पारित द्वारा मा. अध्यक्ष, श्री. अतुल दि. आळशी
-- आदेश --
( पारित दि. 30 एप्रिल, 2014)
तक्रारकर्ता हा विरूध्द पक्षाचा ग्राहक असून त्याने ब्रॉड बँन्ड प्लॅन विरूध्द पक्ष यांचेकडून घेतला होता. तक्रारकर्त्याचे ब्रॉड बॅन्ड कनेक्शन नादुरूस्त असल्यामुळे विरूध्द पक्ष यांनी 3 महिन्यातील बंद कालावधीकरिता बिलामध्ये कुठल्याही प्रकारे सुट न दिल्यामुळे नुकसानभरपाई मिळण्यासाठी सदरहू तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारकर्त्याच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणेः-
2. तक्रारकर्ता हा विरूध्द पक्ष यांचा ग्राहक असून त्याचा ग्राहक क्रमांक 1008436847 असा आहे. तक्रारकर्त्याकडे 3 दूरध्वनी कनेक्शन असून 07182-237636 व 236399 या क्रमांकाचे दोन दूरध्वनी कनेक्शन हे अनुक्रमे मेसर्स महाराष्ट्र स्टार्च मॅन्युफॅक्चरिंग कंपनी व महाराष्ट्र स्टारोक मॅन्युफॅक्चरर या व्यवसायाकरिता वापरले जातात. तसेच दूरध्वनी क्रमांक 07182-231451 हा फक्त त्याच्या स्वतःच्या खाजगी कामाकरिता वापरल्या जातो. तक्रारकर्त्याला विरूध्द पक्ष यांनी Unlimited Broad Band करिता एक वर्षासाठी फिक्स्ड रेटप्रमाणे रू. 9,550/- दिनांक 01/12/2012 ते 30/11/2013 या कालावधीकरिता दिलेले होते.
3. वरील तीनही दूरध्वनी कनेक्शन हे एकाच पोलवर जोडल्या गेले होते. तक्रारकर्त्याच्या तक्रारीप्रमाणे वरील तीनही कनेक्शन हे दिनांक 08/05/2012 पासून बंद पडले होते. तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष यांच्याकडे दूरध्वनी सुरू करण्याची विनंती केली. परंतु विरूध्द पक्ष यांनी दूरध्वनी सुरू न केल्यामुळे त्याने दिनांक 11/05/2012, 21/05/2012 व 07/06/2012 रोजी विरूध्द पक्ष यांना लेखी पत्र दिले होते. तक्रारकर्त्याचे दूरध्वनी कनेक्शन बंद असल्यामुळे तक्रारकर्त्यास अतोनात नुकसान सहन करावे लागले. विरूध्द पक्ष यांनी दिनांक 01/08/2012 रोजी वरील तीनही दूरध्वनी चालू करून दिले. तक्रारकर्त्याचे दूरध्वनी कनेक्शन दिनाांक 08/05/2012 ते 01/08/2012 या कालावधीत बंद असल्यामुळे तक्रारकर्त्याला मानसिक त्रास सहन करावा लागला. तक्रारकर्त्याने संपूर्ण बिले भरून सुध्दा त्याला मानसिक त्रास सहन करावा लागला म्हणून तक्रारकर्त्याने सदर तक्रार रू. 50,000/- नुकसानभरपाई मिळण्यासाठी तसेच रू. 30,000/- दूरध्वनी बंद असल्यामुळे झालेल्या नुकसानीपोटी देण्यात यावे व रू. 5,000/- तक्रारीचा खर्च मिळावा म्हणून विद्यमान न्याय मंचात दिनांक 17/11/2012 रोजी दाखल केली.
4. मंचाने तक्रारकर्त्याची तक्रार दाखल करून घेतल्यानंतर दिनांक 19/11/2012 रोजी विरूध्द पक्ष यांना मंचामार्फत नोटीस बजावण्यात आला. विरूध्द पक्ष यांना नोटीस प्राप्त झाल्यानंतर त्यांनी हजर होऊन त्यांचा लेखी जबाब दाखल केला आहे.
