::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, मा. सौ. कल्पना जांगडे (कुटे) मा.सदस्या)
१. विरुध्द पक्ष यांनी, तक्रारकर्त्यास ग्राहक संरक्षण अधिनियम अन्वये तरतुदीनुसार सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याने प्रस्तूत तक्रार दाखल केली आहे.
२. तक्रारकर्त्याचे विरुद्धपक्ष यांचेकडे ३२२७४९७११३२ क्रमांकाचे बचत खाते होते व विरुद्ध पक्षांनी ४५९१५१००४३७५४५०१ या क्रमांकाचे एटीएम डेबीट कार्ड दिले होते व सदर कार्ड हे तक्रारकर्त्याकडे होते व तो स्वत:च त्याचा वापर करीत होता. तक्रारकर्ता यांचे खात्यातुन दिनांक १४.०४.२०१५ रोजी अनुक्रमे रक्कम रु. २८,११३.५०/- व रक्कम रु. ९,३७१.१७/- वेळ १७ वाजुन ४४ मिनीट व त्यानंतर पुन्हा १७ वाजुन ४८ मिनीटांनी रक्कम रु. १,८७४.२३/- ए.टी.एम. व्दारे रक्कम कपात झाल्याचा भ्रमणध्वनी संदेश तक्रारकर्ता यांच्या भ्रमणध्वनीवर प्राप्त झाल्याने तक्रारकर्त्याने सदर घटनेची तक्रार तात्काळ विरुध्द पक्षाचे कस्टमर केअरकडे दिली. तरी सुध्दा त्यानंतर पुन्हा दिनांक १५.०४.२०१५ रोजी रात्री १२ वाजुन २५ मिनीटांनी रक्कम रु. ३७,४८४.६५/- व १२ वाजुन २६ मिनीटांनी रक्कम रु. १,८७४.२३/- काढल्याचा भ्रमणध्वनी संदेश तक्रारकर्त्याच्या भ्रमणध्वनीवर आला असे एकुण ५ वेळा रक्कम रु. ७८,७१८.७८/- तक्रारकर्त्याच्या खात्यातुन बेकायदेशिररित्या ए.टी.एम. व्दारे काढलेली आहे.तक्रारकर्त्याने ताबडतोब रजा घेतली व तो चंद्रपुर येथे आला व त्याने झालेल्या घटनेची लेखी तक्रार विरुध्द पक्षाकडे केली तेव्हा विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याकडील ए.टी.एम. कार्ड घेवुन त्याची सत्यता पडताळल्यानंतर तक्रारकर्त्याला उपरोक्त बचत खाते बंद करण्यास सांगीतले. त्याप्रमाणे तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाच्या सांगण्यावरुन सदर खात्यामध्ये जमा असलेली रक्कम काढुन घेतल्यानंतर ते खाते बंद केले, त्याआधी पासबुकमध्ये सदर खात्याच्या व्यवहाराच्या अद्यावत नोंदी करुन घेतल्या होत्या विरुध्द पक्षांनी तक्रारकर्त्याने केलेल्या तक्रारीची दखल न घेतल्याने शेवटी तक्रारकर्त्याने दिनांक १८.०९.२०१५ रोजी पोलीसाकडे सदर घटनेची माहिती दिली. विरुध्द पक्षांनी तक्रारकर्त्याला दिनांक २३.०४.२०१५ रोजीच्या पत्रान्वये सदर घटनेची चौकशी करुन नंतर खात्यातुन काढलेली रक्कम दिनांक ३०.०५.२०१५ पर्यंत जमा केली जाईल असे कळविले. परंतु विरुध्द पक्ष यांनी सदर रक्कम परत केली नाही तसेच पत्राव्दारे काही कळविले नाही. तक्रारकर्त्याने दिनांक १५.०६.२०१५ रोजी वकिलामार्फत पंजीबध्द डाकेने नोटीस पाठविले. सदर नोटीस प्राप्त झाल्यानंतर विरुध्द पक्ष यांनी खोटे उत्तर दिले. विरुध्द पक्ष यांनी डेबीट कार्ड देते वेळी त्याचे सुरक्षेबाबत कोणतीही काळजी घेतली नाही. विरुध्द पक्षाची व्यवहारावर नजर असते परंतु त्यांनी तक्रारकर्त्याच्या खात्यातुन रक्कम वळती करतेवेळी काळजी घेतली नाही. विरुध्द पक्षांनी ग्राहकाचे नुकसान होण्यापासुन सुरक्षा उपाय योजना ठेवायची होती, परंतु त्यांनी ती ठेवलेली नाही. विरुध्द पक्षांनी तक्रारकर्त्याला दिनांक २३.०४.२०१५ रोजीच्या पत्रान्वये रक्कम परत करण्याचे अभिवचन दिल्यावरही उपरोक्त रक्कम परत केली नाही व सेवेत न्युनता दिल्याने तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करुन त्यामध्ये अशी मागणी केली आहे कि, विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांच्या खात्यातुन अवैधरित्या काढण्यात आलेली रक्कम रु. ७८,१७१.७८/- व त्यावर दिनांक ३०.०५.२०१५ पासून १२ टक्के व्याज विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यास देण्याबाबत निर्देश देण्यात यावे तसेच शारिरीक व मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई रक्कम रु. १०,०००/- व तक्रार खर्च रक्कम रु.१०,०००/- विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यास द्यावे अशी विनंती केली आहे.
३. विरुध्द पक्ष यांनी सदर तक्रारीत उपस्थित राहुन लेखी कथन दाखल केले व त्यात नमुद केले कि, तक्रारकर्त्याचे विरुध्द पक्ष यांचेकडे बचत खाते क्र. ३२२७४९७११३२ असुन त्यांनी तक्रारकर्त्याला एक ४५९१५१००४३७५४५०१ क्र. चे ए.टी.एम. कम डेबीट कार्ड दिले होते व विरुध्द पक्ष यांचे अधिका-याच्या सांगण्यावरुन तक्रारकर्त्याने सदर खाते बंद केले व विरुद्ध पक्ष यांनी तक्रारकर्त्यास नविन खाते उघडुन दिले. तक्रारकर्त्याने दिनांक १६.०४.२०१५ रोजी विरुध्द पक्षाकडे त्याचे उपरोक्त खात्यातून अवैधरीत्या रक्कम काढल्या गेल्याने तक्रार दिली. तक्रारकर्त्याने पाठविलेल्या नोटीसला उत्तर दिले सदर बाबि वि.प. यांनी कबुल केलेल्या आहेत व आपल्या विशेष कथनात नमुद केले आहे कि, तक्रारकर्त्याची सदर तक्रार विद्यमान मंचासमक्ष चालु शकत नाही. कारण तक्रारकर्त्याच्या तक्रारीप्रमाणे तक्रारकर्त्याचे ए.टी.एम. कम डेबीट कार्डचा ति-हाईत व्यक्तीने गैरवापर करुन तक्रारकर्त्याचे खात्यातुन रक्कम काढुन घेतले व हि बाब फौजदारी गुन्हा ठरते व त्यामुळे तक्रारकर्त्याने पोलीस स्टेशनला तक्रार देणे अनिवार्य होते व तशी सुचना आणि आवश्यक सर्व दस्तावेज विरुध्द पक्षांनी तक्रारकर्त्यास दिले होते. तक्रारकर्त्याच्या खात्यामधून स्ट़ाटफोर्ड ब्रॉडवा, लंडन येथुन सदर रक्कम काढल्याचे प्राथमिक चौकशीत समजले व त्यामुळे सदर गुन्हा हा सायबर गुन्हेगारीचा आहे व यामध्ये विरुध्द पक्षाची काहीही चुक नसुन विरुध्द पक्ष दोषी नाही. तक्रारकर्त्याच्या ए.टी.एम. कम डेबिट कार्डच्या क्रमांकाचा गैरवापर करुन जर कोणी तक्रारकर्त्याच्या खात्यातुन रक्कम काढत असेल तर यात विरुध्द पक्ष यांचा दोष नसुन तक्रारकर्त्यास कोणतीही न्युनतापुर्ण सेवा दिलेली नाही. सबब तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात यावी अशी विनंती केली आहे.
