निकालपत्र
(घोषीत द्वारा- मा. सौ. स्मिता बी.कुलकर्णी, अध्यक्षा )
अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्या विरुध्द सेवेत त्रुटी दिल्याच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे आहे.
1. गैरअर्जदार 1 ते 3 हे गैरअर्जदार 4 च्या नांदेड येथील शाखा असून गैरअर्जदार 4 यांचे मुख्य कार्यालय जळगांव येथे आहे. अर्जदार यांनी गैरअर्जदार 1 व 3 यांच्या क्रेडीट सोसायटीमध्ये ‘संजिवनी ठेव योजनेखाली’ खालील रक्कमेचा एफ.डी. काढलेल्या होत्या.
Sr. | Branch BHR Society at Nanded | Fix Deposit Date | Maturity Date | A/c. no. | Deposited Amount | Maturity Amount |
1 | Vazirabad | 14-11-2013 | 14-11-2014 | 010713000721 | 9,000 | 10,170 |
2 | Vazirabad | 21-11-2013 | 21-11-2014 | 010713000730 | 5,000 | 5,650 |
3 | Sarafa Baazar | 13-12-2013 | 13-12-2014 | 012813000244 | 17,500 | 19,775 |
4 | Sarafa Baazar | 4-1-2014 | 4-1-2015 | 010813000267 | 12,500 | 14,124 |
5 | New Mondha | 7-1-2014 | 7-1-2015 | 010813000363 | 17,694 | 19,994 |
6 | New Mondha | 22-1-2014 | 22-1-2015 | 010813000381 | 13,000 | 14,690 |
7 | Vazirabad | 1-2-2014 | 1-2-2015 | 010713000907 | 11,500 | 12,995 |
| | | | | Total | 97,399 |
उपरोक्त F.D. ची मुदत संपल्यानंतर अर्जदार यांनी गैरअर्जदाराच्या शाखेत जावून चौकशी केली असता सदरील शाखा बंद स्वरुपात होती. शाखाधिकारी यांच्याशी संपर्क केला असता शाखाधिकारी यांनी अर्जदारास कोणतीही मदत केली नाही. अर्जदाराने गैरअर्जदार 4 यांच्याकडे विनंती अर्ज केला होता. गैरअर्जदार 4 यांच्याकडूनही अर्जदारास कोणतीही मदत मिळालेली नाही. अर्जदाराने अनेकवेळा गैरअर्जदार 4 यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. परंतू उपरोक्त F.D.ची रक्कम देण्यास गैरअर्जदार यांनी टाळाटाळ केलेली आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदारास रक्कम न देवून सेवेत त्रुटी व कमतरता करुन ग्राहकाची फसवणूक केलेली आहे. त्यामुळे गैरअर्जदार यांनी अर्जदारास F.D.ची रक्कम रु.97,299/- दिनांक 01-02-2015 पासून 13 % व्याजासह देण्याचा आदेश करावा. तसेच गैरअर्जदार यांनी अर्जदारास दिलेल्या चुकीच्या सेवेबाबत झालेल्या मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 20,000/- व दावा खर्चापोटी रक्कम रु. 10,000/- गैरअर्जदार यांनी अर्जदारास देण्याबाबत आदेश करावा अशी विनंती तक्रारीद्वारे केलेली आहे.
2. गैरअर्जदार 4 यांना मंचाची नोटीस प्राप्त झाली. त्यानंतर अर्जदाराने गैरअर्जदार 4 हे गैरअर्जदार यांचे मुख्य कार्यालय असून गैरअर्जदाराचे नांदेड येथील कार्यालय बंद असल्याने पाठवलेल्या नोटीसा परत येत आहेत. त्यामुळे गैरअर्जदार 1 व 3 यांचे मुख्य कार्यालय जळगाव येथे असल्याने जळगांव येथील नोटीस तामील रिपोर्ट हा नांदेड येथील त्यांच्या कार्यालयाबाबत गृहीत धरण्यात यावा असा अर्ज दिला. गैरअर्जदार यांना नोटीस तामील होवूनही गैरअर्जदार प्रकरणात हजर झालेले नाहीत.
अर्जदार यांनी आपल्या म्हणण्याचे पुष्टयर्थ आपले शपथपत्र व कागदपत्रे दाखल केलेली आहेत. अर्जदार यांचा युक्तीवाद ऐकला. दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता खालील बाबी स्पष्ट होतात.
3. अर्जदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक आहे. अर्जदार यांनी खालील प्रमाणे मुदत ठेव पावत्या गैरअर्जदार यांचेकडे ठेवलेल्या असल्याचे दाखल पावतीवरुन दिसून येते.
अ.क्र | दिनांक | पावती क्रमांक | रक्कम |
1 | 14.11.2013 | 0434396 | 9,000/- |
2 | 21.11.2013 | 0434410 | 5,000/- |
3 | 13.12.2013 | 0382507 | 17,500/- |
4 | 4.1.2014 | 0382541 | 12,500/- |
5 | 7.1.2014 | 0447765 | 17,694/- |
6 | 22.1.2014 | 0447791 | 13,000/- |
6 | 1.2.2014 | 0434688 | 11,500/- |
वरील पावत्यांची एकूण परिपक्व रक्कम रु. 97,399/- आहे. अर्जदाराने दिलेल्या अर्जावरुन व तक्रारीवरुन सदर मुदत ठेव पावत्या परिपक्व झाल्यानंतरही गैरअर्जदार यांनी अर्जदारास रक्कम परत केलेली नाही. वास्तविक पाहता गैरअर्जदार यांनी अर्जदारास सदरील रक्कम त्वरित परत करणे क्रमप्राप्त होते. परंतू गैरअर्जदाराच्या मुदत ठेवीची रक्कम गैरअर्जदार यांनी परत न करुन अर्जदारास सेवेत त्रुटी दिलेली आहे. अर्जदारास सदरील रक्कम गैरअर्जदार यांनी दिलेली नसल्याचे दाखल कागदपत्रावरुन सिध्द होते. अर्जदार यांनी सदरची रक्कम मिळणेसाठी मागणी केली असता, सदर रक्कम त्यांना देण्यात आली नाही. वास्तविक अर्जदार यांनी मागणी केल्यानंतर तात्काळ विरुध्द पक्ष यांच्याकडील जमा असलेली रक्कम त्यांना परत करणे पतसंस्थेचे कर्तव्य होते. अर्जदार यांनी मागणी करुनही संस्थेने रक्कम न देऊन सेवेत त्रुटी केली आहे असे मंचाचे मत आहे. गैरअर्जदार यांना नोटीस प्राप्त होवूनही प्रकरणामध्ये हजर झालेले नाहीत. यावरुन गैरअर्जदार यांना अर्जदाराची तक्रार मान्य असल्याचे दिसते. हयावरुन असे दिसते की, गैरअर्जदार हे अर्जदाराची रक्कम देण्यास टाळाटाळ करीत आहेत व असे करुन अर्जदारास सेवेत त्रुटी व मानसिक त्रास देत आहेत.
वरील विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
1. अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2. गैरअर्जदार यांनी अर्जदारास मुदत ठेवीची रक्कम रु. 97,399/- त्यावर दिनांक
01-02-2015 पासून 13 % व्याजासह आदेश तारखेपासून 30 दिवसांच्या आत
दयावेत.
3. गैरअर्जदार यांनी अर्जदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु. 2,000/- आदेश तारखेपासून 30 दिवसांच्या आत दयावेत.
4. आदेशाची पूर्तता झाल्याबद्दलचा अहवाल दोन्ही पक्षांनी 45 दिवसानंतर मंचात दाखल
करावा.प्रकरण 45 दिवसानंतर पुन्हा आदेशाच्या पूर्ततेच्या अहवालासाठी ठेवले जाईल.
5. निकालाच्या प्रती दोन्ही पक्षकारास मोफत देण्यात याव्यात.