जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – ८८/२०१०
तक्रार दाखल दिनांक – ०४/०३/२०१०
तक्रार निकाली दिनांक – १८/११/२०१३
श्री. रावसाहेब कडू पाटील
उ.व. ५१ वर्षे, धंदा – शेती,
रा.मु.पो. पाष्टे, ता.शिंदखेडा, जि. धुळे. ------------- तक्रारदार
विरुध्द
भारत ऑटो कार्पोरेशन टि.व्ही.एस.
(टि.व्ही.ए. मोटार कं.लि. अधिकृत डिलर)
प्रकाश थिएटर समारे, पारोळारोड, धुळे, ता.जि.धुळे. ------------ सामनेवाला
न्यायासन
(मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
(मा.सदस्या – सौ.एस.एस.जैन)
(मा.सदस्य – श्री.एस.एस.जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – वकील श्री.यू.जी. पाटील)
(सामनेवाला तर्फे – वकील श्री.आर.एम.अग्रवाल)
निकालपत्र
(दवाराः मा.सदस्या – सौ.एस.एस.जैन)
सामनेवाला यांनी तक्रारदार यास वाहनाची सेल-नोट व इतर कागदपत्र न दिल्याने तक्रारदार याने सदर तक्रार या मंचात दाखल केली आहे.
१. तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की, तक्रारदार याने सामनेवाला यांचे धुळे येथील भारत ऑटो कॉर्पोरेशन येथून दि.२७/११/०९ रोजी टि.व्ही.एस. स्टार मॉडेल के.एस.एम.डब्लू. हे रक्कम रू. १५,५७७ (पावती क्र.००४८९७०) डाऊन पेमेंट देवून आपल्या ताब्यात घेतले व उर्वरित रक्कम रू.२८,८६८/- हे सामनेवाला यांचे संबंधित ‘मास फायनान्स लि.’ या द्वारा सदर वाहनावर फायनान्स घेणेसाठी लागणा-या सर्व कागदपत्रांचा पाठपुरावा केला. परंतु ‘मास फायनान्स लि.’ यांनी तक्रारदार यांना फायनान्स देणेस असमर्थता दर्शविलेने तक्रारदार यांनी दि.१९/०२/२०१० रोजी उर्वरित रक्कम रू.२८,६८६/- (पावती क्र.००५००८१) असे एकूण रू.४४,४४५/- देवून रोखीने वाहन विकत घेतले. मात्र सामनेवाला यांनी वाहन खरेदीच्या दोन्ही बिलांवर ‘मास फायनान्स लि.’ याचा उल्लेख करून फायनान्स कंपनीचे हायपोथिकेशन नमुद केले.
२. तक्रारदारने संपूर्ण रक्कम दिल्यानंतर सामनेवाला यांचेकडे वेळोवेळी वाहनांचे कागदपत्रे मागून देखील सामनेवाला यांनी रक्कम रू.१७०८/- व्याजापोटी मागून अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला आहे. त्याबाबत तक्रारदारने विचारणा केली असता, सामनेवाला यांनी रक्कम देणेस उशीर केला म्हणून तुम्हाला सदर व्याज रक्कम भरावीच लागेल, अन्यथा वाहनाचे कागदपत्रे देणार नाही असे सांगितले. सामनेवाला यांनी सेलनोट व इतर कागदपत्रे दिलेली नसल्याने सदर वाहन घरासमोर उभे करून ठेवावे लागत आहे. वाहनाचे आर.टी.ओ. पासिंग झालेले नाही. त्यामुळे घरगुती अडचणींमुळे सदर वाहन विक्री करता येत नाही असे तक्रारीत नमूद आहे.
३. तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडून वाहनाची सेल नोट व इतर कागदपत्रे देववावी. मनस्तापापोटी रू.७०,०००/- देववावे तसेच तक्रार अर्जाचा खर्च रू.२५,०००/- देववावा, अशी मागणी केली आहे.
४. तक्रारदार यांनी आपले म्हणण्याचे पृष्ठयार्थ नि.५ वर प्रतिज्ञापत्र, नि.७ सोबत नि.७/१ व नि.७/२ वर वाहन खरेदीच्या रक्कमेच्या पावत्या, नि.२९ वर लेखी युक्तीवाद, इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
५. सामनेवाला यांनी आपला लेखी खुलासा नि.२० वर दाखल केलेला आहे. त्यात त्यांनी दाखल तक्रार त्यातील आरोप व मागणी खोटी व लबाडीची आहे. तक्रारदारने ज्या विषयासाठी सदरची तक्रार दाखल केली आहे, त्या विषयासाठी सदरची तक्रार ग्राहक मंचात चालू शकत नाही.
६. सामनेवाला यांचे पुढे असे म्हणणे आहे की, सामनेवाला यांच्या आग्रहावरून ‘मास फायनान्स लि.’ कडून फायनान्स घेण्याचे तक्रारदारचे कथन खोटे आहे. उलट तक्रारदारने रक्कम रू.१५,५७७/- चे डाऊन पेमेंट देवून त्यास ‘मास फायनान्स लि.’ कडून निश्चितच कर्ज मंजूर करून मिळेल व तसे न झाल्यास व्याजासह उर्वरित रक्कम भरून सदर वाहनाचे कागदपत्र घेवून जातील असे आश्वासन तक्रारदारने देवून सदर वाहन सामनेवाला यांचेकडून घेतले. सबब त्याअनुषंगाने ‘मास फायनान्स लि.’ कंपनीचे बाबतीत नमूद केलेले आहे. तक्रारदारचे कर्ज मंजूर झाले नाही. सबब दि.२७/११/०९ पासून रू.४४,४४५/- वर व्याज रू.१७०८/- दयावे अशी विनंती त्यांनी केली. परंतु तक्रारदार सदर रक्कम देण्यास तयार नव्हते.
७. फायनान्स कंपनीचे एजंट हे प्रत्येक शोरूमला त्यांचा धंदा करण्यासाठी त्यांच्या वैयक्तिक जबाबदारीवर येत असतात व ग्राहकांच्या वैयक्तिक जबाबदारीवर फायनान्स करून देत असतात. सबब त्या विषयासंबंधात कुठलाही करार सरळ सरळ तक्रारदार व सामनेवाला यांच्यात झालेला नाही. तक्रारदारने संपूर्ण रक्कम दिली नाही म्हणून तक्रारदार यास सेल नोट देता येत नाही. परंतु सदर तक्रार दाखल केलेल्या पहिल्याच तारखेला दि.१२/०३/२०१० रोजी तक्रारदारने कोर्टात रू.१७०८/- भरले. त्यानंतर ताबडतोब सामनेवाला यांनी सर्व कागदपत्रे मे.कोर्टात दाखल केले. त्यानंतर तक्रारदारचे वाहन दि.१५/०३/२०१० ला पासींग झाले त्याची सर्व कागदपत्रे मे. कोर्टात इन्शुरन्ससह दाखल केलेली आहे. सामनेवाला याने कोणतीही सदोष सेवा दिलेली नाही व कोणत्याही ग्राहक अनुचित प्रथेचा अवलंब केलेला नाही. सबब सामनेवाला यास सरदरची रक्कम रू.१७०८/- मिळणे न्यायाचे व जरूरीचे आहे. सामनेवाला यांनी कुठलीही सेवेत कमतरता दिलेली नाही. त्यामुळे तक्रारदारची तक्रार खर्चासह रद्द होण्यास पात्र आहे. तसेच सामनेवाला यांना नाहक त्रास व खर्चास टाकले आहे. सबब कॉम्पेनसेटरी कॉस्ट रू.५०००/-मिळावे, असे नमूद केले आहे.
८. सामनेवाला यांनी आपले म्हणण्याच्या पृष्ठयार्थ नि.१५ सोबत नि.१५/१ वर सेल सर्टिफिकेट, नि.१५/२ वर फॉर्म नं.२२, नि.१५/३ वर फॉर्म नं.१९, नि.१५/४ वर टॅक्स इनव्हाई. तसेच लि.१९ सोबत नि.१९/१ वर वाहन रिसीट, नि.१९/२ वर इन्शुरन्स कव्हर नोट, नि.१९/३ वर फॉर्म नं.२०, नि.१९/४ वर निवडणूक ओळखपत्र, नि.१९/५ वर वीज बिल, इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
९. तक्रारदार यांची तक्रार, सामनेवाला यांचा खुलासा व युक्तिवाद ऐकल्यानंतर, तसेच दाखल कागदपत्रे पाहता निष्कर्षासाठी आमच्या समोर खालील मुद्दे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालीलप्रमाणे देत आहोत.
मुद्दे निष्कर्ष
१. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना
दयावयाच्या सेवेत त्रृटी केली आहे काय ? नाही
२. आदेश काय ? खालीलप्रमाणे
विवेचन
१०. मुद्दा क्र.१- तक्रारदार यांची मुख्य तक्रार अशी आहे की, त्यांनी सामनेवाला यांचेकडून टि.व्ही.एस. स्टार मॉडेल के.एस.एम.डब्लू. हे रक्कम रू.१५,५७७/- डाऊन पेमेंट भरून विकत घेतले. त्यानंतर वाहनावर फायनान्स देणेस असमर्थता दर्शविलेने त्यांनी उर्वरित रक्कम रू.२८,८६८/- रोख भरले व सामनेवाला यांचेकडे वाहनांचे कागदपत्रांची मागणी केली असता सामनेवाला यांनी रक्कम रू.१७०८/- व्याजापोटी मागणी केली. सदर रक्कम देण्यास तक्रारदारने नकार दिल्याने सामनेवाला यांनी तक्रारदारास वाहनाची सेल नोट व इतर कागदपत्रे दिलेले नाहीत.
यावर सामनेवाला यांनी आपल्या खुलाश्यात तक्रारदार यांनी रक्कम रू.१५,५७७/- चे डाऊन पेमेंट देवून त्यास ‘मास फायनान्स लि.’ कडून निश्चित कर्ज मंजूर करून मिळेल व तसे न झाल्यास व्याजासह उर्वरित रक्कम भरून वाहनाचे कागदपत्र घेवून जातील असे आश्वासन देवन सदर वाहन घेतले होते. मात्र कर्ज मंजूर न झाल्याने त्यांनी उर्वरित रक्कम दि.२७/११/०९ रोजी भरल्यावर त्यांना आपण व्याज रक्कम रू.१७०८/- दयावे अशी विनंती केली होती. त्यावेळी तक्रारदार सदर रक्कम देण्यास तयार नव्हते. परंतु सदर तक्रार दाखल केलेल्या पहिल्या तारखेला रू.१७०८/- जमा करीत असल्यास सामनेवाला सर्व कागदपत्रे देण्यास तयार असल्याचे म्हणणे मांडल्यावर तक्रारदारने दि.१२/०३/२०१० रोजी मे. कोर्टात रू.१७०८/- भरले आहेत. त्यानंतर तक्रारदारचे वाहन दि.१५/०३/२०१० ला पासींग झाले. ही सर्व कागदपत्रे मे. कोर्टात इन्शुरन्ससह दाखल केलेली आहे. सबब तक्रारदारस कोणतीही सदोष सेवा दिलेली नाही असे नमूद केले आहे.
११. याबाबत आम्ही सामनेवाला यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले आहे. त्यात नि.१५/१ वर सेल सर्टिफिकेट व नि.१९/२ वर इन्शुरन्स कव्हर नोट दाखल आहे. तसेच नि.१९ वर तक्रारदारने मूळ कागदपत्रे मिळाली व नि.२६ वर आर.सी. स्मार्ट कार्ड मिळाले असे स्वतः नमूद केलेले असून त्यावर त्याची सही आहे.
तक्रारदारने मूळ तक्रारीसोबत अंतरीम आदेशासाठी अर्ज दाखल केलेला आहे. सदर अर्जाच्या खुलाश्यात सामनेवाला यांनी तक्रारदार व्याजाची रक्कम रू.१७०८/- भरत असल्यास सेल नोट व सर्व कागदपत्रे देण्यास तयार आहे असे नमूद करताच तक्रारदारने सदर रक्कम मे. मंचात भरलेली आहे. त्यामुळे सामनेवाला यांनी लगेचच सर्व कागदपत्रे मे. दाखल केलेली आहेत. सदर सर्व कागदपत्रे तक्रारदारास मिळाल्याचेही त्याने नमुद केलेले आहे. यावरून केवळ तक्रारदारने वाहन घेतेवेळीची उर्वरित रक्कम उशिराने भरल्याने सामनेवाला यांनी त्याचेकडे व्याजाच्या रकमेची मागणी ही योग्य व रास्त होती असे आम्हांस वाटते. कारण तक्रारदाराने त्याला कर्जाची गरज नसतांना केवळ सामनेवालाचे आग्रहावरून कर्ज घेण्यास तयार झाल्याचे म्हटले आहे. मग वाहन घेते वेळीच तक्रारदाराने संपूर्ण रक्कम का भरली नाही ? किंवा ३ महिन्यांचा कालावधी पर्यंत पैसे भरण्याची कोणतीही हालचाल का केली नाही ही बाब तक्रारदाराने समाधानकारकरित्या पुराव्यासह स्पष्ट केलेली नाही. तसेच व्याजाची रक्कम तक्रारदारने उर्वरित रक्कम भरतेवेळीच दिली नसल्याने सामनेवाला हे तक्रारदारास सेल नोट व कागदपत्रे देवू शकलेले नाहीत, हे स्पष्ट होत आहे. यावरून सामनेवाला हयांनी तक्रारदारास द्यावयाच्या सेवेत कोणत्याही प्रकारची त्रुटी केलेली नाही. या मतास आम्ही आलो आहोत. म्हणून मुद्दा क्र.१ चे उत्तर आम्ही नकारार्थी देत आहोत.
१२. मुद्दा क्र.२- वरील सर्व विवेचनावरून आम्ही खालीलप्रमाणे आदेश देत आहोत.
आ दे श
१. तक्रारदार यांची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे.
२. सामनेवाला यांना तक्रारदार यांनी मे.मंचात भरलेली व्याजाची रक्कम रू.१७०८/- देण्यात येत आहे.
३. दोन्ही पक्षांनी आपआपला खर्च सोसावा.
धुळे.
दि.१८/११/२०१३.
(श्री.एस.एस. जोशी) (सौ.एस.एस. जैन) (सौ.व्ही.व्ही. दाणी)
सदस्य सदस्या अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.