(मंचाचा निर्णय: श्री. विजयसिंह राणे - अध्यक्ष यांचे आदेशांन्वये) -// आ दे श //- (पारित दिनांक :08/07/2011) 1. प्रस्तुत तक्रार तक्रारकर्त्यानी ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारा विरुध्द मंचात दिनांक 12.10.2010 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :- 2. यातील तक्रारकर्त्याचे थोडक्यात तक्रार अशी आहे की, त्याची पत्नी आणि तो यांची संयुक्त जीवन विमा पॉलिसी क्र.970760576 होती. पत्नी व त्याचेमधील विवाह संपुष्टात येऊन कॉटूंबिक न्यायालयात घटस्फोट डिक्री मिळाली. त्यावर गैरअर्जदार क्र.5 ने उच्च न्यायालयात अपील केले आहे. ते एकत्र राहत नसल्यामुळे पॉलिसी बंद करावी अशी तक्रारकर्त्याने विनंती केली. विमा कंपनीतर्फे त्यांना असे सांगण्यांत आले की, अश्या परिस्थितीत पॉलिसी पुढे चालविण्यांत येत नाही, ती बंद करण्यांत येते आणि अर्धी-अर्धी रक्कम विभागून देण्यांत येते. यावर विमा कंपनीच्या विधी विभागाने लवकर निर्णय घेतला नाही, दरम्यान पॉलिसी दि.20.08.2010 रोजी मॅच्यूअर झाली आणि अवधी संपल्यानंतर त्या प्रकरणाचा निपटारा करावा असे तक्रारकर्त्याला कळविले. मा. उच्च न्यायालयाने घटस्फोटाचे डिक्रीला स्थगितीचा आदेश दिलेला आहे, त्यामुळे पॉलिसीची रक्कम तक्रारकर्ता व गैरअर्जदार क्र.5 या दोघांनीही संयुक्त डिस्चार्ज फॉर्मवर स्वाक्ष-या करुन सादर करावा, व त्यानंतर कारवाई होऊन आणि दोघांच्या नावाने एकच धनादेश देण्यांत येईल असे कळविण्यांत आले. तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे की, हे शक्य नाही त्यामुळे त्याने ही तक्रार दाखल करुन ती व्दारे सदर पॉलिसीची रक्कम दोघांना वेगवेगळया धनादेशाव्दारे देण्यांत यावी अशी मागणी केलेली आहे. 3. गैरअर्जदारांना नोटीस देण्यांत आली असता ते मंचात उपस्थित झाले असुन त्यांनी आपला लेखी जबाब दाखल केला. गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांनी आपल्या जबाबात सदरची तक्रार निकाली काढण्याचे अधिकारक्षेत्र मंचाला नाही असा उजर घेतला आणि तक्रारकर्त्याने नमुद केलेले बहुतांश विधाने मान्य केले, मात्र इतर विपरीत विधाने नाकबुल केली. सदरची पॉलिसी ही संयुक्त जीवन विमा पॉलिसी आहे आणि दायीत्वाचे परतफेडीसाठी पती-पत्नी या दोघांनी सही करणे गरजेचे आहे. जेणेकरुन गैरअर्जदार दावा निकाली काढू शकतील. मात्र दोघे स्वतंत्र राहत असल्यामुळे असे ते करुन शकत नव्हते, तसेच यामध्ये अद्याप त्यांचा घटस्फोट अंतिमतः मंजूर झालेला नाही. म्हणून गैरअर्जदारांनी रु.1,63,344/- एवढी रक्कम धनादेशाव्दारे ग्राहक मंचात जमा केली आणि ते स्वतः 50% रक्कम देण्यांस असमर्थ असल्यामुळे त्यांना या प्रकरणातुन मुक्त करावे अशी मंचास विनंती केलेली आहे. 