Maharashtra

Bhandara

CC/19/23

RAJENDRAKUMAR KASHINATH TICHKULE - Complainant(s)

Versus

BHANDARA DISTRICT PRIVATE PRIMARY TEACHERS CO-OPERATIVE SOCIETY LTD - Opp.Party(s)

ADV.S.B. DAHARE

05 Mar 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION,BHANDARA
Near Akhil Sabhagruha, Ganeshpur Road,Bhandara
PINCODE-441904
 
Complaint Case No. CC/19/23
( Date of Filing : 21 Jan 2019 )
 
1. RAJENDRAKUMAR KASHINATH TICHKULE
KISAN NAGAR BHANDARA
BHANDARA
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. BHANDARA DISTRICT PRIVATE PRIMARY TEACHERS CO-OPERATIVE SOCIETY LTD
TROUGH IT SECRETARY BHANDARA
BHANDARA
MAHARASHTRA
2. BHANDARA DIDTRICT PRIVATE PRIMARY TEACHERS CO-OPERATIVE SOCIETY LTD THROUGH ITS PRESIDENT
BHANDARA
BHANDARA
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. NITIN M. GHARDE PRESIDING MEMBER
 HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR MEMBER
 
PRESENT:
 MR. S. K. TAMBDE, Advocate for the Opp. Party 0
Dated : 05 Mar 2021
Final Order / Judgement

(पारीत व्‍दारा श्रीमती वृषाली गौरव जागिरदार, मा.सदस्‍या)

                                                                 (पारीत दिनांक–  05 मार्च, 2021)

   

01.  तक्रारदार हे मृतक श्री काशिनाथ सुकलजी टिचकुले  यांचे नात्‍याने मुले व विवाहित मुली असून ते मृतकाचे कायदेशीर वारसदार आहेत. मृतक          श्री काशिनाथ टिचकुले यांनी विरुध्‍दपक्ष प्राथमिक शिक्षक पतसंस्‍था, भंडारा या पतसंस्‍थे मध्‍ये गुंतवणूक केलेली रक्‍कम व्‍याजासह परत मिळण्‍यासाठी त्‍याचे कायदेशीर वारसदार म्‍हणून तक्रारदारांनी ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 खाली प्रस्‍तुत तक्रार दाखल केलेली आहे.

