जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 156/2011.
तक्रार दाखल दिनांक :19/04/2011.
तक्रार आदेश दिनांक : 20/07/2012.
निकाल कालावधी: 01 वर्षे 03 महिने 00 दिवस
भिमराव श्रीपती कसबे, वय 44 वर्षे, व्यवसाय : मजुरी,
रा. नरखेड, ता. मोहोळ, जि. सोलापूर. तक्रारदार
विरुध्द
1. भारत संचार निगम लि., टेलिफोन राजस्व विभाग,
सी.टी.ओ. बिल्डींग, सात रस्ता, सोलापूर.
2. भारत संचार निगम लि., उपविभागीय अभियंता,
दूरध्वनी कार्यालय, मोहोळ, ता. मोहोळ, जि. सोलापूर. विरुध्द पक्ष
गणपुर्ती :- सौ. शशिकला श. पाटील, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
सौ. विद्युलता जे. दलभंजन, सदस्य
तक्रारदारयांचेतर्फेविधिज्ञ: व्ही.टी. धावणे
विरुध्दपक्ष स्वत:
निकालपत्र
सौ. शशिकला श. पाटील, अध्यक्ष(अतिरिक्त कार्यभार)यांचे द्वारा :-
1. प्रस्तुत तक्रारीमध्ये तक्रारदार यांनी उपस्थित केलेला विवाद थोडक्यात असा आहे की, ते विरुध्द पक्ष यांच्याकडून दूरध्वनी क्रमांक 02189 – 255549 अन्वये दूरध्वनी सेवा घेत आहेत आणि त्याची कोणतीही थकबाकी किंवा बील देणे त्यांच्याकडे प्रलंबीत नव्हते व नाही. विरुध्द पक्ष क्र.1 यांनी दि.24/12/2010 रोजी त्यांना नोटीस पाठवून तक्रारदार यांचे नांवे तरंग दूरध्वनी क्रमांक 2189 – 285876 ची रु.5,165/- थकबाकी व त्यावरील व्याज व इतर खर्चासह रु.7,072/- येणेबाकी असल्याचे कळवून ते प्रकरण मोहोळ येथील फौजदारी व दिवाणी न्यायालयामध्ये आयोजित दि.2/1/2011 च्या लोकअदालतमध्ये खटलापूर्व प्रकरण क्र.382/2011 असल्याचे कळविले. नोटीस मिळताच दि.28/12/2010 रोजी तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांच्या कार्यालयामध्ये जाऊन तरंग दूरध्वनी क्रमांक 2189 – 285876 हा त्यांचे किंवा त्यांचे कुटुंबियाचे नांवे आजतागायत कधीही नव्हता व नाही, असे सांगितले. परंतु तरंग दूरध्वनी क्रमांक 2189 – 285876 हा तक्रारदार यांचे नांवे होता आणि त्यांचा तक्रारदार वापर करीत असून त्याची थकबाकी भरण्यास तक्रारदार यांना धमकी दिली. तक्रारदार हे सदर तरंग दूरध्वनीचा वापर करीत नसल्यामुळे थकबाकी भरण्याचा प्रश्नच उदभवत नव्हता व नाही. त्याबाबत लेखी कळवूनही विरुध्द पक्ष यांनी त्याची दखल घेतलेली नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार मंचामध्ये दाखल करुन विरुध्द पक्ष यांच्याकडून शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.10,000/-, आर्थिक नुकसानीपोटी रु.10,000/- व नोटीस खर्च रु.500/- असे एकूण रु.20,500/- व्याजासह मिळावेत आणि तक्रार खर्च मिळावा, अशी विनंती केली आहे.
2. विरुध्द पक्ष यांनी मंचासमोर लेखी म्हणणे दाखल केलेले नाही. परंतु त्यांनी दि.26/4/2012 रोजी लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. त्यामुळे त्याची दखल घेण्यात आली आहे. त्यांच्या कथनाप्रमाणे तक्रारदार यांच्याकरिता विधिज्ञ श्री. व्ही.टी. धावणे यांनी दिलेल्या नोटीसच्या उत्तरामध्ये श्री. कसबे भिमराव श्रीपती हे त्यांचे ग्राहक असल्याचे नमूद केले आहे. तसेच ते दाखल करीत असलेल्या कागदपत्रांवरुन श्री. कसबे यांनी डब्ल्यू.एल.एल. टेलिफोन जोडणीकरिता अर्ज केल्याचे व त्याप्रमाणे त्यांना प्राप्त झालेला आहे. तक्रारदार यांनी थकबाकी टाळण्याच्या उद्देशाने प्रस्तुत तक्रार दाखल केलेली आहे. तसेच त्यांना इंडीयन टेलिग्राफ अक्ट, 1885 चे कलम 7-बी प्रमाणे बिलाचा वाद निराकरण करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उपलब्ध आहे. त्याप्रमाणे मा. सर्वोच्च न्यायालयाचा सिव्हील अपील नं. 7687/2004 दाखल केला आहे. शेवटी तक्रारदार यांची तक्रार खर्चासह रद्द करण्याची विनंती केली आहे.
3. तक्रारदार यांनी दाखल केलेला तक्रार-अर्ज, विरुध्द पक्ष यांची कैफियत, दोन्ही पक्षांनी दाखल कागदपत्रे, प्रतिज्ञालेख, लेखी युक्तिवाद यांचे सुक्ष्मरित्या पडताळणी व अवलोकन केले असता पुढील मुद्दे उपस्थित झाले व कारणमिमांसा देऊन पुढील आदेश पारीत करण्यात आले.
3.1) सदर तक्रार-अर्जामध्ये तक्रारदार यांना तरंग दूरध्वनी क्रमांक 2189 – 285876 हा विरुध्द पक्ष यांनी दिलेला होता. तो विरुध्द पक्ष यांच्याकडे जमा केलेला आहे. परंतु त्यावेळी थकीत असलेली रक्कम तक्रारदार यांनी भरणा न केल्याने विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांच्याकडे रक्कम वसुलीसाठी पाठपुरावा केला होता. परंतु तक्रारदार यांनी या नंबरचा दूरध्वनी त्यांच्याकडे नव्हता, चुकीची आकारणी करण्यात आली आहे, अशा आशयाचा तक्रार-अर्ज दाखल केला आहे. विरुध्द पक्ष यांनी तक्रार-अर्जास सविस्तर म्हणणे दाखल केलेले आहे. त्यासोबत कागदपत्रे दाखल केलेली आहेत. त्यामध्ये तक्रारदार यांच्याकडून दूरध्वनी मागणीसाठी अर्ज घेण्यात आला होता. त्याची प्रतिलिपी मंचासमोर दाखल केलेली आहे. त्यावरती संबंधी अधिका-यांनी तक्रारदार यांना दूरध्वनी देण्याबाबतचा आदेशही पारीत केलेले होते व आहेत. उभय पक्षकारामध्ये मध्यंतरीच्या कालावधीमध्ये बिलावरुन वाद निर्माण झाले. तदनंतर तक्रारदार यांचा दि.18/9/2009 रोजी दूरध्वनी नं.285876 हा बंद करण्यात आला व फोन चार्जर, अंटेना जमा करुन घेण्यात आला आहे. यावरुन तक्रारदार यांच्याकडे सदरचा दूरध्वनी होता व त्याचे देयक भरणे राहिलेले होते म्हणून तक्रारदार यांनी वादीत देयक भरणे न्यायोचित, विधीयुक्त व संयुक्तिक आहे. म्हणून आदेश.
आदेश
1. तक्रारदार यांचा अर्ज नामंजूर करण्यात आला आहे.
2. दोन्ही उभय पक्षकारांनी आपआपला खर्च स्वत: सोससावा.
(सौ. विद्युलता जे. दलभंजन) (सौ. शशिकला श. पाटील÷)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
----00----
(संविक/स्व/16712)