Dated the 14 Mar 2016
न्यायनिर्णय
द्वारा- सौ.स्नेहा एस.म्हात्रे...................मा.अध्यक्षा.
1. तक्रारदार हे जेष्ठ नागरीक आहेत. सामनेवाले हे दुरध्वनी सेवा देणारी संस्था आहे. तक्रारदार यांनी दुरध्वनी क्रमांक-272617 या क्रमांकाबाबत सेवा देण्यासाठी बी.एस.एन.एल. यांचेकडून दुरध्वनी जोडून घेतला होता. भिवंडी येथे पी.डब्ल्यु.डी.व्दारे रस्ता रुंदिकरणाचे काम सुरु झाल्याने तक्रारदाराच्या सोसायटीमधील तसेच त्या परिसरातील काही सोसायटयांमधील बी.एस.एन.एल. चे दुरध्वनी तारा तुटल्याने किंवा इतर तांत्रिक अडथळयांमुळे नोव्हेंबर-2009 पासुन पुर्णपणे बंद पडले. तरीदेखील तक्रारदार वर सामनेवाले यांचेकडून रु.10,921/- चे बील ता.23.12.2009 रोजी आकारण्यात आले, तसेच तक्रारदार यांनी ई.सी.एस.ची मर्यादा रु.2,000/- पर्यंत ठेवली असतांनाही सामनेवाले यांनी तक्रारदार यांना पुर्व कल्पना न देता तक्रारदाराच्या खात्यातुन रु.12,477/- वळते करुन घेतले. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे तक्रारदार यांचा फोन बंद असुनही आकारण्यात आलेल्या बीलाबाबत व सदर रक्कम सामनेवाले यांनी व्याजासह परत देण्याबाबत सामनेवाले यांना वारंवार विनंती करुनही सामनेवाले यांनी त्यांना कोणतेही सहकार्य न केल्याने तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे. तसेच ई.सी.एस. खालील रक्कम रु.13,554/- सामनेवाले यांनी दरसाल दर शेकडा 8 टक्के व्याजाने परत करावी, दुसरे इंटरनेट कनेक्शन घेण्यासाठी तक्रारदार यांना भरावे लागलेली रक्कम रु.3,000/- तक्रारदार यांना परत करावी, मानसिक त्रासापोटी रु.10,000/- दयावेत, तक्रार खर्च रु.600/- दयावा अशी मागणी सामनेवाले यांचेकडून केली आहे.
2. सामनेवाले यांनी कैफीयत दाखल करुन तक्रारदार यांची प्रस्तुत तक्रार खोटी असुन ती कॉस्टसह फेटाळण्यात यावी अशी मागणी केली आहे. उभयपक्षांनी दाखल केलेल्या आवश्यक कागदपत्रांचे अवलोकन केले असता खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे निष्कर्ष
अ.सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सदोषपुर्ण सेवा दिली
आहे का ?.....................................................................................होय.
ब.तक्रारदार सामनेवालेकडून ई.सी.एस.खाली सामनेवाले
यांनी तक्रारदाराच्या खात्यातुन काढलेली बिलाची रक्कम
व इतर खर्च व्याजासह परत मिळण्यास पात्र आहेत का ?...................होय.
क.तक्रारीत काय आदेश ?........................................................अंतिम आदेशाप्रमाणे.
3.कारण मिमांसा
अ. तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक असुन तक्रारदार यांचा दुरध्वनी क्रमांक-272617 असा आहे. तक्रारदार रहात असलेल्या निलशिल्प सोसायटी काल्हेर भिवंडी येथील रस्त्याचे रुंदिकरण करण्यात येत असल्याने तक्रारदारासह सदर सोसायटीमधील बी.एस.एन.एल. चे ग्राहक असलेल्या सर्व सदनिकाधारकांचे दुरध्वनी वायर्स तुटणे व इतर तांत्रिक अडचणींमुळे नोव्हेंबर-2009 पासुन पुर्णपणे बंद पडले असल्याचे तक्रारदार यांनी नमुद केले आहे,पान क्रमांक-9 वर जोडलेल्या तक्रारदाराच्या सोसायटीमधील सदनिकाधारकांनी सामनेवाले यांना दिलेल्या निवेदनपत्रावरुन ही बाब स्पष्ट होते. तसेच पान क्रमांक-10 वर देखील तक्रारदाराच्या सोसायटीमधील सदनिकाधारक श्री.अल्बर्ट फीलिप यांनी सामनेवाले यांच्या अकाऊंटस डिपार्टमेंटला पाठविलेल्या पत्रावरुन फोन बंद असल्याची व फोन बंद असतांना तक्रारदारासह इतर सदनिकाधारकांना बीले आकारल्याची बाब पुन्हा सिध्द होते. तक्रारदार यांनी देखील सामनेवाले यांना तक्रारदाराचा फोन नोव्हेंबर-2009 पासुन बंद असल्याचे कळवून देखील सामनेवाले यांनी तक्रारदार यांना रु.10,961/- हया रकमेचे बील आकारले तक्रारदारांनी ही बाब ता.02.01.2010 रोजीच्या पत्राने सामनेवाले यांच्या निदर्शनास आणली आहे, व तक्रारदार यांनी त्यापुर्वी सामनेवाले यांच्या कार्यालयास त्याबाबत ता.24.12.2010 रोजी पत्र दिल्याचे नमुद केले आहे, त्यामध्ये तक्रारदार यांनी ई.सी.एस. चे लिमिट रु.2,000/- असतांना सामनेवाले यांनी सदर लिमिटपलीकडे तक्रारदाराची संमती नसतांना ई.सी.एस. ची रक्कम वाढवल्याबाबत खुलासा मागितला आहे व तक्रारदार यांनी त्यांचा फोन नोव्हेंबर-2009 पासुन बंद असल्याने तक्रारदार यांना Broadband सेवेसाठी सामनेवाले यांनी आकारलेली रक्कम परत मागितली आहे व तक्रारदार यांनी Sify या संस्थेकडून Broadband बाबतची सेवा रक्कम रु.3,200/- भरुन घेतली असल्याने त्याचा बी.एस.एन.एल सेवेशी संबंध नसल्याचे नमुद केले आहे. तक्रारदार यांनी ता.01.04.2010 रोजी सामनेवाले यांना ई.सी.एस. व्दारे रक्कम तक्रारदार यांच्या खात्यातुन काढून घेण्याबाबत दिलेली सुचना मागे घेत असल्याचे सामनेवाले यांना कळवले आहे, व तक्रारदाराचा फोन नोव्हेंबर-2009 पासुन बंद असल्याचे पुन्हा एकदा सामनेवाले यांना कळवले आहे, ता.11.06.2010 च्या पत्रान्वये तक्रारदार यांनी सामनेवालेकडून ई.सी.एस. व्दारे वजा झालेली तक्रारदार यांच्या खात्यातील रक्कम रु.12,477/- सामनेवाले यांनी तक्रारदार यांना परत देण्याची विनंती केली आहे. सदर रक्कम ता.16.03.2010 रोजी तक्रारदाराच्या खात्यातुन बी.एस.एन.एल. च्या नांवे काढली गेल्याचे तक्रारदार यांनी पान क्रमांक-11 वर जोडलेल्या बँकेच्या खाते उता-यावरुन दिसुन येते. सामनेवाले यांनी तक्रारदाराचे ई.सी.एस. लिमिट पलीकडे रक्कम काढल्याबाबतचा खुलासा देतांना ता.16.06.2010 च्या पत्राव्दारे बी.एस.एन.एल. ने तक्रारदार यांना सी.डी.आर. बीलींग सिस्टीम सुरु केल्याने व त्याला ई.सी.एस. च्या रकमेचे बंधन नसल्याने तसे केले असल्याचे म्हटले आहे व जानेवारी व फेब्रुवारीच्या बिलांसह त्याबाबत तक्रारदार यांना कळविल्याचे नमुद केले आहे,परंतु त्याबाबतचा कोणताही कागदोपत्री पुरावा सामनेवाले यांनी प्रस्तुत प्रकरणात सादर केलेला नाही, व ता.20.07.2010 च्या सामनेवाले यांनी तक्रारदार यांना पाठविलेल्या पत्रांत खालील प्रमाणे परस्पर विरोधी विधान दिसुन येते. “ Many customer’s bill send by ECS could not be cleared by bank stating the reason ECS MANDATE NOT RECEIVED FROM CUSTOMER. Hence it is presumed that you have given the instruction ” यावरुन तक्रारदाराकडून सामनेवाले यांना ई.सी.एस.चे लिमिट वाढवून बीलाची रक्कम काढून घेण्याची कोणतीही सुचना नसतांना सामनेवाले यांनी तक्रारदाराच्या खात्यातुन सदर रक्कम वळती केल्याचे दिसुन येते. वास्तविक पाहता तक्रारदाराचा फोन नोव्हेंबर-2009 पासुन बंद असल्याचे तक्रारदार यांनी सादर केलेल्या पत्रव्यवहारावरुन व पुराव्यावरुन सिध्द होत असतांना सामनेवाले यांनी तक्रारदार यांना फोनबाबत किंवा Broadband सेवेबाबत कोणतीही सेवा नोव्हेंबर-2009 पासुन न देता आकारणी केलेले नोव्हेंबर-2009 चे बील व तक्रारदाराच्या खात्यातुन ई.सी.एस. व्दारे काढलेली रक्कम रु.12,477/-, चुकीच्या पध्दतीने वसुल केली असल्याने तक्रारदाराशी ई.सी.एस.बाबतच्या अटी शर्तींचा भंग केला आहे व अशाप्रकारे तक्रारदार यांना सदोषपुर्ण सेवा दिली आहे. सामनेवाले यांनी त्यांच्या म्हणण्याच्या पुष्ठयर्थ कोणताही कागदोपत्री पुरावा सादर केलेला नाही, तसेच तक्रारदार यांचा धनादेश न वठता परत आला, सामनेवाले यांचे मुद्दे तक्रारदार यांनी रिजॉईन्डर सोबत दाखल केलेल्या कागदपत्रांव्दारे खोडून काढले आहेत. तक्रारदार यांना सामनेवाले यांनी दिलेला रक्कम रु.1,118/- चा धनादेश तक्रारदार यांनी बँकेत जमा केलेला नाही. त्यामुळे तक्रारदार सदर रक्कम देखील सामनेवाले यांचेकडून परत मिळण्यास पात्र आहेत. सबब सामनेवाले यांनी तक्रारदार प्रती फोन बंद असतांना देखील बीलाची आकारणी केली. तक्रारदार यांनी फोन सुरु करण्यासाठी निलशिल्पच्या इतर सदनिका धारकांसमवेत व वैयक्तिकरित्या सामनेवाले यांना अनेकदा विनवणी करुनही सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सहकार्य केले नाही. तसेच तक्रारदार यांनी दुसरीकडून (Sify) Broadband सेवा रु.3,200/- भरुन घेतली असतांना तक्रारदार यांना Broadband बाबतचे शुल्क आकारले ही बाब सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सदोषपुर्ण सेवा दिल्याचे सिध्द करते. यामुळे तक्रारदार सामनेवाले यांचेकडून रक्कम रु.13,554/- ता.16.03.2010 पासुन दरसाल दर शेकडा 6 टक्के व्याजासह परत मिळण्यास पात्र आहेत, व तक्रारदार यांना सदर रक्कम परत मिळण्यासाठी सामनेवाले यांचेकडे वारंवार भेट देण्यामुळे व नोव्हेंबर-2009 पासुन अदयापपर्यंत फोन बंद असल्याने जो मानसिक त्रास झाला त्याबाबत तक्रारदार सामनेवालेयांचेकडून रक्कम रु.3,000/- (अक्षरी रुपये तीन हजार) मानसिक त्रासापोटी मिळण्यास पात्र आहेत. तसेच प्रस्तुत तक्रारीचा खर्च तक्रारदार यांनी मागणी केल्याप्रमपाणे रु.600/- सामनेवाले यांनी तक्रारदार यांना दयावेत असे आदेश सामनेवाले यांना देण्यात येतात.
उपरोक्त चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन खालील प्रमाणे आदेश पारित करण्यात येतो.
“ या मंचातील कार्यभार पाहता व इतर प्रशासकीय कारणांमुळे यापुर्वी ही तक्रार निकाली काढता येऊ शकली नाही ”.
- आदेश -
1. तक्रारदार यांची तक्रार क्रमांक-224/2010 अंशतः मंजुर करण्यात येते.
2. सामनेवाले यांनी तक्रारदार प्रती फोन बंद असतांना देखील Broadband बाबत व
दुरध्वनी सेवा दिल्याबाबत शुल्क आकारले असल्याने व ती तक्रारदार यांच्या
खात्यातुन तक्रारदार यांची परवानगी न घेता ई.सी.एस.व्दारे वळती केल्याने सामनेवाले
यांनी तक्रारदार यांना त्रुटीची सेवा सदोषपुर्ण दिल्याचे जाहिर करण्यात येते.
3. सामनेवाले यांनी तक्रारदार यांच्याकडून एकूण रक्कम रु.13,554/- (अक्षरी रुपये तेरा हजार
पाचशे चोपन्न) तक्रारदार यांना ता.16.03.2010 पासुन दरसाल दर शेकडा 6 टक्के
व्याजासह परत करावी.
4. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रु.3,000/- (अक्षरी रुपये तीन हजार)
व न्यायिक खर्च तक्रारदार यांनी मागणी केल्याप्रमाणे रु.600/- (अक्षरी रुपये सहाशे)
दयावा असे आदेश सामनेवाले यांना देण्यात येतात.
5. सामनेवाले यांनी वरील आदेशाचे पालन आदेश पारित तारखेपासुन 01 (एक) महिन्यांत
करावे.
6. आदेशाच्या प्रती उभयपक्षकारांना विनामुल्य व विनाविलंब पोस्टाने पाठविण्यात याव्यात.
7. तक्रारीचे अतिरिक्त संच असल्यास तक्रारदार यांना परत करण्यात यावे.
ता.14.03.2016
जरवा/