::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, कल्पना जांगडे (कुटे) मा. सदस्या)
(पारीत दिनांक :- 30/06/2017)
तक्रारकर्त्याने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायदयाचे कलम १२ अन्वये दाखल केली आहे.
तक्रारकर्त्याच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालील प्रमाणे.
1. तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीत असे कथन केले आहे कि, तक्रारकर्त्याने गैरअर्जदार यांचेकडून दिनांक 22/10/2014 रोजी आपल्या घरगूती वापराकरीता रू.20,000/- मध्ये सोफा तकिया खरेदी केला. सदर्हू सोफा घरी आणल्यानंतर दुस-याच दिवशी तकिया सोफ्याच्या शिलाईजवळ चिकट डाग आढळले. त्या भागातून केव्हाही कापड फाटू शकते असे अर्जदारांस वाटले. त्यामुळे अर्जदाराने स्वतः गैरअर्जदाराकडे जावून त्याबाबत तक्रार केली. गैरअर्जदाराने रविवारी कारागिराला पाठवितो असे सांगितले.15 दिवस लोटून गेल्यानंतरसुध्दा गैरअर्जदाराने कारागिराला पाठविले नाही. म्हणून अर्जदाराने गैरअर्जदाराकडे परत 2 ते 3 वेळा तोंडी तक्रार केली तसेच गैरअर्जदाराचे तक्रारबूकात नोंददेखील केली परंतु गैरअर्जदाराकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही.सबब अर्जदाराने अनुक्रमे दिनांक 15 जून,2015 रोजी व दिनांक 29 जून,2015 रोजी गैरअर्जदाराला पत्र पाठविले. सदर पत्राचे गैरअर्जदाराने खोटे उत्तर दिले. तेंव्हा गैरअर्जदाराने एक कारागिर पाठविला. तोपर्यंत सोफ्याच्या चिकट डागापासून पूर्ण शिलाई फाटून गेली होती. गैरअर्जदाराच्या कारागिराने शिलाई मारून दिली व रविवारी येतो असे सांगितले. त्याने सदर सोफ्याच्या तुटलेल्या बटनादेखील लावून दिल्या नाहीत व 4-5 महिन्यात सोफ्याची दुर्दशा झाली. गैरअर्जदाराने अर्जदाराला निःकृष्ट दर्जाचा सोफा दिल्याने अर्जदाराचे फार मोठे नुकसान झाले व अर्जदाराला सदर सोफ्याचा पुरेपूर उपयोग करता आला नाही. अर्जदार यांनी गैरअर्जदाराकडे सदर तकिया सोफ्याबाबत तक्रार केल्यावरही गैरअर्जदार यांनी अर्जदाराला वेळोवेळी टाळाटाळीची आश्वासने दिली व अर्जदाराच्या कोणत्याही तक्रारीची अथवा पत्राची दखल घेतली नाही व पुर्तताही केली नाही. सबब अर्जदाराने गैरअर्जदाराविरूध्द मंचासमक्ष तक्रार दाखल करून तक्रारीत अशी मागणी केली आहे कि, अर्जदाराने गैरअर्जदाराला वादग्रस्त सोफ्याची दिलेली किंमत रू.20,000/- दिनांक 22/10/2014 पासून 12 टक्के व्याजासह परत देण्याचे आदेश तसेच अर्जदाराला शारिरीक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई रू.50,000/- व तक्रारीचा खर्च रू.10,000/- गैरअर्जदाराकडून मिळण्याचा आदेश व्हावे.