४. तक्रारकर्त्याची तक्रार, दस्तावेज, शपथपञ तक्रारीतील कथन व शपथपत्रातील मजकूरच तक्रारकर्त्याचा लेखी युक्तीवाद समजन्यात यावा अशी दि. २४.१.२०१७रोजी पुर्सीस दाखल , तसेच विरूध्द पक्ष यांचे लेखी उत्तर व अनुक्रमे दि. २०.११.२०१७ व दि.२१.१२.२०१७ रोजी लेखी कथनालाच शपथपत्र व लेखी युक्तिवाद समजण्यात यावा अशी पुर्सीस दाखल,उभय पक्षांचा तोंडी युक्तिवाद आणि तक्रारकर्ता व विरूध्द पक्ष यांचे परस्पर विरोधी कथन मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष आणि त्याबाबतची कारण मिमांसा पुढील प्रमाणे.
कारण मिमांसा
५. तक्रारकर्त्याचे विरुध्द पक्षाकडे बचत खाते क्र. ३२२७४९७११३२ असुन ४५९१५१००४३७५४५०१ क्र. चे ए.टी.एम. कम डेबीट कार्ड विरुध्द पक्षांनी तक्रारकर्त्यास दिले होते. सदर बाब विरूढपक्ष यांनी मान्य केली असल्याने तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे याबाबत वाद नाही. परंतु तक्रारकर्ता व विरूध्द पक्षांनी तक्रारीत दाखल केलेल्या दस्तावेजांचे अवलोकन केले असता असे निर्दशनास येते कि, तक्रारकर्त्याचे बचत खात्यातुन दिनांक १४.०४.२०१५ रोजी अनुक्रमे रक्कम रु. २८,११३.५०/- , रक्कम रु. ९,३७१.१७/-, रक्कम रु. १,८७४.२३/-व दि. १५.०४.२०१५ रोजी रक्कम रु. ३७,४८४.६५/- ,रक्कम रु. १,८७४.२३/- असे एकुण रक्कम रु. ७८,७१८.७८/- ए.टी.एम. व्दारे रक्कम काढल्या गेली व तक्रारकर्त्याने दिनांक १६.०४.२०१५ रोजी याबाबत विरूध्द पक्षाकडे लेखी तक्रार केली व त्यानंतर तक्रारकर्त्याचे बचत खाते बंद करण्यात आले याबाबत वाद नाही. सदर प्रकरण गुंतागूंतीचे असल्यामुळे निष्कर्षाप्रत येण्याकरीता विस्तृत पुराव्याची आवश्यकता आहे. परंतु सदर बाब मंचाचे मर्यादीत अधिकारक्षेत्रात शक्य नाही असे मंचाचे मत आहे. सबब तक्रारकर्त्यांस योग्य त्या न्यायाधिकरणाकडे दाद मागण्याची मुभा देवून सदर तक्रार निकाली काढण्यांत येते.
सबब, खालीलप्रमाणे आदेश पारित करण्यात येतो.
अंतीम आदेश
(1) तक्रारकर्त्यांस योग्य त्या न्यायाधिकरणाकडे दाद मागण्याची मुभा देवून
तक्रारकर्त्याची तक्रार क्र. १११/२०१६ निकाली काढण्यात येते.
(2) उभय पक्षांनी आपआपला तक्रार खर्च सहन करावा.
(3) उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी .
श्रीमती कल्पना जांगडे (कुटे) श्रीमती किर्ती वैदय (गाडगिळ) श्री उमेश वि. जावळीकर
मा.सदस्या मा.सदस्या मा. अध्यक्ष