::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, मा. सौ. कल्पना जांगडे (कुटे) मा.सदस्या)
(पारीत दिनांक :- 13/10/2017)
1. तक्रारकर्त्याने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली आहे. सदर तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे.
2. तक्रारदारकर्त्याचे विरूध्द पक्ष बॅंकेच्या शास्त्रीनगर शाखेत क्र.10669137656 चे बचत खाते असून विरूध्द पक्ष बॅंकेने सदर खात्याला डेबीट कार्ड एटीएम सेवा उपलब्ध करून दिलेली आहे. तक्रारकर्त्यास एटीएम वापराचा चांगला अनूभव असून त्याला एटीएम वापराताना कधीही अडचण गेलेली नाही. तक्रारदाराने पैश्याची आवश्यकता असल्यामुळे दिनांक 29/6/2014 रोजी अंदाजे दुपारी 2.40 वाजता विरूध्द पक्ष यांच्या शाखेतील एटीएम क्रमांक S10MOO1941001 मध्ये डेबीट कार्डचा वापर करून रू.10,000/- काढण्यासाठी कमांड दिली तसेच व्यवहाराची स्लीपदेखील मागीतली. परंतु त्यावेळी अर्जदाराला मशीनमधून रू.10,000/- प्राप्त झाले नाहीत आणी केवळ स्लीप अर्जदाराला मिळाली. मशीनमधून रक्कम प्राप्त न झाल्यामुळे तक्रारकर्त्याने तात्काळ ही बाब सदर एटीएम वर नियुक्त गैरअर्जदाराचे सुरक्षा कर्मीस निदर्शनांस आणून दिली. त्यावर, सदर सुरक्षारक्षकाने सदर एटीएम मधून केवळ रू.5,000/- काढता येतात व तशी सूचना बाजूला लावलेली आहे असे तक्रारकर्त्यांस सांगितले. तक्रारकर्त्याने सदर सूचनेनुसार डेबीट कार्डचा वापर करून रू.5,000/- काढण्यासाठी एटीएम मशीनला कमांड दिली तसेच व्यवहाराची स्लीपदेखील मागीतली. परंतु याही वेळी तक्रारकर्त्यास मशीनमधून रू.5,000/- प्राप्त झाले नाहीत आणी केवळ स्लीप तक्रारकर्त्याला मिळाली. ही बाबदेखील सदर एटीएम वर नियुक्त गैरअर्जदाराचे सुरक्षा कर्मीस निदर्शनांस आणून दिली. त्यावर, सदर सुरक्षारक्षकाने याबाबत बॅंकेत तक्रार दाखल करण्यांस सांगितले. परंतु दिनांक 29/06/2014 रोजी रविवार असल्यामुळे आणी दुस-या दिवशी सोमवारी सदर बॅंक बंद रहात असल्यामुळे तक्रारकर्त्याला सदर तक्रार दाखल करता आली नाही. परंतु थोडया कालावधीनंतर तक्रारकर्त्याच्या खात्यातून रू.10,000/- व रू.5,000/- एटीएम मशीनद्वारे काढले गेल्याचा मेसेज तक्रारकर्त्याचे मोबाईलवर आला. व नंतर थोडया वेळाने तक्रारकर्त्याच्या खात्यात रू.5,000/- पुन्हा जमा करण्यांत आल्याचा मेसेज आला. परंतु रू.10,000/- जमा झाल्याबाबत मेसेज तक्रारकर्त्याला आला नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने दिनांक 1/7/2014 रोजी अंदाजे 12 वाजता विरूध्द पक्षाकडे एटीएममधून रू.10,000/- प्राप्त न झाल्याची लेखी तक्रार दिली तसेच दोन्ही स्लीप् देखील विरूध्द पक्षाला दिल्या. परंतु तक्रारकर्त्याने त्याची पोच विरूध्द पक्षाकडून घेतली नाही. विरूध्द पक्ष यांनी 15 दिवसांचे आंत रू.10,000/- तक्रारकर्त्याचेखात्यात जमा होतील असे आश्वासन दिले. परंतु सदर रक्कम जमा न झाल्यामुळे तक्रारकर्त्याने अनुक्रमे दिनांक 1/7/2014व दिनांक 9/8/2014 रोजी रकमेबाबत विरूध्द पक्षाकडे चौकशी केली असता याबाबत तपास सुरू आहे तुम्ही परत 15 दिवसानंतर या असे तक्रारकर्त्यांस सांगण्यांत आले. परंतु तरीही रक्कम जमा न झाल्यामुळे तक्रारकर्त्याने दिनांक 9/8/2014 रोजी विरूध्द पक्षाकडे लेखी तक्रार करून त्याची पोच घेतली. परंतु सदर तक्रारीची विरूध्द पक्षाने कोणतीही दखल घेतली नाही. बॅंकेचे नियमांनुसार प्रत्येक बॅंकेच्या एटीएम मध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावणे बंधनकारक असून विरूध्द पक्षाकडे सदर एटीएमचे तक्रारकर्त्याच्या व्यवहाराबद्दलचे व्हिडिओ रेकॉर्डींग उपलब्ध आहे. परंतु तक्रारकर्त्याने