(आदेश पारीत व्दारा - श्रीमती चंद्रिका किशोरसिंह बैस, मा.सदस्या)
(पारीत दिनांक : 04 ऑक्टोंबर, 2017)
तक्रारकर्त्याने सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अंतर्गत दाखल केली असून, तक्रारकर्त्याच्या तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालील प्रमाणे आहे.
1. विरुध्दपक्ष ही जनरल इंशुरन्स कंपनी असून ती वाहनाचा विमा काढण्याचा व्यवसाय करतात. तक्रारकर्त्या जवळ “Maruti Suzuki SX4 VXI” मॉडेलची गाडी असून त्याचा रजिस्ट्रेशन नंबर MH-31-CR 1582 व चेसीस नंबर 00125374 आणि इंजिन नंबर M/6A/31/007 असा होता. सदरचे वाहन विरुध्दपक्षा तर्फे पॉलिसी क्रमांक I0898732 व्दारे विमा काढला होता. सदरच्या वाहनाच्या विम्याचा कालावधी दिनांक 17.5.2012 ते 16.5.2013 च्या मध्यरात्री पर्यंत वैध होता. दुर्दैवाने सदरच्या वाहनाचा दिनांक 21.8.2012 ला सावनेर येथे अपघात झाला. त्यानंतर, ताबडतोब तक्रारकर्त्याने सदरचे वाहन श्रीकांत ऑटोमोबाईल, कोराडी रोड, नागपुर येथील वर्कशॉपमध्ये दुरुस्तीकरीता पाठविले. त्यानंतर, तक्रारकर्त्याने दावा क्रमांक C0270701 विरुध्दपक्षाकडे दाखल केला.
2. विरुध्दपक्षाने दिनांक 25.5.2012 ला सदरचे वाहन तक्रारकर्त्याने श्री स्वप्नील बोराडे’ यांना विकला असल्याचे कारण सांगून विमा दावा नामंजूर केला. परंतु, तक्रारकर्त्याच्या म्हणण्यानुसार त्यांनी सदरचे वाहन कधीही कुणाला विकले नाही. कारण, सदरचे वाहन तक्रारकर्त्याचे नावे शासकीय दस्ताऐवजावर आजही आहे. विरुध्दपक्ष हा विमा दावा हेतुपुरस्परपणे नाकारत आहे. तक्रारकर्त्याने सदर वाहनाचे दुरुस्तीकरीता रुपये 1,93,370/- खर्च केले आहे, तसेच सर्व बिल सोबत जोडले आहे. त्यानंतर, तक्रारकर्त्याने वारंवार विरुध्दपक्षास तोंडी विनंती केली, परंतु विरुध्दपक्षाने कोणताही प्रतिसाद न दिल्यामुळे, तक्रारकर्त्याने कायदेशिरित्या वकीला मार्फत नोटीस दिनांक 8.6.2013 रोजी विरुध्दपक्षास पाठविली, परंतु त्याचे कोणतेही उत्तर दिले नाही. त्यामुळे, तक्रारीस कारण सतत घडत आहे. (Cause of action) त्यामुळे, सदरची तक्रार काल मर्यादेत आहे, त्यामुळे तक्रारकर्त्याने खालील प्रमाणे प्रार्थना केलेली आहे.
1) विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास वाहन दुरुस्तीकरीता लागलेला खर्च रुपये 1,93,370/- व्याजासह 18 % दराने द्यावे.
2) तक्रारकर्त्यास झालेल्या मानसिक, शारिरीक त्रासापोटी रुपये 1,00,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 50,000/- द्यावे.
3. तक्रारकर्त्याच्या तक्रारीला अनुसरुन विरुध्दपक्ष यांना मंचाची नोटीस पाठविण्यात आली होती. त्यानुसार विरुध्दपक्षाने लेखीउत्तर दाखल करुन त्यात नमूद केले की, सदरच्या वाहनाचा अपघात घडण्याच्या तिन महिण्या आधीच तक्रारकर्त्याने उपरोक्त वाहन ‘श्री स्वप्नील शंकरराव बोराडे’ यांना रुपये 3,51,000/- मध्ये ओम साई मोटर्स यांचे तर्फे विकला व त्याचवेळी त्यांनी त्या गाडीचा ताबा ‘श्री स्वप्नील बोराडे’ यांना दिला. तेंव्हापासून, सदरचे वाहन ‘श्री स्वप्नील बोराडे’ यांच्या ताब्यात आहे. मोटार वाहन कायदा 1988 च्या कलम 157 प्रमाणे व इंडीयन मोटार टॅरीफ अॅक्टच्या जनरल इंशुरन्सचे कलम 17 प्रमाणे, ‘’जेंव्हा एका ग्राहकाने दुस-या ग्राहकाला गाडी विकली, तेंव्हा तो Consumer Protection Act 1986 प्रमाणे ‘’ग्राहक’’ या व्याख्येत मोडत नाही.’’ त्यामुळे, तक्रारकर्त्याची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी. या संदर्भात मा.सुप्रीम कोर्ट व मा.राष्ट्रीय आयोगांचे बरेच न्यायनिवाडे आहे.
4. ‘श्री स्वप्नील बोराडे’ व भारती एक्सा जनरल इंशुरन्स कंपनी लिमिटेड यांचेमध्ये कुठलाही करारनामा किंवा पॉलिसी अस्तित्वात नाही. त्यामुळे विम्याची देय रक्कम विरुध्दपक्षास लागु होत नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात यावी.
5. सदर प्रकरणात विरुध्दपक्षाच्या वकीलांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला. तक्रारकर्त्याने युक्तीवाद केला नाही. दोन्ही पक्षानी अभिलेखावर दाखल केलेल्या दस्ताऐवजाचे, शपथपत्र, लेखी युक्तीवादाचे अवलोकन करण्यात आले, त्याप्रमाणे खालील प्रमाणे निष्कर्ष देण्यात येते.
मुद्दे : निष्कर्ष
1) तक्रारकर्त्याची तक्रार मंजूर होण्यास पाञ आहे काय ? : होय.
2) अंतिम आदेश काय ? : खालील प्रमाणे
// निष्कर्ष //
6. तक्रारकर्त्याची कार, “Maruti Suzuki SX4 VXI” मॉडेलची गाडी असून त्याचा रजिस्ट्रेशन नंबर MH-31-CR 1582 व चेसीस नंबर 00125374 आणि इंजिन नंबर M/6A/31/007 असा होता. सदरचे वाहनाकरीता विरुध्दपक्षा तर्फे पॉलिसी क्रमांक I0898732 व्दारे विमा काढला होता. सदरच्या वाहनाच्या विम्याचा कालावधी दिनांक 17.5.2012 ते 16.5.2013 च्या मध्यरात्री पर्यंत वैध होता. त्याकरीता, तक्रारकर्त्याने रुपये 12,810/- नगदी स्वरुपात विरुध्दपक्षाकडे भरले होते, तो दस्त क्र.1 वर जोडलेला आहे. तसेच, गाडीचे रजिस्ट्रेशन नंबर MH-31 CR 1582 असल्याचा दस्त क्र.2 वर दाखल आहे. त्यानंतर गाडीमध्ये वेग-वेगळ्या ठिकाणी दुरुस्ती केल्याचे बिल लावलेले आहे. तसेच, तक्रारकर्त्याचे नावे सदरचे वाहन शासकीय दस्ताऐवजा प्रमाणे ‘श्री मोहन कुकरेजा’ यांचे नांव नोंदणीकृत असल्याचे दिसून येते व सदरची तक्रार ही देखील ‘श्री मोहन मोटुमल कुकरेजा’ यांनीच दाखल केली आहे. ज्यावेळी, अपघात घडला त्या दिनांकाला देखील गाडी तक्रारकर्त्याचे नावे नोंदणीकृत होती, केवळ श्री स्वप्नील बोराडे ही ती गाडी चालवीत होता. विरुध्दपक्षाच्या म्हणण्यानुसार सदरचे वाहन हे तक्रारकर्त्याने दुस-यास विकलेले होते. परंतु, ती गाडी जोपर्यंत शासकीय दस्ताऐवजावर नावाची नोंद होत नाही तोपर्यंत जुन्या मालकाचे नावे गाडीची नोंदणी ही कायदेशिर नोंदणी असते. सदरच्या वाहनाचा अपघात हा विमा दाव्याच्या अवधीमध्ये घडला आहे, त्यामुळे विरुध्दपक्षास विमा दाव्याची रक्कम नाकारता येणार नाही.
7. विरुध्दपक्षा तर्फे काही न्यायनिवाड्याचा आधार घेतला आहे. परंतु, ते सदरच्या प्रकरणाशी विसंगत आहे. त्यामुळे, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
// अंतिम आदेश //
(1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
(2) विरुध्दपक्षाला आदेशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्त्यास रक्कम रुपये 1,93,370/- (रुपये एक लाख त्र्यान्नव हजार तिनशे सत्तर फक्त) गाडी अपघाताचा दिनांक 21.8.2012 पासून द.सा.द.शे. 15 % व्याजदराने तक्रारकर्त्याचे हातात पर्डपर्यंत द्यावे.
(3) तसेच, विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास झालेल्या मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रासापोटी रुपये 10,000/- (रुपये दहा हजार) व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 5,000/- (रुपये पाच हजार) द्यावे.
(4) विरुध्दपक्षाने आदेशाची पुर्तता निकालपत्राची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत करावे.
(5) उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क पाठविण्यात यावी.
नागपूर.
दिनांक :- 04/10/2017