खुल्या मंचातील आदेश श्री.विजयसिंह राणे, अध्यक्ष. - आदेश - (पारित दिनांक – 29/06/2011) 1. तक्रारकर्तीने सदर तक्रार ग्रा.सं.का.1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली असून तक्रारकर्तीच्या तक्रारीचा आशय असा आहे की, तिच्या पतीने त्यांचे हयातीत बिमा गोल्ड ए युनिक मनी बॅक प्लॅन विथ एडेड फिचर्स एज ‘न्यु बिमा गोल्ड’ पॉलिसी काढली होती. सदर पॉलिसीनुसार विमाधारकाचा नैसर्गिकरीत्या मृत्यु झाल्यास नामनिर्देशित व्यक्तीला रु.2,50,000/- विमा रक्कम मिळणार होती व अपघाताने मृत्यु झाल्यास रु.5,00,000/- मिळणार होते. सदर बाब गैरअर्जदारांना मान्य आहे. परंतू तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु अपघाताने होऊनसुध्दा गैरअर्जदारांनी, मृतक हा हृदय विकाराने मृत्यु पावल्याचे नमूद करुन तिला रु.2,40,814/- चा दावा दिला. गैरअर्जदारांनी तक्रारकर्तीचा दावा असे म्हणून नाकबूल केला की, मृतक हे हृदय रोगाने मरण पावले. यासंबंधीचे पत्र गैरअर्जदाराने दि.12.10.2010 रोजी दिले व तक्रारकर्तीचा अपघाती विमा संबंधीचा दावा नामंजूर केला. या प्रकरणात मर्ग समरी, शव विच्छेदन अहवाल आणि कामगार आयुक्त नुकसान भरपाई न्यायालयात डॉक्टरांनी दिलेल्या साक्षीबाबत निवेदनाची सत्यप्रत आणि आयुक्त, कामगार नुकसान भरपाई न्यायालयाने दिलेला निकाल असे दस्तऐवज दाखल आहेत. या दस्तऐवजांचे अवलोकन केले असता अपघाताची परिस्थिती स्पष्ट होते. गैरअर्जदारांनी युक्तीवाद करतांना असे सांगितले की, मृतकाला हृदय विकाराचा झटका आला आणि तो मेला. परिणामतः तो खाली पडला. शव विच्छेदन अहवालाचे अवलोकन केले असता मृतकाचे शरीरावरील जखमा या मृत्यूपूर्व असल्याचे नमूद आहे. संबंधित डॉक्टरांनी आयुक्त, कामगार नुकसान भरपाई न्यायालय यांचेकडे साक्ष देतांना नमूद केले आहे की, “मृतकास झालेल्या जखमामुळे मृत्यु होऊ शकतो आणि परिणामी हृदय विकाराने मृत्यू होऊ शकतो. मृतकाचे वय लक्षात घेता व मरणाची स्थिती ही तपासणीच्या वेळी पाहिली असता, त्यास हृदय विकार होता हे आढळून येत नाही”. सर्वात महत्वाची बाब ही साक्ष आणि संबंधीत दस्तऐवज हे गैरअर्जदारांना प्राप्त झाल्यावरसुध्दा, गैरअर्जदार तक्रारकर्तीला दावा देण्यास तयार नाही. गैरअर्जदारांनी तक्रारकर्तीला 18.11.2010 रोजी पत्र देऊन, “तुमच्या प्रकरणात आम्ही पुनर्विचार करीत आहोत” असे कळविले. परंतू आजपर्यंत गैरअर्जदारांनी त्यासंबंधीचा निर्णय घेतलेला नाही, ही वस्तूस्थिती आहे. मंचाचे मते गैरअर्जदारांनी सदर दावा नाकारणे आणि त्याकडे दुर्लक्ष करणे ही गंभीर स्वरुपाची बाब आहे व सेवेत केलेला निष्काळजीपणा आहे. यास्तव खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहो. -आदेश- 1) तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2) गैरअर्जदारांनी तक्रारकर्तीला अपघात मृत्यु हित लाभ म्हणून रु.2,50,000/- द्यावे. त्यावर दि.12.10.2010 पासून रकमेच्या अदायगीपावेतो द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह द्यावे. 3) गैरअर्जदारांनी मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाई रु.25,000/- तक्रारकर्तीला द्यावे व तक्रारीच्या खर्चाबाबत रु.2,000/- द्यावे. 4) सदर आदेशाचे पालन गैरअर्जदारांनी आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत करावे, अन्यथा द.सा.द.शे. 9 टक्केऐवजी 12 व्याज देय राहील.
| [HONABLE MRS. Jayashree Yende] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |