तक्रार क्र. CC/ 13/ 28 दाखल दि. 01.02.2014
आदेश दि. 09.09.2014
तक्रारकर्ता :- श्री बळीराम लक्ष्मण शेंडे
वय – 45 वर्षे, धंदा - नोकरी
रा.कोंढी,पाण्याच्या टाकीजवळ, पो.जवाहरनगर
ता.जि.भंडारा
-: विरुद्ध :-
विरुद्ध पक्ष :- 1. व्यवस्थापक,
भारतीय जीवन विमा महामंडळ,
शाखा-भंडारा, ‘जिवन ज्योती’
दुस-या पेट्रोलपंपाच्या मागे, राष्ट्रीय महामार्ग
क्र.6,भंडारा ता.जि.भंडारा
गणपूर्ती :- मा. अध्यक्ष श्री अतुल दि. आळशी
मा. सदस्या श्रीमती गीता रा. बडवाईक
मा.सदस्य हेमंतकुमार पटेरिया
उपस्थिती :- तक्रारकर्त्यातर्फे प्रतिनीधी कारेमोरे
वि.प. तर्फे अॅड.सुषमा सिंग
.
(आदेश पारित द्वारा मा. अध्यक्ष श्री अतुल दि. आळशी )
-// आ दे श //-
(पारित दिनांक 09 सप्टेंबर 2014)
1. तक्रारकर्त्याच्या पत्नीने विरुध्द पक्षाकडून विमा पॉलीसी काढलेली होती. तक्रारकर्त्याच्या पत्नीचे निधन झाल्यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडे विमा पॉलीसीची रक्कम मिळण्यासाठी दावा दाखल केला. परंतु विरुध्द पक्षाने विमा दावा मंजुर न केल्यामुळे तक्रारकर्त्याने सदरहू तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीचा आशय खालीलप्रमाणे
2. तक्रारकर्त्याची पत्नी श्रीमती रंजना बळीराम शेंडे हिने विरुध्द पक्ष जे मंचाच्या कार्यक्षेत्रात ज्यांचे कार्यालय आहे त्यांच्या कडून दिनांक 10/2/2011 ला, क्र.165-15-15 या तालीकेअंतर्गत पॉलीसी 15 वर्षासाठी 2,50,000/- किंमतीची काढली होती. पॉलीसीचा त्रैमासिक हप्ता 3062/- होता. तक्रारकर्त्याच्या पत्नीने दिनांक 7/2/2011 रोजी विमा काढण्यासाठी Proposal Form, LIC अभिकर्ता श्री कारेमोरे यांचे मार्फत भरुन दिला. LIC अभिकर्ता श्री कारेमोरे यांनी तक्रारकर्त्याच्या पत्नीचा फॉर्म तक्रारकर्त्याच्या पत्नीकडून माहिती घेवून भरुन दिला होता. सदरहू फॉर्म तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाच्या कार्यालयात सादर केला व विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याच्या पत्नीची पॉलीसी मंजुर केली व त्या पॉलीसीचा नंबर 977557317 हा असून विमा पॉलीसी दिनांक 10/2/2011 पासून सुरु झाली. तक्रारकर्त्याने वारस या नात्याने सदरहू तक्रार दाखल केली आहे.
काही दिवसांनी तक्रारकर्त्याच्या पत्नीच्या उजव्या गालावर एक छोटासा
Nodule आला. त्यामुळे तक्रारकर्ता त्याच्या पत्नीला डॉ.गुप्ता यांच्याकडे तपासणी
साठी घेवून गेला. दिनांक 11/2/2011, 14/3/2011, 19/3/2011 ला डॉ गुप्ता
यांच्याकडे त्याने आपल्या पत्नीस तपासणी साठी नेले. आराम न पडल्या
मुळे डॉ.गुप्ता यांनी डॉ.गोहकर यांच्याकडे जाण्या साठी सांगितले. त्यांनी
तपासणी करुन उपचार केला. त्यानंतर आराम न पडल्यामुळे तक्रारकर्त्याने दिनांक
20/9/2011 ला पत्नीला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पीटल, नागपुर येथे
नेले व तेथे उपचार झाल्यानंतर त्यांना सुटटी देण्यात आली.
3. तक्रारकर्त्याने पत्नीला दिनांक 19/1/2011 ला सक्करदरा येथील डॉ.कोठालकर यांच्याकडे उपचारासाठी घेवून गेले. तेथे 7 दिवस भरती केल्यानंतर त्यांना सुटटी झाली परंतु दिनांक 24/3/2012 ला तक्रारकर्त्याच्या पत्नीचा मृत्यु झाला.
4. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडे विमा पॉलीसी मिळण्यासाठी रितसर अर्ज केला व आवश्यक कागदपत्रांची पुर्तता केली. परंतु दिनांक 30/5/2013 ला विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याचा मृत्यु दावा हा तक्रारकर्त्याने प्रश्न क्र.11 A 11 B चे उत्तर ‘‘नाही’’ असे दिल्याचे चुकीचे कारण सांगुन मृत्यु दावा फेटाळला. त्यामुळे तक्रारकर्त्याने विमा दाव्याची रुपये 2,50,000/- ही रक्कम मिळण्यासाठी व मानसिक त्रासासाठी रुपये 10,000/- मिळण्यासाठी सदरहू तक्रार न्यायमंचामध्ये दिनांक 4/6/2013 ला दाखल केली.
5. तक्रारकर्त्याचा दावा दाखल करुन विरुध्द पक्षास दिनांक 1/2/2014 ला नोटीस काढण्यात आल्या.
6. विरुध्द पक्षाने आपला जबाब दिनांक 13/5/2014 ला दाखल केला. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याच्या तक्रारीचे खंडन केले. विरुध्द पक्षाने ही बाब मान्य केली की तक्रारकर्त्याच्या पत्नीने विमा पॉलीसी काढली होती. विमा धारकाने पॉलीसी काढतांना Proposal Form मधील 11 (a), (b), (e), (i) या प्रश्नांना चुकीचे उत्तर दिल्यामुळे व माहिती लपवून ठेवल्यामुळे तक्रारकर्त्याचा मृत्यु दावा फेटाळला असे विरुध्द पक्षाने म्हटले आहे. तसेच तक्रारकर्त्याच्या पत्नीस डॉ.कोठाळकर यांच्याकडे उपचारासाठी भरती करण्यात आले होते हे विरुध्द पक्षाने मान्य केले आहे. तक्रारकर्त्याच्या पत्नीला मागील 2-3 वर्षापासून गालाचा कर्करोग होता हे माहित असून त्याने 11 (e), या प्रश्नाला नाही हे उत्तर दिले. तसेच विमा धारकाची प्रकृती Good असे Proposal Form मध्ये लिहीले परंतु विमा धारकाला कर्करोग होता, त्यामुळे Proposal Form व Declaration Form मध्ये चुकीची माहिती दिली तसेच महत्त्वाची माहिती लपवून ठेवणे हे कराराचे उल्लंघन असून विश्वासघात सुध्दा असल्यामुळे तक्रारकर्त्याचा विमा दावा फेटाळणे म्हणजे सेवेतील त्रृटी नाही.
7. तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत सुभाष कारेमोरे यांचे अधिकारपत्र पान नं.9 वर दाखल केले आहे. मृत्यु पत्र पान नं.15 वर दाखल केले आहे. हप्ता भरल्याची पावती पान नं.16 व 18 वर दाखल केली आहे. विरुध्द पक्षास दावा मंजुर करण्याबाबत पाठविलेले पत्र पान नं.20 वर दाखल केलेले आहे. गुप्ता नर्सिंग होमचे Description पान नं.23 ते 28 वर दाखल केले आहे. डॉ.दिलीप गोहकर यांचा रिपोर्ट पान नं.30 ते 34 वर दाखल केला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पीटल ची कागदपत्रे पान नं.35 ते 42 वर दाखल केली आहे. डॉ कोठाळकर यांचे Discharge Card 43 ते 46 वर दाखल केले आहे. डॉ.वसई यांचा Investing Report पान नं.52 वर दाखल केला आहे.
8. तक्रारकर्त्याचे प्रतिनीधी श्री कारेमोरे यांनी युक्तीवाद केला की तक्रारकर्त्याचा Proposal Form हा कारेमोरे यांनी स्वतः भरला, कारण कारेमोरे हे LIC Agent होते. तक्रारकर्त्याच्या पत्नीने जी माहिती सांगितली त्याप्रमाणे Proposal Form मध्ये माहिती भरली. तक्रारकर्त्याच्या पत्नीचा Proposal Form भरल्यावर त्यांचे Medical Examination हे विरुध्द पक्षाच्या तज्ञ डॉक्टरां कडून करुन घेवून तक्रारकर्त्याच्या पत्नीची विमा पॉलीसी मंजुर करण्यात आली. विरुध्द पक्षाचे तज्ञ डॉक्टरांकडून Medical Examination केल्यामुळे पॉलीसी काढण्याच्या वेळी कुठलाही आजार तक्रारकर्त्याच्या पत्नीस नव्हता हे स्पष्ट होते. तक्रारकर्त्याची पत्नी ही पॉलीसी काढतांना आरोग्यदृष्टया सुदृढ व चांगली होती. पॉलीसी काढण्यापुर्वी तक्रारकर्त्याच्या पत्नीला कुठल्याही दवाखान्यात 7 दिवसांपेक्षा जास्त भरती केले नव्हते. त्यामुळे तक्रारकर्त्याच्या पत्नीने दिलेली माहिती चुकीची नाही व कुठलीही माहिती लपवून ठेवलेली नाही. तक्रारकर्त्याच्या पत्नीचा विमा दावा हा मृत्युपत्र व इतर आवश्यक कागदपत्रांसह विरुध्द पक्षाकडे रितसर अर्ज करुन सुध्दा व विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याच्या पत्नीच्या आजाराबद्दल कुठलाही पुरावा न दाखल केल्यामुळे तक्रारकर्त्याचा तक्रार अर्ज मंजुर करण्यास पात्र आहे.