विरूध्द पक्ष यांनी त्यांचा जबाब दिनांक 25/02/2013 रोजी मंचात दाखल केला. विरूध्द पक्ष यांनी आपल्या जबाबात असे म्हटले आहे की, तक्रारकर्त्याने संपूर्ण दूरध्वनी कनेक्शन हे कमर्शियल प्रयोजनाकरिता वापरले असून तक्रारकर्ता हा त्याच्या व्यवसायामध्ये प्रोप्रायटर होता याबद्दल कुठलाही पुरावा तक्रारकर्त्याने दाखल केलेला नसल्यामुळे सदर तक्रार विद्यमान मंचाच्या अधिकारक्षेत्रात येत नाही. विरूध्द पक्ष यांनी त्यांच्या जबाबातील परिच्छेद क्र. 4 मध्ये असे म्हटले आहे की, ग्रामपंचायत, पिंडकेपार येथे पाण्याच्या पाईपलाईनचे काम सुरू असल्यामुळे विरूध्द पक्ष यांचे जमिनीखालील केबल क्षतिग्रस्त झाले होते. त्यामुळे तक्रारकर्त्याचे दूरध्वनी कनेक्शन हे दिनांक 08/05/2012 ते 01/08/2012 पर्यंत नादुरूस्त होते. विरूध्द पक्ष यांचे केबल ग्राम पंचायत मार्फत सुरू असलेल्या खोदकामामुळे क्षतिग्रस्त होऊ देऊ नका अशी विनंती विरूध्द पक्ष यांनी ग्राम पंचायतीला वेळोवेळी केली होती. विरूध्द पक्ष यांचेद्वारा दिनांक 08/07/2012 रोजी तक्रारकर्त्याची दूरध्वनी सेवा व ब्रॉड बॅन्ड सेवा पूर्ववत सुरू करून देण्यात आली व त्यासाठी नवीन केबल वायर भंडारा स्टोअर येथून मागवून दुरूस्ती करण्यात आली. त्यासाठी तक्रारकर्त्यास झालेल्या त्रासाबद्दल म्हणजेच दिनांक 05/05/2012 ते 08/07/2012 पर्यंतच्या कालावधीकरिता तक्रारकर्त्याला बिलामध्ये रू. 1,700/- ची सूट देण्यात आली. त्यामुळे विरूध्द पक्ष यांनी त्यांच्या सेवेमध्ये कुठलीही त्रुटी केलेली नसल्यामुळे त्यांच्याविरूध्द सदरहू तक्रार खारीज करण्यात यावी अशी विनंती केली आहे.
5. तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत दिनांक 27/06/2012 चे बिल पृष्ठ क्र. 11 वर दाखल केले आहे तसेच विरूध्द पक्ष यांना दिलेल्या तक्रारी पृष्ठ क्र. 12, 13 व 14 वर दाखल केलेल्या आहेत. विरूध्द पक्ष यांनी दिनांक 28/12/2012 चे बिल पृष्ठ क्र. 25 वर दाखल केले असून बिलाच्या तपशीलासंबंधी व प्लॅन बद्दलचा डाटा हा पृष्ठ क्र. 26 वर दाखल केला आहे.
6. तक्रारकर्त्याचे वकील ऍड. एन. एस. पोपट यांनी असा युक्तिवाद केला की, तक्रारकर्त्याने दूरध्वनी नादुरूस्त असल्याबाबतचे पत्र वारंवार देऊन सुध्दा विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याचा दूरध्वनी दुरूस्त केला नाही. तक्रारकर्त्यास मे, जून व जुलै या 3 महिन्यात दूरध्वनी सेवा बंद असल्यामुळे मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला. तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष यांना दिलेल्या तक्रारीची सत्यप्रत सदरहू प्रकरणात दाखल केलेली आहे त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार मंजूर करण्यात यावी.
7. विरूध्द पक्षाचे वकील ऍड. एस. बी. राजनकर यांनी असा युक्तिवाद केला की, तक्रारकर्त्याचे दूरध्वनी कनेक्शन हे ग्राम पंचायतीच्या चुकीच्या पध्दतीच्या कामामुळे केबल डॅमेज होऊन क्षतिग्रस्त झाले. विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याच्या अर्जाची त्वरित दखल घेऊन विरूध्द पक्ष यांना केबल जोडण्याचे काम लवकर करता यावे या उद्देशाने ग्राम पंचायतीला केबल डॅमेज झाल्याबद्दल पत्र दिले व नळ दुरूस्तीचे ग्राम पंचायतीचे काम त्वरित संपविण्यास सांगितले. तक्रारकर्त्यास कुठलाही त्रास होऊ नये याकरिता विरूध्द पक्ष यांनी वेळोवेळी पाऊले उचलली असून तक्रारकर्त्यास दूरध्वनी कनेक्शन बंद असलेल्या कालावधीकरिता रू. 1,700/- ची सूट देऊन तक्रारकर्त्याचे कुठल्याही प्रकारे नुकसान होऊ नये म्हणून सर्वतोपरी काळजी घेतली. त्यामुळे विरूध्द पक्ष यांच्या सेवेमध्ये कुठल्याही प्रकारे त्रुटी नसल्यामुळे त्यांच्याविरूध्द तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात यावी.
8. तक्रारकर्त्याचा तक्रार अर्ज, विरूध्द पक्ष यांचा जबाब तसेच हाती असलेल्या प्रकरणामध्ये दाखल केलेले कागदपत्र व दोन्ही पक्षाच्या वकिलांचा तोंडी युक्तिवाद यावरून खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | निर्णय |
1. | तक्रारकर्त्याची तक्रार मान्य होण्यास पात्र आहे काय? | नाही |
2. | या तक्रारीचा अंतिम आदेश काय? | कारणमिमांसेप्रमाणे |
- कारणमिमांसा –
9. तक्रारकर्त्याने कबूल केले की, तक्रारकर्त्याचे दूरध्वनी कनेक्शन हे काही व्यवसायाकरिता व एक दूरध्वनी कनेक्शन हे खाजगी कामाकरिता वापरल्या जात होते. तक्रारकर्त्याने असेही कबूल केले आहे की, तक्रारकर्त्याचे घर व तक्रारकर्त्याचा व्यवसाय हा एकाच इमारतीमध्ये आहे. तक्रारकर्त्याने दिनांक 11/05/2005, 11/05/2012, 18/05/2012 तसेच 05/06/2012 रोजी विरूध्द पक्ष यांच्याकडे केलेली तक्रार ही त्याच्या व्यवसायाकरिता वापरल्या जाणा-या लेटरहेड वर दिलेली असून बिलावरील पत्ता व व्यवसायाच्या लेटरहेडवरील पत्ता हा सारखाच आहे. त्यामुळे कोणते दूरध्वनी कनेक्शन हे कोणत्या कारणाकरिता वापरण्यात येत होते हे सांगणे कठीण आहे. तक्रारकर्त्याने वापरलेले दूरध्वनी कनेक्शन हे खाजगी कारणासाठी वापरले गेल्याबद्दलचा कुठलाही पुरावा तक्रारकर्त्याने दाखल न केल्यामुळे सदरहू वाद हा कमर्शियल प्रयोजनाकरिताचा वाद असल्यामुळे तो ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत न्याय मंचासमोर चालविता येऊ शकत नाही असे मंचाचे मत आहे.
10. सदरहू तक्रारीमध्ये विरूध्द पक्ष यांनी दाखल केलेल्या दिनांक 06/12/2012 रोजीच्या पत्रानुसार विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यास दूरध्वनी सेवा खंडित झाल्याबद्दल 3 महिन्याची सूट रू. 1,700/- दिलेली असून तक्रारकर्त्याच्या फिक्स्ड चार्जेस रू. 9,550/- मधून रू. 1,700/- वजा करता रू. 7,850/- चेच ब्रॉड बॅन्ड चार्जेस लावलेले आहेत. त्यामुळे विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यास झालेल्या त्रासाबद्दल सूट दिल्यामुळे व वेळीच पाऊले उचलल्यामुळे त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी झाल्याचे म्हणता येणार नाही.
11. तक्रारकर्त्याची खंडित झालेली दूरध्वनी सेवा ही ग्राम पंचायतीच्या पाईप दुरूस्तीच्या कामामुळे झालेली असून सदरहू काम हे अकुशल कामगारांकरवी अयोग्य पध्दतीने व उच्च प्रतीचे न वापरले जाणारे ठेकेदार यांच्याकडून ग्राम पंचायत सतत करीत असल्यामुळे तक्रारकर्त्याची सेवा खंडित होण्याच्या कारणाला सर्वस्वी ग्राम पंचायत जबाबदार असल्यामुळे विरूध्द पक्ष या कृत्यास सकृतदर्शनी जबाबदार नाहीत. त्यामुळे विरूध्द पक्ष यांच्या सेवेतील ती त्रुटी होऊ शकत नाही. याउलट विरूध्द पक्ष यांना त्यांच्या केबल जोडणीचे काम त्वरित करता यावे या हेतूने विरूध्द पक्ष यांनी ग्राम पंचायतीस ‘बेजबाबदारपणे’ केलेल्या कामाबद्दल दखल घेऊन पत्र पाठविले व त्वरित काम संपविण्यासाठी सुध्दा विनंती केली होती. त्यामुळे विरूध्द पक्ष हे सेवेतील त्रुटीकरिता जबाबदार नाहीत म्हणून त्यांच्याविरूध्द दाखल केलेली तक्रार खारीज होण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे.
करिता खालील आदेश.
-// अंतिम आदेश //-
1. तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात येते.
2. खर्चाबद्दल कोणताही आदेश नाही.