नि.19 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 274/2010 नोंदणी तारीख - 16/12/2010 निकाल तारीख - 31/03/2011 निकाल कालावधी – 105 दिवस श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या श्री सुनिल कापसे, सदस्य (श्री सुनिल कापसे, सदस्य यांनी न्यायनिर्णय पारीत केला) ------------------------------------------------------------------------------------ श्रीमती सुवर्णा संजय घारे, रा. द्वारा- तुकाराम विठ्ठल यादव, मु.पो. नारायणवाडी, ता. कराड, जि. सातारा ----- अर्जदार (अभियोक्ता श्री एस.के.गरूड) विरुध्द श्री. बी.टी.किणीकर, शाखा प्रबंधक, भारतीय जीवन बिमा निगम, शाखा-कराड ----- जाबदार (अभियोक्ता श्री एम.जी.कुलकर्णी) न्यायनिर्णय अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 नुसार केलेला आहे. अर्जदार यांचे अर्जातील कथन थोडक्यात खालीलप्रमाणे - 1. अर्जदारचे पतीचे मुंबई येथे मोटार अपघातामध्ये दि. 14/01/2003 रोजी निधन झालेले आहे. त्यांनी जाबदार यांचेकडे सन 2000 साली रू. 50,000/- हजारची विमा पॉलिसी उतरवली होती. अर्जदारचे पतीचे निधनाची बातमी जाबदार यांना कळविल्यानंतर त्यांनी रू.50,000/- चा चेक अर्जदारना दि. 8/9/2003 रोजी दिला त्यानंतर अर्जदार यांनी जाबदार यांचेकडे अपघाती फायदयाची उर्वरित रक्कम मिळणे विषयी मागणी केली असता जाबदार यांनी कै. संजय यांचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट पाठविण्यास सांगितले. सदरचा रिपोर्ट अर्जदार यांनी जाबदार यांना सादर केला परंतु जाबदार यांनी पॉलिसीधारक अपघात समयी मद्याच्या अंमलाखाली असल्याने अपघाताचे फायदयाची रक्कम देता येत नाही असे कळविले. जाबदार यांनी रक्कम बुडविण्याचा उद्देशाने चुकीचे कारण दाखविले आहे. जाबदार यांनी पाठविलेले पत्र अर्जदार यांना दि. 16/5/2008 रोजी मिळाले असल्याने सदरच्या तक्रारीस मुदतीच्या कायदयाची बाधा येत नाही. सबब अपघाती फायद्याची उर्वरीत रक्कम रू. 50,000/- व्याजासहीत मिळावेत तसेच मानसिक त्रास व अर्जाची रक्कम मिळावी यासाठी अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज दाखल केला आहे. 2. जाबदार यांनी प्रस्तुतचे कामी त्यांचे लेखी म्हणणे/कैफियत नि.12 ला दाखल केली आहे. त्यामध्ये त्यांनी अर्जदारचे तक्रारअर्जातील बहुतांश मजकूर नाकारलेला आहे. अर्जदार यांना विमा पॉलिसीची रक्कम मिळाल्यानंतर दि.30/1/2008 चे पत्रानंतर प्रथमच पोस्टमॉर्टेम रिपोर्ट दि. 30/3/2008 रोजी जाबदार यांचेकडे दिला. सदरचे रिपोर्टचे अवलोकन करता विमेदार यांनी मद्याचे प्राशन केल्याने सदरचा अपघात होवून त्याचे अपघातात निधन झाले असे दिसून आले आहे. याबाबत पोलिसांनी मयतावर गुन्हा दाखल केला आहे. विमा पॉलिसीचे नियम व अटी नुसार विमेदाराचे मद्याचे प्राशन केले असता त्यास मृत्यु आल्यास विम्याचे अपघात बेनिफिटची रक्कम मिळत नाही. त्यामुळे अर्जदार यांचा क्लेम नाकारण्यात आला आहे. अर्जदारने मयताचा वाहन परवानाही दाखल केला नाही. अर्जदारची तक्रार मुदतीत नाही. सबब तक्रार खर्चासह नामंजूर करावी असे जाबदार यांनी त्यांचे कैफियतीमध्ये कथन केले आहे. 3. अर्जदारतर्फे दाखल लेखी युक्तिवाद नि.18 पाहिला. जाबदारतर्फे वकील श्री कुलकर्णी यांनी केलेला युक्तिवाद ऐकला. तसेच अर्जदार व जाबदारतर्फे दाखल कागदपत्रे पाहिली. 