Exh.No.12
सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
तक्रार क्र. 67/2015
तक्रार दाखल झाल्याचा दि. 04/01/2016
तक्रार निकाल झाल्याचा दि. 21/03/2016
श्री रघुनाथ साबाजी कासले
वय 76 वर्षे, व्यवसाय – शेती,
रा.माळगाव, ता. मालवण,
जिल्हा - सिंधुदुर्ग. ... तक्रारदार
विरुध्द
1) भाईसाहेब सावंत नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित
सिंधुदुर्ग, वसंत प्लाझा कॉम्प्लेक्स, गांधी चौक,
सावंतवाडी तर्फे अध्यक्ष,
श्री. विकास भालचंद्र सावंत
सावंतवाडी, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
2) भाईसाहेब सावंत नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित
सिंधुदुर्ग करिता सचिव, श्री. संजय कानसे
वसंत प्लाझा कॉम्प्लेक्स, गांधी चौक,
सावंतवाडी, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.
3) भाईसाहेब सावंत नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित
सिंधुदुर्ग.
वसंत प्लाझा कॉम्प्लेक्स,
गांधी चौक, सावंतवाडी,
ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग. ... विरुध्द पक्ष.
गणपूर्तीः- 1) श्री कमलाकांत ध. कुबल, प्रभारी अध्यक्ष
2) श्रीमती वफा ज. खान, सदस्या.
तक्रारदारतर्फे – व्यक्तीशः
विरुद्ध पक्षातर्फे – श्री संजय कानसे.
निकालपत्र
(दि.21/03/2016)
द्वारा : मा.सदस्या, श्रीमती वफा जमशीद खान.
1) तक्रारीची थोडक्यात हकीकत अशी की, तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष पतसंस्था म्हणजेच भाईसाहेब सावंत नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्ग, शाखा विरण येथे दि.17/08/2001 रोजी रु.50,000/- रक्कम मुदत ठेव स्वरुपात ठेवली होती. तीच रक्कम मुदत संपलेनंतर म्हणजेच 2/6/2006 रोजी नुतनीकरण करुन दामदुप्पट ठेवीमध्ये ठेवली. त्याचा कालावधी दि.17/3/2013 असा होता व मिळणारी रक्कम ही रु.2,00,000/- एवढी होती. मुदत संपल्यानंतर तक्रारदार यांने वेळोवेळी तोंडी व दि.7/3/2014, 8/5/2014, 15/12/2014 व 19/10/2015 या तारखांना लेखी पत्र पाठवून मुदत ठेवींच्या रक्कमेची मागणी केली, परंतु विरुध्द पक्षाने रक्कम देण्याबाबत कोणतीही कार्यवाही केली नाही. तक्रारदार हे ज्येष्ठ नागरीक असून विरुध्द पक्षाने मुदत ठेव स्वरुपात ठेवलेली रक्कम स्वीकारुन देखील मुदतीत तक्रारदारास परत केली नाही. विरुध्द पक्षाने ग्राहकाला देण्यात येणा-या सेवेत त्रुटी ठेवून अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याने विरुध्द पक्षाकडून दि.18/3/2013 पासून द.सा.द.शे.15% व्याज दराने रक्कम वसूल होऊन मिळावी. तसेच तक्रारदारास झालेल्या त्रासापोटी नुकसान भरपाई रु.50,000/- मिळावी व विरुध्द पक्षावर दंडात्मक कारवाई व्हावी याकरीता तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार यांनी तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ विरुध्द पक्ष यांनी तक्रारदारास दिलेली ठेव पावतीची झेरॉक्स प्रत, विरुध्द पक्ष पतसंस्थेस वेळोवेळी पाठविलेल्या नोटीसांच्या झेरॉक्स प्रती दाखल केल्या आहेत.
2) तक्रार प्रकरणाची नोटीस मिळालेनंतर विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 तर्फे श्री संजय कानसे हजर होऊन त्यांनी लेखी म्हणणे दाखल केले ते नि.10 वर आहे. विरुध्द पक्ष 1 ते 3 यांनी तक्रारदार यांची रक्कम देणेचे मान्य केले आहे. परंतु कर्जवसुलीसाठी बरेच अडथळे आल्याने मुदतीत रक्कम देता आली नसल्याचे मान्य केले आहे. तसेच तक्रारदार यांची रक्कम देणेसाठी विरुध्द पक्ष 1 ते 3 यांना अवधी मिळावा अशी विनंती केली आहे.
3) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांचे लेखी म्हणणे विचारात घेता विरुध्द पक्ष पतसंस्था ही आर्थिक अडचणीत असल्याचे त्यांचे लेखी म्हणण्यावरुन स्पष्ट होत आहे. परंतु असे जरी असले तरी सदर पतसंस्थेने ग्राहकांच्या ज्या ठेवी स्वीकारल्या आहेत त्या मुदत ठेवीची मुदत पुर्ण झाल्यानंतर त्वरीत रक्कम संबंधितांना देणे आवश्यक आहे. तक्रारदार यांचे तक्रारीत नमूद वय 76 आहे. मंचामध्ये ये-जा करणे देखील त्यांचे प्रकृतीप्रमाणे गैरसोयीचे आहे. तक्रारदार यांच्या मुदत ठेवींची मुदत 17/3/2013 ला संपून देखील विरुध्द पक्ष त्यांना फक्त आश्वासने देत आहेत. ही कृती विरुध्द पक्ष यांनी ग्राहकाला देणेत येणारे सेवेतील त्रुटी आहे. त्यामुळे विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना मूळ रक्कम व्याजासहीत देणे व नुकसानी देणे आवश्यक आहे असे मंचाचे मत आहे. सबब मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
आदेश
- तक्रारदार यांची तक्रार मंजूर करण्यात येते.
2) विरुध्द पक्ष 1 ते 3 यांनी तक्रारदार यांचे मूदत ठेव पावती क्र.1755 दि.17/8/2001 प्रमाणे रक्कम रु.2,00,000/-(रुपये दोन लाख मात्र) व त्यावर दि.18/3/2013 पासून रक्कम फिटेपर्यंत 9% सरळव्याजदराने रक्कम तक्रारदार यांना दयावी.
3) विरुध्द पक्ष 1 ते 3 यांनी तक्रारदार यांस देणेत येणारे सेवेत त्रुटी ठेवल्याने झालेल्या मानसिक, शारीरिक, आर्थिक त्रासापोटी नुकसान भरपाई व प्रकरण खर्च मिळून रक्कम रु.10,000/- (रुपये दहा हजार मात्र) तक्रारदार यांस दयावेत.
4) वरील आदेशाची पुर्तता विरुध्द पक्ष 1 ते 3 यांनी आदेशाचे दिनांकापासून 45 दिवसांचे आत न केल्यास तक्रारदार विरुध्द पक्ष यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायदा कलम 25 व 27 अन्वये कारवाई करु शकतील.
5) मा.राज्य आयोग, मुंबई यांचे परिपत्रक्र क्र.राआ/महा/आस्था/-3/जि.मं.कामकाज/परिपत्रक/2014/3752 दि.05 जुलै 2014 नुसार उभय पक्षकारांनी 45 दिवसानंतर म्हणजेच दि.06/05/2016 रोजी आदेशाची पुर्तता झाली किंवा नाही हे कळवणेसाठी या मंचासमोर हजर रहावे असे आदेश देण्यात येतात.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 21/03/2016
Sd/- Sd/-
(वफा ज. खान) (कमलाकांत ध.कुबल)
सदस्या, प्रभारी अध्यक्ष,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
प्रत तक्रारदार यांना हातपोहोच/रजि पोस्टाने रवाना दि.
प्रत विरुद्ध पक्ष यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने रवाना दि.