जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – ५५/२०१२ तक्रार दाखल दिनांक – २७/०३/२०१२
तक्रार निकाली दिनांक – १६/१०/२०१४
सुरेश धोंडू सोनार उ.व.५० धंदा – नोकरी
रा.मिरा अपार्टमेंट प्लॉट नं.६
सहकार मंगलकार्यालय जवळ गोंदूर
रोड देवपूर वलवाडी धुळे ता.जि. धुळे
मो.न.९२७१५८६१२२ ................ तक्रारदार
विरुध्द
१) भरत राजाराम मराठे
उ.व.३५ धंदा – कार्यालय भाडयाने देणे,
रा.प्लॉट नं.३० दिपमाला सोसायटी
वलवाडी शिवार देवपूर धुळे ता.जि. धुळे.
मो.नं. ९२७२३४१०५५
२) मॅनेजर/ मालक शिवसागर मंगल कार्यालय
स्टेडियम समोर, गोंदूर रोड, देवपूर
वलवाडी धुळे ता.जि.धुळे.
मॅनेजर फोन नं.०२५६२-३२१५८४ मो.नं.९२७०३१५१०१ ...............सामनेवाला
(मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
(मा.सदस्य – श्री.एस.एस.जोशी)
(मा.सदस्या – सौ.के.एस.जगपती)
उपस्थिती
(तक्रारदारातर्फे – अॅड.श्री.एम.पी. परदेशी)
(सामनेवालातर्फे – अॅड.श्री.ए.एस.सानप)
निकालपत्र
(दवाराः मा.सदस्या – सौ.के.एस.जगपती)
१ तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्याकडे मंगल कार्यालयासाठी डिपॉझिट केलेली रक्कम परत न केल्यामुळे, सदरची रक्कम परत मिळण्यासाठी या मंचात प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
२. तक्रारदारांची तक्रार थोडक्यात अशी आहे की, तक्रारदार यांनी सामनेवाला भरत राजाराम मराठे यांच्याकडे लग्नासाठी दि.०७/०८/२०११ रोजी रक्कम रूपये १०,०००/- डिपॉझिट करून दि.२९/११/२०११ ते ३०/११/२०११ या दोन दिवसांसाठी शिवसागर मंगल कार्यालय बुक केलेले होते. हॉल पसंत न पडल्याने तक्रारदार यांनी दि.०८/१०/२०११ रोजी सामनेवाला यांना फोन करून डिपॉझिटची रक्कम परत मागितली. सामनेवाला यांनी नियम १ व ११ प्रमाणे रक्कम परत देण्यास नकार दिला. तक्रारदार यांचे पुढे असे म्हणणे आहे की, सदर सामनेवाला यांनी रक्कम रूपये १०,०००/- मधील रक्कम रूपये २,०००/- कापून उर्वरित रक्कम रूपये ८,०००/- सामनेवाला यांनी ती द्यावे म्हणून मागणी केली होती, परंतू सामनेवाला यांनी रक्कम रूपये ८,०००/- परत करण्यास नकार दिला. त्यामुळे तक्रारदार यांना सामनेवालांकडे डिपॉझिट रक्कम रूपये १०,०००/-, मानसिक व शारिरीक त्रासासाठी रूपये १५,०००/-, नोटीसचा खर्च रक्कम रूपये १,०००/- एकूण रक्कम रूपये २६,०००/- सामनेवालेंडून मिळावे म्हणून मागणी केली आहे.
तक्रारदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ नि.५ वर दस्तऐवज यादी दाखल केलेली आहे. त्यामध्ये नोटीस, परत आलेले पाकीट आणि मंगलकार्यालयाचे नियम व अटी असलेले पत्रक हे तिन दस्तऐवज दाखल केले आहे.
३. सामनेवाला यांनी हजर होवून त्यांनी आपल्या बचाव्याच्या पुष्ट्यर्थ लेखी युक्तिवाद दाखल केलेला आहे. तसेच दस्तऐवज यादीमध्ये भूषण भरत मराठे यांच्या नावे नि. १६/१ वर ग्रामपंचायत कार्यालय यांच्याकडे मंगलकार्यालय बांधणी परवानगी देणेबाबत अर्ज, व्यवसायाबाबतचा दाखला इत्यादी दस्तऐवजांच्या छायांकीत प्रती दाखल केलेल्या आहेत.
४. सामनेवाला यांनी आपल्या लेखी खुलाशामध्ये तक्रारदार यांची संपुर्ण तक्रार नाकबूल केलेले आहे. तसेच सामनेवाला हे सदर मंगलकार्यालशी काहीएक संबंध नाही. सदर तक्रारदरानी सामनेवालाविरूध्द खोटी तक्रार दाखल केली आहे. तसेच तक्रारदार यासाठी सामनेवालांना झालेल्या खर्चासाठी रक्कम रूपये ५,०००/- ची मागणी केलेली आहे.