4. प्रस्तुतचे कामी प्रामुख्याने खालीलप्रमाणे मुद्दे उपस्थित होत आहेत. हे मुद्दे व त्यांना दिलेली उत्तरे खालीलप्रमाणे आहेत. मुद्दे उत्तरे अ) अर्जदार व जाबदार यांचे दरम्यान ग्राहक व सेवा देणारे असे नाते आहे काय ? होय. ब) जाबदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे काय ? नाही. क) अंतिम आदेश - खाली दिलेल्या कारणास्तव अर्जदार यांचा तक्रारअर्ज नामंजूर करणेत येत आहे. कारणे 5. याकामी काही निर्विवाद बाबींची पाहणी करणे जरुरीचे आहे. अर्जदार यांचे पती कै.संजय घारे यांनी जाबदार यांचेकडे रक्कम रु.50,000/- चा विमा उतरविलेला आहे. दि.14/1/2003 रोजी कै संजय घारे यांचे मोटारअपघातामध्ये निधन झाले. सदरची बाब जाबदार यांनी कळविलेनंतर त्यांनी रक्कम रु.50,000/- ची विमा रक्कम अर्जदार यांना अदा केलेली आहे. तदनंतर अर्जदार यांनी जाबदार यांचेकडे अपघाती फायद्याचे रकमेची मागणी केली असता जाबदार यांनी अर्जदार यांचेकडून पोस्ट मॉर्टेम रिपोर्ट मागितला. सदरचे पोस्ट मॉर्टेम रिपोर्टमध्ये अपघातसमयी कै संजय घारे हे मद्याच्या अंमलाखाली असल्याचे नमूद करण्यात आले आहे. जाबदार यांनी अर्जदार यांना दिलेल्या पॉलिसीचे अट क्र. 10.2 नुसार जर विमाधारक हा मद्याच्या अंमलाखाली असताना त्याचा मृत्यू झाला तर जाबदार हे अपघाती फायद्याची रक्कम देण्यास जबाबदार राहणार नाहीत असे स्पष्ट नमूद केलेले आहे. सदरचे अटीनुसार जाबदार यांनी अर्जदार यांची मागणी नामंजूर केली आहे. जाबदार यांनी प्रस्तुतप्रकरणी अर्जदार यांनी कै संजय घारे यांचे वाहन चालविण्याच्या परवाना दाखल करावा अशी मागणी करुनही अर्जदार यांनी सदरचा वाहन चालविण्याचा परवाना दाखल केलेला नाही. 6. वर नमूद निर्विवाद बाबींची पाहणी केली असता एक बाब स्पष्ट होते ती अशी की, जाबदार यांनी अर्जदार यांना कै संजय घारे यांचे निधनानंतर विमारक्कम रु.50,000/- अदा केलेली आहे. त्यानंतर त्यांनी अपघाती फायद्याचे रकमेची मागणी जाबदार यांचेकडे केली असता जाबदार यांनी कै संजय घारे यांचे पोस्ट मॉर्टेम अहवालाची पाहणी केली. सदरचे अहवालानुसार अपघातसमयी कै संजय घारे हे मद्याच्या अंमलाखाली असलयाचे जाबदार यांना दिसून आले. म्हणून जाबदार यांनी अर्जदार यांची मागणी पॉलिसीचे अट क्र.10.2 नुसार नामंजूर केली. जाबदार यांनी याकामी मयत संजय घारे यांचा पोस्ट मॉर्टेम अहवाल व विमा पॉलिसी दाखल केली आहे. सदरचे पोस्ट मॉर्टेम अहवालाचे अवलोकन केले असता अपघातसमयी कै संजय घारे हे मद्याच्या अंमलाखाली होते ही बाब स्पष्ट होते. तसेच जाबदार यांनी दाखल केलेल्या विमा पॉलिसीचे अवलोकन केले असता अट क्र.10.2 नुसार जर विमेधारक हा मद्याच्या अंमलाखाली असेल तर तो अपघाती फायदा मिळणेस पात्र नाही असे स्पष्ट नमूद केलेले आहे. सदरची बाब विचारात घेता कै संजय घारे हे अपघातसमयी मद्याच्या अंमलाखाली असलेने विमा पॉलिसीअंतर्गत अपघाती फायदा नाकारण्याचा जाबदार यांचा निर्णय हा योग्य, संयुक्तिक व कायेदशीर आहे असे या मंचाचे मत आहे. सबब जाबदार यांनी सेवा देण्यामध्ये कोणतीही त्रुटी केलेली नाही असे या मंचाचे मत आहे. 7. या सर्व कारणास्तव व वर नमूद मुद्दयांच्या दिलेल्या उत्तरास अनुसरुन अर्जदार यांचा तक्रारअर्ज नामंजूर करणेत येत आहे. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज फेटाळणेत येत आहे. 2. खर्चाबाबत काहीही आदेश करणेत येत नाहीत. 3. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि. 31/3/2011 (सुनिल कापसे) (सुचेता मलवाडे) (विजयसिंह दि. देशमुख) सदस्य सदस्या अध्यक्ष
| Smt. S. A. Malwade, MEMBER | HONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT | Mr. Sunil K Kapse, MEMBER | |