Exh.No.16
सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
तक्रार क्र. 01/2015
तक्रार दाखल झाल्याचा दि.08/01/2015
तक्रार निकाल झाल्याचा दि.22/06/2015
श्री सुजित सुधाकर तावडे
वय 31 वर्षे, व्यवसाय- डॉक्टर, बांधकाम व्यावसायीक,
रा.व्हाईट कॅसल श्री नगर कळसुली,
ता.कणकवली, जिल्हा- सिंधुदुर्ग ... तक्रारदार
विरुध्द
भारत मॅट्रीमोनी,
नं.94, टीव्हीएच बेलिसिया टॉवर्स,
10 वा मजला, टॉवर्झ, एमआरसी नगर,
मंदावेली, चेन्नई,
तामिळनाडू, इंडिया ... विरुध्द पक्ष.
गणपूर्तीः- 1) श्रीम. अपर्णा वा. पळसुले. अध्यक्ष
2) श्री कमलाकांत ध. कुबल, सदस्य
3) श्रीमती वफा ज. खान, सदस्य.
तक्रारदार - स्वतः
विरुद्ध पक्षातर्फे विधिज्ञ - श्री डी.एम. पाटील, श्री एच.टी. चव्हाण
निकालपत्र
(दि.22/06/2015)
द्वारा : श्री कमलाकांत ध. कुबल, प्रभारी अध्यक्ष
1) प्रस्तुतची तक्रार तक्रारदाराने विरुध्द पक्षाकडे विवाह जुळवून देण्यासाठी रक्कम घेतली व त्याप्रमाणे सेवा दिली नाही म्हणून मंचाकडे दाखल केली आहे.
2) सदर तक्रारीचा गोषवारा असा आहे –
तक्रारदार श्री सुजीत सुधाकर तावडे रा.कळसुली-कणकवली येथे रहाणारा असून अविवाहीत आहे. त्याचा स्वतःचा विवाह करावयाचा असल्याने विरुध्द पक्ष भारत मॅट्रीमोनी या विवाह जुळवणा-या संस्थेकडे रु.1,50,000/- एवढी रक्कम भरली व लग्न जुळवून दिल्यानंतर उर्वरीत रक्कम रु.1,00,000/- देण्यास विरुध्द पक्षाने सांगितले. या संदर्भात विरुध्द पक्षाकडे रक्कमेची पुर्तता केल्यानंतर विरुध्द पक्षाने आपण एक रिलेशनशिप मॅनेजर देऊ असे सांगितले व त्याप्रमाणे रिलेशनशिप मॅनेजरने तक्रारदाराला आम्ही तुझे काही फोटो काढू तसेच तुझ्याशी यासंदर्भात contract करु असे सांगितले व त्यांनी तसे केले नाही असे तक्रारदाराचे म्हणणे आहे. दि.3/9/2014 नंतर कोणतेही प्रोफाईल तक्रारदाराच्या ईमेलवर पाठविले नाही अथवा संपर्क ठेवला नाही. तक्रारदाराने यासंदर्भात विरुध्द पक्षाच्या अहमदाबाद ऑफीसमध्ये संपर्क केला होता. तक्रारदाराचे म्हणणे असे आहे की, विरुध्द पक्षाने दिलेली सर्व आश्वासने खोटी असून मला मानसिक त्रास देऊन माझ्या आयुष्यात आर्थिक फसवणूक केलेली आहे, विरुध्द पक्षाने माझे लग्न जुळवण्यास मदत केली नाही. आपली रक्कम परत देतो असे सांगून अदयापी पाच महिने रक्कम परत दिलेली नाही. सदर कंपनी मुरुगावेल जानकीरामन यांचे नावाने आहे. तक्रारदाराने मंचाकडे विरुध्द पक्षाला दिलेले रु.1,50,000/- तक्रार खर्च रु.5,000/-, व्याज रु.15,000/- व मानसिक त्रासापोटी रु.15,000/- अशी एकूण रु.1,85,000/- ची तक्रारीत मागणी केली आहे.
3) आपले म्हणण्याच्या पुष्टयर्थ नि.क्र.2 वर एकूण 10 कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
4) विरुध्द पक्षाने आपले म्हणणे नि.9 वर दाखल केले असून सदर तक्रार चुकीची खोडसाळ असून तक्रारदाराने मांडलेले मुद्दे अमान्य केलेले आहेत. तक्रारदार हा विरुध्द पक्षाचा ग्राहक या संज्ञेत येत नसल्याचे कथन केले असून आपण कोणतीही सेवा त्रुटी अथवा अनुचित व्यापार पध्दती केली नसल्याचे नमूद केले आहे. तसेच सदर प्रकरण सिंधुदुर्ग जिल्हा मंचाच्या कार्यक्षेत्रात घेता येणार नाही; कारण तक्रारदाराने स्वतःच म्हटलेप्रमाणे तक्रारदाराने चेन्नई ऑफिसशी संपर्क साधला व आपली वैयक्तिक सविस्तर माहिती अहमदाबाद ऑफिस मार्फत पाठविली होती. विरुध्द पक्षाने तक्रारदाराकडून NEFT द्वारे दि.18/07/2014 रोजी पैसे घेतल्याचे मान्य केले आहे. मात्र तक्रारदाराच्या म्हणण्याप्रमाणे कोणतीही सेवाच दिली नाही हे विरुध्द पक्षाने अमान्य केले आहे. तक्रारदाराला 11 प्रोफाईल्स पाठवण्यात आल्या. त्यापैकी 9 प्रोफाईल स्वीकृत करण्यात आल्या व 3 प्रोफाईल नाकारल्या. मात्र तक्रारदाराने कोणतेही सहकार्य विरुध्द पक्षाला केले नाही. अर्वाच्य भाषेमध्ये बोलणे वगैरे तक्रारदाराची कृती समर्थनीय नव्हती. त्यामुळेच दोघांच्या संमतीने रु.94,000/- तक्रारदाराला परत देण्याचे ठरले. त्याप्रमाणे चेक नं.018551 रु.94,000/- चा चेक विरुध्द पक्षाच्या कोल्हापूर ऑफिसला पाठविला तसे तक्रारदाराला दूरध्वनीवरुन चेक ताब्यात घेण्याविषयी कळविण्यात आले. मात्र आजमितीपर्यंत तक्रारदाराने तो स्वीकारलेला नाही. त्यामुळे तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार खर्चासह फोटाळण्यात यावी अशी विनंती केलेली आहे.
5) आपल्या म्हणण्याच्या पुष्टयर्थ नि.10 वर एकूण 13 कागदपत्रे दाखल केलेली आहेत. त्याचप्रमाणे विरुध्द पक्षाने उभय पक्षकारात झालेल्या संवादाची ध्वनीफित दाखल केली आहे.
6) तक्रारदाराची तक्रार, त्यांचे म्हणणे, दाखल केलेले पुरावे तसेच विरुध्द पक्षाचे म्हणणे, कागदोपत्री पुरावे दोहोंचे लेखी/तोंडी युक्तीवाद यांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्कर्षाप्रत येत आहे.
अ.क्र. | मुद्दे | निष्कर्ष |
1 | सदरची तक्रार चालवणेस या मंचास अधिकारक्षेत्र आहे काय ? | होय |
2 | तक्रारदार हा विरुध्द पक्ष यांचा ग्राहक आहे काय ? | होय |
3 | विरुध्द पक्षाने तक्रारदारास दयावयाच्या सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ? | होय |
4 | आदेश काय ? | खालीलप्रमाणे |
7) मुद्दा क्रमांक 1 - विरुध्द पक्ष यांनी त्यांच्या म्हणण्यामध्ये या मंचाच्या अधिकारक्षेत्राबाबतचा मुद्दा उपस्थित केला आहे. विरुध्द पक्षाच्या म्हणण्यानुसार तक्रारदाराने चेन्नई ऑफिसला संपर्क साधून व्यवहाराची माहिती अहमदाबाद ऑफिसला पाठविली होती. त्यामुळे सदरचा तक्रार अर्ज या मंचाच्या अधिकार क्षेत्राबाहेरील असल्यामुळे या मंचासमोर चालणेस पात्र नाही. तथापि तक्रारदाराने दाखल केलेला नि.2 कडील कागदोपत्री पुरावा पाहता सदरचा व्यवहार हा ऑन लाईन झाल्याचे दिसून येते. तसेच तक्रारदाराने सदरच्या व्यवहाराबाबतची रक्कम NEFT द्वारे दि.18/07/2014 रोजी पाठविली असून ती मिळाल्याचे विरुध्द पक्ष यांनी मान्य केले आहे. त्यामुळे सदरचा व्यवहार ऑन लाईन असल्याचे सिध्द होते. सबब विरुध्द पक्षाचे म्हणणे सदरची तक्रार या मंचासमोर चालणेस कार्यक्षेत्र नाही हे मान्य करता येणार नाही. एकंदरीत कागदोपत्री पुराव्यांचा विचार करता सदरची तक्रार या मंचासमोर चालणेस पात्र आहे व या मंचास सदरची तक्रार चालवणेचे अधिकारक्षेत्र आहे, या निर्णयाप्रत हे मंच येत आहे. त्यामुळे मुद्दा नं.1 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
8) मुद्दा क्रमांक 2 - तक्रारदाराने NEFT द्वारे दि.18/7/2014 रोजी रु.1,50,000/- पाठविल्याचे नि.9 मधील मुद्दा क्र.6 मध्ये विरुध्द पक्षाने मान्य केले आहे. याचा अर्थ सदर रक्कम विरुध्द पक्षाला प्राप्त झालेली असल्याने दोघांमध्ये ग्राहक आणि सेवादार हे नाते प्रस्थापित झाल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे तक्रारदार हा विरुध्द पक्षाचा ‘ग्राहक’ असल्याचे अधोरेखित होते.
9) मुद्दा क्रमांक 2 - तक्रारदार व विरुध्द पक्षाने एकमेकांच्या अटी-शर्ती मान्य केल्याने सातत्यपूर्ण सेवा देण्याची सर्वथा जबाबदारी विरुध्द पक्षाची होती. ती त्यांनी काही अंशी पूर्ण केली हे कागदोपत्री पुराव्यावरुन दिसून येते. मात्र दोघांमधील संवाद विशिष्ट पातळीपर्यंत चांगल्या रितीने चालू राहिले. कालांतराने त्यामध्ये शाब्दीक वितुष्टता निर्माण झाली. मूळतः विरुध्द पक्षाची संस्था ही लग्न जुळवण्यासारखे मंगलमय कार्य करीत आहे. त्यामुळे तक्रारदार हा जरी गरजू असला तरी विरुध्द पक्षाकडून दिलेल्या सेवेसाठी त्याने त्याचे पूर्ण मुल्य रु.1,50,000/- विरुध्द पक्षाकडे जमा केलेले होते. त्यामुळे त्याला तशी सातत्यपूर्ण सेवा देणे क्रमप्राप्त होते. किंवा संवादात वितुष्टता निर्माण झाली तर त्याचवेळी करार संपूष्टात आणून तक्रारदाराने भरलेली रक्कम डिमांड ड्राफ्टद्वारे विरुध्द पक्षाला पाठविता आली असती. त्यांनी तसे न करता आपल्या कोल्हापूर ऑफिसला वजावट करुन रु.94,000/- चा चेक पाठवून तिथून तक्रारदाराला घेऊन जाण्यास सांगितले ही विरुध्द पक्षाची कृती समर्थनीय नाही. त्यामुळे विशिष्ट सेवेसाठी घेतलेली रक्कम अंशतः सेवा देऊन रक्कम वजावट करुन तक्रारदाराला देणे ही सेवेतील त्रुटी आहे असे मंचाला वाटते.
10) विरुध्द पक्षाच्या माहितीपत्रकात अटी व शर्तीमध्ये पैसे परत देण्याच्या अटी नमूद आहेत. त्यामध्ये 3 महिने, 6 महिने व 9 महिने मनी बॅक गॅरंटी देण्यात आलेली आहे. प्रस्तुत तक्रार 9 महिन्यातच घडून आली. त्यामुळे त्या अटीनुसार तक्रारदाराला विरुध्द पक्षाकडून रक्कम परत मिळणे आवश्यक आहे. मात्र त्यामध्ये विरुध्द पक्षाने 10 प्रोफाईल पाठविले असल्याचे कागदपत्रावरुन दिसून येते. त्यामुळे विरुध्द पक्षाने अंशतः सेवा दिली असल्याचे मान्य करावे लागते.
11) विरुध्द पक्षाने तक्रारदाराला रु.94,000/- देणेची तयारी दर्शविल्याचे दिसून येते. मात्र उर्वरित रक्कमेची कपात कशा प्रकारे व कोणत्या कारणास्तव केली याचा उल्लेख नाही. मात्र कागदोपत्री पुराव्यावरुन तक्रारदाराला प्रोफाईल पाठविल्याचे दिसून येते. केवळ प्रोफाईल पाठवून विरुध्द पक्षाची जबाबदारी संपूष्टात येत नाही. कारण तक्रारदाराला देण्यात येणा-या सेवेसाठी विरुध्द पक्षाने मोठा आर्थिक व्यवहार केलेला असून त्यापोटी त्याला सेवा देण्याचे काम विरुध्द पक्षाचे होते असे मंचाला वाटते.
12) तक्रारदार आणि विरुध्द पक्षामध्ये झालेल्या संवादाची ध्वनीफित सिलबंद असल्याने तक्रारदार आणि विरुध्द पक्ष यांचेसमोर वाचन व श्रवण करण्याचे मंचाने ठरविलेले होते. मात्र ध्वनीफित दाखल केल्यानंतर विरुध्द पक्ष अथवा विधिज्ञ मंचासमोर हजर राहिले नाहीत. त्यामुळे त्या सिडीमध्ये तक्रारदार व विरुध्द पक्ष यांचेमध्ये कोणता संवाद झाला हे मंचासमोर उघड झाले नाही.
13) मुद्दा क्रमांक 3 - तक्रारदाराच्या तक्रारीतील कथन, सादर केलेले पुरावे तसेच विरुध्द पक्षाचे म्हणणे, कागदोपत्री पुरावे यांचे अवलोकन केल्यानंतर तक्रारदारांची तक्रार अंशतः मान्य करण्याच्या निर्णयावर हा मंच आला आहे. त्यामुळे विरुध्द पक्षाने मान्य केल्याप्रमाणे रु.94,000/- त्याला द.सा.द.शे. 9% व्याजासह परत करावेत तसेच मानसिक, शारीरिक त्रासाबद्दल रु.50,000/- व प्रकरण खर्चापोटी रु.5,000/- तक्रारदाराला दयावेत असे मंचाला वाटते. त्यामुळे खालीलप्रमाणे अंतीम आदेश पारीत करण्यात येतात.
आदेश
- तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्द पक्षाने तक्रारदार यांना रक्कम रु.94,000/- (रुपये चौ-याण्णव हजार मात्र) दि.18/7/2014 पासून रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे. 9 % व्याजासह अदा करावेत.
- ग्राहकाला देण्यात येणा-या सेवेत त्रुटी केल्याने झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासापोटी रक्कम रु.50,000/- (रुपये पन्नास हजार मात्र) तसेच प्रकरण खर्च रु.5,000/- (रुपये पाच हजार मात्र) विरुध्द पक्ष यांनी तक्रारदाराला अदा करावेत.
- सदर आदेशाची पुर्तता आदेशाच्या दिनांकापासून 45 दिवसांचे आत करणेत यावी. तसे न केल्यास उपरोक्त सर्व रक्कमा द.सा.द.शे. 9% व्याज दराने मिळणेस तक्रारदार पात्र राहतील.
- मा.राज्य आयोग, मुंबई यांचे परिपत्रक्र क्र.राआ/महा/आस्था/-3/जि.मं.कामकाज/ परिपत्रक/ 2014/3752 दि..05 जुलै 2014 नुसार उभय पक्षकारांनी 45 दिवसानंतर म्हणजेच दि.07/08/2015 रोजी आदेशाची पुर्तता झाली किंवा नाही हे कळवणेसाठी या मंचासमोर हजर रहावे असे आदेश देण्यात येतात.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 22/06/2015
Sd/- Sd/- Sd/-
(वफा ज. खान) (अपर्णा वा. पळसुले) (कमलाकांत ध.कुबल)
सदस्य, अध्यक्ष, सदस्य
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
प्रत तक्रारदार यांना हातपोहोच/रजि पोस्टाने रवाना दि.
प्रत विरुद्ध पक्ष यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने रवाना दि.