जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
तक्रार क्रमांक 1567/2009
तक्रार दाखल करण्यात आल्याची तारीखः-16/10/2009.
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 13/08/2013.
मे.शहा आनंदीलाल केशवलाल वहीवाटकर्ता मालक,
श्री.सिध्दार्थ आनंदीलाल शहा,
उ.व.सज्ञान, धंदाः व्यापार,
रा.131, भवानी पेठ, सुभाष चौक,जळगांव. .......... तक्रारदार.
विरुध्द
मे.भवानी माता अर्बन को ऑपरेटीव्ह सोसायटी लि,जळगांव,
सुभाष चौक, जळगांव, समन्स / नोटीस शाखा व्यवस्थापक
यांचेवर बजवावी. ......... विरुध्द पक्ष
कोरम-
श्री.विश्वास दौ.ढवळे अध्यक्ष
श्रीमती पुनम नि.मलीक सदस्या.
तक्रारदारातर्फे श्री.अवधेश इं.संकलेचा वकील.
विरुध्द पक्षातर्फे श्री.आर.आर.झंवर वकील. (नो-से)
निकालपत्र
श्री.विश्वास दौ.ढवळे, अध्यक्षः विरुध्द पक्षाने तक्रारदारास धनाकर्ष न देता चेक देऊन दिलेल्या सेवेतील त्रृटीदाखल प्रस्तुतची तक्रार तक्रारदाराने या मंचासमोर दाखल केलेली आहे.
2. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की,
तक्रारदार हे भांडयाचा व्यापार करणारे वहीवाटकर्ता असुन नेहमी बँकेचे व्यवहार करतात. तक्रारदाराने दि.2/2/2009 रोजी विरुध्द पक्षाकडे अनुक्रमे रक्कम रु.20,000/- चे दोन महेंद्र मेटल, पुणे यांचे नावाने तसेच रक्कम रु.26,150/- चा मारुती कार्पोरेशन, अहमदाबाद यांचे नावाने धनाकर्ष (ड्राफट) काढण्यासाठी रोख भरणा केला व सदरच्या सेवेपोटी रु.30/- भरणा केले. तथापी विरुध्द पक्षाने तक्रारदाराच्या मागणीप्रमाणे धनाकर्ष (ड्राफट) न देता चेक दिले त्याचे विवरण खालीलप्रमाणेः-
अ.क्र. | धनादेश वर्णन | रक्कम | तारीख | नांव व गांव |
1. | अक्सीस बँक,जळगांव धनादेश क्र.477424 | 26,150/- | 09/02/2009 | मारुती कार्पोरेशन अहमदाबाद |
2. | अक्सीस बँक,जळगांव धनादेश क्र.477403 | 20,000/- | 02/02/2009 | महेंद्र मेटल, पुणे |
3. | अक्सीस बँक,जळगांव धनादेश क्र.477401 | 20,000/- | 02/02/2009 | महेंद्र मेटल, पुणे |
| एकुण रक्कम रु. | 66,150/- | | |
वरील प्रमाणे दिलेले धनादेश तक्रारदाराने विरुध्द पक्षाकडुन मिळताच ते ज्यांचे नांवे काढले होते त्यांचेकडे वटविण्यास पाठविले असता तीनही धनादेशांचा अनादर झाला. त्यामुळे अहमदाबाद व पुण्याच्या पार्टीस रक्कम न मिळाल्याने तक्रारदाराची पत कमी झाली. तक्रारदाराची रक्कम अहमदाबाद तसेच पुणे येथे विरुध्द पक्षाचे चुकीमुळे पोहचली नाही. धनादेश क्र.477403, 477401 व 477424 हे पुरेशी रक्कम खात्यात नसल्याने वटले नाहीत. तक्रारदारास फेब्रुवारी, 2009 मध्ये सदरची घटना माहीती होताच त्याने विरुध्द पक्ष कडे धाव घेतली व विचारणा केली असता त्यांनी त्याची काहीएक दखल घेतली नाही. तक्रारदाराने शेवटी दि.8/5/2009 रोजी नोटीस पाठवुन रक्कम रु.86,483/- ची मागणी केली तथापी नोटीस मिळुनही विरुध्द पक्षाने काहीएक दखल घेतली नाही. सबब अहमदाबाद व पुणे येथे ड्राफट घेण्यासाठीची रोख रक्कम रु.66,150/-, धनाकर्ष कमिशन रु.330/-, शारिरिक, मानसिक व आर्थिक नुकसानीची रक्कम रु.20,000/-, नोटीसी नंतरच्या रक्कम वापरण्याच्या 24 टक्के नुकसानी दाखल रु.13,520/- अशी एकुण रक्कम रु.1,00,000/- ची मागणी केलेली आहे.
3. सदरची तक्रार दाखल करुन, विरुध्द पक्ष यांना ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 13(1) ब प्रमाणे नोटीस काढण्यात आली. विरुध्द पक्ष हे वकीलामार्फत हजर झाले तथापी त्यांनी मुदतीत लेखी म्हणणे दाखल केलेले नसल्याने त्यांचेविरुध्द नो-से आदेश पारीत करुन तक्रार निकालासाठी घेतली.
4. तक्रारदार यांची तक्रार, त्यांनी दाखल केलेले कागदपत्रे, तसेच तक्रारदाराची पुरावा पुरसीस इत्यादीचे सुक्ष्म अवलोकन केले असता न्यायनिवाडयासाठी पुढील मुद्ये उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालीलप्रमाणे देत आहोत.
मुद्ये उत्तर
1) विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्या
सेवेत त्रृटी केली आहे काय ? होय.
2) आदेश काय ? खालीलप्रमाणे.
वि वे च न
5. मुद्या क्र.1 - प्रस्तुत तक्रारीकामी तक्रारदाराने नि.क्र.3 लगत दाखल केलेले कागदपत्रे पाहता दि.2/2/2009 रोजी विरुध्द पक्षाकडे ड्राफट मिळण्यासाठी दिलेल्या अर्जानुसार भरणा पावती दिसुन येते. सदर पावतीवरुन तक्रारदाराने धनाकर्ष (ड्राफट) मिळणेसाठी मागणी केल्याचे स्पष्टपणे दिसुन येते. तसेच धनाकर्ष देण्याचे ऐवजी विरुध्द पक्षाने तक्रारदारास धनादेश दिल्याचेही नि.क्र.3 लगत दाखल धनादेशावरुन स्पष्ट होते. तसेच सदरचे धनादेश तक्रारदाराने संबंधीत पार्टींना पाठविल्यानंतर सदरचे धनादेश FUNDS INSUFFICIENT या शे-यासह बँकेने परत केल्याचे अक्सीस बँकेचे चेक रिर्टनींग मेमो वरुन स्पष्ट होते. वरील एकुण पुराव्यावरुन तक्रारदाराने विरुध्द पक्षाकडे रक्कमांचा भरणा करुन धनाकर्ष (ड्राफट) ची मागणी केली असता विरुध्द पक्षाने तक्रारदारास धनादेश देऊन तसेच सदरचे धनादेश संबंधीत पार्टींनी वटवण्यासाठी टाकले असता ते खात्यात बॅलन्स नसल्याने न वटता परत आल्याचे तक्रारदाराने तक्रार अर्जासोबत दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन पुराव्यानिशी शाबीत केलेले आहे. याउलट विरुध्द पक्ष हे या मंचासमोर वकीलामार्फत हजर झाले तथापी त्यांनी तक्रारदाराच्या तक्रारीस कोणत्याही प्रकारे आव्हान दिलेले नाही व काहीएक म्हणणे दाखल केले नाही यावरुन त्यांना तक्रारदाराची तक्रार एकप्रकारे मान्यच आहे असा निष्कर्ष निघतो. तक्रारदाराने संबंधीत पार्टींना सदरचे धनादेश पाठविले असता ते न वटल्याने विरुध्द पक्षाचे सदरचे कृतीमुळे तक्रारदाराची असलेली पत निश्चितच कमी झाली असेल यात तिळमात्र शंका नाही. तक्रारदारास मागणी प्रमाणे धनाकर्ष (ड्राफट) न देता धनादेश देऊन विरुध्द पक्ष मे.भवानी माता अर्बन को ऑप सोसायटी लि यांनी सदोष सेवा दिल्याचे निष्कर्षाप्रत हा मंच आला आहे. सबब मुद्या क्र. 1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
6. मुद्या क्र.1 - तक्रारदाराने अहमदाबाद व पुणे येथे ड्राफट घेण्यासाठीची रोख रक्कम रु.66,150/-, धनाकर्ष कमिशन रु.330/-, शारिरिक, मानसिक व आर्थिक नुकसानीची रक्कम रु.20,000/-, नोटीसी नंतरच्या रक्कम वापरण्याच्या 24 टक्के नुकसानी दाखल रु.13,520/- अशी एकुण रक्कम रु.1,00,000/- ची मागणी केलेली आहे. आमचे मते तक्रारदार हा विरुध्द पक्षाकडे धनाकर्ष (ड्राफट) मिळणेकामी भरणा केलेली एकुण रक्कम रु.66,150/- तसेच कमिशनची रक्कम रु.30/- अशी एकुण रक्कम रु.66,180/- विरुध्द पक्षाकडे ड्राफटभोटी भरणा केल्याची दि.2/2/2009 पासुन द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह तसेच शारिरिक, मानसिक व आर्थिक त्रासापोटी रु.3,000/- व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रु.1,000/- विरुध्द पक्षाकडुन मिळण्यास पात्र आहे. सबब आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आ दे श
( अ ) तक्रारदार यांचा तक्रारी अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
( ब ) विरुध्द पक्ष मे.भवानी माता अर्बन को ऑप.सोसायटी लि जळगांव यांना असे निर्देशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारदारास एकुण रक्कम रु. 66,180/- (अक्षरी रु.सहाशष्ट हजार एकशे ऐंशी मात्र ) विरुध्द पक्षाकडे ड्राफटपोटी भरणा केल्याची दि.2/2/2009 पासुन द.सा.द.शे.9 टक्के व्याजासह या आदेशाची प्रत मिळाल्यापासुन 30 दिवसाचे आंत द्यावेत.
( क ) विरुध्द पक्ष मे.भवानी माता अर्बन को ऑप.सोसायटी लि जळगांव यांना असेही निर्देशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारदार यास तक्रार अर्जाचे खर्चापोटी रु.2,000/- या आदेशाच्या प्राप्तीपासुन 30 दिवसाचे आंत द्यावेत.
ज ळ गा व
दिनांकः- 13/08/2013.
(श्रीमती पुनम नि.मलीक ) (श्री.विश्वास दौ.ढवळे )
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगांव.