(पारीत व्दारा श्रीमती वृषाली गौरव जागिरदार, मा.सदस्या)
(पारीत दिनांक– 05 मार्च, 2021)
01. तक्रारदार हे मृतक सौ. कमल काशिनाथ टिचकुले यांचे नात्याने मुले व विवाहित मुली असून ते मृतकाचे कायदेशीर वारसदार आहेत. मृतक सौ. कमल काशिनाथ टिचकुले हयांनी विरुध्दपक्ष प्राथमिक शिक्षक पतसंस्था, भंडारा या पतसंस्थे मध्ये गुंतवणूक केलेली रक्कम व्याजासह परत मिळण्यासाठी त्याचे कायदेशीर वारसदार म्हणून तक्रारदारांनी ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 खाली प्रस्तुत तक्रार दाखल केलेली आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
तक्रारदार हे विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदी प्रमाणे ग्राहक होतात. तक्रारदारांची आई सौ. कमल काशिनाथ टिचकुले हयांनी ते हयातीत असताना विरुध्दपक्ष भंडारा जिल्हा खाजगी प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित, भंडारा, नोंदणी क्रं 121 या पतसंस्थे मध्ये मुदतठेव प्रमाणपत्र क्रं 786, दिनांक-28.03.2016 अनुसार एकूण रुपये-2,68,000/- एवढी रक्कम मुदती ठेवी मध्ये गुंतवणूक केली होती. सदर मुदतठेवीचा कालावधी हा एक वर्षाचा होता आणि त्यावर वार्षिक-12.5 टक्के व्याज देय होते. मुदत ठेवीची परिपक्वता तिथी दिनांक-27 मार्च, 2017 असून मुदतीअंती एकूण रक्कम रुपये-3,01,500/- मिळणार होती. सदर मुदतठेवीची परिपक्वता तिथी 27 मार्च, 2017 रोजी होती परंतु दरम्यानचे काळात सौ. कमल काशिनाथ टिचकुले हया आजारी पडल्याने त्यांना रकमेची गरज होती परंतु सौ. कमल काशिनाथ टिचकुले हयांचा दिनांक-23.05.2017 रोजी मृत्यू झाला. त्यांचे मृत्यू नंतर तक्रारकर्ता श्री राजेंद्रकुमार काशिनाथ टिचकुले आणि श्री सुरेंद्रकुमार काशिनाथ टिचकुले हे विरुध्दपक्ष पतसंस्थे मध्ये गेले आणि मुदतीठेवीची रक्कम मिळण्यासाठी अर्ज दाखल केला तसेच नॉमीनेशन फॉर्म आणि अन्य दस्तऐवज दाखल केलेत. विरुध्दपक्ष पतसंस्थे तर्फे पंधरा दिवसांचे आत मुदतठेवीची रक्कम देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, परंतु त्यानंतरही वेळोवेळी फक्त आश्वासने देण्यात आलीत परंतु रक्कम देण्यात आली नाही. दरम्यानचे काळात तक्रारदारांना विरुध्दपक्ष सहकारी पतसंस्थे कडून देय परिपक्व रकमेपैकी आंशिक रक्कम रुपये-1,71,000/- (अक्षरी आंशिक रक्कम रुपये एक लक्ष एकाहत्तर हजार फक्त) देण्यात आली. त्यानंतर परिवक्व रकमे पैकी उर्वरीत रक्कम रुपये-1,30,500/- देण्याची विरुध्दपक्षांना विनंती केली परंतु प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर तक्रारदारांनी दिनांक-09.10.2017 रोजी आणि दिनांक-08.01.2018 रोजी विरुध्दपक्षांकडे उर्वरीत रक्कम देण्याची विनंती केली परंतु विरुध्दपक्षांनी टाळाटाळ केली म्हणून शेवटी तक्रारकर्ता श्री सुरेंद्रकुमार काशिनाथ टिचकुले यांनी दिनांक-23.04.2018 रोजीची विरुध्दपक्षांना कायदेशीर नोटीस पाठवली परंतु नोटीस तामील होऊनही देय रक्कम देण्यात आली नाही वा उत्तर सुध्दा दिले नाही. तक्रारदारांची आई सौ. कमल काशिनाथ टिचकुले हयांनी विरुध्दपक्ष पतसंस्थे मध्ये तक्रारदारांचे भविष्यासाठी गुंतवणूक केली होती परंतु परिपक्व रकमे पैकी उर्वरीत रक्कम न मिळाल्याने तक्रारदारांना शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. तक्रारकर्ता श्री राजेंद्रकुमार काशिनाथ टिचकुले यांनी दिनांक-24.05.2018 रोजी विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था नागपूर यांचेकडे अर्ज करुन मुदतीठेवीची उर्वरीत रक्कम मिळण्या बाबत विनंती केली असता विभागीय सहनिबंधकांनी विरुध्दपक्ष पतसंस्थेला दिनांक-02.06.2018 रोजी लेखी पत्र पाठवून त्वरीत परिपक्व रक्कमेपैकी उर्वरीत रक्कम तक्रारकर्ता यांना अदा करण्याचे निर्देशित केले. त्यावर विरुध्दपक्ष पतसंस्थे तर्फे उत्तर पाठवून काही सभासदां कडून कर्जाची रक्कम वसुल होणे बाकी असल्याने तक्रारदाराची रक्कम देण्यास असमर्थ असल्याचे नमुद केले. शेवटी तक्रारकर्त्याने दिनांक-31.12.2018 रोजी विरुध्दपक्ष पतसंस्थे कडे अर्ज करुन मुदतीठेवीची उर्वरीत रक्कम देण्याची विनंती केली परंतु प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून शेवटी तक्रारदारांनी प्रस्तुत ग्राहक तक्रार विरुध्दपक्ष पतसंस्थे विरुध्द जिल्हा ग्राहक आयोगा समोर दाखल करुन त्याव्दारे खालील प्रकारच्या मागण्या केल्यात-
- विरुध्दपक्षांना आदेशित करण्यात यावे की, त्यांनी तक्रारदारांना मुदतीठेवीची परिपक्व रक्कम रुपये-3,01,500/-पैकी आंशिक रक्कम रुपये-1,71,000/- विरुध्दपक्षां कडून मिळाल्याचे तक्रारदारांचे म्हणणे असल्याने उर्वरीत अदा करावयाची रक्कम रुपये-1,30,500/-(तक्रारदारांनी उर्वरीत रक्कम रुपये-1,64,000/- नमुद केलेली आहे जे चुकीचे दिसून येते) परिपक्वता तिथी-27.03.2017 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो वार्षिक-24 टक्के व्याजासह द्दावी.
- विरुध्दपक्षांनी तक्रारदारांना नुकसान भरपाई म्हणून रुपये-1,00,000/- आणि शारिरीक व मानसिक त्रास आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-50,000/- अशा रकमा देण्याचे आदेशित व्हावे.
- याशिवाय योग्य ती दाद तक्रारदारांचे बाजूने मंजूर करण्यात यावी.
03. विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 सहकारी पतसंस्थे तर्फे एकत्रीत लेखी उत्तर पान क्रं 27 ते 32 वर दाखल केले. त्यांनी लेखी उत्तरा मध्ये मृतक श्रीमती कमल काशिनाथ टिचकुले हयांनी त्यांचे पतसंस्थे मध्ये मुदतीठेवी मध्ये गुंतवणूक केल्याची बाब मान्य केली. श्रीमती कमल काशिनाथ टिचकुले हयांचा दिनांक-23.05.2017 रोजी मृत्यू झाला. सौ.कमल काशिनाथ टिचकुले हयांनी मुदतठेव प्रमाणपत्र क्रं 786, दिनांक-28.03.2016 अनुसार एकूण रुपये-2,68,000/- एवढी रक्कम मुदती ठेवी मध्ये गुंतवणूक केली होती. तसेच मृतक श्रीमती कमल काशिनाथ टिचकुले हयांनी कोणालाच नामनिर्देशित केलेले नव्हते. प्रस्तुत तक्रारदार हे सदर मुदतीठेवी मध्ये नामनिर्देशित नव्हते आणि मूळ ठेवीदार सौ.कमल काशिनाथ टिचकुले हयांनी सुध्दा त्या हयातीत असताना कधीही रक्कम मिळण्यासाठी अर्ज केलेला नाही. तक्रारदार हे मुदतठेव प्रकरणात नॉमीनी नसल्याने सदर तक्रार चालू शकत नसल्याने ती खारीज करण्यात यावी. तक्रारदार हे जर मूळ ठेवीदार मृतक सौ.कमल काशिनाथ टिचकुले यांचे कायदेशीर वारसदार असतील तर त्यांनी त्याप्रमाणे सक्षम अशा दिवाणी न्यायालयातून कायदेशीर वारसानचे प्रमाणपत्र आणावे आणि असे वारसान प्रमाणपत्र आणल्या नंतर विरुध्दपक्ष पतसंस्थेच्या संचालकां समोर तक्रारदारांचा दावा निर्णयार्थ ठेवण्यात येईल.
विरुध्दपक्ष सहकारी पतसंस्थे तर्फे पुढे असे नमुद करण्यात आले की, विरुध्दपक्ष पतसंस्थेला काही सभासदां कडून अदयापही 4.00 कोटी रुपयांची कर्ज वसुली घेणे बाकी आहे त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक भंडारा यांनी विरुध्दपक्ष सहकारी पतसंस्थेच्या व्यवहारावर निर्बंध टाकलेले आहेत. अशा परिस्थिती मध्ये काही सभासदांनी सहकारी न्यायालयात आणि मा.उच्च न्यायालयात सुध्दा दावे टाकलेले आहेत. तक्रारदार हे विरुध्दपक्ष सहकारी पतसंस्थेचे ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदी प्रमाणे ग्राहक होत नाहीत कारण सदरचा व्यवहार हा व्यवसायिक स्वरुपाचा आहे. परिच्छेद निहाय उत्तरे देताना विरुध्दपक्ष पतसंस्थे तर्फे तक्रारीतील बहुतांश मजकूर नाकबुल करुन तक्रार खारीज करण्याची विनंती केली.
04. तक्रारदारां तर्फे दाखल दस्तऐवज व साक्षी पुरावा, समतीपत्राचा लेख तसेच उभय पक्षांतर्फे दाखल लेखी युक्तीवाद इत्यादीचे जिल्हा ग्राहक आयोगा तर्फे अवलोकन करण्यात आले तसेच उभय पक्षांचा मौखीक युक्तीवाद त्यावरुन जिल्हा ग्राहक आयोगा समोर न्यायनिवारणार्थ खालील मुद्दे उपस्थित होतात-
अक्रं | मुद्या | उत्तर |
1 | तक्रारदार हे विरुध्दपक्ष सहकारी पतसंस्थेचे ग्राहक होतात काय? | -होय- |
2 | तक्रारदारांची मृतक आई यांचे मुदतठेवीचे परिपक्व रक्कमपैकी उर्वरीत रक्कम परत न करुन विरुध्दपक्ष सहकारी पतसंस्थे तर्फे दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब सिध्द होते काय | -होय- |
3 | काय आदेश? | अंतिम आदेशा नुसार |
:: निष्कर्ष ::
मुद्दा क्रं 1 बाबत
05. विरुध्दपक्ष सहकारी पतसंस्थे तर्फे लेखी उत्तरात असा आक्षेप घेतलेला आहे की, मूळ ठेवीदार सौ.कमल काशीनाथ टिचकुले हयांचा मृत्यू झालेला आहे तसेच मूळ ठेवीदार सौ.कमल काशिनाथ टिचकुले हयांनी कोणालाही नामनिर्देशित केलेले नव्हते परंतु सौ.कमल यांचा मृत्यू झालेला आहे. अशा परिस्थितीत जर तक्रारदार हे मृतक सौ.कमल काशिनाथ टिचकुले यांचे कायदेशीर वारसदार असतील तर त्यांनी सक्षम अशा दिवाणी न्यायालयातून कायदेशीर वारसानचे प्रमाणपत्र दाखल करावे परंतु तक्रारदारांनी तसे केलेले नाही त्यामुळे तक्रारदार हे विरुध्दपक्ष सहकारी पतसंस्थेचे ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदी प्रमाणे ग्राहक ठरत नाही आणि त्यामुळे प्रस्तुत ग्राहक तक्रार जिल्हा ग्राहक आयोगा समोर चालू शकत नसल्याने ती खारीज करण्यात यावी.
या संदर्भात श्री राजेंद्रकुमार काशिनाथजी टिचकुले यांनी कार्यकारी दंडाधिकारी, भंडारा यांचे समोर दिनांक-12.06.2017 रोजीचे शपथपत्र नोंदविलेले असून त्यामध्ये त्यांचे वडील श्री काशिनाथ सुकलजी टिचकुले यांचा दिनांक-18.02.2017 रोजी मृत्यू झाला असून तसेच आई नामे कमलाबाई काशिनाथजी टिचकुले हिचा दिनांक-23.05.2017 रोजी मृत्यू झालेला असून त्यांचे मृत्यू नंतर सुरेंद्र, राजेंद्र, माया, ललीता, कविता, आरती हे कायदेशीर वारसदार आहेत असे नमुद आहे. श्री राजेंद्रकुमार यांनी शपथपत्राचे पुष्टयर्थ त्यांचे वडील श्री काशिनाथ सुकलजी टिचकुले यांचे महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग नगर परिषद भंडारा यांनी दिलेल्या मृत्यू प्रमाणपत्राची प्रत दाखल केली असून त्यानुसार श्री काशिनाथ यांचा मृत्यू दिनांक-18.02.2017 रोजी झाल्याचे नमुद केलेले आहे. तसेच आई नामे कमल काशिनाथ टिचकुले हयांचा दिनांक-23 मे, 2017 रोजी मृत्यू झाल्याचे प्रमाणपत्र दाखल केलेले आहे. तसेच पान क्रं 23 वर ग्राम पंचायत कार्यालय, पंचायत समिती, मोहाडी जिल्हा भंडारा यांनी दिनांक-08.07.2017 रोजी निर्गमित केलेले वारसान प्रमाणपत्र दाखल केले, ज्यावर सरपंच यांची सही आहे. तक्रारकर्ता श्री सुरेंद्रकुमार काशिनाथजी टिचकुले यांनी ते व अन्य तक्रारदार हे मृतक सौ.कमल काशिनाथ टिचकुले हयांचे कायदेशीर वारसदार असल्या बाबत स्वतःचे शपथपत्र तसेच त्यांचे वडील श्री काशिनाथ आणि आई कमल काशिनाथ टिचकुले हयांचे मृत्यू प्रमाणपत्र असे पुराव्याचे दस्तऐवज दाखल केलेले असल्याने मूळ ठेवीदार सौ.कमल काशिनाथ टिचकुले हयांचे मृत्यू नंतर त्यांचे कायदेशीर वारसदार हे विरुध्दपक्ष पतसंस्थेचे ग्राहक होतात आणि त्यामुळे आम्ही मुद्दा क्रं 1 चे उत्तर होकारार्थी नोंदवित आहोत.