2. अर्जदाराची तक्रार स्विकृत करुन गैरअर्जदाराविरुध्द नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार हजर होवून त्यांनी नि. क्रं. 9 वर आपले लेखीउत्तर दाखल केले. गैरअर्जदाराने आपल्या लेखी उत्तरात असे कथन केले आहे कि, अर्जदाराचे म्हणण्यानुसार दिनांक 22/10/2014 रोजी खरेदी केलेल्या सोफ्याकरीता तब्बलआठ महिने सोफा वापरल्यानंतर खोटी तक्रार अर्जदार करीत आहे. अर्जदाराचे तक्रारीमध्ये सोफ्यामध्ये कोणता निर्मीतीतील दोष अथवा इतर कोणताही दोष आहे असे स्पष्ट करणारा कोणताही तज्ञाचा अहवाल नाही. त्यामुळे अर्जदाराची तक्रार प्राथमीकदृष्टयाच खारीज होण्यांस पात्र आहे. पुढे नमूद केले की यात वाद नाही की अर्जदाराने दिनांक15/6/2015 रोजी गैरअर्जदाराला पत्र पाठविले व हे पत्र म्हणजे अर्जदाराने गैरअर्जदाराकडे नोंदविलेली तक्रार आहे. तक्रार प्राप्त होताच गैरअर्जदाराने कारागिर श्री.प्रदिप सिडाम यांना अर्जदाराकडे पाठविले. त्यावेळी अर्जदाराची पत्नी उपस्थीत होती. तिने सांगितले की तिस-या मजल्यावर सोफा चढवतांना मजूरांच्या हाताने तो भिंतीवर घासला गेल्याने त्याची शिलाई उधळली. श्री.सिडाम यांनी शिलाई मारून सोफा जैसे थे करून दिला. अर्जदाराने पाठविलेल्या पत्राला गैरअर्जदाराने उत्तरदेखील दिले. वास्तविकतः अर्जदार हा स्वच्छ हाताने विद्यमान न्यायालयासमोर आलेला नाही. अर्जदार हे पहिले गैरअर्जदार यांचेकडून सोफा खरेदी करून घेवून गेले. परंतु घरी नेल्यावर सोफा न आवडल्यामुळे अर्जदाराने तो सोफा 2 दिवस वापरून गैरअर्जदाराचे दुकानात परत आणला व त्याऐवजी दिनांक 22/10/2014 रोजी दुसरा सोफा गैरअर्जदाराचे दुकानातून नेला. त्यावेळी अर्जदाराने बदलून घेतलेला सोफा सर्व बाजूने तपासणी करून समाधान झाल्यानंतर व त्यात कोणतीही उणीव नसल्याची खातरजमा करूनच आपले घरी नेला. वास्तविक अर्जदाराने तब्बल 8 महिने सोफा वापरला व नंतर खोटी व बनावट तक्रार करण्यांस सुरूवात केली. वास्तविकतः सदर सोफ्याची कोणतीही वॉरंटी वा गॅरटी नव्हती व अशा सोफ्याची कोणतीही वॉरंटी वा गॅरटी नसते. सदर सोफासेटला कोणतेही बटन नव्हते व नाही. त्यामुळे बटन तुटण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सदर सोफ्यात कोणताही निर्मिती दोष नाही व तसा तो असल्याबाबत अर्जदाराचे म्हणणेसुध्दा नाही. व सोफासेटमध्ये काय बिघाड झाला हे अर्जदाराने नमूद कलेले नाही. नियमीत वापरामुळे सोफ्यात झालेला बदल हा सोफ्यातील दोष म्हणता येत नाही. सबब अर्जदाराची तक्रार खर्चासह खारीज करण्यांत यावी.
3. अर्जदाराचा अर्ज, दस्तावेज, शपथपञ, लेखी युक्तिवाद तसेच गैरअर्जदाराचे लेखीउत्तर, दस्तावेज, शपथपञ, गैरअर्जदार यांनी लेखी उत्तरातील मुद्दयांनाच गैरअर्जदाराचा लेखी युक्तीवाद समजण्यात यावा अशी नि.क्र.16 वर पुरसीस दाखल केली तसेच अर्जदार व गैरअर्जदार यांचा तोंडी युक्तीवाद आणि परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्याबाबतची कारण मिमांसा आणि निष्कर्ष पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
(1) अर्जदार गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय
(2) गैरअर्जदाराने अर्जदारास न्युनतापूर्ण सेवा दिली आहे होय
काय ?