02.  तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालील प्रमाणे-      

         तक्रारदार हे विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं 2 प्राथमिक शिक्षक पतसंस्‍थेचे ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदी प्रमाणे ग्राहक होतात. तक्रारदारांचे वडील  श्री काशिनाथ सुकलजी टिचकुले यांनी ते हयातीत असताना विरुध्‍दपक्ष भंडारा जिल्‍हा खाजगी प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्‍था मर्यादित, भंडारा, नोंदणी क्रं 121 या पतसंस्‍थे मध्‍ये मुदतठेव प्रमाणपत्र क्रं 785, दिनांक-28.03.2016 अनुसार एकूण रुपये-10,00,000/- एवढी रक्‍कम मुदती ठेवी मध्‍ये गुंतवणूक केली होती. सदर मुदतठेवीचा कालावधी हा एक वर्षाचा होता आणि त्‍यावर वार्षिक-12.5 टक्‍के व्‍याज देय होते. मुदत ठेवीची परिपक्‍वता तिथी दिनांक-27 मार्च, 2017 असून मुदतीअंती एकूण रक्‍कम रुपये-11,25,000/- मिळणार होती. सदर मुदतठेवीची परिपक्‍वता तिथी 27 मार्च, 2017 रोजी होती परंतु दरम्‍यानचे काळात श्री काशिनाथ सुकलजी टिचकुले यांना हदयरोगाचा त्रास होऊ लागला, त्‍यांचे शस्‍त्रक्रिये करीता रुपये-4,00,000/- रकमेची गरज होती परंतु  श्री काशिनाथ टिचकुले यांचा दिनांक-18.02.2017 रोजी मृत्‍यू झाला.  त्‍यांचे मृत्‍यू नंतर तक्रारकर्ता श्री राजेंद्रकुमार काशिनाथ टिचकुले हे विरुध्‍दपक्ष पतसंस्‍थे मध्‍ये गेले आणि मुदतीठेवीची रक्‍कम मिळण्‍यासाठी अर्ज दाखल केला तसेच नॉमीनेशन फॉर्म आणि अन्‍य दस्‍तऐवज दाखल केलेत. विरुध्‍दपक्ष पतसंस्‍थे तर्फे पंधरा दिवसांचे आत मुदतठेवीची रक्‍कम देण्‍याचे आश्‍वासन देण्‍यात आले होते,  परंतु त्‍यानंतरही वेळोवेळी फक्‍त आश्‍वासने देण्‍यात आलीत परंतु रक्‍कम देण्‍यात आली नाही. तक्रारकर्ता श्री राजेंद्रकुमार काशिनाथ टिचकुले यांनी दिनांक-09.10.2017 रोजी व त्‍यानंतर दिनांक-08.01.2018 रोजी विरुध्‍दपक्ष पतसंस्‍थे मध्‍ये लेखी अर्ज दिलेत व देय रक्‍कम देण्‍याची विनंती केली परंतु प्रतिसाद मिळाला नाही. म्‍हणून शेवटी तक्रारकर्ता  श्री राजेंद्रकुमार काशिनाथ टिचकुले यांनी दिनांक-23.04.2018 रोजीची विरुध्‍दपक्षांना कायदेशीर नोटीस पाठवली परंतु नोटीस तामील होऊनही देय रक्‍कम देण्‍यात आली नाही वा उत्‍तर सुध्‍दा दिले नाही. तक्रारदारांचे वडील  श्री काशिनाथ टिचकुले यांनी सेवानिवृत्‍ती नंतर मिळालेली रक्‍कम विरुध्‍दपक्ष पतसंस्‍थे मध्‍ये गुंतवणूक केली होती परंतु सदर रक्‍कम देयलाभासह न मिळाल्‍याने तक्रारदारांना शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. तक्रारकर्ता श्री राजेंद्रकुमार काशिनाथ टिचकुले  यांनी दिनांक-24.05.2018 रोजी विभागीय सहनिबंधक सहकारी संस्‍था नागपूर यांचेकडे अर्ज करुन मुदतीठेवीची रक्‍कम मिळण्‍या बाबत विनंती केली असता विभागीय सहनिबंधकांनी विरुध्‍दपक्ष पतसंस्‍थेला दिनांक-02.06.2018 रोजी लेखी पत्र पाठवून त्‍वरीत परिपक्‍व रक्‍कम तक्रारकर्ता यांना अदा करण्‍याचे निर्देशित केले. त्‍यावर विरुध्‍दपक्ष पतसंस्‍थे तर्फे उत्‍तर पाठवून काही सभासदां कडून कर्जाची रक्‍कम वसुल होणे बाकी असल्‍याने तक्रारदाराची रक्‍कम देण्‍यास असमर्थ असल्‍याचे नमुद केले. शेवटी तक्रारकर्त्‍याने दिनांक-31.12.2018 रोजी विरुध्‍दपक्ष पतसंस्‍थे कडे अर्ज करुन मुदतीठेवीची रक्‍कम देयलाभासह देण्‍याची विनंती केली परंतु प्रतिसाद मिळाला नाही. म्‍हणून शेवटी तक्रारदारांनी प्रस्‍तुत ग्राहक तक्रार विरुध्‍दपक्ष पतसंस्‍थे विरुध्‍द जिल्‍हा ग्राहक आयोगा समोर दाखल करुन त्‍याव्‍दारे खालील प्रकारच्‍या मागण्‍या केल्‍यात-

  1. विरुध्‍दपक्षांना आदेशित करण्‍यात यावे की, त्‍यांनी तक्रारदारांना मुदतीठेवीची परिपक्‍व रक्‍कम रुपये-11,25,000/- परिपक्‍वता तिथी -27.03.2017 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो वार्षिक-24 टक्‍के व्‍याजासह द्दावी.
  2. विरुध्‍दपक्षांनी तक्रारदारांना नुकसान भरपाई म्‍हणून रुपये-2,00,000/- आणि शारिरीक व मानसिक त्रास आणि तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये-50,000/- अशा रकमा देण्‍याचे आदेशित व्‍हावे.
  3. याशिवाय योग्‍य ती दाद तक्रारदारांचे बाजूने मंजूर करण्‍यात यावी.

 

03. विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं 2 सहकारी पतसंस्‍थे तर्फे एकत्रीत लेखी उत्‍तर पान क्रं 27 ते 32 वर दाखल केले. त्‍यांनी लेखी उत्‍तरा मध्‍ये मृतक श्री काशिनाथ सुकलजी टिचकुले यांनी त्‍यांचे पतसंस्‍थे मध्‍ये मुदतीठेवी मध्‍ये गुंतवणूक केल्‍याची बाब मान्‍य केली तसेच मृतक श्री काशिनाथ यांनी त्‍यांची पत्‍नी सौ.कमल काशिनाथ टिचकुले हयांना नामनिर्देशित केले होते परंतु तक्रारदारांचे तक्रारी प्रमाणे त्‍यांच्‍या पत्‍नीचा सुध्‍दा मृत्‍यू झालेला आहे. मूळ ठेवीदार  श्री काशिनाथ टिचकुले यांचा दिनांक-18.02.2017 रोजी मृत्‍यू झाला होता आणि मुदतीठेवीची परिपक्‍वता तिथी- 27.03.2017 होती. प्रस्‍तुत तक्रारदार हे सदर मुदतीठेवी मध्‍ये नामनिर्देशित नव्‍हते आणि मूळ ठेवीदार श्री काशिनाथ टिचकुले यांची पत्‍नी सौ.कमल यांनी सुध्‍दा त्‍या हयातीत असताना कधीही रक्‍कम मिळण्‍यासाठी अर्ज केलेला नाही. मूळ ठेवीदार श्री काशीनाथ टिचकुले यांच्‍या पत्‍नी श्रीमती कमल टिचकुले यांचा दिनांक-23.05.2017 रोजी मृत्‍यू झाल्‍याचे समजते. तक्रारदार हे मुदतठेव प्रकरणात नॉमीनी नसल्‍याने सदर तक्रार चालू शकत नसल्‍याने ती खारीज करण्‍यात यावी. तक्रारदार हे जर मूळ ठेवीदार मृतक श्री काशिनाथ सुकलजी टिचकुले यांचे कायदेशीर वारसदार असतील तर त्‍यांनी त्‍याप्रमाणे सक्षम अशा दिवाणी न्‍यायालयातून कायदेशीर वारसानचे प्रमाणपत्र आणावे आणि असे वारसान प्रमाणपत्र आणल्‍या नंतर विरुध्‍दपक्ष पतसंस्‍थेच्‍या संचालकां समोर तक्रारदारांचा दावा निर्णयार्थ ठेवण्‍यात येईल.

      विरुध्‍दपक्ष सहकारी पतसंस्‍थे तर्फे पुढे असे नमुद करण्‍यात आले की, विरुध्‍दपक्ष पतसंस्‍थेला काही सभासदां कडून अदयापही 4.00 कोटी रुपयांची कर्ज वसुली घेणे बाकी आहे त्‍यामुळे जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बॅंक भंडारा यांनी विरुध्‍दपक्ष सहकारी पतसंस्‍थेच्‍या व्‍यवहारावर निर्बंध टाकलेले आहेत. अशा परिस्थिती मध्‍ये काही सभासदांनी सहकारी न्‍यायालयात आणि मा.उच्‍च न्‍यायालयात सुध्‍दा दावे टाकलेले आहेत. तक्रारदार हे विरुध्‍दपक्ष सहकारी पतसंस्‍थेचे ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदी प्रमाणे ग्राहक होत नाहीत कारण सदरचा व्‍यवहार हा व्‍यवसायिक स्‍वरुपाचा आहे. परिच्‍छेद निहाय उत्‍तरे देताना विरुध्‍दपक्ष पतसंस्‍थे तर्फे तक्रारीतील बहुतांश मजकूर नाकबुल करुन तक्रार खारीज करण्‍याची विनंती केली.

04.  तक्रारदारां तर्फे दाखल दस्‍तऐवज व  साक्षी पुरावा, समतीपत्राचा लेख तसेच उभय पक्षांतर्फे दाखल लेखी युक्‍तीवाद इत्‍यादीचे जिल्‍हा ग्राहक आयोगा
तर्फे अवलोकन करण्‍यात आले तसेच उभय पक्षांचा मौखीक युक्‍तीवाद त्‍यावरुन जिल्‍हा  ग्राहक आयोगा समोर न्‍यायनिवारणार्थ खालील मुद्दे उपस्थित होतात-

अक्रं

मुद्या

उत्‍तर

1

तक्रारदार हे विरुध्‍दपक्ष सहकारी पतसंस्‍थेचे  ग्राहक होतात काय?

-होय-

 

 

2

तक्रारदारांचे मृतक वडील यांचे मुदतठेवीची रक्‍कम परत न करुन विरुध्‍दपक्ष सहकारी पतसंस्‍थे तर्फे दोषपूर्ण सेवा दिल्‍याची बाब सिध्‍द होते काय

-होय-

3

काय आदेश?

अंतिम आदेशा नुसार

                                                  :: निष्‍कर्ष ::

मुद्दा क्रं 1 बाबत

 

05.  विरुध्‍दपक्ष सहकारी पतसंस्‍थे तर्फे लेखी उत्‍तरात असा आक्षेप घेतलेला आहे की, मूळ ठेवीदार श्री काशीनाथ सुकलजी टिचकुले यांचा मृत्‍यू झालेला आहे तसेच मूळ ठेवीदार श्री काशिनाथ यांनी मुदतठेव प्रमाणत्रात त्‍यांची पत्‍नी नामे सौ.कमल काशिनाथ टिचकुले यांना नामनिर्देशित केले होते परंतु सौ.कमल यांचा सुध्‍दा मृत्‍यू झालेला आहे. अशा परिस्थितीत जर तक्रारदार हे मृतक श्री काशिनाथ आणि मृतक सौ.कमल यांचे कायदेशीर वारसदार असतील तर त्‍यांनी सक्षम अशा दिवाणी न्‍यायालयातून कायदेशीर वारसानचे प्रमाणपत्र दाखल करावे परंतु तक्रारदारांनी तसे केलेले नाही त्‍यामुळे तक्रारदार हे विरुध्‍दपक्ष सहकारी पतसंस्‍थेचे ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदी प्रमाणे ग्राहक ठरत नाही आणि त्‍यामुळे प्रस्‍तुत ग्राहक तक्रार जिल्‍हा ग्राहक आयोगा समोर चालू शकत नसल्‍याने ती खारीज करण्‍यात यावी.

      या संदर्भात श्री राजेंद्रकुमार काशिनाथजी टिचकुले यांनी कार्यकारी दंडाधिकारी, भंडारा यांचे समोर दिनांक-12.06.2017 रोजीचे शपथपत्र नोंदविलेले
असून  त्‍यामध्‍ये त्‍यांचे वडील श्री काशिनाथ सुकलजी टिचकुले यांचा दिनांक-18.02.2017 रोजी मृत्‍यू झाला असून तसेच आई नामे कमलाबाई काशिनाथजी टिचकुले हिचा दिनांक-23.05.2017 रोजी मृत्‍यू झालेला असून त्‍यांचे मृत्‍यू नंतर  सुरेंद्र, राजेंद्र, माया, ललीता, कविता, आरती हे कायदेशीर वारसदार आहेत‍ असे नमुद आहे. श्री राजेंद्रकुमार यांनी शपथपत्राचे पुष्‍टयर्थ त्‍यांचे वडील  श्री काशिनाथ सुकलजी टिचकुले यांचे महाराष्‍ट्र शासन आरोग्‍य विभाग नगर परिषद भंडारा यांनी  दिलेल्‍या मृत्‍यू प्रमाणपत्राची प्रत दाखल केली असून त्‍यानुसार श्री काशिनाथ यांचा मृत्‍यू दिनांक-18.02.2017 रोजी झाल्‍याचे नमुद केलेले आहे. तक्रारकर्ता श्री राजेंद्रकुमार काशिनाथजी टिचकुले यांनी ते व अन्‍य तक्रारदार हे मृतक श्री काशिनाथ यांचे कायदेशीर वारसदार असल्‍या बाबत स्‍वतःचे शपथपत्र तसेच ग्राम पंचायत, रोहणा, पंचायत समिती मोहाडी, जिल्‍हा भंडारा यांनी दिनांक-08.07.2017 रोजी निर्गमित केलेले वारसानचे प्रमाणपत्र दाखल केले, ज्‍यावर सरपंचाची सही आहे तसेच त्‍यांचे वडील श्री काशिनाथ यांचे मृत्‍यू प्रमाणपत्र असे पुराव्‍याचे दस्‍तऐवज दाखल केलेले असल्‍याने मूळ ठेवीदार श्री काशिनाथ यांचे मृत्‍यू नंतर त्‍यांचे कायदेशीर वारसदार हे विरुध्‍दपक्ष पतसंस्‍थेचे ग्राहक होतात आणि त्‍यामुळे आम्‍ही मुद्दा क्रं 1 चे उत्‍तर होकारार्थी नोंदवित आहोत.