4. यातील गैरअर्जदार क्र.5 ने आपला लेखी जबाब दाखल केला आणि सदरची पॉलिसी ही तिनेच काढली आहे व त्याचा हप्ता सुध्दा तिनेच भरलेला आहे व शेवटपर्यंत तिने सदर पॉलिसीचे हप्ते ती परिपक्व होईपर्यंत जमा केलेले आहे. आणि त्यामुळे तक्रारकर्त्याला कोणतीही रक्कम मिळणे शक्य नाही व तसा त्यांना कोणताही अधिकार नाही, संपूर्ण रकमेची हकदार गैरअर्जदार क्र.5 आहे. तक्रारकर्त्याचे नाव सदर पॉलिसीमध्ये केवळ नामनिर्देशित व्यक्ति असे दर्शविण्यांत आलेले आहे. त्यामुळे तक्रारकर्त्यास या प्रकरणी कोणतीही रक्कम मिळण्याचा अधिकार नसुन सदर तक्रार खारिज करावी असा उजर घेतला व पॉलिसीची संपूर्ण रक्कम गैरअर्जदार क्र.5 ला मिळावी असा आदेश करावा अशी मंचास विनंती केली आहे. 5. तक्रारकर्तीने प्रस्तुत तक्रारीसोबत निशानी क्र. 2 वर दस्तावेजांची यादी जोडलेली असुन त्यात अनुक्रमांक 1 ते 23 दस्तावेजांच्या छायांकित प्रती जोडलेल्या आहेत. 6. प्रस्तुत तक्रार ही मंचासमक्ष मौखिक युक्तिवादाकरीता दि.08.07.2011 रोजी आली असता उभय पक्षांचे वकील हजर त्यांचा युक्तिवाद मंचाने ऐकला. तसेच तक्रारीसोबत दाखल दस्तावेजांचे व युक्तिवादाचे अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्कर्षांप्रत पोहचले. -// नि ष्क र्ष //- 7. सर्व पक्षांचा युक्तिवाद ऐकला, पॉलिसीचे अवलोकन केले असता सदर पॉलिसीत पॉलिसीधारक म्हणून गैरअर्जदार क्र.5 आणि तक्रारकर्ता या दोघांची नावे नमुद करण्यांत आलेले आहे. त्यामुळे हे स्पष्ट आहे की, पॉलिसीधारक तक्रारकर्ता आणि गैरअर्जदार क्र.5 हे दोघेही आहे. पॉलिसीचे स्वरुप जीवन साथी हे आहे, ही बाब मान्य आहे आणि या संबंधाने विमा कंपनीने अर्धी रक्कम देण्याची सोय खालिल प्रमाणे केलेली आहे. If one or both the survive to the maturity date, the sum assured, along with the accumulated bonus, is payable. 8. यातील दोन्ही पॉलिसीधारकांची पॉलिसी परिपक्व झाली असल्याने ही रक्कम मिळण्यांस ते पात्र आहेत, ही वस्तुस्थिती आहे. आणि ही बाब गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांना मान्य आहे, त्यामुळे गैरअर्जदार क्र.5 म्हणतात त्याप्रमाणे त्यांनी या पॉलिसीची पूर्ण रक्कम जरी भरली असली तरीही एक पॉलिसी धारक या नात्याने तक्रारकर्त्यांना निम्मी मिळण्याचा पूर्ण हक्क आहे. त्यामुळे विमा कंपनीने पॉलिसीची रक्कम मंचात जमा करुन आपले दायीत्व संपुष्टात आणलेले आहे. वरील सर्व परिस्थीचा विचारकरुन आम्ही खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहोत. -// अं ति म आ दे श //- 1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते. 2. प्रबंधकांना निर्देश देण्यांत येते की, त्यांनी मंचात जमा असलेली रक्कम रु.1,63,344/- ही तक्रारकर्ता व गैरअर्जदार क्र.5 यांना निम्मी-निम्मी विभागून द्यावी.
| [HONABLE MRS. Jayashree Yende] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |