जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2009/269 प्रकरण दाखल तारीख - 11/12/2009 प्रकरण निकाल तारीख – 25/03/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती.एस.आर.देशमुख. - सदस्या मा.श्री.सतीश सामते. - सदस्य श्रीमती.चंद्रकलाबाई भ्र.महादेवअप्पा स्वामी मानुरकर, वय वर्षे 65, व्यवसाय घरकाम, अर्जदार. रा.हडको, नविन नांदेड जि.नांदेड. विरुध्द. भारतीय जिवन विमा महामंडळ, गैरअर्जदार. शाखा नांदेड,मार्फत शाखा प्रबंधक, गोदावरी कॉम्प्लेक्स, आय.टी.आय.समोर,नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.एस.ए.सोमेवाड गैरअर्जदारा तर्फे वकील - अड.एस.डी.देशपांडे निकालपत्र (द्वारा- मा.श्री.सतीश सामते,सदस्य) गैरअर्जदार एल.आय.सी.यांनी त्रुटीची सेवा दिली म्हणुन अर्जदाराने ही तक्रार दाखल केली असुन, अर्जदराचा मुलगा बसवराज स्वामी मनुरकर हे दि.04/06/2004 रोजी अपघाती मरण पावले त्यास अर्जदार आई, श्रीमती सुनिता पत्नी, मुलगा अभीषेक हे कायदेशिर वारस आहेत. मयत बसवराज यांचे नांवे गैरअर्जदाराकडे दोन पॉलिसी होत्या, एक पालिसी क्र.922120915 आणि 921944141 अशा आहेत. गैरअर्जदाराने अर्जदारास सक्षम न्यायालयातुन वारस प्रमाणपत्र देण्यास सांगीतले, त्यासाठी दिवाणी अर्ज क्र.16/05 दाखल केले होते मा.न्यायधीश यांनी दि.12/11/2008 रोजी अर्ज मान्य करुन अर्जदार हे पॉलिसीच्या रक्कमे पैकी 1/3 रक्कम मिळण्यास पात्र आहेत असे घोषित केले. वरील आदेश व प्रमाणपत्र दिल्यानंतर गैरअर्जदाराने रक्कम दिली नाही म्हणुन दि.19/02/2009 रोजी नोंदणीकृत पोष्टाने गैरअर्जदार यांना नोटीस देऊन रक्कमेची मागणी केली. गैरअर्जदारांना पत्र मिळाल्यानंतर एकाच पॉलिसीची रक्कम अर्जदारास दि.17/04/2009 रोजी धनादेशाद्वारे दिली. परंतु अद्यापही गैरअर्जदारांनी विमा पॉलिसी क्र.922120915 अन्वये मिळणारी रक्कम व व्याज तसेच पॉलिसी क्र.921944141 या अंतर्गत मिळणारी रक्कम व्याजासह 2004 पासुन अर्जदारास दिलेली नाही. पॉलिसी क्र.921944141 अन्वये अर्जदारास रु.95,000/- रक्कम गैरअर्जदारांनी दिली व पॉलिसी क्र.922120915 अंतर्गत देय असलेली एकुण रक्कमे पैकी 1/3 अर्जदारास माहे जुलै 2004 पासुन 12 टक्के व्याजासह देण्याचे निर्देश गैरअर्जदारांना देण्यात यावे व पॉलिसी क्र.921944141 या पॉलिसीसाठी 1/3 रक्कमेवरील व्याज जुलै 2004 पासुन गैरअर्जदाराकडुन मिळावे तसेच मानसिक त्रास रु.1,00,000/- मागीतले आहे. गैरअर्जदार हे वकीला मार्फत हजर झाले त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले. अर्जदार यांनी सत्य परिस्थिती दडवून ठेवली व विना कारण तक्रार दाखल केली, याचा त्रास गैरअर्जदारांना होत आहे. त्यामुळे रु.10,000/- कॉस्ट लावून दावा खारीज करावा. मयत बसवराज स्वामी यांनी दोन विमा पॉलिसी ज्याचा क्र.922120915 व 921944141 हे खोपोली जि.