात्यामध्ये जमा करणेत येईल व तक्रारदाराचे कोणतेही आर्थिक नुकसान केले जाणार नाही असे कथन वि.प.क्र.1 यांनी केले आहे.
4. वि.प. क्र.1 यांनी याकामी, कागदपत्रे, पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
5. वि.प.क्र.2 यांना प्रस्तुत तक्रारीची नोटीस लागू होवूनही ते याकामी हजर झालेले नाहीत. सबब, वि.प.क्र.2 यांचेविरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला.
6. तक्रारदारांचा तक्रारअर्ज, वि.प.क्र.1 यांचे म्हणणे, दाखल केलेली अनुषंगिक कागदपत्रे, तक्रारदाराचे व वि.प. यांचे पुराव्याचे शपथपत्र, लेखी युक्तिवाद यांचा विचार करता निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदाराला द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | अंशतः मंजूर. |
कारणमिमांसा –
मुद्दा क्र. 1 –
7. तक्रारदार हे आत्मा स्टील लि. गाझीयाबाद राज्य उत्तर प्रदेश येथे सन 2006 पर्यंत नोकरीत कार्यरत होते. सदर नोकरीत कार्यरत असताना तक्रारदार यांचा वैयक्तिक भविष्य निधी खाते क्र. UP/1517/292 असा होता. तक्रारदार यांनी सदर आत्मा स्टील लि. ची नोकरी सन 2006 मध्ये सोडली व ते कोल्हापूर येथे स्थलांतरीत झाले. आत्मा स्टील लि. येथे नोकरीत कार्यरत असताना तक्रारदार यांचे भविष्य निधी खातेमध्ये रु.10,438/- इतका भविष्य निधी जमा झाला होता सदरचा भविष्य निधी तक्रारदार यांचेकडे जमा असलेच्या अनुषंगाने तक्रारदार यांनी तक्रारीसोबत वि.प. यांचेकडून ता. 20/11/2006 रोजीचे पत्र दाखल केलेले आहे. सदरच्या पत्रामध्ये तक्रारदार यांचे खातेवर रक्कम रु.10,438/- इतका भविष्य निधी जमा असलेचे नमूद आहे. सदरचे पत्र वि.प. यांनी नाकारलेले नसल्यामुळे तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.2
8. उपरोक्त मु्द्दा क्र.1 मधील विस्तृत विवेचनाचा विचार करता तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत. तक्रारदार यांचे आत्मा स्टील लि. येथे नोकरीत कार्यरत असताना भविष्य निधी खात्यामध्ये रक्कम रु.10,438/- इतका भविष्य निधी जमा झाला होता. सदरचा भविष्य निर्वाह निधी हा वि.प. क्र.1 येथील कार्यालयाकडून ता. 20/11/2006 रोजी वि.प.क्र.2 यांना पत्र पाठवून तक्रारदार यांचे भविष्य निधीमध्ये असलेली रक्कम तक्रारदार यांचे कोल्हापूर येथील भविष्य निधी खाते नं.MH/29104/18 असे तक्रारदार यांना पत्र पाठविण्यात आले. तक्रारदार यांनी ता. 18/2/2013 रोजी वि.प. यांना पत्र पाठवून सदरच्या रकमेची व्याजासह मागणी करुन भविष्य निधी खातेमध्ये जमा करावी अशी विनंती केली. तदनंतर ता. 8/6/2013 रोजी ऑनलाईन तक्रार केली. तक्रारदार यांनी वेळोवेळी वि.प. यांना भविष्य निधी खातेमधील रक्कम व्याजासह कोल्हापूर येथील भविष्य निधी खातेवर जमा करावी असे वारंवार कळवून/तक्रार देवून देखील वि.प. यांनी तक्रारदार यांचे खातेमध्ये सदरची रक्कम व्याजासहीत जमा केली नाही. सबब, वि.प. यांनी तक्रारदार यांची भविष्य निधी खातेवरील रक्कम तक्रारदारांचे कोल्हापूर येथील भविष्य निधी खात्यावर व्याजासह जमा न करुन तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली का ? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो. सदर मुद्याचे अनुषंगाने तक्रारदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन करता वि.प.क्र.2 सहायक आयुक्त, भविष्य निधी, मेरठ, उत्तर प्रदेश यांनी वि.प.क्र.1 भविष्य निधी, कोल्हापूर महाराष्ट्र यांना ता. 20/11/2016 रोजी वि.प. यांचेकडून आलेले पत्र तसेच फॉर्म के ची प्रत दाखल केलेली आहे. सदर पत्राचे तसेच फॉर्म के चे अवलोकन करता तक्रारदार यांच्या कोल्हापूर येथील भविष्य निधी खातेवर रक्कम रु.10,438/- जमा केलेचे दिसून येते. प्रस्तुतकामी तक्रारदार यांनी दाखल केलेल्या पुरावा शपथपत्राचे तसेच लेखी युक्तिवादाचे अवलोकन करता तक्रारदार यांनी दि.18/3/2013 रोजी वि.प.क्र.2 यांना पत्र पाठवून सदरच्या रकमेची व्याजासह भविष्य निधी खातेमध्ये रक्कम जमा करावी अशी विनंती केली आहे. सदरचे पत्र तक्रारदार यांनी तक्रारीसोबत दाखल केलेले असून सदरचे पत्राचे अवलोकन करता तक्रारदार यांनी You are requested to credit the amount with interest from 1992 to 2013 to my present account No. MH/29104/18 असे नमूद असून सदरचे पत्र वि.प. क्र.1 यांना मिळालेची पोहोच आहे. तसेच तक्रारदार यांनी दि.8/6/13, 9/6/13, 10/7/17 रोजी वि.प.क्र.1 यांना ऑनलाईन केलेल्या तक्रारीची अभिस्वीकृती दाखल केलेली आहे. सदरच्या पत्रास वि.प. यांनी ता. 9/7/13 रोजी उत्तर दिलेले असून सदर उत्तराचे अवलोकन करता
It is informed after processing your grievance the following action has been taken. Sir with reference to above, it is to inform you that verification of tr-in received from UP/4517/292 is under process. The detailed reply will be intimated to member in due course. CSD, SRO, KOLHAPUR असे उत्तर वि.प. यांनी तक्रारदार यांना दिलेचे दिसून येते. पुन्हा तक्रारदार यांनी वि.प. क्र.1 यांना दि.20/10/2014 रोजी पत्र पाठविलेले असून सदर पत्राचे अवलोकन करता,
After lapse of 16 months the amount has not been credited to my current provident No. MH/29104/18. You are once against requested to credit the amount with upto date interest to my present account No. MH/29104/18 असे नमूद असून सदरचे पत्र वि.प. क्र.1 यांना मिळालेची सदरचे पत्रावर पोहोच आहे. पुन्हा तक्रारदार यांनी ता. 14/2/2015 रोजी वि.प. यांना केलेल्या तक्रारीची अभिस्वीकृती दाखल केलेली आहे. सबब, वरील सर्व पत्रांवरुन तक्रारदार यांनी सन 2013 पासून ते सन 2015 अखेर वि.प. यांना वेळोवेळी ऑनलाईन प्रक्रियेने तसेच पत्र पाठवून भविष्य निधीची व्याजासह मागणीही केलेचे स्पष्टपणे दिसून येते
9. प्रस्तुतकामी वि.प. क्र.2 यांनी आयोगामध्ये म्हणणे दाखल केलेले असून तक्रारदार यांची तक्रार नाकारलेली आहे. सदर म्हणण्याचे अवलोकन करता वि.प. क्र.2 यांनी सर्व बाबींची पूर्तता करुन ता. 16/11/2006 रोजी वि.प. क्र.1 यांच्याकडे सदरचा क्लेम कागदपत्रांसह पाठविलेला होता. वि.प. क्र.1 यांनी ता. 4/1/18 रोजी इमेलद्वारे माहिती दिलेनुसार सदर वि.प. क्र.2 यांनी रक्कम रु. 68,054/- वि.प. क्र.1 यांचेकडील पी.एफ.अकाऊंट नं.एमएच/29104/18 वर ता. 29/4/18 रोजी जमा/क्रेडीट केलेली आहे. प्रस्तुत वि.प.क्र.2 यांना तक्रारदार यांनी कोणतीही कायदेशीर नोटीस अथवा कोणतेही पत्र पाठविलेले नाही असे वि.प. क्र.2 यांनी कथन केलेले आहे. वि.प. क्र.1 यांनी दाखल केलेल्या म्हणण्याचे अवलोकन करता वि.प. क्र.1 यांना वि.प. क्र.2 यांचेकडून रक्कम रु. 10,438/- कधीच प्राप्त झालेली नव्हती. प्रत्यक्षात सदरची रक्कम प्राप्त न झाल्यामुळे वि.प.क्र.1 हे तक्रारदाराचे खातेमध्ये सदरची रक्कम जमा करु शकलेले नाहीत. तक्रारदार यांचे भविष्य निधी हस्तांतरणाचो कागदपत्रे वि.प. क्र.1 याना प्राप्त झालेली होती, परंतु त्या अनुषंगाने रक्कम रु.10,438/- ही त्यांचे खात्यामध्ये हस्तांतरीत झालेली नव्हती. ता. 18/3/16 रोजी सदरची बाब वि.प. यांनी वि.प. क्र.2 यांना निदर्शनास आणून दिली होती व त्याची प्रत तक्रारदार यांना देखील पाठविलेली होती. या संदर्भात स्मरणपत्र सुध्दा पाठविलेले होते. वेळोवेळी पाठपुरावा करुन वि.प. क्र.1 यांनी वि.प. क्र.2 कार्यालयातून सदरची रक्कम हस्तांतरीत करुन घेवून तक्रारदाराची तक्रार निकाली काढणेस प्राधान्य दिले होते. तक्रारदार यांचे भविष्य निधी खाते क्र. UP/29104/18 वर ट्रान्स्फर रक्कम संस्था हिस्सापोटी रक्कम रु.34,027/- व कर्मचारी हिस्सा पोटी रक्कम रु.34,027/- असे एकूण रक्कम रु.68,054/- वि.प.क्र.2 कडून ता. 22/3/2018 रोजी प्राप्त झाली होती व सदरची रक्कम वि.प. क्र.1 यांनी तक्रारदार यांच्या भविष्य निधी खात्यावर जमा केलेली आहे व त्यानंतर तक्रारदार यांच्या ता. 13/2/2019 च्या अर्जानुसार सर्व पीएफ रक्कम रु.33,49,599/- वि.प. क्र.1 कार्यालयाने ता. 13/2/2019 रोजी अदा केलेली आहे. त्या अनुषंगाने सदर वि.प. क्र.1 यांनी तक्रारदार यांचा भविष्य निधी खातेउतारा आयेागामध्ये दाखल केलेला आहे. सबब, तक्रारदार यांना त्यांच्या भविष्य निधी खात्याची एकूण पीएफ रक्कम रु.33,49,599/- अदा केलेली आहे. सबब, वरील सर्व कागदपत्रांचा व दाखल म्हणण्याचा विचार करता तक्रारदार यांचे भविष्य निधी हस्तांतरणाचे कागदपत्रे वि.प. क्र.1 यांना दि.20/11/2006 रोजी प्राप्त झाले होते ही बाब सिध्द होते. त्यानंतर तक्रारदार यांनी सन 2013 पासून सन 2017 अखेर वि.प. क्र.1 यांना वेळोवेळी सदर भविष्य निधी रकमेची मागणी केलेली आहे तसेच ता. 8/3/2016 रोजी वकीलामार्फत नोटीस पाठविलेली असून सदर नोटीसीस दि.18/3/2016 रोजी वि.प. यांनी उत्तर देखील दिलेले आहे. तदनंतर सुध्दा तक्रारदार यांनी दि.31/12/2016 रोजी वि.प. यांना नोटीस पाठविलेली आहे. वि.प.क्र.1 यांच्याच म्हणणेवरुन एमएच/पीएफ/एसआरओ/को/29104/के-6/1921 दि. 18/3/16 रोजी वि.प. क्र.2 यांना वि.प.क्र.1 यांनी सदरची बाब निदर्शनास आणून दिली आहे व दि.1/9/17 सुध्दा स्मरणपत्रसुध्दा पाठविले आहे. सबब, तक्रारदार यांनी सन 2013 पासून वि.