नि का ल प त्र
श्री.डी.डी.मडके, अध्यक्षः तक्रारदार यांना विरुध्द पक्ष भारती एक्सा जनरल इन्शुरन्स कं.लि. यांनी विमा क्लेमची रक्कम दिली नाही म्हणून तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार या मंचात दाखल केली आहे.
तक्रार क्र.७४/११
२. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, त्यांनी स्वतःच्या वापरासाठी टाटा एलपीटी ११०९४२/इएक्सझेड आर.टी.ओ. कडील नं.एचएच १८/अेअे३२७ ही गाडी विकत घेतली. सदर वाहनाचा विमा विरुध्द पक्ष भारती एक्सा जनरल इन्शुरन्स कं.लि. (यापुढे संक्षिप्तेसाठी विमा कंपनी असे संबोधण्यात येईल) यांच्याकडून दि.२७/०३/१० ते २६/०३/११ या कालावधीचा काढला आहे. तिचा विमा पॉलिसी नं.एफव्हीसी/आय-२३०३९७५/डी-२/०३/एमआयडी-२१४ असा आहे.
३. तक्रारदार यांची पुढे असे म्हणणे आहे की, दि.२०/११/१० रोजी दुपारी इंदोर ते जुलवानिया जात असतांना अेबीरोड निहाली फाटा जवळ समोरुन येणारा ट्रक नं.एमपी-०९/जीएफ-०२०८ याने जोरदार धडक दिल्याने अपघात झाला व गाडीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. सदर वाहनाच्या दुरुस्तीपोटी तक्रारदार यांना रु.७,६७,२३९/- इतका खर्च आला. सदर अपघाताबाबत विरुध्द पक्ष क्र.१ व २ यांना त्वरीत सुचना दिली व सर्व्हेअर कडून सर्व्हे करण्यास सांगितले. त्यानुसार सर्व्हेअरने सर्व्हे केलेला आहे. सर्व्हेची प्रत अदयाप तक्रारदारास मिळालेली नाही. तसेच विरुध्द पक्ष क्र.२ यांनी तोंडी सांगितले की, क्लेम नं.६००६७२६० नुसार नाशिक येथे क्लेम पाठविला आहे. त्याबाबत कोणतेही लेखी पत्र दिले नाही किंवा गाडी देखील बदलून दिली नाही. गाडी अदयाप दुरुस्तीसाठी पडली आहे. त्यानंतर वेळोवेळी तक्रारदाराने विमा कंपनीकडे कागदपत्रे स्विकारण्याचे सांगितले असता प्रत्येक वेळेस १०-१५ दिवसांनी या मग कागदपत्रे स्विकारु असे सांगून चालढकल करीत आले आहेत. दि.१४/०३/११ रोजी रजि.नोटीस पाठविली. सदरची नोटीस विमा कंपनीस मिळूनही नोटीसीप्रमाणे काहीच पुर्तता केली नाही.
४. तक्रारदार यांनी शेवटी विमा कंपनीकडून गाडी दुरुस्तीचा खर्च रक्कम रु. ७,६७,२३९/-, शारीरीक, मानसिक व आर्स्थिक त्रासापोटी रु.५०,०००/-, वरील दोन्ही रकमेवर तक्रार दाखल तारेखेपासून १२ टक्के प्रमाणे व्याज व तक्रारीचा खर्च मिळावा अशी विनंती केली आहे.
५. तक्रारदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पृष्ठयार्थ नि.3 वर शपथपत्र तसेच नि.५ वरील यादीनुसार ६ कागदपत्रे दाखल केली आहेत. त्यात नि.५/१ वर विमा पॉलिसी, नि.५/२ वर एफआयआर, नि.५/३ वर आर.सी.बुक, नि.५/४ वर इ.कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
६. विरुध्द पक्ष क्र.२ यांनी खुलासा दाखल केला नाही त्यामुळे त्यांच्या विरुध्द नो से आदेश करण्यात आला. तसेच विरुध्द पक्ष क्र.४ हे हजर झाले नाहीत त्यामुळे त्यांच्या विरुध्द प्रकरण एकतर्फा चालविण्याचे आदेश करण्यात आले.
तक्रार क्र.७४/११
७. विरुध्द पक्ष क्र.१ यांनी आपले लेखी म्हणणे नि.१६ वर दाखल करुन तक्रारदाराची तक्रार चुकीची व खोटी असल्यामुळे तसेच विमा कंपनीने कोणत्याही प्रकारे सेवेत त्रुटी केली नाही त्यामुळे तक्रार अर्ज फेटाळण्यात यावा अशी विनंती केली आहे.
९ विमा कंपनीने वस्तुस्थिती या सदरात तक्रारदार यांनी क्लेम फॉर्म भरुन दिलेला नाही, ड्रायव्हींग लायसन्स, फिर्याद, पंचनामा, एस्टीमेट व फायनल बिले कंपनीत दिलेली नाहीत. तक्रारदार यांना दि.०९/०४/१० रोजी पत्र देवून पुर्तता करण्याबाबत कळविण्यात आले होते. तरीही तक्रारदार यांनी कागदपत्रांची पुर्तता केली नाही. यावरुन तक्रारदार यांच्याकडूनच कमतरता दिसून येते असे म्हटले आहे. तसेच विमा कंपनीने विमा दावा नाकारल्याबद्दल तक्रारदारास कळविलेले नाही. तक्रारदार यांनी त्रास देण्यासाठी सदर तक्रार दाखल केलेली आहे.
१०. विमा कंपनीने पुढे असे म्हटले आहे की, त्यांनी सर्व्हेअर श्री.मिलिंद वर्मा यांना मुल्यांकन करण्यासाठी नियुक्त केले होते व दि.१३/०७/११ रोजी श्री.वर्मा यांनी अहवाल दाखल केला आहे. शेवटी तक्रार दाखल करण्यासाठी कारण घडलेले नसल्यामुळे तक्रार फेटाळण्यात यावी अशी त्यांनी विनंती केली आहे.
११. विमा कंपनीने आपल्या म्हणण्याच्या पृष्ठयार्थ नि.१७ वर भागवत साहेबराव सत्ताधीश यांचे शपथपत्र, नि.१९/१ व नि.१९/२ वर तक्रारदारास पाठविलेल्या पत्रांच्या प्रती आणि नि.१५/१ वर सर्व्हे रिपोर्टची प्रत दाखल केली आहे.
१२. विरुध्द पक्ष क्र.३ यांनी आपले लेखी म्हणणे नि.९ वर दाखल करुन त्यात त्यांनी सदर तक्रारीस आयोग्य पक्षकारांना सामिल केले. गाडीच्या विम्याची रक्कम मिळण्याचा किंवा तक्रारदार यांनी त्यांच्या गाडीचा काढलेल्या विम्याशी काहीएक संबंध नाही. शेवटी तक्रार अर्ज रद्द करावा अशी त्यांनी विनंती केली आहे.
१३. तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्ष क्र.१ व ३ यांचा खुलासा व दाखल कागदपत्रे पाहता आमच्या समोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.
मुद्दे उत्तर
१. विमा कंपनीने तक्रारदाराचा विमा दावा नाकारुन सेवेत त्रुटी
तक्रार क्र.७४/११
केली आहे काय? होय.
२. तक्रारदार कोणता अनुतोष मिळण्यास पात्र आहे? अंतिम आदेशा प्रमाणे.
३. आदेश काय? खालील प्रमाणे.
विवेचन
१४. मुद्दा क्र.१ - तक्रारदार यांनी स्वतःच्या वापरासाठी टाटा एलपीटी ११०९४२/इएक्सझेड आर.टी.ओ. कडील नं.एचएच १८/अेअे३२७ ही गाडी विकत घेतली. सदर वाहनाचा विमा विरुध्द पक्ष भारती एक्सा जनरल इन्शुरन्स कं.लि. यांच्याकडून दि.२७/०३/१० ते २६/०३/११ या कालावधीचा काढला आहे. तिचा विमा पॉलिसी नं.एफव्हीसी/आय-२३०३९७५/डी-२/०३/एमआयडी-२१४ असा आहे. विमा वैध असतांना त्याचा अपघात झाला हे दोन्हीही बाजुंना मान्य आहे. सदर अपघातानंतर विमा कंपनीने सर्व्हेअर नियुक्त करुन मुल्यांकन करुन घेतले या बद्दलही वाद नाही. विमा कंपनीच्या म्हणण्यानुसार त्यांनी तक्रारदार यांना दि.२१/०६/११ व १३/०७/११ रोजी विनंती पत्रे देऊन गाडीची दुरुस्ती करुन बिले दयावीत असे कळवले होते. परंतू त्यानंतरही तक्रारदार यांनी गाडी दुरुस्तीची बिले दिली नाहीत. त्यामुळे त्यांनी सेवेत त्रुटी केलेली नाही.
१५. तक्रारदार यांनी गाडी दुरुस्त करण्यासाठी आवश्यक असलेली रक्कम त्यांच्याकडे नव्हती याची त्यांनी सर्व्हेअर विमा कंपनीस माहिती दिली होती असे असतांना विमा कंपनीने सर्व्हेअर यांचेकडून मुल्यांकन करुन रक्कम अदा करणे आवश्यक होते. परंतू त्यांनी रक्कम देण्यास टाळाटाळ केली व सेवेत त्रुटी केली असे म्हटले आहे.