मुद्दा क्रं 2 बाबत

06.   विरुध्‍दपक्ष पतसंस्‍थे तर्फे लेखी उत्‍तरा मध्‍ये अशी भूमीका घेण्‍यात आली की, मूळ ठेवीदार श्री काशिनाथ सुकलजी टिचकुले आणि त्‍यांनी मुदतीठेव प्रकरणात नामनिर्देशित म्‍हणून दर्शविलेल्‍या त्‍यांच्‍या पत्‍नी सौ.कमल काशिनाथ टिचकुले हे दोघेही मृत्‍यू पावलेले आहेत आणि तक्रारदारांनी सक्षम दिवाणी न्‍यायालयाचे कायदेशीर वारसदाराचे प्रमाणपत्र दाखल केलेले नसल्‍याने ते विरुध्‍दपक्ष पतसंस्‍थेचे ग्राहक होत नसल्‍याने तक्रार खारीज करण्‍यात यावी. तसेच विरुध्‍दपक्ष पतसंस्‍थेनी काही सभासदांना कर्ज वाटप केल्‍याने आणि त्‍यांचे कडून रुपये-4.00 कोटी कर्ज वसुल होणे बाकी असल्‍याने तसेच विरुदपक्ष सहकारी पतसंस्‍थेच्‍या व्‍यवहारावर जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बॅंक भंडारा यांनी निर्बंध लावलेले आहेत, त्‍यामुळे अन्‍य ठेवीदार यांनी सुध्‍दा सहकारी न्‍यायालय तसेच मा.उच्‍च न्‍यायालयात दावे दाखल केलेले आहेत. परंतु विरुध्‍दपक्ष सहकारी पत संस्‍थेनी घेतलेली भूमीका अयोग्‍य आहे.  श्री राजेंद्रकुमार काशिनाथजी टिचकुले यांनी ते व त्‍यांचे कुटूंबातील सदस्‍य हे मृतक श्री काशिनाथजी टिचकुले यांचे कायदेशीर वारसदार असल्‍या बाबत शपथपत्र कार्यकारी दंडाधिकारी, भंडारा यांचे समोर नोंदविलेले आहे. तसेच श्री राजेंद्रकुमार काशिनाथ टिचकुले यांनी विरुदपक्ष सहकारी पतसंस्‍थे मध्‍ये मूळ ठेवीदार वडील श्री काशिनाथ  व नामनिेर्दशित आई सौ.कमल यांचे मृत्‍यू नंतर दिनांक-09.10.2017 रोजी,  दिनांक-08.01.2018 रोजी विरुध्‍दपक्ष पतसंस्‍थे मध्‍ये लेखी अर्ज दिलेले आहेत तसेच  विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्‍था, नागपूर विभाग, नागपूर यांचेकडे दिनांक-24.05.2018 रोजी लेखी अर्ज सादर केलेला आहे. त्‍याच बरोबर दिनांक-23.04.2018 रोजीची कायदेशीर नोटीस विरुध्‍दपक्षास पाठविलेली आहे. परंतु विरुदपक्ष सहकारी पतसंस्‍थे तर्फे तक्रारकर्ता श्री राजेंद्रकुमार यांचे लेखी अर्जावर तसेच कायदेशीर नोटीसवर कोणतीही कार्यवाही केली नाही ईतकेच नव्‍हे तर श्री राजेंद्रकुमार यांनी केलेल्‍या अर्जानां व कायदेशीर नोटीसला साधे उत्‍तरही दिले नाही आणि प्रस्‍तुत तक्रार जिल्‍हा ग्राहक आयोगा समोर दाखल झाल्‍या नंतर मागाहून सक्षम दिवाणी न्‍यायालयाचे कायदेशीर वारसान प्रमाणपत्राची मागणी केलेली आहे, विरुध्‍दपक्ष सहकारी पतसंस्‍थे तर्फे केलेली मागणी ही पःश्‍चात बुध्‍दीतून केल्‍याचे दिसून येते. वस्‍तुतः विरुध्‍दपक्ष सहकारी पतसंस्‍थेला तक्रारदारांची मुदतठेवीची रक्‍कम देण्‍यास टाळाटाळ करावयाची असल्‍याचे एकंदरीत प्रकारा वरुन दिसून येते. तक्रारकर्ता श्री राजेंद्रकुमार यांनी वारंवार मागणी करुनही मुदतठेवीची रक्‍कम देयलाभांसह न मिळाल्‍यामुळे साहजिकच शारिरीक व मानसिक त्रास त्‍यांना झालेला आहे. विरुध्‍दपक्ष पतसंस्‍थेचे असेही म्‍हणणे आहे की, अन्‍य सभासदां कडून कर्ज वसुलीची रक्‍कम प्रलंबित आहे परंतु त्‍यासाठी तक्रारदारांना त्‍यांचे हक्‍काची रक्‍कम मिळवून देण्‍यासाठी ताटकळत ठेवणे योग्‍य ठरणार नाही. अशाप्रकारे विरुदपक्ष सहकारी पतसंस्‍थे तर्फे तक्रारदारांना दोषपूर्ण सेवा दिल्‍याची बाब सिध्‍द होते आणि म्‍हणून आम्‍ही मुद्दा क्रं 2 चे उत्‍तर होकारार्थी नोंदवित आहोत.