सदर चित्रफितीची मागणी करूनही विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्याला चित्रफीत तसेच त्या दिवशीचे सदर एटीएम वर झालेले व्यवहार व शेवटी शिल्लक राहिलेली रक्कम याचे विवरण दिले नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने दिनांक 24/11/2014 रोजी अधिवक्त्यामार्फत पंजीबध्द डाकेने विरूध्द पक्षांस नोटीस पाठविली, परंतु विरूध्द पक्षाने दखल घेतली नाही. त्यामुळे प्रस्तूत तक्रार मंचात दाखल करण्यांत आली असून तक्रारीत अशी मागणी केली आहे की तक्रारकर्त्याच्या बचत खात्यामधून विरूध्द पक्ष यांनी वळती केलेली रक्कम रू.10,000/- तक्रारकर्त्याच्या खात्यात जमा करण्याचे तसेच सदर रकमेवर दिनांक 29/6/2014 पासून सदर रक्कम तक्रारकर्त्याचे खात्यात जमा करेपर्यंत रिझर्व्हबॅंकेच्या नियमाप्रमाणे दररोज रू.100/- याप्रमाणे नुकसान-भरपाई तक्रारकर्त्यांस देण्याचे आदेश व्हावेत तसेच शारिरीक व मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई रक्कम रू.50,000/- व तक्रारीचा खर्च रू.15,000/- देण्याचे आदेश व्हावेत.
3. अर्जदाराची तक्रार स्विकृत करुन गैरअर्जदारा विरुध्द नोटीस काढण्यात आले. विरूध्द पक्ष हजर होवून त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले असून त्यात तक्रारकर्त्याचे त्यांचे शाखेत खाते असल्याची बाब मान्य केली आहे. आपल्या विशेष कथनात विरूध्द पक्ष यांनी नमूद केले की तक्रारकर्त्याने दिनांक 29/6/2014 रोजी दुपारी 2.39.40 वाजता रू.10,000/- काढण्यासाठी विरूध्दपक्ष बॅंकेचे एटीएमवर पीन नं. टाकला व दुपारी 2.40.47 वाजता तक्रारकर्त्याला रक्कम रू.10,000/- प्राप्त झाली असून सदर व्यवहार यशस्वीरीत्यापूर्ण झाल्याची नोंद जे.पी. लॉग रिपोर्टमध्ये आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याचे म्हणणे की त्याला रक्कम प्राप्त झाली नाही हे खोटे असून त्यापुष्टयर्थ त्याने कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. त्यानंतर तक्रारकर्त्याने त्याच दिवशी दुपारी 2.41.35 वाजता पुन्हा रू.5000/- काढण्याकरीता एटीएम मशीनमध्ये पीन क्रमांक टाकला परंतु सदर व्यवहाराचे वेळी तांत्रिक कारणामुळे एरर दाखविण्यांत येऊन तक्रारकर्त्याला रक्कम मिळाली नाही हे सुध्दा जे पी रिपोर्टवरून स्पष्ट होते. त्यामुळे विरूध्द पक्षाने लगेच तक्रारकर्त्याचे खात्यात रू.5000/- जमा केले. सदर एटीएम मशीलसमोर स्वयंचलीत सी सी टीव्ही कॅमेरा असून त्या कॅमेरात एटीएम वर व्यवहार करणा’या व्यक्तीचे रेकॉर्डींग होते परंतु तो व्यक्ती किती पैसे काढीत आहे ही बाब रेकॉर्ड होत नाही. तक्रारकर्त्याच्या मागणीनुसार विरूध्द पक्षाने लगेच चौकशी करून व मुंबईच्या स्विच सेंटरला तक्रार देवून जे पी लॉग रिपोर्ट मागविले. विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्याच्या मागणीनुसार तक्रारकर्त्याला एटीएम कार्ड शीटसुध्दा दिलेली आहे. तक्रारकर्त्याने दिनांक 29/6/2014 रोजीचे सदर एटीएमचे त्याच्या रू.10,000/- च्या व्यवहाराचे सी सी टी व्ही.फुटेज मागीतले होते परंतु ते विरूध्द पक्षाकडे नसतात व त्यामुळे विरूध्द पक्षाने ईमेल द्वारे कॉल सेंटर, ए.टी.एम.अॅट लिपीडाटा.इन या कंपनीकडून ते मागविले आहेत. तक्रारकर्त्याला रू.10,000/- प्राप्त झाली असून सदर व्यवहार यशस्वीरीत्यापूर्ण झाल्याची नोंद जे.पी. लॉग रिपोर्टमध्ये आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याचे म्हणणे की त्याला रक्कम प्राप्त झाली नाही हे खोटे असून तक्रारकर्त्याची तक्रार खारीज होण्यांस पात्र आहे. सबब तक्रार खारीज करण्यात यावी अशी विरूध्द पक्षाने विनंती केलेली आहे.