9. विरुध्द पक्षाचे वकील अॅड.सुषमा सिंग यांनी युक्तीवाद केला की तक्रारकर्त्याच्या पत्नीच्या मृत्यु हा पॉलीसी काढल्यापासून 2 वर्षाचे आंत झाल्यामुळे विरुध्द पक्षाने मृत्युची चौकशी केली असता असे आढळले की तक्रारकर्त्याच्या पत्नीला उजव्या गालाचा कर्करोग 2 ते 3 वर्षापासून होता ही बाब डॉ.कोठाळकर यांच्या Special Query Form भरुन दिला त्यावरुन स्पष्ट होते. विमा धारकाने Proposal Form भरतांना 11 (a), (b), (e), (i) या प्रश्नांचे उत्तर चुकीचे दिल्यामुळे व माहिती लपवून ठेवल्यामुळे तसेच प्रकृती बरी नसतांना विमा धारकाने 11 (i) या प्रश्नाला Good असे उत्तर दिल्यामुळे Proposal Form मधील Declaration विमा करारानुसार Null and Void ठरल्यामुळे तक्रारकर्त्याच्या हप्त्याची रक्कम जप्त केल्या गेली. त्यामुळे विरुध्द पक्षाने आपले सेवेमध्ये कुठल्याही प्रकारची त्रृटी केलेली नाही, करीता तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात यावी.
10. तक्रारकर्त्याचा तक्रार अर्ज, तक्रारकर्त्याने तक्रारीत दाखल केलेले दस्त, विरुध्द पक्षांचे जबाब, तसेच दोन्ही पक्षाच्या वकिंलाचा युक्तीवाद यावरुन खालील मुद्दा उपस्थित होतो.
1. तक्रारकर्त्याची तक्रार मान्य होण्यास पात्र आहे का? – होय.
कारणमिमांसा
11. विरुध्द पक्षाने विमा धारकाचा Proposal Form हा विरुध्द पक्षाचे एजन्ट व तक्रारकर्त्याचे प्रतिनीधी यांचे हस्ताक्षरात भरला होता. तक्रारकर्त्याने विमा प्रतिनीधी यांनी सदरहू प्रकरणात मुखत्यार म्हणुन नियुक्त केले आहे. विरुध्द पक्षाचे एजन्ट यांनी युक्तीवाद केला की तक्रारकर्त्याच्या पत्नीला ते स्वतः ओळखत होते व त्यांची प्रकृती अतिशय चांगली होती व त्यांना पॉलीसी काढतेवेळी कुठलाही गंभीर आजार नव्हता.
तक्रारकर्त्याच्या पत्नीला उजव्या गालावर Nodule होता, त्याबद्दल त्यांना गुप्ता नर्सिंग होम,जवाहर नगर,भंडारा येथे डॉ.गुप्ता यांनी Treatment दिली होती व डॉ.गुप्ता यांनी औषध दिले. तसेच सर्टिफिकेट मध्ये असे लिहीले आहे की, ‘तक्रारकर्त्याच्या पत्नीला मी बरेचदा तपासले त्यांच्या Complaints या General and Causal Nature च्या होत्या व त्यांची तब्बेत (Health Condition) चांगली होती व त्यांना कुठलाही गंभीर स्वरुपाचा आजार नव्हता’, असे त्यांनी दिनांक 27/7/2012 च्या सर्टिफिकेट मध्ये म्हटले आहे, जे पान नं.73 वर दाखल केले आहे.
डॉ.गोहकर यांनी तक्रारकर्त्याच्या पत्नीला दिनांक 30 मार्च 2011 ला तपासल्यानंतर तसेच त्यांच्या Treatment मध्ये तक्रारकर्त्याच्या पत्नीला उजव्या गालावर Swelling होते तसेच कुठलाही गंभीर आजार नव्हता असे त्यांनी दिलेल्या सर्टिफिकेट वरुन स्पष्ट होते.