(3) अर्जदार मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पाञ आहे काय ? अंतीम आदेशाप्रमाणे
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 बाबत ः-
4. तक्रारकर्त्याने गैरअर्जदार यांचेकडून दिनांक 22/10/2014 रोजी आपल्या घरगूती वापराकरीता रू.20,000/- मध्ये सोफा तकिया खरेदी केला. यासंदर्भात तक्रारकर्त्याने नि.क्र.4 वर दस्त क्र.1 पावती दाखल केलेली आहे. तसेच ही बाब गैरअर्जदार यांनी मान्य केलेली आहे. त्यामुळे तक्रारकर्ता हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे हे सिध्द होत आहे. सबब मुद्दा क्रं. 1 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 2 बाबत ः-
5. तक्रारकर्त्याने गैरअर्जदार यांचेकडून दिनांक 22/10/2014 रोजी आपल्या घरगूती वापराकरीता रू.20,000/- मध्ये सोफा तकिया खरेदी केला. सदर्हू सोफा घरी आणल्यानंतर दुस-याच दिवशी तकिया सोफ्याच्या शिलाईजवळ चिकट डाग आढळले. त्याबाबत तक्रारकर्त्याने गैरअर्जदाराकडे तोंडी तसेच दिनांक 15/6/2015 रोजी पत्राद्वारे तक्रार नोंदविलेली आहे. त्यानंतर गैरअर्जदाराने दिनांक 17/6/2017 रोजी स्वतःचा कारागीर पाठवून अर्जदाराच्या सोफ्याची शिलाई करून दिली होती याबाबत उभय पक्षात वाद नाही, परंतु सदर सोफ्याची 4-5 महिन्यानंतर पुन्हा दुरावस्था झाली असे अर्जदाराचे शपथपत्रामध्ये नमूद आहे. सदर सोफा दुरूस्ती करण्यायोग्य नाही असे तक्रारकर्त्याने कुठल्याही पुराव्यानिशी सिध्द केलेले नाही. त्यामुळे सदर सोफा परत करून सोफयाच्या किंमतीची रक्कम व्याजासह परत करण्याची तक्रारकर्त्याची मागणी मान्य करणे न्यायोचीत होणार नाही असे मंचाचे मत आहे. मात्र सोफा घेतल्यानंतर त्याची शिलाई निघून गेल्यामुळे तक्रारकर्त्याला गैरअर्जदाराकडे तोंडी तक्रार केल्यानंतरही गैरअर्जदाराने त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे तक्रारकर्त्याला लिखीत तक्रार करावी लागली व त्यानंतरच गैरअर्जदाराने कारागीर पाठवून उशिरा सदर सोफा दुरूस्त करून दिला. गैरअर्जदाराचा कारागीर येईपर्यंत सदर सोफ्याच्या चिकट डागापासून पूर्ण शिलाई निघाल्यामुळे तक्रारकर्त्यांस मनस्ताप सहन करावा लागला. तक्रारकर्त्याने गैरअर्जदाराकडे सोफ्याबाबत तक्रार नोंदविल्यानंतर लगेच त्याचे निराकरण न करून गैरअर्जदाराने अर्जदाराप्रती सेवेत न्युनता दर्शविली आहे व त्यामूळे तक्रारकर्त्यांस शारिरीक व मानसीक त्रास झालेला असल्याने तक्रारकर्ता त्याबद्दल गैरअर्जदाराकडून नुकसान भरपाई मिळण्यांस पात्र आहे असे मंचाचे मत आहे. सबब मुद्दा क्रं. 2 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
6. मुद्दा क्रं. 1 व 2 च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
(1) तक्रारकर्त्याची तक्रार क्र.164/15 अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
(2) विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याला झालेल्या शारीरिक व मानसिक ञासापोटी
नुकसान भरपाई तसेच तक्रारीचा खर्च यापोटी एकूण रू.10,000/-
आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत दयावे.
(3) उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य पाठविण्यात यावी.
चंद्रपूर
दिनांक – 30/6/2017
( अधि.कल्पना जांगडे (कुटे) ) ( अधि. किर्ती गाडगीळ (वैदय) ) ( श्री उमेश व्ही.जावळीकर)
मा.सदस्या. मा.सदस्या. मा. अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, चंद्रपूर.