तक्रार दाखल ता.15/12/2015
तक्रार निकाल ता.08.07.2016
न्यायनिर्णय
द्वारा:- - मा. अध्यक्षा –सौ. सविता पी.भोसले.
1 प्रस्तुत तक्रार अर्ज तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम-12 नुसार दाखल केली आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात मजकुर पुढीलप्रमाणे. तक्रारदार हे कुडित्रे, ता.करवीर, जि.कोल्हापूर येथील कायमस्वरुपी रहिवाशी आहेत. तक्रारदाराने वि.प.हे टेलीकॉम कंपनीकडून BIANNUAL-PLAN-250 हा दि.01.03.2014 ते दि.29.02.2016 या मुदतीकरता, तक्रारदाराचे रहाते घरी असले लॅंडलाईन नंबर-0231-2444271 साठी रक्कम रु.281/- (सर्व करांसहीत) या रक्कमेस खरेदी केला होता. सदर प्लॅन खरेदीचा इनव्हाईस नं.10171559260033 दि.04.03.2014 आहे. या प्लॅन धारकास (तक्रारदराला) प्लॅनच्या संपूर्ण मुदती दरम्यान इतर कोणत्याही प्रकारचे बिल न आकारणेचे वचन दिले आहे. तथापि, त्यानंतर काही दिवसांतच म्हणजेच सप्टेंबर, 2014 पासून वि.प.ने दिले वचनांचा भंग करुन तक्रारदाराला वेळोवेळी छापील बिले पाठविण्यात व ती भरणेसाठी तगादा लावणेस सुरुवात केली व तक्रारदाराने या बेकायदेशीर बिलांचा भरणा न केलेने वर नमुद लँडलाईनला प्लॅनमध्ये दिलेली मोफत इनकमींग कॉलची सुविधा वि.प.यांनी डिसकनेक्ट केली. त्यावेळी तक्रारदाराने वि.प.ला नमुद प्लॅन खरेदी केलेची पावती दाखवली व प्रस्तुत प्लॅनप्रमाणे मोफत इनकमींग सुविधा पुर्ववत सुरु करणेची विनंती केली. मात्र वि.प.ने कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे तक्रारदाराने वि.प.कंपनीच्या तक्रार निवारण पध्दतीनुसार Nodal Officer (Public Grievances) म्हणजेच ए.जी.एम.कमर्शिअल यांच्याकडे दि.24.11.2014 रोजीचे पत्राद्वारे लँडलाईन वरील मोफत इनकमींग सुविधा बेकायदेशीरपणे वि.प.ने खंडीत केलेबाबत व बेकायदेशीर बिले पाठविण्याची तक्रार केली व तक्रारदाराने घेतले प्लॅननुसार सुविधा पुरविणेची विनंती केली. पंरतु प्रस्तुत ए.जी.एम.कमर्शिअल यांनीही कोणतीही कारवाई केली नाही. त्यानंतर तक्रारदाराने वि.प.काहीतरी कारवाई करतील यासाठी वाट पाहिली परंतु वि.प.ने काहीही कारवाई केली नाही. त्यामुळे तक्रारदाराने Nodal Officer (Public Grievances) Telecom Circle अपीलेट अॅथॉरिटीकडे दि.10.01.2015 रोजी दुपारी वकीलांमार्फत ई-मेलवर तक्रार केली व मोफत इनकमींग सुविधा पूर्ववत सुरु करुन देणची विनंती केली. परंतु वि.प.ने तक्रारदाराचे तक्रारीची कोणतीही दखल घेतली नाही अथवा मोफत इनकमींग सेवा पूर्ववत चालू करुन दिली नाही. अशा प्रकारे वि.प. यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे. सबब, तक्रारदाराने नुकसानभरपाई मिळणेसाठी प्रस्तुत तक्रार अर्ज या मे.मंचात दाखल केला आहे.
2. प्रस्तुत कामी तक्रारदाराने वि.प.यांचेकडून तक्रारदाराला वि.प.कडे वारंवार माराव्या लागणा-या फे-यांसाठी तसेच झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.15,000/- वसूल होऊन मिळावेत तसेच अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.15,000/- वि.प.कडून वसूल होऊन मिळावेत, वि.प.ने.निष्कारण तक्रारदाराला त्रास दिला व वचनाप्रमाणे सेवा दिली नाही त्याबाबत नुकसानी म्हणून रक्कम रु.20,000/- वि.प.कडून वसूल होऊन मिळावे, तसेच वर नमुद एकूण रक्कम रु.50,000/- वर वि.प.ने द.सा.द.शे.18टक्के व्याज पूर्ण रक्कम तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत अदा करावे अशी विनंती तक्रारदाराने या कामी केली आहे.
3. प्रस्तुत कामी, तक्रारदाराने निशाणी-5 चे कागद यादीसोबत निशाणी-5/1 ते निशाणी-5/11 कडे अनुक्रमे वि.प.कडून तक्रारदाराने घेतलेला प्लॅनची झेरॉक्स, प्लॅन खरेदीची पावती, तक्रारदाराने वि.प.चे ए.जी.एम.कमर्शिअल, कोल्हापूर यांना लिहीलेले पत्र मिळालेली पोहोच, तक्रारदाराने वि.प.ला दिलेला ई-मेल, टेलीफोन बिल, इनव्हाईस, वि.प.ने थकीत बिलासाठी तक्रारदाराला दिलेले पत्र, वि.प.ने तक्रारदाराला बिल थकीत असलेने कायदेशीर कारवाई करण्याचे पत्र, निशाणी-10 कडे तक्रारदाराचे पुराव्याचे शपथपत्र, पुरावा संपलेची पुरशिस, लेखी युक्तीवाद, वगैरे कागदपत्रे तक्रारदाराने या कामी दाखल केली आहेत.
4. प्रस्तुत कामी वि.प.हे मंचात हजर झाले आहते परंतू वि.प.यांनी तक्रार अर्जास कैफियत/म्हणणे दाखल केलेले नाही. सबब, वि.प.यांचे विरुध्द निशाणी-1 वर म्हणणे नाही असा आदेश पारीत झालेला आहे. वि.प.ने तक्रार अर्जातील कोणतेही कथन खोडून काढलेले नाही. वि.प.यांनी निशाणी-15 कडे लेखी युक्तीवाद, नोटीफिकेशन झेरॉक्स प्रत, वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत.
5. वर नमुद तक्रारदार व वि.प.यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे यांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे.मंचाने प्रस्तुत तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प.हे नात्याने ग्राहक व सेवा पुरवठादार आहेत काय ? | होय |
2 | वि.प.ने तक्रारदाराला सदोष सेवा दिली आहे काय ? | होय |
3 | अंतिम आदेश काय ? | खालील नमुद आदेशाप्रमाणे |
विवेचन:-
मुद्दा क्र.1:- वर नमुद मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्हीं होकारार्थी देत आहोत, कारण तक्रारदाराने वि.प.यांचेकडून रहाते घरातील लँडलाईन मोबार्इलसाठी BIANNUAL-PLAN-250 हा दि.01.03.2014 ते दि.29.02.2016 या मुदतीकरता रक्कम रु.281/-, खरेदीचा इनव्हाईस नं.10171559260033 दि.04.03.2014 ने खरेदी केला आहे. याबाबत निशाणी-5 चे कागद यादीसोबत निशाणी-5/1 कडे दाखल प्लॅनवरुन स्पष्ट दाखल प्लॅनवरुन स्पष्ट होते. तसेच निशाणी-5/2 वरील खरेदी पावतीवरुन स्पष्ट होते. प्रस्तुत कामी वि.प.ने तक्रारदाराचे तक्रार अर्जातील कोणतेही कथन खोडून काढलेले नाही. सबब, वर नमुद कागदपत्रांवरून तक्रारदार व वि.प.हे नात्याने ग्राहक व सेवा पुरवठादार आहेत हे स्पष्ट होते. सबब, आम्हीं मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्र.2 व 3:- मुद्दा क्र.2 चे उत्तर आम्हीं होकारार्थी देत आहोत कारण तक्रारदाराने वि.प.कंपनीकडून लँडलाईन फोनसाठी BIANNUAL-PLAN-250, दि.01.03.2014 ते दि.29.02.2016 या मुदतीसाठी वि.प.कडून रक्कम रु.281/- (रक्कम रुपये दोनशे ऐक्याऐंशी फक्त) या किंमतीस खरेदी केला होता. प्रस्तुत प्लॅननुसार, वि.प.यांना तक्रारदाराचे लँडलाईन फोनवर मोफत इनकमींग सेवा देण्याचे मान्य केले होते. पंरतु प्रस्तुत प्लॅनची मुदत संपणेपूर्वीच वि.प.यांनी सदर मोफत इनकमींग सेवा तक्रारदाराला देणे बंद केले तसेच प्लॅनमध्ये दिलेल्या सुविधा तक्रारदाराला अदा न करता, प्लॅनची मुदत संपणेपूर्वीच तक्रारदाराला छापील फोन बिले पाठविणेस सुरुवात केली व तक्रारदाराने प्रस्तुत फोनबिले भरली नाही म्हणून तक्रारदार यांचा घरातील लँडलाईन फोन डिसकनेक्ट केला व तक्रारदाराला बिल भरणेसंदर्भात नोटीस पाठविली. तक्रारदाराने वि.प.कडे जाऊन वारंवार विनंती केली व फोनवरील प्लॅनची मुदत संपली नसलेने मोफत इनकमिंग सेवा देण्याची व डिसकनेक्ट केलेला फोन पुन्हा चालू करणेची विनंती केली. तसेच वि.प.चे वरिष्ठाकडे तक्रार निवारणासाठी अर्ज/तक्रार दाखल केली. तरीही वि.प.यांनी तक्रारदाराला कोणतीही दाद दिली नाही व तक्रारदाराचा लँडलाईन फोन सुरु करुन दिला नाही व मोफत इनकमींग सेवा दिली नाही. या सर्व बाबीं, तक्रारदाराने निशाणी-5चे कागद यादीसोबत दाखल सर्व कागदपत्रांवरुन स्पष्ट होतात तसेच वि.प.यांनी तक्रारदाराचे तक्रार अर्जास कैफियत /म्हणणे दाखल केलेले नाही तसेच तक्रारदाराचे तक्रार अर्जातील कोणतेही कथन वि.प.ने खोडून काढलेले नाही. सबब, तक्रारदाराने तक्रार अर्जात केलेल्या कथनावर विश्वासार्हता ठेवणे न्यायोचित होणार आहे. त्यामुळे तक्रारदाराचे कथन व दाखल कागदपत्रे यावरुन वि.प.ने तक्रारदाराला सदोष सेवा दिली आहे ही बाब निर्वीकारपणे स्पष्ट व सिध्द झाली आहे. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर आम्हीं होकारार्थी दिले आहे.
वि.प.चे विरुध्द म्हणणे नाही आदेश पारीत. वि.प.ने कोणताही पुरावा या कामी दाखल केलेला नाही. सबब, वि.प.चे फक्त युक्तीवादावर विसंबून राहणे योग्य होणार नाही. वि.प.यांनी तक्रार अर्जातील कथने खोटी असलेचे शाबीत केलेले नाही. सबब, प्रस्तुत कामी वि.प.यांनी तक्रारदाराला दिले प्लॅनमधील सुविधा पुरविल्या नाहीत. तसेच मुदत संपणेपूर्वीच सुविधा देणेचे बंद करुन बेकायदेशीर फोनबिले देऊन बिले तक्रारदाराने भरली नाहीत म्हणून तक्रारदाराचा लँडलाईन फोन डिसकनेक्ट केलेचे स्पष्ट व शाबीत झालेले आहे. सबब, प्रस्तुत कामी तक्रारदाराने केलेली तक्रार अर्जातील कथने योग्य व बरोबर असून वि.प.ने सदोष सेवा दिेलेली आहे. या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, प्रस्तुत कामी, आम्हीं पुढीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1 तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
2 वि.प.यांनी तक्रारदार यांचे घरातील लॅंडलाईन फोनला तक्रारदाराने खरेदी केले BIANNUAL-PLAN-250 प्लॅनची सर्व सुविधा पुरविण्यात यावी व तक्रारदाराचा लँडलाईन फोन पूर्ववत सुविधांसह चालू करणेत यावा.
3 वि.प.ने तक्रारदाराला मानसिक त्रास, हेलपाटे करणेसाठी झालेला खर्च यासाठी रक्कम रु.15,000/- (रक्कम रुपये पंधरा हजार मात्र) अदा करावी.
4 तक्रार अर्जाचा खर्च म्हणून वि.प.ने तक्रारदाराला रक्कम रु.3,000/- (रक्कम रुपये तीन हजार मात्र) अदा करावेत.
5 नमूद सर्व रक्कमेवर वि.प.ने तक्रारदाराला अर्ज दाखल तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष तक्रारदराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे.6टक्के व्याज अदा करावी.
6 वर नमुद सर्व आदेशांची पूर्तता विहीत मुदतीत वि.प.ने आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.
7 विहीत मुदतीत वि.प.ने वरील सर्व आदेशांची पूर्तता न केलेस तक्रारदारांना वि.प.विरुध्द ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम-25 व कलम-27 प्रमाणे कारवाई करणेची मुभा राहील.
8 आदेशाच्या सत्यप्रतीं उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.