तसेच तक्रारकर्त्याच्या पत्नीला त्याच्या मित्राच्या सल्ल्यानुसार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पीटल,नागपुर येथे घेवून गेले होते तेव्हा तेथील रिपोर्ट नुसार तक्रारकर्त्याच्या पत्नीला कॅन्सर नव्हता. त्यामुळे तक्रारकर्त्याच्या पत्नीला कुठलाही गंभीर आजार नसल्यामुळे तक्रारकर्त्याची पत्नीची प्रकृती ही सुदृढ होती. त्यामुळे त्यांनी Proposal Form 11 (a) मध्ये दिलेल्या प्रश्नाला उत्तर हे चुकीचे ठरत नाही. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याच्या पत्नीच्या उजव्या गालावर असलेले Nodule हे कॅन्सरचे होते या बद्दल कोणताही तज्ञ डॉक्टरांच्या पुराव्याद्वारे सदरहू प्रकरणात दाखल न केल्यामुळे तक्रारकर्त्याच्या पत्नीस कॅन्सर होता हे सिध्द् होत नाही. तक्रारकर्त्याच्या पत्नीला कॅन्सर होता हे तज्ञ व्यक्तीच्या शपथ पुराव्याद्वारे सिध्द् करण्याची जबाबदारी ही विरुध्द पक्षाची असल्यामुळे व ते म्हणणे सिध्द् करण्याचे Burden of proof विरुध्द पक्षाने कुठल्याही Independent पुराव्याद्वारे सिध्द् केलेले नाही, त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार मान्य होण्यास पात्र आहे.
विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याच्या पत्नीची पॉलीसी काढतांना Check up केले असता त्यांना कुठलाही गंभीर आजार होता असे न आढळल्यामुळे त्यांनी तक्रारकर्त्याच्या पत्नीची पॉलीसी काढण्यास संमती दिली. त्यामुळे तक्रारकर्त्याच्या पत्नीला पॉलीसी काढतेवेळी कुठलाही गंभीर आजार नव्हता व किरकोळ कारणासाठी डॉक्टरांकडे जावून Treatment घेणे व त्याबाबत Proposal Form भरतांना न सांगणे म्हणजे ‘Suppression of Material Fact’ किंवा False information होत नाही.
12. Life Insurance Act च्या Section 45 नुसार तक्रारकर्त्याच्या पत्नीला कॅन्सर होता हे सिध्द् करण्याची जबाबदारी विमा कंपनीची आहे. विरुध्द पक्षाने सदरहू तक्रारीमध्ये विरुध्द पक्षाचे एजन्टनी भरलेला Proposal Form दाखल केलेला नाही. विरध्द पक्षाने विमा धारकास गंभीर आजार होता हे तज्ञ डॉक्टरांचे सर्टिफिकेट तसेच तज्ञ डॉक्टरांनी गोळा केलेली माहिती व कुठल्याही माहितीच्या आधारे Conclusion न काढता तक्रारकर्त्याच्या पत्नीला म्हणजेच विमा धारकाच्या पत्नीला गंभीर स्वरुपाचा आजार आहे हे कुठल्या पुराव्याच्या आधारावर काढण्यात आले याबद्दलची माहिती शपथपत्राद्वारे सदरहू प्रकरणात सादर करणे आवश्यक आहे. परंतु सदरहू माहिती विरुध्द पक्षाने सदरहू प्रकरणात दाखल न केल्यामुळे तसेच विरुध्द पक्षाने Branch Manager चे शपथपत्र पुरावा म्हणून सादर न केल्यामुळे तसेच तज्ञ डॉक्टरांचा पुरावा सदरहू प्रकरणात सादर न केल्यामुळे तक्रारकर्त्याच्या पत्नीचा मृत्यु हा कॅन्सरच्या आजाराने झाला आहे, हे सिध्द् होत नाही. करीता तक्रारकर्त्याची तक्रार मान्य होण्यास पात्र आहे. करीता खालील आदेश पारीत करण्यात येत आहे.
करीता आदेश पारीत.
अंतीम आदेश
1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजुर.
2. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास मृत्यु दाव्याची रक्कम रुपये 2,50,000/-(दोन लाख पन्नास हजार) ही सदरहू तक्रार दाखल झाल्याच्या दिनांका पासून म्हणजेच दिनांक 1/2/2014 पासून ते संपुर्ण पैसे मिळेपर्यंत द.शा.द.शे.9 टक्के व्याजदराने तक्रारकर्त्यास दयावी.
3. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास नुकसान भरपाई म्हणून 10,000/- (दहा हजार) दयावे.
4. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 5,000/- (पाच हजार) दयावे.
5. विरुध्द पक्षाने सदर आदेशाची अंमलबजावणी आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांचे आंत करावी.
6. प्रबंधक, जिल्हा ग्राहक मंच, भंडारा यांनी तक्रारकर्त्यास सदर आदेशाची प्रत नियमानुसार विनामुल्य उपलब्ध करुन दयावी.