मंचाचे निर्णयान्वये सौ. जयश्री येंडे, सदस्या.
- आदेश -
(पारित दिनांक – 21/05/2012)
1. तक्रारकर्तीने सदर तक्रार या ग्रा.सं.का.1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली आहे. प्रस्तुत प्रकरणातील तक्रारकर्तीच्या कथनानुसार, तक्रारकर्तीचे मृतक पती श्री. नितीन खोडवे गैरअर्जदार क्र. 3 स्टेट बँकेत कार्यरत होते. त्यांनी आपल्या हयातीत गैरअर्जदार क्र. 2 यांच्या शाखा कार्यालयातून जिवन विमा पॉलिसी दि.19.12.2007 रोजी रु.2,00,000/- एवढया रकमेकरीता, दि.19.12.2007 ते 19.12.2025 या कालावधीकरीता प्रतिमाह रु.1,200/- हप्ता काढलेली होती. तक्रारकर्ती सदर पॉलिसीमध्ये नामनिर्देशीत व्यक्ती होती. गैरअर्जदार क्र. 5 हे गैरअर्जदार क्र. 1 व 2 चे अधिकृत अभिकर्ता आहे. गैरअर्जदार 5 व 6 यांचे गैरअर्जदार क्र. 4 कडे संयुक्त खाते आहे. तक्रारकर्तीचे मृतक पती यांनी दि.19.12.2007 पासून नियमितपणे रु.1,200/- प्रमाणे प्रतिमाह मासिक हप्त्याचे भुगतान केले आहे. सदर रक्कम गैरअर्जदार क्र. 5 यांचे खात्यात वळती करण्यात आली व वळती करुन घेण्यात आलेल्या रकमांचे भुगतान गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना करण्यात येत होते. त्याबाबत गैरअर्जदार क्र. 1 यांनी प्रमाणपत्र सुध्दा तक्रारकर्त्यास दिलेले आहे. गैरअर्जदार क्र. 3 यांच्या बँकेच्या तपशिलावरुन गैरअर्जदार क्र. 5 यांना दि.01.06.2009 पर्यंत सदर रक्कम प्राप्त झाल्याचे दिसून येते.
तक्रारकर्तीचे पती श्री नितीन खोडवे यांचा दि.28.05.2009 रोजी अपघाती मृत्यू झाला. सदर पॉलिसीनुसार पॉलिसीच्या रकमेसोबत, अपघाती मृत्युबाबत मिळणा-या सर्व प्रकारच्या लाभाची रक्कम मिळण्यास तक्रारकर्ती पात्र आहे. तक्रारकर्तीने संपूर्ण दस्तऐवजासह गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडे सदर पॉलिसी अंतर्गत रकमेची देय लाभासह वारंवार लेखी व तोंडी मागणी करुनही अद्यापपावेतो गैरअर्जदार यांनी विमा पॉलिसी अपघाती मृत्यु लाभासह रक्कम तक्रारकर्त्यास दिली नाही. उलट 17.08.2009 रोजी भारतीय जिवन विमा निगम यांनी पत्राद्वारे सदर रक्कम देण्यास नकार दिला ही गैरअर्जदार यांच्या सेवेतील कमतरता आहे.
2. सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदार क्र. 1 ते 6 यांना पाठविण्यात आली असता, गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी व गैरअर्जदार 5 व 6 यांनी लेखी उत्तर दाखल केले. गैरअर्जदार क्र. 3 व 4 यांना नोटीस प्राप्त होऊनही ते मंचासमोर हजर झाले नाही किंवा तक्रारीस लेखी उत्तर दाखल केले नाही, म्हणून मंचाने त्यांचेविरुध्द एकतर्फी कारवाई चालविण्याचा आदेश पारित केला.
3. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी तक्रारकर्त्याने सदर पॉलिसी घेतल्याचे व गैरअर्जदार क्र. 5 ही त्यांची एजेंट असल्याचे तक्रारकर्त्याचे म्हणणे मान्य केले. परंतू तक्रारकर्त्याचे इतर आरोप अमान्य केले आहे. गैरअर्जदार यांच्या कथनानुसार सदर पॉलिसीवर विमा धारक हयात असतांना, तसेच विमा धारकाचे मृत्युनंतरचे फायदे, तसेच हप्त्याची रक्कम, शेवटचा देय हप्त्याचा संपूर्ण तपशिल दिलेला आहे. त्याचे विमाधारकाने काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. तसेच सदर पॉलिसीचे फायदे मिळण्यासाठी ती पॉलिसी चालू स्थितीत (In force) ठेवणे आवश्यक आहे. गैरअर्जदार यांचे कथनानुसार गैरअर्जदार क्र. 5 ही त्यांची अभिकर्ता (एजंट) असली तरी तिला गैरअर्जदार क्र. 1 मार्फत रीन्युअल प्रीमीयम घेण्याचे कुठलेही अधिकार नाही. तक्रारकर्ता व गैरअर्जदार क्र. 5 यांचे काय संबंध व व्यवहार, तसेच पॉलिसी हप्ते भरण्याची काय व्यवस्था केली होती याचेशी गैरअर्जदार यांचा कुठलाही संबंध नाही. सदर पॉलिसी अंतर्गत गैरअर्जदार यांना मार्च 2009 पर्यंत हप्ते प्राप्त झालेले आहे. तसे तक्रारकर्त्यास कळविलेले आहे. वास्तविक विमा पॉलिसीच्या अटी व शर्ती विमा धारकास बंधनकारक आहे. तो विमाधारक व विमा महामंडळ यातील एक करार असून त्यासाठी ते दोघेच जबाबदार आहे. सदर पॉलिसीमध्ये एजंटला पैसे भरायचे अधिकार नाहीत. त्यामुळे विमाधारक किंवा एजंट मधील खाजगी कराराशी गैरअर्जदार क्र. 1 यांना काहीही देणे घेणे नाही. त्यामुळे गैरअर्जदार लॅप्स पॉलिसीचे पैसे (दावा) मंजूर करण्यास जबाबदार नाहीत. वास्तविक पॉलिसीचे हप्ते नियमित भरावे म्हणून गैरअर्जदार यांनी ठिकठिकाणी कार्यालय उघडले. तसेच अनेक प्रकारच्या सुविधा उदा. इंटरनेटने हप्ते भरणे, ऑनलाईन हप्ते भरणे, क्रेडीट कार्डद्वारे, मोबाईल पोर्टद्वारे, मेट्रो एरीया नेटवर्क, इलेक्ट्रॉनिक क्लीयरींग सिस्टीम वगैरे उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. गैरअर्जदार यांना मार्च 2009 पर्यंत हप्ते प्राप्त झालेले आहेत. त्या पैशाची जबाबदारी गैरअर्जदार स्विकारु शकते. विमाधारकाचा मृत्यु 28.05.2009 रोजी झाला. परंतू मार्च 2009 नंतरचे हप्ते भरण्यात न आल्यामुळे पॉलिसी मृत्युचे तारखेस बंद अवस्थेत होती, त्यामुळे तक्रारकर्त्यास (नॉमिनी) काहीही रक्कम देय होत नाही. तक्रारकर्त्याने आपली तक्रार CRM/WZO कडे केली होती. परंतू त्यांनी पत्राद्वारे सिनीयर डिव्हीजनल मॅनेजर, नागपूर यांना दावा नामंजूर झाल्याचे कळविले. तसेच दावा विभागाने दि.07.10.2009 रोजी पत्राद्वारे तक्रारकर्त्यास दावा नाकारल्याचे कळविले आहे. त्याचप्रमाणे तक्रारकर्त्याने Insurance Ombudsman Mumbai कडे तक्रार केली होती. त्यांनीसुध्दा विमाधारकाच्या मृत्युसमयी ती बंद अवस्थेत असल्यामुळे विमा रक्कम नाकारली आहे. वरील सर्व बाबी लक्षात घेता, गैरअर्जदार यांनी पॉलिसीच्या अटी व शर्तींना अधीन राहून निर्णय घेतला, यात कुठलीही सेवेतील कमतरता नाही.
4. गैरअर्जदार क्र. 5 व 6 यांनी पॉलिसी घेतल्याचे कथन मान्य केलेले आहे. परंतू इतर आरोप अमान्य केलेले आहेत. गैरअर्जदार क्र. 5 व 6 यांच्या कथनानुसार तक्रारकर्त्याने दि.19.12.2007 प्रतीमाह रु.1,200/- प्रमाणे भुगतान केल्याची बाब जरी नमूद केली असली तरी सदर भुगतान तक्रारकर्तीने सदर गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांचेकडे करावयास पाहिजे होते. गैरअर्जदार क्र. 5 व 6 यांनी सदर मासिक हप्त्याचे भुगतान त्यांच्या संयुक्त खात्यामार्फत करण्याचा सुरुवातीपासून विरोध केला व कायदेशीररीत्या गैरअर्जदार क्र. 5 व 6 यांना गैरअर्जदार क्र. 1 व 2 मार्फत हप्ता स्विकारता येत नाही ही बाबसुध्दा तक्रारकर्त्यास सुचित करण्यात आली होती. परंतू तक्रारकर्ती व तिचे पतीने गैरअर्जदार क्र. 3 यांचेशी चांगले संबंध असल्यामुळे त्यांनी गैरअर्जदार क्र. 5 व 6 यांच्या खात्यात सदर रक्कम जमा करुन ती गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना देण्यास भाग पाडले. त्यांचे नुकसान होऊ नये, म्हणून सदर जमा झालेली रक्कम गैरअर्जदार क्र. 1 व 2 कडे नियमितपणे जमा केले. तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु दि.28.05.2009 रोजी झाला. फेब्रुवारी 2009 मध्ये गैरअर्जदार क्र. 5 हीने श्री. नायडू, विकास अधिकारी व श्री मनोज पांडे अभिकर्ता, जिवन विमा निगम यांचेसमक्ष तक्रारकर्ती व तिचे पतीला त्यांचा मासिक हप्ता गैरअर्जदार क्र. 5 व 6 यांच्या संयुक्त खात्याच्या माध्यमातून न भरण्याची आधिच सुचना व ताकिद दिली होती व त्यानंतरही तक्रारकर्ती व तिचे पतीने हप्ता भरण्यास त्या हप्त्याची रक्कम भरण्याची जबाबदारी ही गैरअर्जदार क्र. 5 ची राहणार नाही असे स्पष्टपणे सांगूनही तक्रारकर्ती व तिचे पतीने मार्च 2009 मध्ये गैरअर्जदार क्र. 5 व 6 यांच्या सदर खात्यात मासिक हप्ता जमा केला. पुन्हा गैरअर्जदार क्र. 5 यांनी सदर हप्ता भरण्याचा अधिकार नसल्याचे सांगितले व सामाजिक माणुसकीच्या नात्याने शेवटी मार्च 2009 चा मासिक हप्ता गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांचेकडे जमा केला व पुढील महिन्यास सदर हप्ता जमा करण्यास नकार दिला. तरीसुध्दा तक्रारकर्तीच्या मृतक पतीने गैरअर्जदार यांच्या संयुक्त खात्यात एप्रिल व मे 2009 मध्ये विमा हप्त्याची रक्कम जमा केलेली दिसून येते. याचाच अर्थ तक्रारकर्ती व तिचे पती यांनी कायदेशीर जबाबदारी टाळून स्वतःची जबाबदारी दुस-यावर लादण्याचा प्रयत्न करीत होते हे दिसून आल्यावर सदर रकमा गैरअर्जदार क्र. 5 व 6 यांनी गैरअर्जदार क्र. 1 व 2 कडे जमा केले नाही व सदर रकमा तक्रारकर्तीच्या पतीने स्विकारुन कायदेशीररीत्या त्याचा भरणा करावा असे सुचविले. तक्राकर्तीच्या पतीने स्वतःची जबाबदारी पूर्ण न केल्याने त्यांची पॉलिसी संपुष्टात आली. गैरअर्जदार दावा रक्कम देणार नाही याची पूर्ण कल्पना असल्यामुळे तक्रारकर्त्याने दि.01.06.2009 रोजी पतीच्या मृत्युनंतर दोन दिवसातच विमा हप्त्याची रक्कम गैरअर्जदार क्र. 5 च्या संयुक्त खात्यात जमा करुन गैरअर्जदार क्र. 1, 2 व 5 संयुक्तपणे गोवण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे ती पॉलिसीचा लाभ मिळण्यास पात्र नाही. वरील सर्व बाबी लक्षात घेता, सदर तक्रार खारीज करण्याची मागणी केली आहे.
