श्री. शेखर मुळे, मा. अध्यक्ष यांचे आदेशांन्वये.
- तक्रारकर्तीने सदर तक्रार विमा कंपनी आणि वित्तीय कंपनी विरुध्द तिच्या मृतक पतीचा विमा दावा नाकारल्यामुळे ग्रा.सं.का. 1986 अंतर्गत कलम 12 अन्वये दाखल केलेली आहे.
2. तक्रारकर्ती ही मृतक संजय लढ्ढा यांची पत्नी आहे. तिच्या पतीचा मृत्यु 19.05.2015 रोजी झाला. तिचे मृतक पती हयात असतांना त्याने आणि तक्रारकर्तीने मिळून वि.प.क्र. 2 विरुध्द रु.30,00,000/- चे कर्ज 22.09.2014 ला घेतले होते. त्यावेळी वि.प.क्र. 2 ने तिच्या पतीला जबरदस्ती केली की, कर्जाची रक्कम मिळण्यापूर्वी वि.प.क्र. 1 कडून जिवन विमा पॉलिसी घ्यावी. त्यांना दुसरा कुठला पर्याय नसल्याने त्यांनी वि.प.क्र. 1 कडून रु.12,31,270/- रकमेची जिवन विमा पॉलिसी काढली. पॉलिसी घेतेवेळी वि.प.क्र. 1 ला तिच्या पतीने कल्पना दिली होती की, त्याला रक्तदाब, मधुमेह आणि इतर आरोग्य विषयक तक्रारी होत्या. तक्रारकर्तीचे असे म्हणणे आहे की, पॉलिसी प्रस्ताव फॉर्म वि.प.च्या मॅनेजरने भरला होता. तिच्या पतीच्या मृत्युनंतर पोलिसांनी चौकशी केली होती आणि शव विच्छेदन केले होते. त्यावेळी मृत्युचे कारण Coronary Artery Insufficiency म्हणजे हार्ट अटॅक सांगण्यात आले होते. म्हणजेच तिच्या पतीचा मृत्यु नैसर्गिकरीत्या झालेला होता. दि.12.08.2015 ला तक्रारकर्तीने वि.प.क्र. 1 कडे पतीचा मत्यु दावा दाखल केला. दि.31.08.2015 ला वि.प.क्र. 1 कडून तिला दावा नाकारल्याचे पत्र प्राप्त झाले. दावा नाकारल्याचे कारण असे देण्यात आले होते की, तिच्या पतीने प्रपोजल फॉर्ममध्ये स्वतःच्या स्वास्थ्य/आजारपणा विषयी चुकीची माहिती दिली होती. तक्रारकर्तीचे असे म्हणणे आहे की, तिला माहित पडले की, वि.प.च्या मॅनेजरने प्रस्ताव फॉर्म भरतांना तिच्या पतीच्या आजारपणाविषयी काहीच लिहिले नव्हते. पण तिच्या पतीने मॅनेजरला स्वतःच्या आजारपणाविषयी माहिती दिली होती. त्याशिवाय, कर्ज घेण्यासाठी तिच्या पतीला वास्तविक पाहता आरोग्य विमा पॉलिसी घेण्याची गरज नव्हती. तिच्या पतीकडून वि.प.ला त्याच्या आजारपणाविषयी कुठलीही खोटी माहिती दिली नव्हती किंवा त्याबद्दलची माहिती लपवून ठेवण्यात आली नव्हती. त्यामुळे दावा नाकारुन वि.प.ने सेवेत कमतरता ठेवली आणि अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला. या कारणास्तव तिने तक्रार दाखल करुन वि.प.कडून रु.12,31,270/- ही रक्कम 18 टक्के व्याजाने मागितली असून, झालेल्या त्रासाबद्दल रु.1,00,000/- नुकसान भरपाई आणि रु.10,000/- तक्रारीचा खर्च मागितला आहे.
3. वि.प.क्र.1 ने नोटीस प्राप्त झाल्यावर, तक्रारीत लेखी उत्तर नि.क्र. 17-ए वर दाखल केले आणि तक्रारकर्ती व तिच्या पतीला कर्ज दिल्याबद्दलचा मजकूर मान्य केला आहे. परंतू ही बाब नाकारली आहे की, त्याने तक्रारकर्तीच्या पतीला कर्जाची रक्कम देण्यापूर्वी जिवन विमा पॉलिसी घेण्याचा आग्रह केला होता. परंतू ही वस्तूस्थिती आहे की, तक्रारकर्तीच्या पतीने वि.प.क्र. 1 कडून स्वतःची जिवन विमा पॉलिसी रु.12,31,270/- करीता काढली होती. वि.प.क्र. 1 ने हे पूर्णपणे नाकबूल केले की, तक्रारकर्ती किंवा तिच्या पतीने त्याला असलेल्या आजारासंबंधी खरी माहिती पॉलिसी घेतांना दिली होती. त्याचप्रमाणे हे नाकबूल केले की, प्रस्ताव फॉर्म हा त्याच्या मॅनेजरने भरला होता. तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु आणि मृत्युचे कारण, शव विच्छेदन अहवाल इ. बाबीबद्दल वि.प.क्र. 1 ने कुठलेही विशेष कथन केले नाही. पुढे विशेष करुन असे नमूद केले की, तक्रारकर्तीच्या पतीला मधुमेह, Alcoholic hepatitis with Cirrhosis of Lever, diabetic neuropathy, neuropathy and Metabolic encephalopathy हा आजार 5 वर्षापेक्षा जास्त काळापासून होती. परंतू या आजारासंबंधी तक्रारकर्तीच्या पतीने किंवा तिने प्रस्ताव फॉर्ममध्ये काहीही लिहिले नाही आणि अशाप्रकारे विमाधारकाच्या आजारपणाविषयी महत्वाची माहिती लपवून ठेवली. त्यामुळे पॉलिसीच्या अटी आणि शर्तीचा भंग त्याने केला आणि म्हणून तक्रारकर्तीला पॉलिसी अंतर्गत कुठलाही लाभ देय होत नव्हता आणि त्या कारणास्तव तिचा दावा नामंजूर करण्यात आला. अशाप्रकारे त्यांनी अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब किंवा सेवेत कमतरता ठेवली हा आरोप नाकबूल करुन तक्रार खारिज करण्याची विनंती केली.
4. वि.प.क्र. 2 ला बरीच संधी मिळूनही त्याने लेखी उत्तर सादर न केल्यामुळे प्रस्तुत प्रकरण त्यांचे लेखी उत्तराशिवाय चालविण्यात आले. तसेच प्रकरण युक्तीवादाकरीता आल्यावर मंचाने उभय पक्षकांराचा युक्तीवाद त्यांच्या वकीलांमार्फत ऐकला. तसेच दाखल दस्तऐवजांचे अवलोकन केले असता मंचाचे निष्कर्ष खालीलप्रमाणे.
5. वि.प.क्र. 2 जी एक वित्तीय कंपनी आहे, त्यांनी आपला लेखी जवाब सादर न करुन अप्रत्यक्षपणे हे मान्य केले आहे की, तक्रारकर्ती आणि तिच्या पतीने त्यांच्याकडून रु.30,00,000/- कर्ज घेतले होते. परंतू वास्तविक पाहता ही तक्रार वि.प.क्र. 1 विमा कंपनीविरुध्द तक्रारकर्तीच्या पतीच्या विमा दाव्याची राशी मिळण्यासाठी दाखल केली आहे आणि हीच तिच्या तक्रारीतील मुख्य मागणी आहे. त्यामुळे वि.प.क्र. 2 चा विमा राशीशी काहीही संबंध नाही.
6. पहिला प्रश्न असा उपस्थित होतो की, वि.प.ने तक्रारकर्ती आणि तिच्या पतीला कर्जाची रक्कम वितरीत करण्यापूर्वी जिवन विमा पॉलिसी काढण्याचा आग्रह धरला होता की नाही. लोन ऑफर लेटर वाचले असता त्यामध्ये केवळ एकच अट अशी होती की, कर्जाऊ रक्कम ही तक्रारकर्ती आणि तिच्या पतीच्या नावे असलेली मिळकत गहाण ठेवून देण्यात येणार होती आणि गहाण ठेवलेली मिळकत जोपर्यंत कर्जाची परतफेड होत नाही त्या अवधीसाठी विमाकृत करणे आवश्यक होते. याबद्दल वाद नाही की, कर्ज हे मिळकत गहाण ठेवून घेण्यात आलेले होते. त्याशिवाय, वि.प.क्र. 1 ने कर्जाची रक्कम जिवन विमा पॉलिसी विकत घेण्यापूर्वी वितरीत केली होती. त्यामुळे तक्रारकर्तीने केवळ दिलेल्या निवेदनावर हे ग्राह्य धरता येणार नाही की, दोन्ही वि.प.ने तिला किंवा तिच्या पतीला वि.प.क्र. 1 कडून जिवन विमा पॉलिसी काढण्याचा आग्रह केला होता.
7. हे वादातित नाही की, तक्रारकर्तीच्या पतीने रु.12,31,270/- स्वतःची जिवन विमा पॉलिसी काढली होती. जर तिच्या पतीचा मृत्यु कर्जाची रक्कम पूर्ण परतफेड करण्यापूर्वी झाला असता तर सुरक्षा म्हणून ती पॉलिसी तक्रारकर्तीच्या पतीने काढली होती. त्यामुळे तक्रारकर्तीच्या पतीला स्वतःच्या आजारपणाविषयी किंवा स्वास्थ्याविषयी पूर्ण आणि सत्य परिस्थिती वि.प.क्र. 1 ला पॉलिसी देण्यापूर्वी सांगणे अनिवार्य होते. वि.प.क्र. 1 ने आपल्या लेखी उत्तरात असे म्हटले आहे की, प्रस्ताव फॉर्ममध्ये तक्रारकर्तीच्या पतीने स्वतःच्या आजारपणाविषयी किंवा स्वास्थ्याविषयी विचारलेल्या प्रश्नांची नकारार्थी उत्तरे देऊन असे दर्शविले आहे की, त्याला कुठल्याही प्रकारचा आजार किंवा स्वास्थ्याविषयी तक्रार नव्हती किंवा त्याने कधीही स्वतःवर उपचार करुन घेतले नव्हते. तसेच त्याला कुठल्याही प्रकारचा हृदय विकार, उच्च रक्त दाब, मज्जा संस्थेविषयी कुठलेही आजार किंवा कुठल्याही प्रकारची वैद्यकीय अवस्था नव्हती आणि त्याचे स्वास्थ्य अत्तुत्तम होते. या त्याने दिलेल्या प्रश्नांच्या उत्तरावर विश्वास ठेवून विमा पॉलिसी त्याला देण्यात आली होती. ज्यावेळी पतीच्या मृत्युनंतर तक्रारकर्तीने विमा दावा दाखल केला त्यावेळी चौकशी करण्यात आली होती आणि असे निष्पन्न झाले की, तिच्या पतीला Alcoholic hepatitis with Cirrhosis of Lever, diabetic neuropathy, neuropathy and Metabolic encephalopathy हा आजार ब-याच वर्षापासून होता आणि मृत्युच्या मागिल 5 वर्षापासून तो मधुमेह आणि उच्च रक्त दाब ग्रस्त होता. जानेवारी, 2014 मध्ये त्याला दवाखान्यात सुध्दा भरती करण्यात आले होते. त्याचे स्वास्थ्याविषयी विचारल्या प्रश्नांची नकारार्थी उत्तरे दिली जी बाब पूर्ण असत्य होती. याच कारणास्तव विमा दावा नाकारण्यात आलेला आहे.
8. तक्रारकर्तीचे असे म्हणणे आहे की, विमा पॉलिसी प्रस्ताव फॉर्म आणि त्यामध्ये विचारण्यात आलेल्या स्वास्थ्याविषयी प्रश्नांची उत्तरे ही वि.प.च्या मॅनेजर किंवा प्रतिनीधीने लिहिली होती. तिच्या पतीने प्रतिनीधीला स्वतःच्या स्वास्थ्याविषयी पूर्ण सत्य माहिती दिली होती, परंतू त्या प्रतिनीधीने त्याचेविषयी असत्य माहिती प्रस्ताव फॉर्ममध्ये भरली. त्यामुळे तिचे असे म्हणणे की, प्रस्ताव फॉर्ममध्ये पतीची स्वास्थ्याविषयी भरलेली असत्य माहितीसंबंधाने तिला किंवा तिच्या पतीला जबाबदार धरता येणार नाही. तक्रारकर्तीच्या पतीने या मुद्यावर Sahara India Life Insurance Company Ltd. Vs. Rayani Ramanjaneyulu III (2014) CPJ 582 (NC) या निवाडयाचा आधार घेतला आहे. या निवाडयात असे म्हटले आहे की, विमा कंपनीच्या प्रतिनीधीच्या चुकीमुळे विमाधारकाने पूर्वी घेतलेल्या पॉलिसीसंबंधीची माहिती जर विमा कंपनीला दिली नसेल तर विमाधारकाने महत्वाची माहिती लपवून ठेवली असे म्हणता येणार नाही, कारण विमा कंपनीच्या प्रतिनीधीच्या चुकीमुळे विमाधारक किंवा त्यांच्या वारसाचे नुकसान करता येणार नाही. या निवाडयाचा आधार तक्रारकर्त्याला मिळेल असे मंचाला वाटत नाही. कारण या प्रकरणात असा कुठलाही पुरावा नाही की, प्रस्ताव फॉर्ममध्ये माहिती आणि विशेष करुन स्वास्थ्याविषयी दिलेली उत्तरे ही वि.प.च्या प्रतिनीधीने भरलेली होती.
9. याउलट, वि.प.क्र. 1 च्या वकीलांनी P.C.Chako vs. Chairman, Life Insurance Corporation of India, Appeal (civil) 5322 of 2007 (SC) decided on 20/11/2007 या निवाडयाचा आधार घेतला, ज्यामध्ये विमाधारकाने स्वतःच्या आजारपणाविषयी माहिती लपवून ठेवल्यामुळे विमा दावा नाकारण्यात आला होता. मा. सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटले आहे की, विमा करार तसेच जिवन विमा करार हे विश्वासावर (utmost goodfaith) वर आधारीत असतात आणि कुठलीही महत्वाची माहिती प्रस्तावित विमाधारकाने सांगणे अपेक्षित असते नाहीतर केवळ त्या कारणास्तव विमा दावा नाकारण्यास विमा कंपनीला कायदेशीररीत्या योग्य कारण मिळू शकते.
10. तक्रारकर्तीने हे नाकबूल केले नाही की, तिच्या पतीला मधुमेह, रक्तदाब, Cirrhosis of Lever आणि diabetic neuropathy हे आजार होते. diabetic neuropathy ही अवस्था जेव्हा येते ज्यावेळी मधुमेह योग्य रीतीने नियंत्रित केल्या गेला नसेल. अनियंत्रित मधुमेह किंवा diabetic neuropathy मध्ये बहुधा हार्ट फेल्युयर किंवा हार्ट अटॅक होण्याची दाट शक्यता असते. प्रस्ताव फॉर्मवर स्वाक्षरी करण्यापूर्वी तक्रारकर्तीच्या पतीने त्यातील मजकूर वाचून समजून घेणे अपेक्षित नाहीतर आवश्यकही होते. एखाद्या प्रस्ताव फॉर्मवर सही केल्यानंतर आणि पॉलिसी विकत घेतल्यानंतर तक्रारकर्ती आता असे म्हणत आहे की, तो प्रस्ताव फॉर्म तिच्या पतीने नव्हे तर वि.प.च्या प्रतिनीधीने भरला होता. तक्रारकर्तीचा हा आरोप स्विकारण्यायोग्य नाही आणि केवळ तिचा दावा ज्या कारणास्तव नाकारला त्याला आव्हान देण्यासाठी म्हणून तिने हा मुद्दा उपस्थित केल्याचे दिसून येते. त्यामुळे तिने तक्रारीत उपस्थित केलेल्या या मुद्याशी मंच सहमत नाही. तक्रारकर्तीच्या पतीने स्वतःच्या आजारपणा विषयीची माहीती प्रस्ताव फॉर्ममध्ये न भरुन विमा कराराचा एकप्रकारे भंग केला आणि त्यामुळे वि.प.क्र. 1 ने विमा दावा योग्य कारणास्तव नाकारला असे मंचाचे मत आहे.
11. तक्रारीतील मजकुरावरुन वि.प.क्र. 2 ला या प्रकरणात नाहक प्रतिपक्ष बनविल्याचे दिसून येते. कारण त्याच्याविरुध्द तक्रार दाखल करण्यास कुठलेही कारण दिसून येत नाही. तसेच त्यांचेविरुध्द नुकसान भरपाई सोडून कुठलीही मागणी केलेली नाही. वरील कारणास्तव सदर तक्रार खारिज करण्यायोग्य असल्याचे दिसून येते.
उपरोक्त निष्कर्षावरुन मंच सदर प्रकरणी खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
- तक्रारकर्त्याची तक्रार खारिज करण्यात येते.
- उभय पक्षांनी आप-आपला खर्च सोसावा.
- तक्रारीची प्रमाणित प्रत उभय पक्षांना विनामूल्य पुरविण्यात यावी.