::निकालपत्र::
(पारीत व्दारा- श्री शेखर प्रभाकर मुळे, मा.अध्यक्ष.)
(पारीत दिनांक–25 सप्टेंबर, 2017)
01. तक्रारकर्त्याने ग्राहक मंचा समक्ष ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 खाली विरुध्दपक्ष भारती अक्सा जनरल इन्शुरन्स कंपनी (Bharti AXA general Insurance Company) आणि क्लेम मॅनेजर विरुध्द तक्रारकर्त्याचा विमा दावा मंजूर न केल्या संबधी अतिरिक्त ग्राहक मंचा समक्ष दाखल केलेली आहे.
02. तक्रारकर्त्याचे तक्रारी नुसार संक्षीप्त कथन पुढील प्रमाणे-
तक्राकर्त्याने विरुध्दपक्ष विमा कंपनी कडून वैयक्तिक अपघात गट विमा पॉलिसी एकूण रुपये-3,00,000/- एवढया रकमेची काढली होती आणि सदर पॉलिसीचा कालावधी हा दिनांक-15/05/2010 ते दिनांक-14/05/2011 असा होता. पॉलिसीचे कालावधीत विमाधारकास अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास त्याला विमा राशी देय होती. दिनांक-19/08/2010 ला तक्रारकर्ता खापरखेडया वरुन कामठी येथे जात असताना त्याचा अपघात झाला आणि त्यात त्याला गंभिर दुखापत झाली. त्याला कामठी येथील रॉय हॉस्पीटल मध्ये भरती करण्यात आले आणि तेथून त्याला दिनांक-26/08/2010 रोजी डिसचॉर्ज देण्यात आला. त्याला वैद्दकीय उपचारावर रुपये-1,00,000/- एवढा खर्च आला. घटनेच्या दिवशी पोलीसां पण घटनेचा रिपोर्ट देण्यात आला होता. त्या अपघाता मध्ये तक्रारकर्त्याला 75% कायमस्वरुपी अपंगत्व आले. वैद्दकीय खर्चाची प्रतीपुर्ती मिळण्यासाठी त्याने विरुध्दपक्ष विमा कंपनीकडे विमा दावा केला. परंतु त्या नंतर कोणत्या-ना-कोणत्या कारणास्तव त्याच्या विमा दाव्यावर निर्णय घेण्यात आला नाही आणि तेंव्हा पासून तो सतत विरुध्दपक्षांच्या संपर्कात होता परंतु विमा दावा मंजूर करण्यात आला नाही. शेवटी सन-2015 मध्ये विरुध्दपक्ष विमा कंपनी तर्फे त्याला कळविण्यात आले की, त्याने विमा दावा विलंबाने दाखल केल्यामुळे तो खारीज करण्यात आला.
तक्रारकर्त्याला विरुध्दपक्ष विमा कंपनी तर्फे असे सांगण्यात आले होते की, जर त्याला अपघाता मुळे 75% अंपगत्व आले तर त्याला विमा राशीच्या दुप्पट रक्कम मिळेल. विरुध्दपक्षानीं सेवेत कमतरता ठेवली म्हणून त्याने या तक्रारी व्दारे विरुध्दपक्षां कडून रुपये-6,00,000/- व्याजासह मागितले असून, झालेल्या त्रासा बद्दल नुकसान भरपाई आणि तक्रारीचा खर्च मागितला आहे.
03. विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनी तर्फे लेखी उत्तर सादर करण्यात आले. तक्रारकर्त्याची विमा पॉलिसी असल्याची बाब कबुल केली. परंतु हे नाकबुल केले की, तक्रारकर्त्याचा दिनांक-19/08/2010 रोजी अपघात होऊन त्याला दुखापत झाली म्हणून त्याला दवाखान्यात भरती व्हावे लागले. त्यांनी हे सुध्दा नाकबुल केले की, त्याला 75% कायमस्वरुपी अपंगत्व आले आणि त्याच्या वैद्दकीय उपचारावर रुपये-1,00,000/- खर्च आला. तसेच त्याने विरुध्दपक्ष विमा कंपनीकडे सर्व अवश्यक दस्तऐवजांसह त्वरीत विमा दावा दाखल केला ही बाब सुध्दा नकबुल करण्यात आली. वस्तुतः विमा दावा घटनेच्या 317 दिवसा नंतर आणि तो ही विना कागदपत्र दाखल करण्यात आला होता आणि म्हणून विमा पॉलिसीच्या अटी व शर्ती नुसार विमा दावा हा खारीज करण्यात आला होता.
04. विरुध्दपक्ष क्रं-2) ला अतिरिक्त ग्राहक मंचाची रजिस्टर नोटीस मिळूनही तो उपस्थित झाला नाही अथवा लेखी निवेदनही सादर केले नाही म्हणून त्याचे विरुध्द तक्रार एकतर्फी चालविण्यात आली.
05. तक्रारकर्त्याची तक्रार, विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनीचे लेखी उत्तर आणि प्रकरणातील दाखल दस्तऐवज यावरुन अतिरिक्त ग्राहक मंचा तर्फे पुढील प्रमाणे निष्कर्ष देण्यात येतो-
::निष्कर्ष ::
06. सर्वात प्रथम दाखल दस्तऐवजां वरुन ज्या बाबी सकृतदर्शनी सिध्द होतात, त्या आम्ही येथे नमुद करीत आहोत. कारण विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनी तर्फे तक्रारकर्त्याला झालेला अपघात आणि त्यात त्याला आलेले कायमस्वरुपी अंपगत्व या बाबी नाकबुल करण्यात आहेत. तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीचे पुष्टयर्थ एफ.आय.आर.प्रत, घटनास्थळ पंचनामा आणि दोषारोप पत्र इत्यादीच्या प्रती दाखल केलेल्या आहेत, त्या वाचल्यावर हे सिध्द होते की, तक्रारकर्ता हा मोटर-सायकलने जात असतान एका ऑटो रिक्क्षाने त्याचे मोटर-सायकलला धडक दिल्याने त्याचा अपघात होऊन तो दुखापतग्रस्त झाला, त्याचेवर वैद्दकीय उपचार करण्यात आले. इंदिरा गांधी शासकीय वैद्दकीय महाविद्दालय, नागपूर येथील आर्थोपेडीक कमेटीने तक्रारकर्त्यांच्या अपंगत्वा बद्दल दिलेला दाखला अभिलेखावर दखल करण्यात आलेला आहे, त्यानुसार त्याला 75% कायमस्वरुपी अपंगत्व आलेले आहे. हे सर्व शासकीय यंत्रणेव्दारे म्हणजे मेडीकल बोर्डने दिलेले दस्तऐवज बनावट व खोटे असल्याचा आरोप विरुध्दपक्ष विमा कंपनी तर्फे करण्यात आलेला नाही. या सर्व दस्तऐवजां वरुन हे निर्विवादपणे सिध्द होते की, तक्रारकर्त्याला वाहन अपघातात 75% कायमस्वरुपी अपंगत्व आलेले आहे आणि अपघाताचे वेळी त्याची विमा पॉलिसी ही अस्तित्वात होती.
07. विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनी तर्फे वकीलानीं आपल्या युक्तीवादात असे सांगितले की, तक्रारकर्त्याने विमा दावा विलंबाने दाखल केल्यामुळे तो खारीज करण्यात आला. या बद्दल आमचे लक्ष त्यांनी विमा पॉलिसीच्या दस्तऐवजा कडे वेधले, जे तक्रारकर्त्याने स्वतः दाखल केले आहे. विमा पॉलिसीती अट क्रं-11 अनुसार जर विमाधारकाला अपघातामुळे कुठलीही इजा झाली तर त्या बद्दलची लेखी सुचना विमा कंपनीला देणे आवश्यक असते आणि जर अपघाता मध्ये विमा धारकाची डोळयाची दृष्टी गेली असेल किंवा हात-पाय कायम स्वरुपी निकामी झाले असेल तर त्या बद्दलची लेखी सुचना विमा कंपनीला 01 महिन्याच्या आत देणे त्याला बंधनकारक आहे. विमा पॉलिसी मधील या अटीचा आधार घेत असा युक्तीवाद करण्यात अला की, तक्रारकर्त्याने अपघाता संबधी घटनेची सुचना, घटने नंतर 317 दिवसानीं दिली होती आणि त्यामुळे विमा पॉलिसीतील अटी व शर्तीचा भंग झाला आणि म्हणून त्याचा विमा दावा खारीज करण्याची कृती ही कायद्दा नुसार वैध आणि योग्य आहे. विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनी तर्फे आपले म्हणण्याचे समर्थनार्थ पुढील मा.राष्ट्रीय ग्राहक आयोगाचे निवाडयाचा आधार घेण्यात आला-
”RITU SINGHAL-VERSUS- NEW INDIA ASSURANCE CO.LTD.,”-REVISION PETITION NO.-2613 OF 2016, ORDER DATED-17/08/2017 (NC)
उपरोक्त नमुद निवाडया मध्ये सुध्दा विमा धारकने वैयक्तिक अपघात विमा पॉलिसी घेतली होती आणि त्याच्या अपघाती मृत्यू नंतर त्याच्या पत्नीने विमा दावा दाखल केला होता, तो विमा दावा विलंबाने दावा दाखल केला या कारणा वरुन खारीज करण्यात आला होता परंतु ग्राहक मंचाने तक्रार मंजूर केली होती, त्या आदेशा विरुध्द मा.राज्य ग्राहक आयोगाने विमा कंपनीने केलेले अपिल मंजूर केले होते आणि तक्रार खारीज केली होती, त्या आदेशा विरुध्द मा.राष्ट्रीय ग्राहक आयोगाने मा.राज्य ग्राहक आयोगाचा आदेश कायम ठेऊन असे म्हटले की, विमा दावा विलंबाने दाखल केला असल्याने विमा अटी व शर्तीचा सरळ सरळ भंग होतो आणि म्हणून विमा दावा खारीज करण्याचा निर्णय योग्य आहे.
08. तक्रारकर्त्या तर्फे असा युक्तीवाद करण्यात आला की, अपघाता नंतर तो दवाखान्यात भरती होता आणि अपंगत्व आल्यामुळेजवळ जवळ 05-06 महिने त्याला चालता येत नव्हते तसेच त्याची मानसिक स्थिती पण बरोबर नव्हती, त्यामुळे तो विहित मुदतीत विमा दावा दाखल करु शकला नाही परंतु तक्रारकर्त्याने तक्रारीमध्ये त्याला विमा दावा दाखल करण्यास झालेल्या विलंबा बद्दल एक अवाक्षरही लिहिलेले नाही. तसेच विरुध्दपक्ष विमा कंपनीला अपघाताची सुचना केंव्हा दिली आणि विमा दावा केंव्हा दाखल केला या बद्दल सुध्दा काहीही लिहिलेले नाही.
09. उपरोक्त नमुद रितु सिंघल- विरुध्द-न्यु इंडीया एश्योरन्स कंपनी या प्रकरणा मध्ये सुध्दा अशाच प्रकारचा युक्तीवाद म्हणजे तक्रारकर्तीचे पतीचे अपघाती मृत्यू नंतर तिची मानसिक स्थिती योग्य नसल्याने विमा दावा दाखल करण्यास विलंब झाला होता असे कारण देण्यात आले होते परंतु तो युक्तीवाद मा.राष्ट्रीय ग्राहक आयोगाने स्विकारला नाही. आमच्या मते रितु सिंघल-विरुध्द- न्यु इंडीया एश्योरन्स कंपनी मधील निवाडा हा हातातील प्रकरणाला तंतोतंत लागू पडतो म्हणून आणखी काही भाष्य करण्या ऐवजी एवढे म्हणणे पुरेसे ठरेल की, ही तक्रार खारीज होण्यास पात्र आहे कारण तक्रारकर्त्याने विमा दावा विमा पॉलिसीतील अटी व शर्ती नुसार विहित मुदतीत दाखल न केल्यामुळे विलंबाचे कारणा वरुन विमा दावा खारीज करण्याची विरुध्दपक्ष विमा कंपनीची कृती ही योग्य आहे, त्यावरुन आम्ही तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-
::आदेश::
1) तक्रारकर्ता श्री प्रल्हाद हरिभाऊ राहाटे यांची, विरुध्दपक्ष क्रं-1) भारती अक्सा जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड अधिक-1 यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
2) खर्चा बद्दल कोणतेही आदेश नाहीत.
3) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.