निकाल
पारीत दिनांकः- 30/03/2012
(द्वारा- श्रीमती अंजली देशमुख, अध्यक्ष)
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे आहे.
1] तक्रारदारांनी तक्रारीबरोबर विलंब माफीचा अर्ज दाखल केला आहे. सदरच्या अर्जान्वये प्रस्तुतची तक्रार दाखल करण्यास एकुण 1234 दिवसांचा विलंब झालेला आहे आणि तो विलंब माफ करण्यात यावा अशी मागणी तक्रारदार करतात. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी जाबदेणारांच्या विरुद्ध SEBI कडे तक्रार दाखल केलेली होती, परंतु ती तांत्रिक कारणांवरुन फेटाळण्यात आली. त्यानंतर त्यांनी SEBI च्या वरिष्ठ प्राधिकार्यांकडे पाठपुरावा केला, परंतु तेथेही त्यांना यश आले नाही. त्यानंतर तक्रारदारांनी दक्षिण मुंबई येथील ग्राहक मंचामध्ये तक्रार दाखल केली, तेथेही कार्यक्षेत्र नसल्यामुळे मंचाने तक्रारदारास तक्रार परत केली. त्यानंतर तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली.
2] जाबदेणारांनी तक्रारदारांच्या विलंब माफीच्या अर्जावर त्यांचे म्हणणे दाखल केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, तक्रारदारांनी विलंब माफीचे दोन अर्ज दाखल केलेले आहेत. पहिल्या अर्जामध्ये तक्रारदार 1234 दिवसांच्या विलंबाची माफी मागतात आणि दुसर्या अर्जामध्ये 1371 दिवसांच्या विलंबाची माफी मागतात. पहिल्या अर्जामध्ये तक्रारदार SEBI कडे व त्यांच्या वरिष्ठ प्राधिकार्यांकडे तक्रारी दाखल केलेल्या होत्या असे नमुद करतात, परंतु तेथे त्या कधी (तारीख) व कशाप्रकारे निकाली काढल्या याबद्दल काहीही नमुद केलेले नाही, तसेच त्यांच्या आदेशाच्या प्रमाणित प्रतीही तक्रारदारांनी जोडलेल्या नाहीत. जाबदेणारांच्या म्हणण्यानुसार, तक्रारदारांनी त्यांच्या दुसर्या अर्जामध्ये कौटुंबिक कारण व त्यांच्या मुलीच्या कानाच्या ऑपरेशनचे कारण नमुद केलेले आहे, परंतु त्या संदर्भात कोणतेही वैद्यकीय कागदपत्रे दाखल केलेली नाहीत. दक्षिण मुंबई येथील ग्राहक मंचामध्ये तक्रार दाखल करण्यासही तक्रारदारांना विलंब झालेला होता असे जाबदेणारांचे म्हणणे आहे, म्हणून तक्रारदारांचा विलंब माफीचा अर्ज नाकारुन मुळ तक्रार नामंजूर करावी अशी मागणी जाबदेणार करतात.
3] दोन्ही बाजूंनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदारांनी एकुण 1371 दिवसांच्या विलंब माफीचा अर्ज दाखल केलेला आहे, परंतु त्यासाठी योग्य ते स्पष्टीकरण दिलेले नाही. मुलीच्या कानाच्या ऑपरेशनसंदर्भात कोणताही पुरावा किंवा प्रमाणपत्र तक्रारदारांनी तक्रारीबरोबर दाखल केलेला नाही ज्यावरुन त्यांच्या मुलीला गंभीर आजार होता हे सिद्ध होईल. त्याचप्रमाणे तक्रारदारांनी SEBI कडे व त्यांच्या वरिष्ठ प्राधिकार्यांकडे कधी तक्रारी दाखल केलेल्या होत्या याच्या तारखा अर्जामध्ये नमुद केलेल्या नाहीत. तक्रारदारांनी अतिशय संदीग्धपणे विलंब माफीचा अर्ज दाखल केलेला आहे, त्याच्या पुष्ठ्यर्थ व्यवस्थित स्पष्टीकरण किंवा कोणताही पुरावा मंचासमोर दाखल केलेला नाही, म्हणून मंच तक्रारदारांचा विलंब माफीचा अर्ज नाकारुन प्रस्तुतची तक्रार नामंजूर करते.
4] वरील सर्व विवेचनावरुन व कागदपत्रांवरुन मंच खालील आदेश पारीत करते
:- आदेश :-
1. तक्रारदारांचा विलंब माफीचा अर्ज तसेच तक्रार
नामंजुर करण्यात येते.
2. तक्रारीच्या खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत
3. आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क
पाठविण्यात यावी.