रायगड या शाखेतुन घेतले होते व त्याची अनुक्रमे विमाधारकाची पत्नी,आई यांना नॉमिनी म्हणुन नेमले होते. यानंतर बसवराज स्वामी यांचा मृत्यु दि.04/06/2004 रोजी झाला. यानंतर वरील दोन विमा पॉलिसी पैकी पॉलिसी क्र. 922120915 खाली मृत्यु दावा देय रक्कम रु.1,01,789/- कायदेशिर नॉमिनी श्रीमती सुनिता यांना इतर कोणतेही दावेदार नसल्यामुळे व दिवाणी न्यायालयाचे आदेश नसल्यामुळे दि.24/12/2004 रोजी अदा करण्यात आले. या प्रकरणांतील दुसरे वादातील पॉलिसी क्र.921944141 या अर्जदार चंद्रकलाबाई यांना मृत्यु दावा देय रक्कम रु.1,49,722/- देय होते परंतु दरम्यान मयत विमा धारकाची पत्नी यांनी दाखल केलेले दिवाणी दाव्यामुळे ती रक्कम त्यांना देता आली नाही. यानंतर अर्जदार यांनी दिवाणी न्यायालय नांदेड येथे अर्ज क्र.16/05 दाखल केले होते तो दि.12/11/2008 रोजी निकाली निघाला. यानंतर गैरअर्जदारास वारसा हक्क प्रमाणपत्र अर्जदाराकडुन मिळालेनंतर दि.18/04/2009 रोजी देय रक्कमे पैकी रुद्य49,907/- चेक क्र.805815 नुसार सुनिता यास व अज्ञान अभिषेक याला रु.49,907/- चेक क्र.805816 नुसार तो अज्ञान असल्यामुळे सुनिता यांच्या नांवाने देण्यात आला व अर्जदार चंद्रकलाबाई यास रु.49,907/- चेक क्र.801857 असे प्रदान केले अशा रितीने गैरअर्जदाराने वादातील दोन विमाखाली देय रक्कम प्रदान केलेले आहे. त्यामुळे आज रोजी गैरअर्जदार काहीही देणे लागत नाही. अर्जदाराची मुळ तक्रार दिवाणी अर्ज क्र.16/05 च्या आदेशाचे पालन गैरअर्जदाराने केले नाही, अर्जदाराने कागदपत्रांची पुर्तता 2004 अखेर करुनही ती रक्कम अर्जदारास दिली नाही. सदरील दोन्ही रक्कम एप्रिल मध्ये बिन व्याजी दिले हे म्हणणे अमान्य आहे. वारस प्रमाणपत्र फेब्रुवारी 2009 प्राप्त झाल्यावर डिसचार्ज फॉर्म 2009 मध्ये अर्जदाराकडुन प्राप्त झाल्यावर वारसांना 1/3 रक्कम प्रदान केली. त्यामुळे अर्जदाराची विमा रक्कम त्यावरील व्याज मिळण्याची मागणी अमान्य आहे. अर्जदार यांनी पुरावा म्हणुन आपले शपथपत्र तसेच गैरअर्जदार यांनी पुरावा म्हणुन आपले शपथपत्र दाखल केले आहे. दोन्ही पक्षकार यांनी दाखल केलेले दस्तऐवज बारकाईने तपासुन व वकीला मार्फत केलेला युक्तीवाद ऐकुन खालील मुद्ये उपस्थित होतात. मुद्ये. उत्तर. 1. गैरअर्जदारांच्या सेवेतील त्रुटी सिध्द होते काय? नाही. 2. काय आदेश? अंतीम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्या क्र. 1 – पॉलिसी क्र.922120915 ही पॉलिसी या प्रकरणांत दाखल केली असुन पॉलिसी दि.25/07/2003 रोजी मयत बसवराज यांचे नांवाने काढली जी की, रु.50,000/- ची आहे. यातील नॉमिनी म्हणुन सुनीता यांचे नांव आहे दि.04/06/2004 रोजी बसवराज यांचा मृत्यु झाल्यावर त्यांची पत्नी सुनीता यांनी गैरअर्जदार यांना अर्ज केला व दाव्याची रक्कम मागीतली त्यानुसार दि.10/07/2004 रोजी गैरअर्जदारांनी पत्र लिहुन दावा प्रस्ताव दाखल करण्यास सांगीतले व याप्रमाणे या पॉलिसी अंतर्गत मयताची पत्नी सुनीता यांना दि.17/12/2004 रोजी रु.1,01,789/- मृत्यु दावा दिला, ज्याची रशिद याप्रकरणांत दाखल आहे. गैरअर्जदाराचे म्हणणेप्रमाणे या पॉलिसीमधील मयताची पत्नी ही नॉमिनी असल्या कारणांने गैरअर्जदार यांनी त्यांना पुर्ण रक्कम अदा केलेले आहे. यानंतर पॉलिसी क्र.921944141 अंतर्गत रु.1,49,722/- दिलेले आहेत. अर्जदार यांनी दोन्ही पॉलिसीबद्यल दि.19/02/2009 रोजी गैरअर्जदार यांना पत्र दिले होते व 1/3 रक्कम देण्याचे सांगितले होते. याप्रमाणे पत्नी व मुलगा व आई यांना समान प्रमाणात चेक क्र.805815, 805816,801857 नुसार प्रत्येकी दिलेले आहे. या सर्वांच्या पावत्या अर्जदारांनी दाखल केलेले आहे, त्यावर दि.18/02/2009 अशी तारीख आहे. गैरअर्जदाराच्या म्हणण्याप्रमाणे विमा पॉलिसी क्र.922120915 यात फक्त सुनीता वारस आहे त्यामुळे तिला ताबडतोब मदत म्हणुन गैरअर्जदारांनी ही रक्कम दिली आहे. दुसरी पॉलिसी क्र.921944141 यात आई,पत्नी,मुलगा या तिघांना समान रक्कम वाटुन दिले आहे. दिवाणी न्यायालयातील अर्ज क्र.16/05 दाखल होते व याचा निकाल दि.12/11/2008 रोजी देण्यात आला. दिवाणी न्यायालयाने वारस ठरविलेले आहे तेंव्हा हा वाद मिटल्यावर व वारस प्रमाणपत्र मिळाल्यावरच मृत्यु क्लेम देय होता. याप्रमाणे गैरअर्जदारांनी आदेशाची अंमलबजावणी केलेली आहे. अर्जदारांनी आपल्या तक्रार अर्जात सुरुवातीस कधी रक्कम मिळाली म्हणतात, कधी रक्कम मिळाली नाही म्हणतात, त्यातच तक्रारअर्जातील परिच्छेद क्र.3 मध्ये एका पॉलिसीची रक्कम दि.17/04/2009 ला दिली व दुस-या पॉलिसी क्र.922120915 याची रक्कम मागीतली आहे व परिच्छेद क्र. 4 मध्ये पॉलिसी क्र. 921944141 अन्वये अर्जदारास रु.95,000/- रक्कम मिळाल्याचे म्हणतात म्हणजे अर्जदार स्वतः एवढया गोंधळात आहेत की, कधी रक्कम मिळाली म्हणतात कधी रक्कम मिळाली नाही म्हणतात. गैरअर्जदारांनी रक्कम मिळाल्याचा पुरावा दिला आहे. एका पॉलिसीची रक्कम 2004 मध्ये देण्यात आली आहे दुसरी पॉलिसीची रक्कम वारस प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे व दिवाणी न्यायालयात दावा दाखल असल्या कारणाने देण्यास विलंब झाला व त्यावर आदेश झालेनंतर गैरअर्जदार यांनी त्यावर ताबडतोब अंमलबजावणी केली. एकंदरीत परिस्थिती पाहीली असता, गैरअर्जदारांनी अंमलबजावणीमध्ये कुठेही कसुर केल्याचे आढळत नाही. 2009 मध्ये अर्जदाराने विना तक्रार सही करुन विम्याची रक्कम स्विकारली आहे, त्यावेळेस कुठलाही उजर घेतलेला नाही किंवा ही रक्कम अंडरप्रोटेस्ट स्विकारतो असे म्हटलेले नाही. परत अशा प्रकारची अंमलबजावणी प्रकरण दाखल केले व यात भयानक गोंधळ झाला आहे. त्यामुळे त्यांच्याकडुनच योग्य पुर्तता झाली नाही. त्यामुळे मानिसिक त्रासाबद्यल व दाव्याची रक्कम मिळण्यास ते पात्र नाहीत. यात दिवाणी न्यायालयाच्या आदेशाची प्रत दाखल केलेले असुन त्यांनी वारस व हिस्सा ठरविलेला आहे व यासाठी अर्जदार हेच न्यायालयात गेलेले होते त्यामुळे आदेशाच्या नंतरच त्यांचा हिस्सा त्यांना मिळणे अभिप्रेत होते. यात काही विलंब झाला असे आम्हास वाटत नाही. त्यामुळे व्याज मागण्यास अर्जदार पात्र नाही. वरील सर्व बाबींचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रारअर्ज खारीज करण्यात येतो. 2. दावा खर्च ज्यांनी त्यांनी आपापला सोसावा. 3. संबंधीत पक्षकार यांना निकाल कळविण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाडे पाटील) (श्रीमती.सुवर्णा.देशमुख) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष सदस्या सदस्य गो.प.निलमवार.लघूलेखक. |