१६. या संदर्भात तक्रारदार यांनी विमा कंपनीस गाडी दुरुस्त करणे शक्य नाही असे विमा कंपनीस कळवले होते काय? हे पाहणे आवश्यक ठरते. या संदर्भात आम्ही विमा कंपनीने नि.१५/१ वर दाखल केलेल्या श्री.मिलींद वर्मा यांच्या सर्व्हे रिपोर्टचे अवलोकन केले आहे. त्या रिपोर्टच्या पान क्र.३ वर श्री.मिलींद वर्मा यांनी “but the insured conveyed to the repairer that owing to financial problems, he is unable to proceed with the repairs.” यावरुन तक्रारदार हे गाडीची दुरुस्ती करण्यास आर्थिक अडचणीमुळे असमर्थ होते याची विमा कंपनीस माहिती होते हे स्पष्ट आहे. त्यामुळे विमा कंपनीने तक्रारदाराची असमर्थता माहित असतांना पुन्हा त्यांना पत्रे देऊन गाडी दुरुस्तीचा आग्रह धरणे अयोग्य होते असे आम्हांस वाटते. वास्तविक विमेदाराने आार्थिक अडचण असल्याचे सांगितल्यानंतर व गाडी टोटल लॉस झाली असल्याचे सांगितल्या नंतर विमा कंपनीने मुल्यांकनाच्या आधारे विमा दावा मंजूर करणे आवश्यक होते. तसे न करुन विमा कंपनीने सेवेत त्रुटी केली आहे या मतास आम्ही आलो आहोत. विरुध्द
तक्रार क्र.७४/११
पक्ष क्र.२ ते ४ यांचा सदर व्यवहाराशी काहीही संबंध दिसून येत नाही. त्यांनी सेवेत त्रुटी केलेली नाही. म्हणून मुद्दा क्र.१ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
१७. मुद्दा क्र.२ - तक्रारदार यांनी विमा कंपनीकडून गाडी दुरुस्तीसाठी लागणारा खर्च रक्कम रु.७,६७,२३९/-, शारीरीक, मानसिक व आर्स्थिक त्रासापोटी रु.५०,०००/-, वरील दोन्ही रकमेवर तक्रार दाखल तारेखेपासून १२ टक्के प्रमाणे व्याज व तक्रारीचा खर्च मिळावा अशी मागणी केली आहे. विमा कंपनीने सर्व्हेअर श्री.मिलींद वर्मा यांचा सर्व्हे रिपोर्ट नि.१५/१ वर दाखल केला आहे. सदर अहवाल तज्ञाचा असल्यामुळे रिपोर्टमध्ये दर्शवलेली रक्कम रु.४,७२,१६५/- मिळण्यास तक्रारदार पात्र आहेत. विमा कंपनीतर्फे अॅड.पिंगळे यांनी विमा दावा नाकारला नसल्यामुळे व्याज व खर्च देण्यास विमा कंपनी जबाबदार नाही असा युक्तीवाद केला. परंतू सर्व्हे रिपोर्ट विमा कंपनीस दि.२५/०४/११ रोजी मिळालेला आहे. त्यानंतर २ महिन्यात विमा कंपनीने अंतिम निर्णय घेणे आवश्यक होते. त्यामुळे विमा कंपनी तारीख दि.२५/०६/११ पासून द.सा.द.शे. ९ टक्के दराने व्याज मिळण्यासही तक्रारदार पात्र आहे असे आम्हांस वाटते. तसेच मानसिक त्रास व अर्जाच्या खर्चाची मागणी अवास्तव वाटते. तक्रारदार मानसिक त्रासापोटी रु.५०००/- व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रु.२०००/- मिळण्यास पात्र आहे.
१८. मुद्दा क्र.३ - वरील विवेचनावरुन आम्ही खालील प्रमाणे आदेश देत आहोत.
आ दे श
१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येत आहे.
२. विरुध्द पक्ष भारती एक्सा जनरल इन्शुरन्स कं.लि. यांनी तक्रारदारास रक्कम रु. ४,७२,१६५/-/- व त्यावर दि. २५/०६/११ पासून द.सा.द.शे. ९ टक्के दराने व्याज या आदेशाच्या प्राप्ती पासून ३० दिवसाच्या आत द्यावेत.
३. विरुध्द पक्ष भारती एक्सा जनरल इन्शुरन्स कं.लि. यांनी मानसिक त्रासापोटी रु.५०००/- व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रु.२०००/- या आदेशाच्या प्राप्ती पासून ३० दिवसाच्या आत द्यावेत.
(सी.एम.येशीराव) (डी.डी.मडके)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, धुळे