श्री. मिलींद केदार, सदस्य यांचे आदेशांन्वये. - आ दे श - (पारित दिनांक : 24/11/2010) 1. प्रस्तुत तक्रार ही तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत दाखल केलेली असून तक्रारकर्तीच्या तक्रारीचा आशय असा की, तिचा मृतक मुलगा सूरजलाल भगवानजी रच्छोरे हा जिल्हा परीषद प्राथमिक शाळा, हिवरा हिवरी, ता रामटेक येथे शिक्षक पदावर कार्यरत असतांना त्याने गैरअर्जदाराकडून ‘विमा किरण’ नावाची पॉलिसी क्र.972170245, टेबल क्र.111-25 ही रु.1,00,000/- विमा सुरक्षा रकमेची असून दि.28.03.1995 ते 28.02.2020 कालावधीकरीता रु.98/- प्रीमीयम प्रतिमाहप्रमाणे काढली होती. सदर विमाधारकाचा मृत्यू हा 28 ऑगस्ट 2007 रोजी अपघात होऊन झाला. याबाबतची सुचना पोलीस स्टेशन, पारशिवनी यांना देण्यात आली. तसेच 19.09.2007 रोजी गैरअर्जदाराकडे विमा दावा सादर करण्यात आला. गैरअर्जदारांनी दि.20.03.2008 रोजी तक्रारकर्तीला विमा दावा निकालात काढण्याकरीता पोलीस तपासात निघालेल्या निष्कर्षासंबंधी अंतिम अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. परंतू तक्रारकर्तीला सदर अहवाल प्राप्त न झाल्याने ती गैरअर्जदारांना सदर अहवाल पूरविण्यास असमर्थ ठरली. तक्रारकर्तीने माहितीच्या अधिकारांतर्गत अर्ज करुन माहिती मागविली असता गैरअर्जदाराने तिला पॉलिसीधारकाने आजपर्यंत भरलेली रक्कम परत मिळण्यास ती पात्र असल्याचे कळविले. तसेच मे 1995 ते डिसेंबर 1995 पर्यंत प्रीमीयम प्राप्त नसल्याचेही कळविले आहे. तक्रारकर्तीच्या मते गैरअर्जदाराने न प्राप्त झालेल्या प्रीमीयमबाबत कधीच संबंधीत कार्यालयाला विचारणा केलेली नाही व विमा दावा दाखल केल्यावर त्याबद्दल वाद उत्पन्न करीत आहे. तक्रारकर्तीने सदर तक्रारीद्वारे विमा पॉलिसीची राशी व्याजासह, शारिरीक व मानसिक त्रासाबाबत रु.50,000/- व तक्रारीच्या खर्चाबाबत रु.10,000/- मिळावे अशा मागण्या केलेल्या आहेत. 2. सदर तक्रारीचा नोटीस गैरअर्जदारावर बजावण्यात आला असता त्यांनी मंचासमोर हजरही झाले नाही किंवा तक्रारीस लेखी उत्तर दाखल केले नाही, म्हणून मंचाने त्यांच्याविरुध्द एकतर्फी कारवाई चालविण्याचा आदेश दि.26.10.2010 रोजी पारित केला. 3. मंचासमोर सदर प्रकरण युक्तीवादाकरीता आले असता मंचाने तक्रारकर्तीचा युकतीवाद ऐकला. गैरअर्जदार अनुपस्थित. मंचाने सदर प्रकरणी तक्रारकर्तीने दाखल केलेल्या कथनाचे व दस्तऐवजांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्कर्षाप्रत आले. -निष्कर्ष- 4. तक्रारकर्तीने दस्तऐवज क्र. 1 वर पॉलिसीची प्रत दाखल केलेली आहे. सदर प्रतीवर नामनिर्देशित व्यक्ती म्हणून तक्रारकर्तीचे नाव नमूद आहे. तसेच मृतक सूरजलाल भगवानजी रच्छोरे तक्रारकर्तीचा मुलगा असल्याने तक्रारकर्ती ही लाभार्थी म्हणून गैरअर्जदाराची ग्राहक ठरते. 