मुद्दा क्रं 2 बाबत
06. विरुध्दपक्ष पतसंस्थे तर्फे लेखी उत्तरा मध्ये अशी भूमीका घेण्यात आली की, मूळ ठेवीदार सौ.कमल काशिनाथ टिचकुले हयांनी मुदतीठेव प्रकरणात कोणालाही नामनिर्देशित केलेले नव्हते आणि आता त्या मृत्यू पावलेल्या आहेत आणि तक्रारदारांनी सक्षम दिवाणी न्यायालयाचे कायदेशीर वारसदाराचे प्रमाणपत्र दाखल केलेले नसल्याने ते विरुध्दपक्ष पतसंस्थेचे ग्राहक होत नसल्याने तक्रार खारीज करण्यात यावी. तसेच विरुध्दपक्ष पतसंस्थेनी काही सभासदांना कर्ज वाटप केल्याने आणि त्यांचे कडून रुपये-4.00 कोटी कर्ज वसुल होणे बाकी असल्याने तसेच विरुदपक्ष सहकारी पतसंस्थेच्या व्यवहारावर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक भंडारा यांनी निर्बंध लावलेले आहेत, त्यामुळे अन्य ठेवीदार यांनी सुध्दा सहकारी न्यायालय तसेच मा.उच्च न्यायालयात दावे दाखल केलेले आहेत. परंतु विरुध्दपक्ष सहकारी पत संस्थेनी घेतलेली भूमीका अयोग्य आहे. श्री राजेंद्रकुमार काशिनाथजी टिचकुले यांनी ते व त्यांचे कुटूंबातील सदस्य हे मृतक सौ.कमल काशिनाथ टिचकुले हयांचे कायदेशीर वारसदार असल्या बाबत शपथपत्र कार्यकारी दंडाधिकारी, भंडारा यांचे समोर नोंदविलेले आहे. तसेच श्री राजेंद्रकुमार काशिनाथ टिचकुले यांनी विरुदपक्ष सहकारी पतसंस्थे मध्ये मूळ ठेवीदार आई सौ.कमल काशिनाथ टिचकुले हयांचे मृत्यू नंतर दिनांक-09.10.2017 रोजी, दिनांक-08.01.2018 रोजी विरुध्दपक्ष पतसंस्थे मध्ये लेखी अर्ज दिलेले आहेत तसेच विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, नागपूर विभाग, नागपूर यांचेकडे दिनांक-24.05.2018 रोजी लेखी अर्ज सादर केलेला आहे. त्याच बरोबर तक्रारकर्ता श्री सुरेंद्रकुमार यांनी दिनांक-23.04.2018 रोजीची कायदेशीर नोटीस विरुध्दपक्षास पाठविलेली आहे. परंतु विरुदपक्ष सहकारी पतसंस्थे तर्फे तक्रारकर्ता श्री राजेंद्रकुमार यांचे लेखी अर्जावर तसेच श्री सुरेंद्रकुमार यांनी दिलेल्या कायदेशीर नोटीसवर कोणतीही कार्यवाही केली नाही ईतकेच नव्हे तर श्री राजेंद्रकुमार यांनी केलेल्या अर्जानां व श्री सुरेंद्रकुमार टिचकुले यांचे कायदेशीर नोटीसला साधे उत्तरही दिले नाही आणि प्रस्तुत तक्रार जिल्हा ग्राहक आयोगा समोर दाखल झाल्या नंतर मागाहून सक्षम दिवाणी न्यायालयाचे कायदेशीर वारसान प्रमाणपत्राची मागणी केलेली आहे, विरुध्दपक्ष सहकारी पतसंस्थे तर्फे केलेली मागणी ही पःश्चात बुध्दीतून केल्याचे दिसून येते. वस्तुतः विरुध्दपक्ष सहकारी पतसंस्थेला तक्रारदारांची मुदतठेवीची रक्कम देण्यास टाळाटाळ करावयाची असल्याचे एकंदरीत प्रकारा वरुन दिसून येते. तक्रारकर्ता श्री राजेंद्रकुमार यांनी वारंवार मागणी करुनही तक्रारदारांना विरुध्दपक्ष सहकारी पतसंस्थे कडून देय परिपक्व रक्कम रुपये-3,01,500/- पैकी आंशिक रक्कम रुपये-1,71,000/- (अक्षरी आंशिक रक्कम रुपये एक लक्ष एकाहत्तर हजार फक्त) देण्यात आल्याचे तक्रारदारांचे म्हणणे असून उर्वरीत रक्कम रुपये-1,30,500/- अदयापही त्यांना मिळालेली नाही. विरुध्दपक्षांनी