4. तक्रारदारांची तक्रार, दस्ताऐवज, , तक्रारदारांचे शपथपत्र, तक्रारदाराचा लेखी युक्तीवाद तसेच गैरअर्जदाराचे लेखी म्हणणे तसेच लेखी उ्त्तरालाच रिजॉईंडर तसेच लेखी युक्तिवाद समजण्यात यावे अशी पुरसीस दाखल, उभय पक्षांचा तोंडी युक्तीवाद तसेच तक्रारकर्ता व गैरअर्जदार यांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्याबाबतची कारणमिमांसा आणी निष्कर्ष पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
1) तक्रारकर्ता विरूध्द पक्षांचा ग्राहक आहे काय ? : होय
2) विरूध्द पक्षाने तक्रारकर्ताप्रति न्युनता पूर्ण सेवा दिली आहे
काय ? : नाही
3) तक्रारकर्ता मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पाञ आहे काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे.
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 बाबत ः-
5. तक्रारदारकर्त्याचे विरूध्द पक्ष यांच्याकडे क्र.10669137656 चे बचत खाते असून सदर खात्याला विरूध्द पक्षाने डेबीट कार्ड एटीएम सेवा उपलब्ध करून दिलेली आहे ही बाब विरूध्द पक्षांसदेखील मान्य असल्याने तक्रारकर्ता हा विरूध्द पक्षाचा ग्राहक आहे हे सिध्द होत आहे. सबब मुद्दा क्रं. 1 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 2 बाबत ः-
6. तक्रारदाराने रविवार, दिनांक 29/6/2014 रोजी दुपारी 2.39.40 वाजता विरूध्द पक्ष यांच्या शाखेतील एटीएम क्रमांक S10MOO1941001 मध्ये डेबीट कार्डचा वापर करून रू.10,000/- काढण्यासाठी कमांड दिली याबाबत वाद नाही. विरूद्ध पक्षाने दाखल केलेला दस्तावेज जे.पी.लॉग रिपोर्टचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते कि, तक्रारकर्त्याने दिनांक 29/6/2014 रोजी दुपारी 2.39.40 वाजता रू.10,000/- काढण्यासाठी विरूध्दपक्ष बॅंकेचे एटीएमवर पीन नं. टाकला व दुपारी 2.40.47 वाजता तक्रारकर्त्याला रक्कम रू.10,000/- प्राप्त झाली व रु. १०,०००/- WITHDRAWAL असे नमूद असून सदर व्यवहार यशस्वीरीत्यापूर्ण झाल्याची नोंद जे.पी. लॉग रिपोर्टमध्ये आहे. यावरून सदर रक्कम तक्रारकर्त्याला प्राप्त झाली आहे हे सिध्द होते. दिनांक 29/6/2014 रोजी रविवार होता व त्या दिवशी विरूध्द पक्ष बॅंकेचे कामकाज सुरू होते. सदर विरुद्धपक्ष यांची बँक रविवारी सूरू असते व सोमवारी बंद असते. असे असूनही तक्रारकर्त्याने रक्कम न प्राप्त झाल्याबाबत बॅंकेत जावून ताबडतोब तक्रार नोंदविण्याबाबत सुचीत केल्यावरही तक्रारकर्त्याने त्या दिवशी विरूध्द पक्षाकडे लेखी तक्रार नोंदविली नाही व विलंबाने दिनाक ०१.०७.२०१४ रोजी लेखी तक्रार दिली. परतू तक्रारकर्त्याला प्रत्यक्ष रक्कम प्राप्त झाल्याचे दाखल दस्तावेजांवरून सिध्द होते, असे मंचाचे मत आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याला रक्कम काढल्याची पावती प्राप्त झाली परतु रक्कम मिळाली नाही, हे तक्रारकर्त्याचे कथन ग्राहय धरण्यायोग्य नाही, व विरुद्धपक्षाने तक्रारकर्ताप्रति न्युनता पूर्ण सेवा दिली नाही ही बाब सिध्द होते. सबब मुद्दा क्रं. 2 चे उत्तर नकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 3 बाबत ः-
7. मुद्दा क्रं. 1 व 2 च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
(1) तक्रारकर्त्याची तक्रार क्र. 223/2015 खारीज करण्यात येते.
(2) उभय पक्षांनी आपआपला तक्रार खर्च सहन करावा.
(3) उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी .
( अधि.कल्पना जांगडे (कुटे) ) ( अधि. किर्ती गाडगिळ (वैदय) )( श्री उमेश व्ही.जावळीकर)
मा.सदस्या. मा.सदस्या. मा. अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, चंद्रपूर.