जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे समोर
ग्राहक तक्रार क्रमांक –134/2010 तक्रार दाखल तारीख –07/04/2010
निकाल तारीख – 11/04/2011
-------------------------------------------------------------
शिवदास पि. शेषबुवा पुरी,
वय- 44 वर्षे, धंदा- नौकरी,
रा. मु.पो.धर्मापूरी, ता. परळी जि.बीड.
हल्ली मु.द्वारा- देवीदास पिंगळे,
पिंगळे गल्ली, बीड. ता. जि. बीड. ... तक्रारदार
विरुध्द
भारतीय जीवन बीमा निगम,
मार्फत- मा. वरिष्ठ शाखा व्यवस्थापक,
भारतीय जीवन बीमा निगम, जिवन ज्योती
पोलीस मुख्यालयासमोर, नगररोड,
बीड, ता. जि. बीड. ... सामनेवाला
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
सौ. एम. एस. विश्वरुपे, सदस्या.
तक्रारदारातर्फे :- वकील -अँड. बी. बी. गिते.
सामनेवालेतर्फे :- वकील –अँड. ए.पी.कुलकर्णी.
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदाराने सामनेवाले विमा कंपनीकडुन विमापत्र क्रं. 981803104 व 981514767 अशी दोन विमापत्रे घेतलेली आहेत. पैकी वरील अनुक्रमांक 981803104 हे विमापत्र मनिबॅक स्वरुपाचे आहे. सदर विमापत्रातील नियम व अटीनुसार सदर 5 वर्षानी विमाधारकाला रक्कम रु. 10,000/- बोनस स्वरुपात देण्याचे सामनेवालेने मान्य केलेले आहे. तक्रारदाराच्या वरील विमापत्रास मार्च-2010 मध्ये 5 वर्षे पूर्ण झालेली असल्याने मार्च-10 अखेरपर्यंत रक्कम रु. 10,000/- बोनसच्या स्वरुपात मिळणार होती.
दुसरे विमापत्र क्रं 981514767 हे रक्कम रु. 15,000/- चे होते. त्याची परिपक्वता तारीख 21/3/2010 होती. परिपक्वतेनंतर रक्कम रु. 11,835/- अधिक बोनस रु. 570/- मिळणार होते. सदर विमापत्राचा हप्ता तक्रारदाराच्या कार्यालयामार्फत त्याच्या पगारातून कपात होत होता. हप्त्यापोटी तक्रारदाराकडून रक्कम रु. 720/- बाकी असल्याचे तक्रारदारांना सांगितल्यावरुन तक्रारदाराने सामनेवालेकडे तात्काळ सदर रक्कम रु. 40/- व्याजासह जमा केली. परिपक्वतेनंतर वरील विमापत्रावरील कर्ज, व्याज व इतर सर्व कपाती वजाजाता रक्कम रु. 11,474/- अधिक 720/- मिळून रक्कम रु. 12,191/- तक्रारदारांना मिळणे आवश्यक आहे. परंतू अदयापपर्यंत तक्रारदारांना रक्कम मिळालेली नाही.
तारीख 21/6/2010 रोजी सामनेवालेच्या कार्यालयात जावून तक्रारदाराने लेखी अर्ज केला व रक्कमेची मागणी केली. त्यावेळी सामनेवालेने तक्रारदारांना चेक क्रमांक 412976 व 412977 तारीख 21/6/2010 अनुक्रमे रक्कम रु. 540/- व रु. 2272/- चे दिले व उर्वरीत रक्कमांचे धनादेश पोष्टाद्वारे तुम्हाला पाठवून दिले आहेत व ते मिळून जातील म्हणून कळविले.
तक्रारदाराने त्यावर विश्वास ठेवून धनादेश स्विकारला व धनादेश पोस्टाने मिळण्याची वाट पाहू लागले परंतू धनादेश मिळाले नाहीत. तसेच त्यांनी सामनेवालेच्या कार्यालयात जावून विचारणा केली परंतू त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. तक्रारदाराने तारीख 19/07/2010 रोजी दुसरा अर्ज सामनेवाले यांच्याकडे दिला व वरील रक्कमेची मागणी केली. परंतू सामनेवालेंनी त्याचे उत्तर समाधानकारक दिले नाही व धनादेशही दिला नाही. तुमचा चेक आल्यानंतर तुम्हाला कळवू, तुम्ही रोज रोज चकरा मारु नका, असे म्हणून अपमानास्पद वागणूक देवून त्यांना तेथून हाकलून दिले. अशा त-हेने सामनेवालेंनी तक्रारदारांना दयावयाच्या सेवेत कसूर केला आहे. त्यामुळे तक्रारदारांना शारीरिक, मानसिक त्रास झाला म्हणून त्याबाबत रक्कम रु. 20,000/- मिळण्यास तक्रारदार पात्र आहे. तक्रारीच्या खर्चापोटी रु.5,000/- मिळण्यास पात्र आहे.