मुद्दा क्रं 3 बाबत

07.   उपरोक्‍त नमुद विवेचना वरुन तक्रारदारांची तक्रार  विरुध्‍दपक्षां विरुध्‍द अंशतः मंजूर होण्‍यास पात्र असून तक्रारदार यांना त्‍यांचे मृतक वडील  श्री काशिनाथ सुकलजी टिचकुले यांचे मुदतठेवीची परिपक्‍वता तिथी 27.03.2017 रोजी देय रक्‍कम रुपये-11,25,000/- (अक्षरी रुपये अकरा लक्ष पंचविस हजार फक्‍त) आणि सदर रकमेवर दिनांक-28.03.2017 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-7 टक्‍के दराने व्‍याजाची रक्‍कम   विरुध्‍दपक्षा कडून मंजूर करणे योग्‍य व न्‍यायोचित होईल. त्‍याच बरोबर तक्रारदारांना झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-10,000/- आणि प्रस्‍तुत तक्रारीचा खर्च रुपये-10,000/- अशा रकमा विरुध्‍दपक्षा कडून मंजूर करणे योग्‍य व न्‍यायोचित होईल, असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मत आहे. या प्रकरणात कार्यकारी दंडाधिकारी, भंडारा यांचे समोर दिनांक-12.06.2017 रोजी नोंदविलेला समतीपत्राचा प्रतिज्ञालेख पान क्रं 60 वर दाखल आहे, त्‍यानुसार श्री सुरेंद्रकुमार काशिनाथ टिचकुले यांना आईची पेंशन, तसेच भंडारा अर्बन बॅंक मध्‍ये असलेली शेअर्सची रक्‍कम, अलाहाबाद बॅंक भंडारा येथील वडीलांचे खात्‍या मधील रक्‍कम उचल करण्‍या करीता अन्‍य वारसदार सौ.माया अरुण तितीरमारे, सौ.‍ललीता शालीकजी झंझाड, सौ.कविता कैलासजी पुडके, सौ.आरती उर्फ छाया रामुजी मते यांनी श्री सुरेंद्रकुमार काशिनाथजी टिचकुले यांना अधिकार प्रदान केलेले आहेत परंतु जिल्‍हा ग्राहक आयोगा समोरील प्रकरणाचा सदर अधिकारपत्रामध्‍ये काहीही उल्‍लेख नाही. उपरोक्‍त नमुद वस्‍तुस्थिती पाहता आम्‍ही प्रस्‍तुत तक्रारी मध्‍ये खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-