5. सदर प्रकरण युक्तीवादाकरीता आल्यानंतर मंचाने सर्व पक्षांचा युक्तीवाद ऐकला. गैरअर्जदार क्र. 5 व 6 यांनी लेखी युक्तीवाद दाखल केला. मंचाने दाखल दस्तऐवजांचे अवलोकन केले असता, मंच खालील निष्कर्षाप्रत आले.
-निष्कर्ष-
6. निर्विवादपणे तक्रारकर्त्याचे मृतक पती श्री नितीन उत्तमराव खोडवे यांनी गैरअर्जदार विमा कंपनीकडून जिवन छाया पॉलिसी विथ प्रॉफीट एक्सीडेंट बेनीफीट ही पॉलिसी घेतलेली होती. तिचा क्र. 976000361 असून कालावधी 19.12.2007 ते 19.12.2025 (18 वर्ष) असा असून पॉलिसी रक्कम रु.2,00,000/- करीता होती. त्याकरीता प्रतिमाह रु.1,200/- प्रमाणे प्रीमीयम पॉलिसी धारकाने अदा करावयाचे होते.
7. सदर पॉलिसी अंतर्गत जर पॉलिसीधारकाचा मृत्यु अपघाताने जाण्यास त्याला दुप्पट विमा रक्कम, तसेच पुढील विमा हप्ते माफ होतात. तसेच इतरही फायदे मिळतात (दस्तऐवज क्र. 11) असे निदर्शनास येते. निर्विवादपणे पॉलिसीच्या वैध कालावधीमध्ये दि.28.05.2009 रोजी तक्रारकर्तीचे पती यांचा अपघाती मृत्यु झालेला होता. सदर पॉलिसी अंतर्गत तक्रारकर्त्याने गैरअर्जदार यांचेकडे सदर पॉलिसीचे लाभ मिळावे, म्हणून दावा दाखल केला असता तक्रारकर्त्यास मार्च 2009 व एप्रिल 2009 या महिन्याचे प्रीमीयम अदा केलेले नव्हते. त्यामुळे ‘मृतकाचे मृत्युसमयी पॉलिसी अकार्यान्वीत (लॅप्स) झाले’ (दस्तऐवज क्र.29) या कारणास्तव सदर दावा नाकारला.
