(मंचाचा निर्णय: श्रीमती जयश्री येंडे - सदस्या यांचे आदेशांन्वये)
-// आ दे श //-
(पारित दिनांक : 14/09/2011)
1. प्रस्तुत तक्रारीतील तक्रारकर्ता ही एक भागीदारी संस्था असुन त्यांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारां विरुध्द मंचात दि.16.07.2009 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :-
2. प्रस्तुत प्रकरणात तक्रारकर्त्यांचे म्हणण्यानुसार त्याला त्याच्या व्यवसायाकरीता फोनची आवश्यकता असल्यामुळे गैरअर्जदारांकडून मोबाईलचे जवळपास 40 सीयुजी कनेक्शन घेतले होते. सदरचे कनेक्शन घेतल्यावर तक्रारकर्त्याच्या असे लक्षात आले की, नटवर्कची योग्य उपलब्धता नसल्यामुळे बोलतांना वारंवार अडचनी येतात व फोन बंद होतो, फोन बंद केल्यावरही फोनचे मीटर चालू राहते. तसेच नंबर फिरविल्यावर फोन उचलण्यापूर्वी पल्स रेट चालू होते, या तक्रारी आढळून आल्यावर तक्रारकर्त्याने गैरअर्जदार यांचे कस्टमर रिलेशन सेंटरकडे वारंवार तक्रारी नोंदवुनही त्यांनी सदर तक्रारीची दखल तर घेतली नाही, उलट स्वतःहुन सदर फोन कनेक्शन बंद केले ही गैरअर्जदारांची कृती त्यांचे सेवेतील कमतरता असल्यामुळे तक्रारकर्त्यांनी सदर तक्रार मंचात दाखल केली असुन ती व्दारे त्यांना व्यवसायासंबंधी झालेल्या नुकसानीपोटी रु.10,00,000/-, शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.5,00,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.25,000/- मिळावे अश्या मागण्या केलेल्या आहेत.
3. सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदारांना पाठविण्यात आली असता सदर नोटीस मिळूनही गैरअर्जदार हजर झाले नसुन पुकारा केला असता त्यांचेतर्फे कोणीही हजर नसल्यामुळे गैरअर्जदारांविरुध्द तक्रार विनालेखी जबाब चालविण्याचा आदेश दि.18.03.2010 रोजी पारित करण्यांत आला. दि. 23.09.2009 रोजी गैरअर्जदारांनी आपला तक्रारीवरील आक्षेप मंचात दाखल केला असुन त्यावर तक्रारकर्त्याचे म्हणणे दिले.
4. गैरअर्जदारांनी आपले प्राथमिक आक्षेपात इंडियन टेलिग्राफ ऍक्ट 1885 च्या कलम 7 (ब) प्रमाणे सदरची तक्रार या मंचाचे अधिकार क्षेत्रात येत नाही. तसेच आपल्या म्हणण्याचे पृष्ठयर्थ गैरअर्जदारांनी मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निवाडयांचा आधार घेतलेला आहे.
5. तक्रारकर्तीने प्रस्तुत तक्रारीसोबत निशानी क्र. 3 वर दस्तावेजांची यादी जोडलेली असुन त्यात गैरअर्जदार क्र.1 व 3 ला दिलेले पत्र, स्मरणपत्र, वकीलामार्फत पाठविलेली नोटीस व पोच पावत्यांच्या छायांकीत प्रती जोडलेल्या आहेत.
6. सदर तक्रार मंचासमक्ष मॉखिक युक्तीवादाकरीता दि.24.08.2011 रोजी आली असता दोन्ही पक्ष अंतिम संधी देऊनही गैरहजर असल्यामुळे प्रकरण निकालाकरीता ठेवण्यांत आले. तसेच सदर प्रकरणी उभय पक्षांनी दाखल केलेल्या दस्तऐवजांचे अवलोकन केले असता मंच खालील प्रमाणे निष्कर्षाप्रत पोहचले.
-// नि ष्क र्ष //-
7. तक्रारीतील शपथेवरील कथनाच्या परिच्छेद क्र.2,6 मध्ये नमुद केले आहे की, त्यांचे कंपनीचा जमीनीचा खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांचे नागपूर बाहेर लेआऊटस् असुन मुंबई व मुंबई बाहेर लेआऊटस् आहे आणि फ्लॅटस् स्किम्स् आहेत. त्याला व्यावसायीक कामाकरीता फोनसेवा आवश्यक असल्यामुळे तक्रारकर्त्याने आपल्या कर्मचा-यांकरीता गैरअर्जदारांकडून मोबाईलचे 40 सीयुजी कनेक्शन घेतलेले होते. तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तावेजांवरुन देखिल हे सिध्द होते, त्यामुळे ग्राहक संरक्षण कायद्याचे ‘ग्राहक’ या संज्ञेत व्यावसायीक उद्देशाने घेतलेली सेवा यात अंतर्भुत नाही. त्यामुळे सदरची तक्रार चालवीणे ग्राहक मंचाच्या अधिकार क्षेत्रात येत नसल्यामुळे सदरची तक्रार या मंचाला चालविता येणार नाही, तक्रारकर्ता आपल्या तक्रारीची योग्य त्या न्यायालयात दाद मागू शकतो. वरील सर्व बाबींचा विचार करता आम्ही खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहोत.
-// अं ति म आ दे श //-
1. वरील निरीक्षणासह सदरची तक्रार निकाली काढण्यांत येते.
2. तक्रारकर्त्याने आपली तक्रार योग्य त्या न्यायालयात दाखल करावी, याबाबत त्यांचा अधिकार अबाधीत ठेवण्यांत येतो.