विनंती की, तक्रारदारांना सामनेवालेकडून विमापत्राबाबत येणे असलेली व तक्रारदारास देय असलेली रक्कम रु. 22,191/- देण्याबाबत आदेश व्हावा. तसेच मानसिक त्रासाची व तक्रारीच्या खर्चाची रक्कम रु. 25,000/- देण्याबाबत आदेश व्हावा. तसेच तक्रार दाखल तारखेपासून नुकसान भरपाईची रक्कम प्रत्यक्ष तक्रारदारास मिळेपर्यंत द.सा.द.शे.15 टक्के प्रमाणे व्याज देण्याबाबत आदेश व्हावा.
सामनेवालेंनी त्यांचा खुलासा तारीख 03/12/2010 रोजी दाखल केला. तक्रारीतील सर्व आक्षेप सामनेवालेंनी नाकारलेले आहेत. तक्रारदाराने विमापत्र क्रमांक 981803104, रक्कम रु. 50,000/-चे मासिक हप्ता रु.294/- चे घेतलेले होते. त्याची सुरुवात तारीख 28/03/2000 रोजी झाली. सदरचे विमापत्र हे मनिबॅक योजने अंतर्गत 20 वर्षाच्या कालावधीचे होते. त्यातील शर्ती व अटीनुसार विमापत्रातील 20 टक्के रक्कम विमाधारकाला देय होती. सामनेवाले विमा कंपनीने रु.10,000/- तारीख 28/3/2005 रोजी चेक क्रं. 0626488 ने दिले. दुसरा देय हप्ता ता. 28/3/2010 ला नंतरच्या 5 वर्षाचा देय होता, परंतू मासिक हप्ता जुलै-09 ते फेब्रुवारी-2010 8 महिन्यांची रक्कम विमा कंपनीकडे संबंधीत कार्यालयाकडून (तक्रारदार ज्या कार्यालयात आहे त्या कार्यालयातून) जमा झाली नाही. शेवटी तारीख 01/04/2010 ला मुख्याधिकारी नगरपालीका, बीड यांनी हप्त्याची रक्कम कोणत्याही व्याजाशिवाय सामनेवालेच्या कार्यालयात जमा केली.
दुस-या हप्त्याची 20 टक्के विम्याची रक्कम तारीख 29/03/2010 रोजी देयक होती ती विमा कंपनीने वरील 8 महिन्याचे हप्ते सप्टेंबर-09 ते फेब्रुवारी-2010 एकूण रक्कम रु. 2,272/- त्यावरील व्याज रु. 68/- देय रक्कम रु. 10,000/- मधून कापून रक्कम रु. 7,660/- चा चेक नंबर 0403497 रक्कम रु. 7,660/- तारीख 29/3/2010 चा तक्रारदारांना दिला. सदर विमापत्रा अंतर्गत तक्रारदारांना कोणतीही रक्कम देय नाही.
त्यानंतर सामनेवालेने 8 हप्त्याची देय रक्कम संबंधीत कार्यालयाकडून तारीख 01/04/2010 रोजी प्राप्त झाली म्हणून विमा कंपनीने रक्कम रु. 2,272/- चा चेक नं. 412977 ता. 21/6/2010 रोजी तक्रारदारांना दिला.
तक्रारदाराचे विमापत्र क्रं. 981514767 रक्कम रु. 15,000/- चे 15 वर्षे कालावधीचे होते व त्याची सुरुवात तारीख 28/3/1995 ला झाली. सदरचे विमापत्राची रक्कम बोनससहीत तारीख 28/3/2010 ला देय झाली. त्याचा तपशील खालील प्रमाणे आहे.
अ. 1. विमापत्र रक्कम. रु. 15,000/-
2. बोनस. रु. 12,405/-
एकूण :- 27,405/-
ब. वजा.
1. कर्ज रक्कम. रु. 9,150/-
2. कर्जावरील व्याज. रु. 6,021/-
एकूण :- 15,171/-
27,405/- वजा 15,171/- बरोबर 12,234/-
सामनेवाले यांनी जुलै-09 व फेब्रुवारी-10 या 8 महिन्याचे हप्ते अधिक त्यावरील व्याज असे एकूण रु. 760/- रक्कम रु. 12,234/- वजा 760/- बरोबर 11,474/- चा चेक नं. 404087 तारीख 28/3/2010 चा तक्रारदारांना देण्यात आला. सदरचा चेक तक्रारदाराच्या खात्यावर तारीख 30/3/2010 रोजी जमा झाला आहे. याबबात सविस्तर पत्र विमा कंपनीने तक्रारदारांना दिलेले आहे.
त्यानंतर तारीख 01/04/2010 रोजी संबंधीत कार्यालयाकडून तक्रारदाराच्या विमापत्रातील राहिलेले 6 मासिक हप्ते रक्कम रु. 90/- गुणिले 6 बरोबर 540/- विमा कंपनीने तक्रारदारांना चेक नं. 412976 तारीख 21/6/2010 रोजी दिलेले आहेत. सदर विमापत्रा अंतर्गत कोणतीही रक्कम तक्रारदारांना देय नाही. यात सामनेवाले यांनी तक्रारदारांना दयावयाच्या सेवेत कोणताही कसूर केलेला नाही. तक्रार खर्चासह रद्द व्हावी व सामनेवालेंना खर्चाची रक्कम रु. 10,000/- देण्याबाबत आदेश व्हावा.
तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, तक्रारदाराचा लेखी युक्तिवाद, तक्रारदाराचे शपथपत्र, सामनेवालेचा खुलासा, शपथपत्र, दाखल कागदपत्रे यांचे सखोल वाचन केले. सामनेवालेचे विद्वान अँड. ए.पी.कुलकर्णी यांचा युक्तिवाद ऐकला.
तक्रारदारांना तक्रारीत नमूद केलेल्या विमापत्रातील देय रक्कमा देय तारखेनंतर मिळाल्या नसल्याने सामनेवालेच्या सेवेत कसूरीबाबत तक्रारदाराची तक्रार आहे. यासंदर्भात सामनेवालेंचा खुलासा स्वयंस्पष्ट आहे. याबाबत तक्रारदाराने सामनेवालेच्या खुलाशानंतर दाखल केलेले शपथपत्र पाहता त्यात सामनेवालेचे म्हणणे तक्रारदारांना मान्य नाही अशाप्रकारचा मजकूर नमूद केलेला आहे. सामनेवालेने चेक नंबर, चेकची तारीख, रक्कमा हे सर्व खुलाशात व शपथपत्रात नमूद केलेले आहे. तथापि, तक्रारदाराने तक्रारीत रक्कम रु. 12,191/- अधिक 10,000/- अशी रक्कम रु. 22,191/- ची मागणी केलली आहे. सदर रक्कमेचा धनादेश तक्रारदारांना देण्यात आलेला आहे व सदरचा धनादेश हा तक्रारदाराच्या खात्यावर जमा झाल्याचे सामनेवालेचे म्हणणे आहे. सदरचे म्हणणे तक्रारदाराने खोडून काढणे आवश्यक होते व खुलाशात नमूद असलेला धनादेश तक्रारदारांना मिळालाच नाही किंवा सदरचे धनादेश तक्रारदाराच्या खात्यावर जमा झालेलेच नाहीत, याबाबत तक्रारदाराने त्याच्या खात्याचा उतारा दाखल करणे आवश्यक होते परंतू कोणत्याही स्पष्ट शब्दात तक्रारदाराने सदरचे धनादेश नाकारलेले नाहीत. केवळ सामनेवालेंचा खुलासा मान्य नाही एवढेच विधान केलेले आहे. सामनेवालेची सदरची विधाने ही योग्य त्या आव्हानाशिवाय असल्याने व त्यासंदर्भात सामनेवालेंनी तक्रारदारांना पत्र देवून तक्रार दाखल करण्यापूर्वीच सविस्तर कळविलेले नाही. त्याचा कुठलाही उल्लेख तक्रारदाराने तक्रारीत केलेला नाही. सदरच्या पत्रात तक्रारदारांना देय होणा-या रक्कमांचा पूर्ण तपशील देवून त्यातून तक्रारदाराने घेतलेले कर्ज व त्यावरील व्याज, एकूण मिळालेले हप्ते यांचा पूर्ण तपशील देवून तक्रारदारांना सुरुवातीला 2 चेक अनुक्रमे रक्कम रु. 7,660/- व रक्कम रु. 11,474/- चे देण्यात आलेले आहेत व त्यानंतरचे हप्ते जमा झालेले नव्हते त्या हप्त्यांची रक्कम तक्रारदाराच्या कार्यालयाकडून प्राप्त झाल्यानंतर त्याचे 2 चेक रक्कम रु. 2,272/- आणि रक्कम रु. 540/- चे तक्रारदारांना देण्यात आलेले आहेत. सदरचे दोन्हीही चेक तक्रारदारांना मिळाल्याचे तक्रारदाराने नमूद केलेले आहे. सदर चेक घेतांना तक्रारदाराने या अगोदरच वरील रक्कमेचे चेक मिळाले नसल्याबाबतचा कोणताही सामनेवालेकडे नोंदवल्याचे दिसत नाही. तक्रारीत दाखल असलेले तक्रारदाराचे अर्ज हे वरील दोन्ही चेक मिळण्याच्या पूर्वीचे आहेत.
वरील सर्व विवेचनावरुन सामनेवालेने तक्रारदारांना दोन्हीही विमापत्रातील देय असलेल्या रक्कमा दिल्या असल्याची बाब स्पष्ट होत असल्याने सामनेवालेने तक्रारदारांना दयावयाच्या सेवेत कसूर केल्याची बाब स्पष्ट होत नाही, त्यामुळे तक्रारीत मागणी केल्यानुसार तक्रारदारांना रक्कम देणे उचित होणार नाही, असे न्याय मंचाचे मत आहे.
सबब, न्याय मंच खालील प्रमाणे आदेश देत आहे.
आ दे श
1. तक्रारदाराची तक्रार रदृ करण्यात येत आहे.
2. सामनेवालेंच्या खर्चाबाबत आदेश नाही्.
(सौ.एम.एस.विश्वरुपे) ( पी.बी.भट )
सदस्या, अध्यक्ष,
चुनडे/- स्टेनो जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, बीड जि.बीड