प. यांचेकडे वेळोवेळी पत्रे पाठवून देखील सदर पत्राची दखल वि.प. क्र.1 यांनी सन 2016 रोजी घेतलेची दिसून येते. सन 2016 नंतर वि.प. क्र.1 यांनी वि.प. क्र.2 यांना सदरची बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर वि.प.क्र.2 यांनी वि.प. क्र.1 यांच्या दि.4/1/18 रोजीच्या ईमेलद्वारे माहिती मिळालेनंतर वि.प. क्र.2 यांनी रक्कम रु.68,254/- इतकी रक्कम वि.प.क्र.1 यांचेकडे तक्रारदार यांच्या पीएफ अकाऊाट नं. MH/29104/18 वर ता. 29/4/2018 रोजी जमा केलेचे दिसून येते. सबब, वरील सर्व बाबींचा विचार करता तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडे नोकरीत कार्यरत असताना असलेला भविष्य निधीच्या रकमेची व्याजासह वेळोवेळी मागणी करुन देखील वि.प. यांनी सदरची रक्कम तक्रारदार यांना विलंबाने सन 2018 मध्ये अदा केलेली आहे. तक्रारदारांचे सदरची तक्रारीची दखल वि.प.क्र.1 व 2 यांनी विलंबाने घेतली तसेच तक्रारदारांचे भविष्य निधीची कागदपत्रे सन 2006 पासून वि.प.क्र.1 यांचेकडे होती ही बाब वि.प.क्र.1 यांना माहित होती. तदनंतर सन 2016 साली वि.प.क्र.1 यांनी तक्रारदारांचे भविष्य निधी रकमेचा पाठपुरावा केलेचे दिसून येते. त्यामुळे तक्रारदार हे त्यांचे भविष्य निधीची रक्कम व त्यावरील व्याजापासून तब्बल 10 वर्षे वंचित राहिले. केवळ वि.प.क्र.1 व 2 यांचे अपु-या (communication) संवादाने तक्रारदार यांना नुकसान सोसावे लागले ही बाब सिध्द होते. सबब, वि.प.क्र.1 व 2 यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत गंभीर त्रुटी केलेली आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.3
10. उपरोक्त मुद्दा क्र.1 व 2 मधील विस्तृत विवेचनाचा विचार करता वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेने तक्रारदार यांना सदरची भविष्य निधीची रक्कम विलंबाने मिळालेमुळे तक्रारदार यांना मानसिक त्रास झाला व सदरची तक्रार या आयोगात दाखल करणे भाग पडले. त्या कारणाने तक्रारदार हे वि.प.क्र.1 व 2 यांचेकडून संयुक्तिकरित्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम रु.15,000/-, सदर फायद्यापासून वंचित राहिलेमुळे नुकसान भरपाईची रक्कम रु.5,000/-, तक्रारीचा खर्च रक्कम रु.8,000/- अशी एकूण रक्कम रु. 28000/- मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.3 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.4 - सबब आदेश.
- आ दे श - - तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
- वि.प. क्र.1 व 2 यांनी संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना नुकसान भरपाईपोटी रक्कम रु.28,000/- त्वरित अदा करावी.
- वर नमूद सर्व आदेशांची पुर्तता वि.प. यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.
- विहीत मुदतीत आदेशांची पुर्तता न केलेस ग्राहक सरंक्षण कायदयातील तरतुदींअन्वये वि.प. विरुध्द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
- आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.
|