५. सामनेवाले क्र.२ भरत राजधर मराठे हे स्वतःहून मंचात हजर होवून लेखी खुलासा दाखल केलेला आहे. त्यात त्यांनी आपल्या बचावाच्या पुष्ट्यर्थ तक्रारदाराचे संपूर्ण म्हणणे खोटे व नाकबूल केलेले आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तक्रारदार व त्यांचे भाऊ या दोघांनी प्रत्येकी रूपये १०,०००/- प्रमाणे रूपये २०,०००/- अॅडव्हान्स बुकींगपोटी मंगल कार्यालय बुक केलेले होते. त्यावेळेस सामनेवाला यांनी तक्रारदार यांना मंगलकार्यालयाच्या अटी व शर्ती समजावून सांगितल्या होत्या. सदर अटी व शर्तींची माहिती संपूर्णपणे तक्रारदार यांना होती. त्यानुसार तक्रारदार यांचे भाऊ यांनी अचानक मंगलकार्यालय बुकींग रद्द करून डिपॉझिट परत मागितले. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना सांगितले की त्या तारखेत दुस-या ग्राहकांनी बुकींग केल्यास तुम्हाला डिपॉझिट रक्कम परत देण्यात येईल. त्यानुसार तक्रारदार यांच्या भावाची डिपॉझिट रक्कम रूपये १०,०००/- सामनेवालेंनी परत केलेली आाहे. त्यामुळे तक्रारदार यांनी दाखल केलेला अर्ज रद्द करण्याची विनंती केली आहे व कॉम्पनसेटरी कॉस्ट म्हणून रक्कम रूपये ५,०००/- ची मागणी केलेली आहे.
६. सामनेवाला क्र.१ व २ यांनी आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ नि.१९ वर एकत्रितरित्या लेखी युक्तिवाद दाखल केलेला आहे.
७. तक्रारदार यांनी तक्रारीसोबत दाखल केलेली कागदपत्रे, सामनेवाले यांनी दाखल केलेला खुलासा विचारात घेता आमच्यासमोर निष्कर्षासाठी पुढील मुद्दे उपस्थित होतात.
. मुद्दे निष्कर्ष
- तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय ? होय
- सामनेवाले यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्या
सेवेत त्रुटी केली आहे काय ? नाही
- आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे
८.मुद्दा ‘अ’- तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्याकडे रितसर डिपॉझिट रक्कम रूपये १०,०००/- देवून मंगलकार्यालय बुक केलेले होते. त्यासंदर्भातील शिवमंगलकार्यालय यांनी दिलेली रितसर पावती नि. ६/३ वर दाखल केलेली आहे. यावरून तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत हे सिध्द होते. याच कारणामुळे आम्ही मुद्दा ‘अ’ चे उत्तर होकारार्थी देत आहोत.
९.मुद्दा ‘ब’- सामनेवाला यांनी तक्रारदार व त्यांचे भाऊ यांना दि.२९/११/२०११ व दि.३०/११/२०११ या दोन दिवसांसाठी शिव मंगलकार्यालय प्रत्येकी रक्कम रूपये १०,०००/- प्रमाणे रूपये २०,०००/- दि.०७/०८/२०११ रोजी सामनेवाला यांच्याकडे हॉल बुक केलेले होता. त्याच्या पुष्ट्यर्थ तक्रारदार यांनी दि.३०/११/२०११ रोजीची शिवमंगल कार्यालयाची नियम व अटी असलेले पत्रक दाखल केले आहे. त्यानुसार सदर पत्रावर तक्रारदार व सामनेवाला यांच्या सह्या दिसून येत आहे.
सामनेवाला यांनी दाखल केलेल्या खुलाशावरून व दस्तऐवजावरून असे दिसून येते की, सामनेवाला भरत राजाराम मराठे यांनी श्री. भूषण भरत मराठे यांच्या नावाचे ग्राम पंचायत कार्यालय वलवाडी हद्दीतील सर्व्हे नं.२८/३-४ मधील प्लॉट नं. ५७ मंगलकार्यालय बांधणी आराखडा मंजूरी परवानगी देणेबाबत पत्र व भूषण भरत मराठे यांच्या नावे व्यवसायाबाबतचा दाखला यावरून असे दिसून येते की, भूषण भरत मराठे हे सदर मंगल कार्यालयाचे मालक आहेत.
सामनेवाला क्र.१ व २ यांनी एकत्रितरित्या लेखी युक्तिवाद दाखल केलेला आहे. त्यामध्ये असे दिसून येते की, तक्रारदार यांनी मंगल कार्यालय बुक करतांना सामनेवाला यांनी अटी व शर्ती असलेले पत्रक तक्रारदार यांना दिलेले होते ते नि.६/३ वर तक्रारदार यांनी दाखल केलेले आहेत. त्यामध्ये नियम व अटी ११ मध्ये बुकींगसाठी दिलेली रक्कम परत मिळणार नाही असे नमूद केलेले आहे व तक्रारदार यांची त्यावर स्वाक्षरी केलेल्या दिसून येत आहे. याचाच अर्थ तक्रारदार यांना सामनेवाला यांचे नियम व अटींची कल्पना होती. तसेच दि.२०/१०/२०११ रोजी तक्रारदार यांनी स्वतः सामनेवाला यांना दि.३०/११/२०११ रोजीचे लग्न रद्द करण्याबद्दल सांगितले होते. म्हणजेच तक्रारदार यांच्या इच्छेनुसार सदर बुकींग रद्द करण्यात आलेली आहे, असे दिसून येते. तसेच दि.३०/११/२०११ रोजी दुस-या ग्राहकांनी हॉल बुक न केल्यामुळे सामनेवाला यांनी तक्रारदार यांचे अॅडव्हान्स रक्कम रूपये १०,०००/- परत केलेले नाही. वरील बाबींचा विचार करता सामनेवाला यांनी तक्रारदार यांना सेवा देण्यास कसूर केलेला दिसून येत नाही असे मंचाचे मत आहे. म्हणून आम्ही मुद्दा ‘ब’ चे उत्तर नकारार्थी देत आहोत.
१०. मुद्दा क्र. ‘‘ड’’ – उपरोक्त सर्व विवेचनावरुन हे मंच खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे
आ दे श
१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.
२. खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.
धुळे.
-
(सौ.के.एस.जगपती) (श्री.एस.एस. जोशी) (सौ.व्ही.व्ही. दाणी)
सदस्या सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.