8. परंतू तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तऐवजांचे निरीक्षण करता या मंचाचे असे निदर्शनास येते की, तक्रारकर्तीचे मृतक पती यांनी त्यांच्या मृत्युपर्यंत पॉलिसीचे हप्ते नियमितपणे गैरअर्जदार यांचे अधिकृत अभिकर्ता (एजंट) यांच्यामार्फत गैरअर्जदार क्र. 5 यांच्या बँकेत असलेल्या खात्यात जमा केलेले होते. गैरअर्जदार क्र. 5 यांनी ते कुठलाही आक्षेप न नोंदविता स्विकारले. त्यापैकी फेब्रुवारी पर्यंतचे हप्ते गैरअर्जदार क्र. 5 यांनी गैरअर्जदार विमा कंपनीला अदा केले व गैरअर्जदार कंपनीने कुठलाही आक्षेप न घेता ते स्विकारले. तसेच मार्च 2009 व एप्रिल 2009 चा हप्ता गैरअर्जदार क. 5 हिने गैरअर्जदार विमा कंपनीकडे भरला नाही असेदेखील दिसून येते. गैरअर्जदार क्र. 5 च्या म्हणण्यानुसार फेब्रुवारी 2009 मध्ये गैरअर्जदार यांचे विकास अधिकारी व गैरअर्जदार क्र. 5 यांनी तक्रारकर्ती व तिचे पतीस पुढील महिन्याचे विमा हप्ते त्यांनी भरावे अशी ताकिद दिली असतांना देखील तक्रारकर्तीचे पतींनी विमा हप्ते गैरअर्जदार क्र. 5 व 6 च्या खात्यात जमा केले. परंतू या म्हणण्यापोटी गैरअर्जदार क्र. 5 ने कुठलाही पुरावा सादर केला नाही. उलट दस्तऐवजावरुन मार्च 2009 चा हप्ता गैरअर्जदार क्र. 5 हीने विमा कंपनीकडे भरला व तो गैरअर्जदार कंपनीने स्विकारला असे दिसून येते. गैरअर्जदार क्र. 5 यांनीदेखील आपल्या उत्तरात तसेच दस्तऐवजावरील पत्रानुसार मार्च 2009 पर्यंतचे हप्ते प्राप्त झाल्याचे तक्रारकर्त्यास कळविलेले दिसून येते. त्यामुळे गैरअर्जदार क्र. 5 हीचे सदर म्हणणे या मंचाला मान्य करता येणार नाही.
9. गैरअर्जदार विमा कंपनीचे मते करारानुसार विम्याचे हप्ते भरण्याची जबाबदारी ही विमा धारकाची आहे. पॉलिसीमध्ये एजंटला पैसे भरावयाचे अधिकार नाही. परंतू हा नियम जरी असला तरी विमा कंपनीने मार्च 2009 पर्यंतचे हप्ते स्विकारले व त्यावर कुठलाही आक्षेप न घेतल्यामुळे असे दिसून येते की, विमा कंपनीला ही पध्दत मान्य आहे. त्यामुळे “Doctrine of Estoppel” ह्या नियमाप्रमाणे गैरअर्जदार कंपनीला ही पध्दत नंतर नाकारता येणार नाही. तसेच गैरअर्जदार क्र. 5 हे गैरअर्जदार विमा कंपनीचे अधिकृत एजंट असल्यामुळे एजंटची कृती ही प्रींसीपल वर बंधनकारक असते. त्यामुळे वरील वस्तूस्थितीचा विचार करता तक्रारकर्त्याने एजंटकडे भरलेले पैसे हे गैरअर्जदार विमा कंपनीला मिळाले असे ग्राह्य धरण्यात येते व सदर विमा पॉलिसीचे फायदे तक्रारकर्तीस मिळावयास पाहिजे या निर्णयाप्रत हे मंच येते.
10. तक्रारकर्ता हा गैरअर्जदार क्र. 6 चा ग्राहक नसल्यामुळे त्याला तक्रारकर्तीच्या नुकसान भरपाईकरीता जबाबदार धरता येणार नाही. तसेच गैरअर्जदार क्र. 3 व 4 यांनी दिलेल्या सेवेत कुठलीही कमतरता दिसून येते. सबब आदेश.
-आदेश-
1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2) गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी वैयक्तीकरीत्या व संयुक्तरीत्या तक्रारकर्तीस दुप्पट लाभासहीत पॉलिसी रक्कम द्यावी. तसेच पॉलिसीतील अटी व नियमानुसार मिळणारे सर्व लाभ तक्रारकर्तीस द्यावे.
3) गैरअर्जदार क्र. 5 यांनी तक्रारकर्तीस नुकसान भरपाईपोटी रु.25,000/- द्यावी.
4) गैरअर्जदार क्र. 1 व 2 वैयक्तीकरीत्या व संयुक्तरीत्या गैरअर्जदार क्र. 3 यांनी तक्रारकर्तीस दाव्याच्या खर्चापोटी रु.5,000/- द्यावे.