5. गैरअर्जदाराने तक्रारकर्तीच्या मृतक मुलाचा विमा दावा निकाली काढण्याकरीता पोलीस तपासात निघालेल्या निष्कर्षासंबंधी अंतिम अहवाल दाखल करण्यास सांगितले. मंचाने सदर प्रकरणी दाखल दस्तऐवजांच्या प्रतींचे अवलोकन केले असता गैरअर्जदाराने पोलीस स्टेशन, रामटेक यांना सदर अहवाल सादर करण्याबाबत सुचित केले आहे. मात्र तक्रारकर्तीला सदर दस्तऐवज दाखल करण्याकरीता निर्देशित केल्याबाबतचे दिसून येत नाही. जेव्हा तक्रारकर्तीने माहितीच्या अधिकारांतर्गत विचारणा केली, तेव्हा गैरअर्जदाराने ही बाब तक्रारकर्तीसमोर उघड केली आहे. तक्रारकर्तीने दि.19.09.2007 रोजी विमा दावा दाखल केल्यानंतर तिला सदर बाब 26.02.2010 रोजी माहितीच्या अधिकारांतर्गत विचारणा केल्यावर समजलेली आहे. गैरअर्जदाराची सदर कृती सेवेतील निष्काळजीपणा दर्शविते. त्यामुळे तक्रारकर्ती सदर प्रकरणी दाद मिळण्यास पात्र ठरते. 6. पॉलिसीच्या प्रतीमध्ये अपघाती मृत्यु झाल्यास रु.1,00,000/- हितलाभ नमूद आहे. तसेच शव विच्छेदन अहवालाचे अवलोकन केले असता त्यामध्ये मृत्युचे कारण बुडाल्यामुळे झाल्याचे नमूद आहे. त्यामुळे तक्रारकर्ती अपघाती हितलाभ मिळण्यास पात्र ठरते असे मंचाचे मत आहे. गैरअर्जदाराने तक्रारकर्तीला रु.1,00,000/- विमा दाव्याबाबतची रक्कम आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसाच्या आत द्यावी अन्यथा आदेश पारित दिनांकापासून तर प्रत्यक्ष रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याज सदर रकमेवर दंडनीय व्याज म्हणून मिळण्यास तक्रारकर्ती पात्र राहील. 7. तक्रारकर्तीने शारिरीक व मानसिक त्रासाबाबत रु.50,000/- ची मागणी केलेली आहे. परंतू सदर अवाजवी मागणीबाबत उचित पुरावा दाखल केलेला नाही. तक्रारकर्तीला प्रलंबित असलेल्या दाव्यामुळे रक्कम मिळण्यास उशिर लागल्याने मानसिक व शारिरीक त्रास सहन करावा लागला ही बाबही तेवढीच स्पष्ट आहे. मंचाचे मते कायदेशीरदृष्टया व न्यायोचितदृष्टया तक्रारकर्ती रु.5,000/- मिळण्यास पात्र आहे. तसेच तक्रारीच्या खर्चाबाबत रु.2,000/- मिळण्यास पात्र आहे. उपरोक्त निष्कर्षावरुन मंच सदर प्रकरणी खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे. -आदेश- 1) तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2) गैरअर्जदाराला आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्तीला रु.1,00,000/- विमा दाव्याबाबतची रक्कम आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसाच्या आत द्यावी अन्यथा आदेश पारित दिनांकापासून तर प्रत्यक्ष रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के सदर रकमेवर दंडनीय व्याज देण्यात गैरअर्जदार बाध्य राहील. 3) गैरअर्जदाराने तक्रारकर्तीला मानसिक व शारिरीक त्रासाकरीता भरपाई म्हणून रु.5,000/- द्यावे. तसेच तक्रारीच्या खर्चाबाबत रु.2,000/- द्यावे. 4) सदर आदेशाचे पालन गैरअर्जदाराने आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत करावे.
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |