द्वारा-श्री. एस.के.कापसे, मा. सदस्य
:- निकालपत्र :-
दिनांक 30 डिसेंबर 2011
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे-
1. तक्रारदारांनी सदनिका क्र.11 व 12 अ, शर्मिला अपार्टमेंट, पुणे 7 संदर्भात वॉटर प्रुफिंगचे काम जाबदेणार यांच्याकडे दिले होते. कामाची किंमत रुपये 65,000/- ठरली होती. दिनांक 12/5/2007 रोजीच्या पत्रानुसार कामाची 5 वर्षांची वॉरंटी होती. जाबदेणार यांनी काम व्यवस्थित न केल्यामुळे पुर्वीपेक्षा अधिक पाणी गळती सुरु झाली, जेथे पाणी गळती नव्हती तेथे देखील ती होऊ लागली. जून 2008 मध्ये गळती दुरुस्तीनंतरही जून 2009 मध्ये परत दुरुस्ती करण्यात आली. तरी देखील उपयोग झाला नाही. मे 2010 मध्ये परत काम करण्यासाठी लागणा-या मटेरिसाठी रुपये 50,000/- ची मागणी जाबदेणार यांनी केली. त्यास तक्रारदारांनी नकार दिला. पाणी गळतीमुळे सदनिका क्र.11 मध्ये बेडरुम सिलींग मध्ये गळती नसतांना सुरु झाली, इलेक्ट्रिक वायरिंग मध्ये पाणी असते, रंग खराब झाला, बाथरुमची भिंत व सिलींगमध्ये पाणी गेले, स्ट्रक्चरल नुकसान झाले, त्यामुळे ती बेडरुम व बाथरुम तक्रारदारांनी वापरणे बंद केले. सदनिका क्र.12 मध्ये बेडरुम, बाथरुम व किचनमध्ये पावसाळयात भांडी/बादली ठेवावी लागते. गळतीचे प्रमाणे वाढलेले आहे. किचन मध्ये देखील गळती असल्यामुळे गॅसच्या ओटयावर गळतीच्या ठिकाणी भांडी ठेवावी लागतात. वॉर्डरोप खराब झालेले आहेत. जाबदेणार यांनी वॉटर प्रुफिंगचे काम निट न केल्यामुळे तक्रारदारांनी प्रस्तूत तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारदार सदनिका क्र.11 व 12 वरील टेरेसचे पूर्णपणे नविन दुरुस्ती करुन गळती थांबवून मागतात, परत रंगाची मागणी करतात, सदनिका क्र.12 मधील वॉर्डरोप दुरुस्त करुन मागतात. जर जाबदेणार यांची वरील काम करण्याची तयारी नसेल तर सदनिका क्र.11 मधील गळतीमुळे झालेल्या नुकसानीपोटी रुपये 1,00,000/- मागतात. तसेच सदनिका क्र.12 मधील गळतीमुळे झालेल्या नुकसानीपोटी रुपये 2,00,000/-मागतात. नुकसान भरपाईपोटी एकत्रित रुपये 5,00,000/- व तक्रारीचा खर्च मागतात. तक्रारदारांनी शपथपत्र, कागदपत्रे व फोटो दाखल केलेले आहेत, तसेच फोटो स्वत: काढलेले असल्यामुळे स्वत:चे शपथपत्र दाखल केलेले आहे.
2. जाबदेणार यांना मंचाची नोटीस लागूनही गैरहजर. म्हणून त्यांच्याविरुध्द दिनांक 3/1/2011 रोजी मंचाने एकतर्फा आदेश पारीत केला.
3. तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. जाबदेणार यांच्या दिनांक 12/3/2007 व 12/5/2007 च्या पत्रांवरुन त्यांनी तक्रारदारांच्या सदनिकेचे वॉटर प्रुफिंगचे काम रुपये 65,000/- मोबदला घेऊन स्विकारल्याचे दिसून येते. सदरहू वॉटर प्रुफिंगचे काम केल्यानंतर 5 वर्षांची वॉरंटी जाबदेणार यांनी दिलेली होती. तक्रारदारांनी जाबदेणार यांनी केलेले वॉटर प्रुफिंगचे काम व्यवस्थित केलेले नव्हते यासंदर्भात तज्ञ यू.आर.वॉटर प्रुफिंग कंपनी यांचा दिनांक 7/3/2011 चा अहवाल दाखल केलेला आहे. सदरहू अहवालामध्ये सध्याची वॉटर प्रुफिंगची कंडिशन चांगली नसल्याचे नमूद करण्यात आलेले आहे. तसेच तक्रारदारांनी दाखल केलेल्या फोटोंची पाहणी केली असता सदनिका क्र.11 व 12 मध्ये पाणी गळतीमुळे सिलींग, वॉर्डरोप, रंग खराब झाल्याचे दिसून येते. तक्रारदारांनी फोटो काढल्यासंदर्भात शपथपत्र देखील दाखल केलेले आहे. यासर्वावरुन जाबदेणार यांनी वॉटर प्रुफिंगसंदर्भात संपुर्ण मोबदला स्विकारुनही वॉटर प्रुफिंगचे काम व्यवस्थित केले नाही ही बाब सिध्द होते. म्हणून जाबदेणार यांनी सदरहू सदनिका क्र.11 व 12 मधील पाणी गळती पूर्णपणे थांबवावी व काम पूर्ण झाल्यानंतर त्या दिवसापासून पुढील 5 वर्षांची वॉटर प्रुफिंगची वॉरंटी दयावी असे आदेश जाबदेणार यांना देण्यात येत आहेत. तक्रारदारांनी सदनिकेचे परत रंगकामाची व वॉर्डरोप दुरुस्तीची मागणी केलेली आहे परंतू याबाबत नक्की किती नुकसान झाले याबाबत तज्ञाचा अहवाल वा आर्किटेक्ट कडून व्हॅल्युएशन अहवाल, वॉर्डरोप नुकसानीबाबतचा अहवाल, रंगकामाच्या नुकसानीबाबतचा अहवाल दिलेला नाही. त्यामुळे सदरहू मागणी मान्य करता येत नाही असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
तक्रारदारांना सदनिकेतील पाणी गळतीमुळे, वॉटर प्रुफिंगचे काम व्यवस्थित न झाल्यामुळे निश्चितच शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला असेल असे मंचाचे मत आहे. तक्रारदारांनी नुकसान भरपाईपोटी प्रत्येकी रुपये 2,50,000/- म्हणजेच एकत्रित रुपये 5,00,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 25,000/- ची मागणी केलेली आहे. परंतू ही मागणी अवास्तव आहे असे मंचाचे मत आहे. म्हणून जाबदेणार यांनी सदनिका क्र.11 व सदनिका क्र.12 मधील तक्रारदारांना नुकसान भरपाईपोटी रुपये 25,000/- प्रत्येकी दयावेत असा आदेश देण्यात येत आहे.
यासंदर्भात मंचाने मा. सर्वोच्च न्यायालयाचा 2000 DGLS 1448 तक्रार क्र.767/2000 निकाल दिनांक 20/9/2000 श्री. चरणसिंग विरुध्द हिलींग टच हॉस्पिटल या निवाडयाचा आधार घेतला. सदरहू निवाडयामध्ये मा. सर्वोच्च न्यायालयाने “It is for the Consumer Forum to grant compensation to the extent it finds it reasonable, fair and proper in the facts and circumstances of a given case according to established judicial standards where the claimant is able to establish his charge.” असे नमूद केलेले आहे.
वरील विवेचनावरुन व दाखल कागदपत्रांवरुन खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे-
:- आदेश :-
1. तक्रार अंशत: मान्य करण्यात येत आहे.
2. जाबदेणार यांनी सदनिका क्र.11 व सदनिका क्र.12 मधील तक्रारदारांच्या सदनिकांमधील पाणी गळती पूर्णपणे थांबविण्याचे काम आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत पूर्ण करावे व काम पूर्ण झाल्यानंतर त्या दिवसापासून पुढील 5 वर्षांची वॉटर प्रुफिंगची वॉरंटी दयावी.
3. जाबदेणार यांनी सदनिका क्र.11 तक्रारदारांना नुकसान भरपाई पोटी रुपये 25,000/- व सदनिका क्र.12 मधील तक्रारदारांना नुकसान भरपाई पोटी रुपये 25,000/- व तक्रारीचा खर्च दोन्ही तक्रारदारांना प्रत्येकी रुपये 1000/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत अदा करावा.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.