(मंचाचा निर्णय : श्री. सतीश देशमुख - सदस्य यांचे आदेशांन्वये)
-// आ दे श //-
(पारित दिनांक : 08/04/2013)
1. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल सदर प्रकरणात तक्रारकर्त्याचे वकील श्री. सोलट यांनी दि. 25.03.2012 रोजी दाखल केलेल्या पुरसीस अन्वये या न्याय मंचाला असे कळविले आहे की, सदर प्रकरणात विरुध्द पक्षाने दि.18.01.2012 रोजी व दि.09.03.2012 रोजीचे प्रतिज्ञापत्रावर दाखल केलेल्या लेखी जबाबातील परिच्छेद क्र.3 मधे नमुद केल्यानुसार मुळ रक्कम व अपघाती लाभाची रक्कम रु.5,00,000/- ही धनादेशाव्दारे तक्रारकर्त्याला प्राप्त झालेली आहे. करीता तक्रारीतील मुळ रकमेची प्रार्थना वगळून खालील प्रार्थना केली आहे...
प्रार्थनाः- 1. अपघात लाभाची रक्कम रु.5,00,000/- वर दि.18.08.2008 पासुन ते 12.01.2012 पावेतो 18% व्याज मिळावे, (2) तक्रारीचा खर्च मिळावा, करीता सदर तक्रार प्रकरणातील मुळ रक्कम प्राप्त झापल्यामुळे वरील प्रार्थना आदेशाकरीता शिल्लक आहे व आदेश याच मुद्दावर आहे.
2. मुख्य मुद्दा असा की, तक्रारकर्ती ही विरुध्द पक्षाकडून व्याज रक्कम मागण्यांस पात्र ठरते काय ?
उत्तर – अंतिम आदेशानुसार.
3. मुळ तक्रारीचा थोडक्यात आशय असा आहे की, तक्रारकर्तीचे मृतक पती श्री. जगजितसिंग बावा यांनी त्यांचे हयातीत वि.प.विमा कंपनीकडून दि.09.02.2003 रोजी रु.5,00,000/- ची जिवन आनंद ही दुर्घटना लाभासहित पॉलिसी घेतली होती. तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु हा दि.29.12.2006 रोजी त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने नदीचे पात्रात पडल्याने झाला. सदर घटनेची तक्रार कामठी पोलिस स्टेशनला देण्यात आली व त्यानुसार पोलिस तपास व मर्ग समरी करण्यात आली.
वि.प.कडे मृतक विमाकृत असल्याने तक्रारकर्तीने संपूर्ण कागदपत्रे वि.प.कडे दाखल करुन दि.03.09.2007 रोजी पॉलिसीची संपूर्ण लाभासह विमा रक्कम मिळण्याकरीता विमा दावा दाखल केला असता वि.प.विमा कंपनीने मुळ रक्कम अदा केली व अपघात लाभच्या रकमेचा विमा दावा दि. 18.08.2008 पर्यंत मंजूर केला नाही अथवा नाकारलाही नाही व सदर दावा हा विचाराधीन आहे असे 18.08.2008 चे पत्रांन्वये कळविले. परंतू प्रत्यक्षात दावा निकाली काढला नाही.
त्याचप्रमाणे दि.12.03.2011 चे पत्रांन्वये मृतकाचे मृत्युचे कारण स्पष्ट होत नसल्याबाबत कळविले. तक्रारकर्तीनुसार, तक्रारकर्तीने पतीचे अपघातापासून तर मृत्युपर्यंतची सर्व कागदपत्रे वि.प.कडे दाखल केलेली असतांना विमा कंपनीने तक्रारकर्तीचा अपघाती लाभ दावा निकाली न काढल्याने वि.प.ची सदर कृती ही ग्रा.सं.का.1986 अंतर्गत कलम 2 (i) (g) नुसार सेवेतील त्रुटी व अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब करणारी आहे. करिता तक्रारकर्तीने सदर तक्रार प्रतिज्ञापत्रावर एकूण 10 दस्तऐवजासह या मंचात दाखल केलेली आहे.
4. सदर तक्रार या मंचासमोर प्रलंबित असतांना, वि.प.ने तक्रारकर्तीचा विमा दावा मंजूर करुन विमा दाव्याची एकूण रक्कमेचा धनादेश दुर्घटनालाभासह, पंजिकृत डाकेने तक्रारकर्तीला दि.18.01.2012 रोजी पाठविला.
5. तक्रारकर्तीने सदर रक्कम कुठलाही आक्षेप न घेता स्विकारली आहे. करिता वि.प.ने त्यांचे दि.09.03.2013 रोजी दाखल केलेल्या लेखी उत्तरात परिच्छेद क्र. 3 मध्ये उल्लेख करुन, युक्तीवादादरम्यान मंचासमोर दि.25.03.2013 तसे नमूद केले व सदर तक्रार खारिज करण्याबाबत विनंती केली.
6. त्यावर तक्रारकर्तीच्या वकिलांनी पुरसिस दाखल करुन, तक्रारीतील आपली प्रार्थना पुरसिसद्वारे मान्य करावी असे निवेदन केले. करिता सदर तक्रारीत उपरोक्त उल्लेखित मुद्दा शिल्लक राहतो.
-निष्कर्ष-
7. उभय पक्षांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे व लेखी तोंडी युक्तीवादाचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, तक्रारकर्तीने तिच्या मृतक पतीचा विमा दावा 29.12.2006 रोजी दाखल केलेला आहे. तथापि, विमा कंपनीने सदर दाव्याविषयी दि.29.12.2006 ते दि. 18.08.2008 पर्यंत दाव्या संदर्भात कोणतीही कारवाई केलेली नाही. दि.18.08.2008 च्या पत्रांन्वये वि.प.ने दावा विचाराधिन असल्याचे कळविले आहे.
8. त्यानंतर दि.12.03.2011 रोजीचे पत्रानुसार पुनः दावा विचाराधिन असल्याचे पत्र दिलेले आहे व त्यानंतर दि.17.01.2012 रोजी धनादेश क्र.106219 या धनादेशाद्वारे तक्रारकर्तीचा संपूर्ण दावा निकाली काढण्यात आलेला असल्याचे दिसून येते. थोडक्यात, वि.प.ने तक्रारकर्तीचा संपूर्ण दावा निकाली काढण्याकरीता, कार्यालयीन पडताळणी/शहानीशा झाल्यानंतरही दि.18.08.2008 ते 17.01.2012 इतका 3 वर्षे 4 महिन्यांचा कालावधी लावलेला आहे व या दरम्यान विमा दावा मंजूर अथवा नाकारल्याबाबत तक्रारकर्तीला कोणतीही माहिती अथवा पत्र दिलेले नाही.
मा. राष्ट्रीय आयोगाने खालील निवाडयामध्ये असे मत केले आहे की, The New India Assurance Co. Ltd. –v/s- Purshotam Gokuldas Mateb Co, 1995(1) CPR 843, 1995(2) CPJ 156 NC. “Insurance – claim not settled nor repudiated deficiency in service- the claim filed was not settled nor repudiated by the company. Hold that it amount to deficiency in service.”
सदर प्रकरणात वि.प.कडून तक्रारकर्तीला सेवा देण्यात निष्काळजीपणा झाल्याचे सिध्द होते असे मंचाचे मत आहे, म्हणून तक्रारकर्ती सदर प्रकरणी पॉलिसीतील अपघात लाभ रकमेवर व्याज मिळण्यास व तक्रारीचा खर्च मिळण्यास पात्र ठरते. करिता हे मंच खालील अंतिम आदेश पारित करीत आहे.
-आदेश-
1) तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2) वि.प.ला आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्तीला दि.18.08.2008 पासून दि. 18.01.2012 पर्यंत दुर्घटना लाभाची रक्कम रु.5,00,000/- वर द.सा.द.शे. 9%प्रमाणे व्याजाची रक्कम द्यावी. 3) वि.प.ने तक्रारकर्तीला तक्रारीचे खर्चाबाबत रु.1500/- द्यावे. 4) सदर आदेशाचे पालन वि.प.ने आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 90 दिवसाचे आत करावे.