                                                     :: अंतिम आदेश ::

 

  1.  उपरोक्‍त नमुद तक्रारदार क्रं 1 ते 6 यांची तक्रार विरुध्‍दपक्ष भंडारा जिल्‍हा खाजगी प्राथमिक शिक्षक सहकारी संस्‍था मर्यादित भंडारा
    (नोंदणी क्रं-121) ही फर्म आणि सदर फर्मचे मार्फतीने विरुध्‍दपक्ष क्रं-1 तिचे  सचिव आणि विरुध्‍दपक्ष क्रं 2 तिचे अध्‍यक्ष यांचे विरुध्‍द वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्‍या खालील प्रमाणे अंशतः मंजूर करण्‍यात येते.
  2. विरुध्‍दपक्ष भंडारा जिल्‍हा खाजगी प्राथमिक शिक्षक सहकारी संस्‍था मर्यादित भंडारा (नोंदणी क्रं-121) ही फर्म आणि तिचे मार्फतीने  विरुध्‍दपक्ष क्रं-1) तिचे सचिव आणि  विरुध्‍दपक्ष क्रं-2) तिचे अध्‍यक्ष यांना आदेशित करण्‍यात येते की, मृतक श्री काशिनाथ सुकलजी टिचकुले यांचे मुदती ठेव प्रमाणपत्र क्रं 785 अनुसार दिनांक-27.03.2017 रोजी देय परिपक्‍व रक्‍कम  रुपये-11,25,000/- (अक्षरी रुपये अकरा लक्ष पंचविस हजार फक्‍त) आणि सदर रकमेवर दिनांक-28.03.2017 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-7 टक्‍के दराने व्‍याज यासह मिळून येणारी रक्‍कम तक्रारदार क्रं 1 ते 6 यांना सदर निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्‍त झाल्‍याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत अदा करावे. विरुध्‍दपक्षांनी विहित मुदतीत आदेशाचे अनुपालन न केल्‍यास सदर परिपक्‍व रक्‍कम  आणि त्‍यावर  दिनांक-28.03.2017 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9% दराने दंडनीय व्‍याज यासह येणारी रक्‍कम तक्रारदारांना देण्‍यास विरुध्‍दपक्ष पतसंस्‍था आणि तिचे पदाधिकारी अनुक्रमे सचिव व अध्‍यक्ष जबाबदार राहतील.

(03)  विरुध्‍दपक्ष भंडारा जिल्‍हा खाजगी प्राथमिक शिक्षक सहकारी संस्‍था मर्यादित भंडारा (नोंदणी क्रं-121) ही फर्म आणि तिचे मार्फतीने  विरुध्‍दपक्ष क्रं-1) तिचे सचिव आणि  विरुध्‍दपक्ष क्रं-2) तिचे अध्‍यक्ष यांचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारदारांना झालेल्‍या  मानसिक व शारिरीक त्रासाबद्दल नुकसान भरपाई रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्‍त) आणि तक्रारीचा खर्च रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्‍त) विरुध्‍दपक्ष पतसंस्‍था आणि तिचे पदाधिकारी अनुक्रमे विरुध्‍दपक्ष क्रं 1  सचिव व  क्रं-2 अध्‍यक्ष  यांनी तक्रारदारांना अदा करावेत.

(04)  सदर आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष भंडारा जिल्‍हा खाजगी प्राथमिक शिक्षक सहकारी संस्‍था मर्यादित भंडारा (नोंदणी क्रं-121) ही फर्म आणि तिचे मार्फतीने  विरुध्‍दपक्ष क्रं-1) तिचे सचिव आणि  विरुध्‍दपक्ष क्रं-2) तिचे अध्‍यक्ष यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्‍या प्रस्‍तुत निकालपत्राची  प्रथम प्रमाणित प्रत प्राप्‍त झाल्‍याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत करावे.

(05) निकालपत्राच्‍या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्‍क उपलब्‍ध करुन देण्‍यात याव्‍यात.

(06)  उभय पक्षां तर्फे दाखल अतिरिक्‍त फाईल्‍स त्‍यांना परत करण्‍यात याव्‍यात.              

 

 

 

 
 
[HON'BLE MR. NITIN M. GHARDE]
PRESIDING MEMBER
 
 
[HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.