(घोषित द्वारा श्रीमती ज्योती पत्की,सदस्य) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार खालीलप्रमाणे आहे. तक्रारदाराची पत्नी नामे रिजवान सुलताना भ्र.ख्वाजा बसारत अहेमद यांनी गैरअर्जदार कडून दिनांक 28/2/2008 रोजी रक्कम रु 2 लाखाची नॉन मेडिकल पॉलिसी घेतली होती. तक्रारदाराची पत्नी दिनांक 24/5/2009 रोजी मयत झाली. तक्रारदाराने दिनांक 29/5/2009 रोजी आवश्यक त्या कागदपत्रासहीत गैरअर्जदार विमा कंपनीकडे विमा रक्कम मिळावी म्हणून विमा दावा दाखल केला. परंतु गैरअर्जदार विमा कंपनीने दिनांक 14/10/2009 रोजी स्वास्थ्याबद्दलचे मुद्दे काढून पॉलिसीची रक्कम देता येणार नाही असे कळविले. विमा कंपनीने, तक्रारदाराच्या पत्नीने नॉन मेडिकल पॉलिसी काढत असताना सदरील मुद्दे निदर्शनास आणले नव्हते तसेच प्रश्नांचा कागद पॉलिसीस लावलेला नव्हता. गैरअर्जदार विमा कंपनी विम्याची रक्कम रु 2 लाख देण्यास टाळाटाळ करीत आहे त्यामुळे तक्रारदारास मानसिक त्रास व आर्थिक त्रास झाला आहे. म्हणून तक्रारदाराने विमा रक्कम व खर्च रु 10,000/- गैरअर्जदार विमा कंपनीकडून देण्यात यावेत अशी विनंती केली आहे. गैरअर्जदार विमा कंपनीने लेखी निवेदन दाखल करुन हे मान्य केले आहे की, तक्रारदाराच्या पत्नीने दिनांक 28/2/2008 रोजी नॉन मेडिकल पॉलिसी अंतर्गत विमा उतरविला होता. परंतु तिने विमा पॉलिसी घेताना 2003 सालापासून मधुमेह व अतिउच्च रक्तदाबाचा विकार होता ही आरोग्यासंबंधीची माहिती लपवून ठेवली. तसेच तिला कर्क रोगाचा आजार होता ही माहितीही लपवून ठेवली. या कारणावरुन तक्रारदाराने दाखल केलेला विमा दावा नामंजूर केल्याचे म्हटले आहे. पॉलिसीतील क्लॉज 7 मध्ये नमूद केल्याप्रमाणे तक्रारदाराच्या पत्नीने आरोग्यासंबंधात विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात गेल्या पाच वर्षापासून कांही आजार होते का याचे उत्तर नाही असे दिलेले आहे. तक्रारदाराच्या पत्नीने विमा पॉलिसी घेताना दिनांक 12/3/2003 ते 19/3/2008 पर्यंत अमेय हॉस्पिटल मध्ये उपचार घेतले तसेच दिनांक 19/5/2008 ते 29/5/2008 पर्यंत समर्थ इस्टिटयूट ऑफ डायबेटीक येथे उपचार घेतल्याची माहिती मुद्दाम लपवून ठेवली. तक्रारदाराच्या पत्नीने दिनांक 29/2/2008 रोजी पॉलिसी घेतली परंतु हप्ता न भरल्यामुळे पॉलिसी लॅप्स झाली. त्यानंतर पुन्हा हप्त्याची रक्कम भरुन पॉलिसी दिनांक 29/1/2009 रोजी पुनर्जिवीत केली, त्यावेळेस देखील तक्रारदाराच्या पत्नीने कर्करागाचे व अतिउच्च रक्तदाबासाठी कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्याची माहिती लपवून ठवेली. तक्रारदाराच्या पत्नीने डायबेटीक अतिउच्च रक्तदाबासाठी उपचार 2003 पासून डॉक्टर वर्षा आपटे यांच्याकडे नियमितपणे उपचार घेतले ही बाब पॉलिसी घेतअसताना लपवून ठेवली. अशा प्रकारे तक्रारदाराच्या पत्नीने विमा पॉलिसीच्या अटी व शर्तीचे उल्लंघन केले आहे. तिच्या मृत्यूनंतर तक्रारदाराने गैरअर्जदार विमा कंपनीकडे विमा रक्कम मिळावी म्हणून विमा दावा दाखल केला. परंतु तक्रारदाराचा विमा दावा विमा कंपनीने योग्य कारणावरुन फेटाळला असून विमा कंपनीच्या सेवेत कोणतीही त्रुटी नाही. तक्रारदाराने खोटा विमा दावा दाखल केला असल्यामुळे तो खर्चासह फेटाळण्यात यावा अशी विनंती गैरअर्जदार विमा कंपनीने केली आहे. दोन्हीही पक्षकांरानी दाखल केलेले शपथपत्र आणि कागदपत्राची मंचाने पहाणी केली तसेच दोन्हीही पक्षांचा युक्तिवाद ऐकला. तक्रारदाराची पत्नीने गैरअर्जदार विमा कंपनीकडे नॉन मेडिकल पॉलिसी अंतर्गत विमा उतरविला होता आणि त्या मयत झाल्यानंतर तक्रारदाराने विम्याची रक्कम मिळावी म्हणून विमा कंपनीकडे विमा दावा दाखल केला याबाबत वाद नाही. गैरअर्जदार विमा कंपनीने दाखल केलेल्या प्रपोजल फॉर्मचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, तक्रारादाराच्या पत्नीने विमा पॉलिसीच्या प्रपोजल फॉर्ममधील क्लॉज 7 मध्ये तिच्या आरोग्यासंबंधीची माहिती असलेल्या प्रश्नांच्या उत्तरात मागील पाच वर्षापासून कांही आजार होते का याचे उत्तर नाही असे लिहीलेले आहे. सदरील प्रपोजल फॉर्मवर तक्रारदाराच्या पत्नीने सहया केलेल्या आहेत. गैरअर्जदार विमा कंपनीने दाखल केलेले कागदपत्रे व डॉ वर्षा आपटे यांच्या शपथपत्रावरुन तक्रारदाराच्या पत्नीस दिनांक 21/3/2003 पासून मधूमेह आणि अतिउच्च रक्तदाबाच्या विकार होता आणि त्या नियमितपणे उपचार घेत होते हे स्पटपणे दिसून येते. तसेच डॉ.हेमंत फटाले यांच्या शपथपत्रावरुन तक्रारदाराच्या पत्नीने समर्थ एण्डॉरीन इस्टिटयूट ऑफ डायबेटीक्स यांच्याकडे देखील अतिउच्च रक्तदाब व मधुमेह व अनिमिया यासाठी उपचार घेतल्याचे दिसून येते. परतु तक्रारदाराच्या पत्नीने त्या उपचार घेत होत्या याबाबीचा उल्लेख विमा पॉलिसी घेताना प्रपोजल फॉर्ममध्ये केलेला नाही आणि आजारासंबंधीची माहिती न देता पॉलिसी घेऊन तक्रारदाराच्या पत्नीने गैरअर्जदार विमा कंपनीची एक प्रकारे फसवणूकच केलेली आहे. विमा कंपनी आणि पॉलिसीधारक यांचे नाते हे विश्वासाचे असते. विमा कंपनी ही विश्वासावर चालणारी संस्था आहे. प्रस्तूतच्या प्रकरणात तक्रारदाराच्या पत्नीने तिला असलेल्या आजारासंबंधीची माहिती लपवून ठेऊन गैरअर्जदार विमा कंपनीचा विश्वासघात केला आहे असे मंचाचे मत आहे. तिच्या मृत्यूनंतर तक्रारदाराने विमा कंपनीकडे पॉलिसीची विमा रक्कम मिळावी म्हणून विमा दावा दाखल केला परंतु विमा कंपनीने तक्रारदाराच्या पत्नीने पॉलिसी घेताना प्रपोजल फॉर्मवर आरोग्यासंबंधीची माहिती लपवून ठेवली या कारणावरुन विमा दावा फेटाळला आहे हे योग्य आहे. विमा कंपनीने तक्रारदाराचा विमा दावा फेटाळून कोणतीही चूक केली नाही आणि तक्रारदारास द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली नाही असे मंचाचे मत आहे. म्हणून मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे. आदेश 1. तक्रारदाराचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे. 2. दोन्हीही पक्षकारांनी आपआपला खर्च सोसावा. (श्रीमती ज्योती पत्की) (श्रीमती रेखा कापडिया) (श्रीमती अंजली देशमुख) सदस्य सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Smt. Anjali L. Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |