सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर
उपस्थिती - मा.सौ.सविता भोसले,अध्यक्षा
मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्य.
मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्या.
तक्रार अर्ज क्र. 181/2013
तक्रार दाखल दि.02-12-2013.
तक्रार निकाली दि.13-08-2015.
1. सौ.वैभवी किशोर पाटील
रा. 272/1, पार्थ कॉम्प्लेक्स,
फ्लॅट नं.5, नवीपेठ, पुणे-30
2. कु. मनस्विनी किशोर पाटील,
अ.पा.क. तर्फे अर्जदार क्र. 1 .... तक्रारदार.
विरुध्द
1. भारतमाता महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या.,कराड
साईप्लाझा, 401/2,शनिवार पेठ,
मार्केट यार्ड, कराड तर्फे संस्थापक
श्री. अधिकराव शिवाजी सोमदे,
रा.जुळेवाडी,ता.कराड,जि.सातारा.
2. चेअरमन, मंगलादेव रामचंद्र माने,
रा. कराड कार्वे नाका,
तृप्ती कल्पना प्लाझा,
सुमंगलनगर,कराड,
3. व्हा.चेअरमन, सौ. विमल चंद्रकांत पवार,
मु.पो. मलकापूर, ता.कराड,जि.सातारा.
4. सचिव, सतिश देशमुख,
मु.पो. जुळेवाडी, ता. कराड, जि.सातारा .... जाबदार.
तक्रारदारातर्फे –अँड.पी.आर.इनामदार.
जाबदार क्र. 1 व 4 – एकतर्फा
जाबदार क्र. 2 व 3 तर्फे – अँड.ए.आर.कदम
न्यायनिर्णय
(सदर न्यायनिर्णय मा.सौ.सविता भोसले, अध्यक्षा यानी पारित केला)
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 नुसार दाखल केला आहे. तक्रारअर्जातील थोडक्यात मजकूर पुढीलप्रमाणे-
तक्रारदार हे पुणे येथील रहिवाशी आहेत. त्यांनी जाबदार पतसंस्थेत खालील नमूद केले प्रमाणे दामदुप्पट मुदत ठेव व शुभमंगल ठेव योजनेत रक्कम गुंतविली होती व आहे.
अ.नं | पावती नंबर | रक्कम रु | ठेवीची तारीख | ठेवीची मुदत संपते तारीख | मुदतीनंतर मिळणारी रक्कम |
1. | 458 | 25,000/- | 12/08/2007 | 12/02/2013 | 50,000/- |
2. | 457 | 25,000/- | 12/08/2007 | 12/02/2013 | 50,000/- |
3. | 227 | 1,000/- | 12/12/2003 | 13/12/2018 | 10,000/- |
4. | 228 | 1,000/- | 12/12/2003 | 13/12/2018 | 10,000/- |
वरील नमूद केलेप्रमाणे तक्रारदाराने जाबदार पतसंस्थेच्या ठेवीच्या स्वरुपात रक्कम गुंतविली होती व आहे. प्रस्तुत ठेवपावत्यांची रक्कम तक्रारदाराने परत मागणेसाठी जाबदारांची वारंवार भेट घेतली असता व ठेवीच्या रकमेची मागणी जाबदार यांचेकडे केली असता जाबदार यांनी टाळाटाळ केली व रक्कम अदा केली नाही. त्यामुळे जाबदाराने तक्रारदाराला सदोष सेवा दिलेने तक्रारदाराची रक्कम जाबदारांकडून व्याजासह वसूल होवून मिळणेसाठी तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज मे. मंचात दाखल केला आहे.
2. तक्रारदाराने प्रस्तुतकामी जाबदाराकडून वर नमूद कोष्टकातील ठेवीची सर्व रक्कम ठेवपावतीवरील नमूद व्याजासह परत मिळावी, जाबदाराकडून अर्जाचा खर्च मिळावा अशी मागणी केली आहे.
3. तक्रारदाराने प्रस्तुत कामी नि.2 कडे शपथपत्र, नि. 3 चे कागदयादीसोबत नि.3/1 व 3/2 कडे ठेवपावत्यांच्या वकीलांनी व्हेरीफाय केलेल्या ठेवपावत्यांच्या प्रती, नि. 5 व 6 कडे जाबदाराना पाठवलेली नोटीसचा ‘रिफ्यूज्ड’ शे-याने परत आलेला लखोटा व जाबदाराना नोटीस पोहोचल्याच्या पोहोचपावत्या नि. 13 कडे पुराव्याचे शपथपत्र, नि. 14 कडे तक्रारदाराचा लेखी युक्तीवाद, नि. 17 चे कागदयादीसोबत जाबदार संस्थेच्या पासबुकावरील नमूद संचालक मंडळाची यादी दाखवणेसाठी झेरॉक्स, वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत.
4. जाबदार क्र. 1 व 4 यांना नोटीस लागू होऊनही सदर जाबदार मे. मंचात हजर राहीले नाहीत व म्हणणेही दाखल केलेले नाही. सबब सदर जाबदार क्र. 1 व 4 विरुध्द नि. 1 वर एकतर्फा आदेश पारीत झाला आहे. जाबदार क्र. 2 व 3 यांनी नि. 10 कडे म्हणणे दाखल केले आहे तर नि. 11,12 कडे म्हणण्याचे अँफीडेव्हीट तर नि. 15 कडे जाबदार क्र. 3 चे पुरावा शपथपत्र वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत. जाबदाराने त्यांचे म्हणण्यामध्ये तक्रारदाराचे तक्रार अर्जातील सर्व कथन फेटाळलेले आहे. त्यांनी पुढीलप्रमाणे आक्षेप नोंदवलेले आहेत.
तक्रारदाराचा अर्ज व त्यातील मजकूर मान्य व कबूल नाही. सदर जाबदार क्र. 2 व 3 हे जाबदार क्र. 1 पतसंस्थेवर कधीही संचालक नव्हते व नाहीत. त्यामुळे सदर जाबदारांचा या ठेवीशी व पतसंस्थेशी काडीमात्र संबंध नाही. प्रस्तुत जाबदारांचा पतसंस्थेशी कोणताही संबंध नसलेने तक्रारदार याआधी कधीही जाबदाराकडे ठेवींची रक्कम मागणेसाठी आल्या नव्हत्या. त्यामुळे जाबदाराला सदरचा मजकूर मान्य नाही. उलट जाबदार क्र. 2 व 3 हे जाबदार क्र. 1 पतसंस्थेचे ठेवीदार आहेत. त्यांनी बरीच मोठी रक्कम सदर पतसंस्थेत गुंतविली आहे. मात्र जाबदार क्र. 1 व त्यांचे नातेवाईक असे अन्य संचालकांना जाबदार क्र. 2 व 3 चे नाव सुडबुध्दीने संचालक मंडळाच्या यादीत कोणतीही निवडणूक न घेता अगर कायदेशीर तरतूदीचे पालन न करता घेतले आहे. याऊलट तक्रारदार हया प्रस्तुत जाबदार संस्थेच्या संचालक आहेत/मालक आहेत. त्यामुळे तक्रारदार हया मालक असलेने सदरचा तक्रार अर्ज तक्रारदाराला दाखल करणेचा अधिकार व हक्क नाही. तक्रारदाराने खरी वस्तुस्थिती लपवून ठेवली आहे. त्यामुळे तक्रार अर्ज फेटाळण्यात यावा व तक्रारदार यांचेकडून जाबदार क्र. 2 व 3 यांना रक्कम रु.50,000/- दंड वसूल होवून मिळावा असे म्हणणे जाबदाराने दाखल केले आहे.
5. वर नमूद केलेप्रमाणे तक्रारदार व जाबदार यांनी दाखल केले सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे मंचाने प्रस्तुत तक्रारअर्जाचे निराकरणार्थ खालील मुदद्यांचा विचार केला.
अ.क्र. मुद्दा उत्तर
1. तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक आहेत काय? होय.
2. जाबदार यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा दिली आहे काय? होय.
3. अंतिम आदेश काय? खाली नमूद
आदेशाप्रमाणे.
विवेचन-
6. प्रस्तुत कामी मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत. कारण- तक्रारदाराने जाबदार संस्थेत खालील कोष्टकात नमूद रक्कम मुदत ठेव योजनेत गुंतविली होती व आहे.
अ.नं | पावती नंबर | रक्कम रु | ठेवीची तारीख | ठेवीची मुदत संपते तारीख | मुदतीनंतर मिळणारी रक्कम |
1. | 458 | 25,000/- | 12/08/2007 | 12/02/2013 | 50,000/- |
2. | 457 | 25,000/- | 12/08/2007 | 12/02/2013 | 50,000/- |
3. | 227 | 1,000/- | 12/12/2003 | 13/12/2018 | 10,000/- |
4. | 228 | 1,000/- | 12/12/2003 | 13/12/2018 | 10,000/- |
प्रस्तुत ठेवीच्या रकमेची या ठेवपावतीवरील नमूद व्याजासह तक्रारदाराने जाबदार यांचेकडे मागणी केली असता जाबदार यांनी रक्कम देणेस टाळाटाळ केली व ठेवीची रक्कम व्याजासह तक्रारदाराला अदा केली नाही. प्रस्तुत ठेव जाबदार संस्थेत ठेवलेबाबत ठेवपावत्यांच्या सत्यप्रती तक्रारदाराने याकामी नि. 3 चे कागदयादीसोबत नि.3/1 व 3/2 कडे दाखल आहेत. म्हणजेच तक्रारदार हे जाबदाराचे ग्राहक आहेत हे सिध्द होते. तसेच प्रस्तुत ठेवींच्या रकमेची तक्रारदाराने जाबदारांकडे मागणी केली असता, जाबदार यांनी तक्रारदाराला कोणतीही रक्कम अदा केली नाही व आज देतो, उद्या देतो म्हणून रक्कम देणेस टाळाटाळ केली आहे ही बाब स्पष्ट होते. कारण याकामी जाबदार क्र. 1 व 4 यांना नोटीस लागू होवूनसुध्दा मे मंचात हजर राहीले नाहीत तसेच त्यांनी म्हणणे दाखल केले नाही व तक्रार अर्जातील कोणतेही कथन सदर जाबदार यांनी नाकारलेले नाही. तर प्रस्तुत कामी जाबदार क्र. 2 व 3 यांनी हजर होवून त्यांचे म्हणणे नि. 10 कडे तर नि.11 कडे म्हणण्याचे अँफीडेव्हीट दाखल केले आहे. प्रस्तुत जाबदार यांनी संस्थेचे संचालक व सभासद कधीच नव्हते व नाही तसेच तक्रारदाराने सूडबुध्दीने विनाकारणच प्रस्तुत जाबदार यांचे नाव संचालक मंडळाच्या यादील दाखल केलेचे म्हटले आहे. याकामी तक्रारदाराने जाबदार क्र. 1 संस्थेच्या संचालक मंडळाची वैध यादी मे मंचात दाखल केलेली नाही. त्यांनी जी यादी (नि.17/1) कडे दाखल केली आहे ती प्रस्तुत जाबदार संस्थेच्या पासबुकची झेरॉक्स आहे. सदर यादी वैध नाही. त्यामुळे ती पुराव्यात वाचता येणार नाही. सबब जाबदार क्र. 2 व 3 हे या जाबदार क्र. 1 पतसंस्थेचे संचालक होते हे तक्रारदाराने पुराव्यानिशी सिध्द केलेले नाही. त्यामुळे जाबदार क्र. 2 व 3 यांनी तक्रारदारास सदोष सेवा पुरविली असे म्हणणे न्यायोचीत होणार नाही. मात्र जाबदार क्र. 1 व 4 हे याकामी हजर राहीले नाहीत. त्यामुळे त्यांचेविरुध्द नि. 1 वर एकतर्फा आदेश पारीत झालेने तसेच प्रस्तुत जाबदार क्र. 1 व 4 ने तक्रार अर्जातील कोणतेही कथन खोडून काढलेले नाही. सबब जाबदार क्र. 1 व 4 यानी तक्रारदाराला सदोष सेवा दिली आहे असे म्हणणे न्यायोचीत होणार आहे. सबब मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
7. वरील सर्व पुराव्यांचा, कागदपत्रांचा विचार करता याकामी तक्रारदाराने जाबदार क्र 1 पतसंस्थेत गुंतवलेली ठेवींची अनुक्रमे ठेवपावती क्र. 458 व 457 वरील दामदुप्पट रक्कम व अनुक्रमे ठेवपावती क्र. 227 व 228 वरील ठेवींच्या रकमा सदर पावत्यांच्या मुदत संपली नसलेने जाबदार संस्थेच्या नियमाप्रमाणे व्याजासह होणारी रक्कम जाबदार क्र. 1 व 4 यांनी तक्रारदार यांना Co-Operative Corporate veil नुसार अदा करणे न्यायोचीत होणार असे या मंचाचे स्पष्ट मत आहे. याकामी आम्ही रिटपिटीशन नं.117/2011 मंदाताई संभाजी पवार वि. स्टेट ऑफ महाराष्ट्र या मा. उच्च न्यायालयाच्या न्यायनिवाडयाचा आधार घेतला आहे.
8. सबब याकामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1. तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2. जाबदार क्र. 1 व 4 यांनी तक्रारदार यांना वर नमूद ठेवपावती क्र. 458 व
457 वरील ठेवींची दामदुप्पट रक्कम तक्रारदार यांना अदा करणेसाठी तसेच
ठेवपावती क्र. 227 व 228 वरील ठेवींची रक्कम जाबदार संस्थेच्या
नियमाप्रमाणे होणा-या व्याजासह तक्रारदारास अदा करणेसाठी वैयक्तिक व
संयुक्तिकरित्या जबाबदार धरण्यात येते. जाबदार क्र. 2 व 3 यांना प्रस्तुत
जबाबदारीतून वगळणेत येते.
3. जाबदार क्र. 1 व 4 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना
अनुक्रमे ठेव पावती क्र.458 व 457 वरील ठेवीची दामदुप्पट रक्कम
तसेच अनुक्रमे ठेवपावती क्र. 227 व 228 वरील ठेवीची रक्कम जाबदार
संस्थेच्या नियमाप्रमाणे होणा-या व्याजासह अदा करावी. प्रस्तुत सर्व रकमेवर
अर्ज दाखल तारखपासून रक्कम हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के व्याजदराने
होणारी व्याजाची रक्कम जाबदार क्र. 1 व 4 ने वैयक्तिक व संयुक्तीकपणे
तक्रारदारास अदा करावी.
4. अर्जाचा खर्च म्हणून जाबदाराने रक्कम रु.3,000/- (रुपये तीन हजार फक्त)
अदा करावेत.
5. वरील सर्व आदेशाचे पालन आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांचे आत करावे.
6. विहीत मुदतीत आदेशाचे पालन न केल्यास तक्रारदार यांना ग्राहक संरक्षण
कायदा कलम 25 व 27 नुसार जाबदारांविरुध्द कारवाई करणेची मुभा राहील.
7. सदर न्यायनिर्णयाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य पाठवणेत याव्यात.
8. सदर न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
ठिकाण- सातारा.
दि. 13-08-2015.
(सौ.सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ.सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.