सुध्दा त्यांचे लेखी उत्तरा मध्ये आणि लेखी युक्तीवादा मध्ये तक्रारदारांना मुदतठेवीच्या परिपक्व रकमे पैकी आंशिक रक्कम रुपये-1,71,000/- दिल्या बाबत कोणताही वाद केलेला नाही त्यामुळे तक्रारदारांना परिपक्व रकमे पैकी आंशिक रक्कम रुपये-1,71,000/- विरुध्दपक्षां कडून मिळाल्याचे तक्रारदारांचे म्हणणे जिल्हा ग्राहक आयोगा तर्फे मान्य करण्यात येते. त्यानंतर तक्रारदारांनी परिवक्व रकमे पैकी उर्वरीत रक्कम रुपये-1,30,500/- देण्याची विरुध्दपक्षांना विनंती केली परंतु प्रतिसाद मिळाला नाही. मुदतठेवीची उर्वरीत रक्कम न मिळाल्यामुळे साहजिकच शारिरीक व मानसिक त्रास त्यांना झालेला आहे. विरुध्दपक्ष पतसंस्थेचे असेही म्हणणे आहे की, अन्य सभासदां कडून कर्ज वसुलीची रक्कम प्रलंबित आहे परंतु त्यासाठी तक्रारदारांना त्यांचे हक्काची रक्कम मिळवून देण्यासाठी ताटकळत ठेवणे योग्य ठरणार नाही. अशाप्रकारे विरुदपक्ष सहकारी पतसंस्थे तर्फे तक्रारदारांना दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब सिध्द होते आणि म्हणून आम्ही मुद्दा क्रं 2 चे उत्तर होकारार्थी नोंदवित आहोत.
मुद्दा क्रं 3 बाबत
07. उपरोक्त नमुद विवेचना वरुन तक्रारदारांची तक्रार विरुध्दपक्षां विरुध्द अंशतः मंजूर होण्यास पात्र असून तक्रारदार यांना त्यांची मृतक आई सौ.कमल काशिनाथ टिचकुले हयांचे मुदतठेवीची परिपक्व दिनांक-27 मार्च, 2017 रोजी देय रक्कम रुपये-3,01,500/- पैकी तक्रारदारांचे म्हणण्या प्रमाणे यापूर्वीच आंशिक रक्कम रुपये-1,71,000/- विरुध्दपक्षां कडून मिळालेली असल्याने उर्वरीत देय रक्कम रुपये-1,30,500/- (अक्षरी रुपये एक लक्ष तीस हजार पाचशे फक्त) आणि सदर रकमेवर दिनांक-28.03.2017 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-7 टक्के दराने व्याजाची रक्कम विरुध्दपक्षा कडून मंजूर करणे योग्य व न्यायोचित होईल. त्याच बरोबर तक्रारदारांना झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-10,000/- आणि प्रस्तुत तक्रारीचा खर्च रुपये-10,000/- अशा रकमा विरुध्दपक्षा कडून मंजूर करणे योग्य व न्यायोचित होईल, असे जिल्हा ग्राहक आयोगाचे मत आहे. या प्रकरणात कार्यकारी दंडाधिकारी, भंडारा यांचे समोर दिनांक-12.06.2017 रोजी नोंदविलेला समतीपत्राचा प्रतिज्ञालेख पान क्रं 60 वर दाखल आहे, त्यानुसार श्री सुरेंद्रकुमार काशिनाथ टिचकुले यांना आईची पेंशन, तसेच भंडारा अर्बन बॅंक मध्ये असलेली शेअर्सची रक्कम, अलाहाबाद बॅंक भंडारा येथील वडीलांचे खात्या मधील रक्कम उचल करण्या करीता अन्य वारसदार सौ.माया अरुण तितीरमारे, सौ.ललीता शालीकजी झंझाड, सौ.कविता कैलासजी पुडके, सौ.आरती उर्फ छाया रामुजी मते यांनी श्री सुरेंद्रकुमार काशिनाथजी टिचकुले यांना अधिकार प्रदान केलेले आहेत परंतु जिल्हा ग्राहक आयोगा समोरील प्रकरणाचा सदर अधिकारपत्रामध्ये काहीही उल्लेख नाही. उपरोक्त नमुद वस्तुस्थिती पाहता आम्ही प्रस्तुत तक्रारी मध्ये खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-
:: अंतिम आदेश ::
- उपरोक्त नमुद तक्रारदार क्रं 1 ते 6 यांची तक्रार विरुध्दपक्ष भंडारा जिल्हा खाजगी प्राथमिक शिक्षक सहकारी संस्था मर्यादित भंडारा (नोंदणी क्रं-121) ही फर्म आणि सदर फर्मचे मार्फतीने विरुध्दपक्ष क्रं-1 तिचे सचिव आणि विरुध्दपक्ष क्रं 2 तिचे अध्यक्ष यांचे विरुध्द वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या खालील प्रमाणे अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्दपक्ष भंडारा जिल्हा खाजगी प्राथमिक शिक्षक सहकारी संस्था मर्यादित भंडारा (नोंदणी क्रं-121) ही फर्म आणि तिचे मार्फतीने विरुध्दपक्ष क्रं-1) तिचे सचिव आणि विरुध्दपक्ष क्रं-2) तिचे अध्यक्ष यांना आदेशित करण्यात येते की, त्यांनी मृतक सौ. कमल काशिनाथ टिचकुले हयांचे मुदती ठेव प्रमाणपत्र क्रं 786 अनुसार दिनांक-27.03.2017 रोजी देय परिपक्व रक्कम रुपये-3,01,500/- पैकी तक्रारदारांचे म्हणण्या प्रमाणे यापूर्वीच आंशिक रक्कम रुपये-1,71,000/- विरुध्दपक्षां कडून मिळालेली असल्याने उर्वरीत देय रक्कम रुपये-1,30,500/- (उर्वरीत देय रक्कम रुपये एक लक्ष तीस हजार पाचशे फक्त) आणि सदर उर्वरीत रकमेवर दिनांक-28.03.2017 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-7 टक्के दराने व्याज यासह मिळून येणारी रक्कम तक्रारदार क्रं 1 ते 6 यांना सदर निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत अदा करावे. विरुध्दपक्षांनी विहित मुदतीत आदेशाचे अनुपालन न केल्यास परिपक्व रक्कमे पैकी उर्वरीत अदा करावयाची रक्कम रुपये-1,30,500/- आणि त्यावर दिनांक-28.03.2017 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9% दराने दंडनीय व्याज यासह येणारी रक्कम तक्रारदारांना देण्यास विरुध्दपक्ष पतसंस्था आणि तिचे पदाधिकारी अनुक्रमे सचिव व अध्यक्ष जबाबदार राहतील.
(03) विरुध्दपक्ष भंडारा जिल्हा खाजगी प्राथमिक शिक्षक सहकारी संस्था मर्यादित भंडारा (नोंदणी क्रं-121) ही फर्म आणि तिचे मार्फतीने विरुध्दपक्ष क्रं-1) तिचे सचिव आणि विरुध्दपक्ष क्रं-2) तिचे अध्यक्ष यांचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारदारांना झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासाबद्दल नुकसान भरपाई रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्त) विरुध्दपक्ष पतसंस्था आणि तिचे पदाधिकारी अनुक्रमे विरुध्दपक्ष क्रं 1 सचिव व क्रं-2 अध्यक्ष यांनी तक्रारदारांना अदा करावेत..
(04) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष भंडारा जिल्हा खाजगी प्राथमिक शिक्षक सहकारी संस्था मर्यादित भंडारा (नोंदणी क्रं-121) ही फर्म आणि तिचे मार्फतीने विरुध्दपक्ष क्रं-1) तिचे सचिव आणि विरुध्दपक्ष क्रं-2) तिचे अध्यक्ष यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या प्रस्तुत निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत करावे.
(05) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
(06) उभय पक्षां तर्फे दाखल अतिरिक्त फाईल्स त्यांना परत करण्यात याव्यात.