::: आ दे श :::
( पारीत दिनांक : 08.01.2016 )
आदरणीय सदस्या श्रीमती भारती केतकर, यांचे अनुसार
सदर फिर्याद ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, दाखल करण्यात आली. सदर तक्रारीचा सारांश खालील प्रमाणे आहे.
तक्रारकर्ती ही गृहीणी असून त्यांना स्वत: जमा केलेली रक्कम भविष्याच्या दृष्टीने गुंतविण्याची इच्छा होती. म्हणून तक्रारकर्तीने विरुध्दपक्ष यांच्याकडे खालील प्रमाणे विविध कालावधीसाठी एकूण 3 ठेवी ठेवल्या त्याचा तपशिल खालील प्रमाणे
ठेव पावती क्र. | ठेव पावती दिनांक | पुर्णावधी दिनांक | मुळ रक्कम रु. | पुर्णवधी रक्कम रु. |
0733394 | 25.10.2013 | 25.10.2014 | 52000/- | 58760/- |
0733582 | 25.12.2013 | 25.12.2014 | 147000/- | 166110/- |
0785261 | 26.05.2014 | 26.05.2015 | 59000/- | 66670/- |
एकूण रुपये | 291540/- |
सदरहू ठेव पावत्या निर्धारित कालावधीनुसार मुदतपुर्ण झाल्यामुळे तक्रारकर्तीला कौटूंबिक जबाबदाऱ्या पुर्ण करण्यासाठी पैश्यांची आवश्यकता असल्यामुळे विरुध्दपक्षाकडे पुर्णावधीची रक्कम देण्याची मागणी केली, परंतु विरुध्दपक्ष यांनी प्रत्येकवेळी आश्वासन देवून रक्कम परत न केल्यामुळे तक्रारकर्तीला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असून शारीरिक व मानसिक त्रास भोगावा लागत आहे. तक्रारकर्तीने दि. 15/12/2014 रोजी विरुध्दपक्षांना लेखी सुचना देवून ठेव पावत्यांची मुदतपुर्ण रक्कम व्याजासह देण्याची मागणी केली, परंतु विरुध्दपक्षांनी त्याकडे दुर्लक्ष केले. तक्रारकर्तीने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करुन विनंती केली की, तक्रारकर्तीची तक्रार मंजुर करण्यात यावी व विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी सेवेत त्रुटी व अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केल्याचे घोषीत करण्यात येवून वैयक्तीक वा संयुक्तीरित्या तक्रारकर्तीस देय रक्कम रु. 169500/- प्रत्यक्ष देय तारखेपर्यंत ठरलेल्या व्याजानुसार देण्याचा व शारीरिक, मानसिक व आर्थिक नुकसान भरपाई रु.50,000/- व न्यायिक खर्चापोटी रु. 5000/- देण्याचा आदेश पारीत करण्यात यावा.
2. सदर प्रकरणात विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 तर्फे श्री शिरीष रायचंद कुवाड हजर झाले व त्यांनी इंग्रजीतून जबाब दाखल केला, त्यात यांनी केवळ तकारकर्तीच्या तक्रारीतील मुद्दे नाकारले असून तक्रारकर्ती मंचासमोर स्वच्छ हाताने आली नसल्याचे म्हटले आहे. तक्रारकर्तीने विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 विरुध्द दाद मागण्यासाठी लवादाकडे जावयास हवे होते, परंतु तसे न करता तक्रारकर्तीने मंचासमोर तक्रार दाखल केल्याने सदर तक्रार खारीज करण्यात यावी, असे म्हटले आहे. विरुध्दपक्षाने त्यांच्या म्हणण्याच्या पुष्ठ्यर्थ कुठलेही पुरावे दाखल केलेले नाही अथवा तक्रारकर्तीचे म्हणणे खोडून काढणारे पुरावे दाखल केलेले नाही.
3. त्यानंतर तक्रारकर्तीतर्फे प्रतीशपथपत्र दाखल करण्यात आले व तोंडी युक्तीवाद केला.
::: का र णे व नि ष्क र्ष :::
4. तक्रारकर्तीची तक्रार, तक्रारकर्तीने दाखल केलेले दस्तऐवज व विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 चा लेखी जबाब, यांचे आधारे सदर प्रकरण निकाली काढण्यात आले.
5. तक्रारकर्तीने दाखल केलेल्या दस्तांतील ठेव पावतीवरुन तक्रारकर्तीने विरुध्दपक्षाकडे रक्कम गुंतविल्याचे व त्यावर विरुध्दपक्षाने व्याज देण्याचे मान्य केल्याचे दिसून येते. विरुध्दपक्ष हे गुंतवणुकदार व तक्रारकर्ती ही विरुध्दपक्षाची ठेवीदार असल्याचे सिध्द होत असल्याने, तक्रारकर्ती ही विरुध्दपक्षाची “ग्राहक” असल्याचे ग्राह्य धरण्यात येते.
3. तक्रारकर्तीच्या तक्रारीवरुन, तक्रारकर्तीच्या पतीने वेळोवेळी विरुध्दपक्षाकडे पैसे गुंतविले होते, परंतु सदर ठेवी परिपक्व झाल्यावरही व तक्रारकर्तीने मागणी केल्यावरही विरुध्दपक्षांनी तक्रारकर्तीला त्यांची रक्कम परत केली नाही. विरुध्दपक्षाने तक्रारकर्तीच्या कुठल्याच मागणीची पुर्तता न केल्याने तक्रारकर्तीने सदर तक्रार मंचात दाखल केली.
4. तक्रारकर्तीने मंचात गुंतवणुक केलेल्या पावत्यांच्या छायांकित प्रती दाखल केल्या आहेत व तक्रारीत सदर पावत्यातील रक्कम, पुर्णावधी दिनांक व ठेव परिपक्व झाल्यानंतर मिळणारी रक्कम, याचा सविस्तर तक्ता दाखल केला आहे, तो खालील प्रमाणे…
ठेव पावती क्र. | ठेव पावती दिनांक | पुर्णावधी दिनांक | मुळ रक्कम रु. | पुर्णवधी रक्कम रु. |
0733394 | 25.10.2013 | 25.10.2014 | 52000/- | 58760/- |
0733582 | 25.12.2013 | 25.12.2014 | 147000/- | 166110/- |
0785261 | 26.05.2014 | 26.05.2015 | 59000/- | 66670/- |
एकूण रुपये | 291540/- |
या मंचाने निर्देश दिल्यानंतर तक्रारकर्तीने सर्व ठेव पावत्यांच्या मुळ अस्सल पावत्या मंचासमोर हजर केल्या. त्या पावत्यांवरुन मंचाने तक्त्यातील रकमेचे विवरण व छायांकित प्रतींची पडताळणी करुन, तक्रारकर्तीने मागणी केलेली रक्कम योग्य आहे, अशी खात्रीकरुन घेतली. दाखल दस्तांवरुन तक्रारकर्तीने विरुध्दपक्षाकडे रु. 2,58,000/- ( दोन लाख अठ्ठावन हजार ) गुंतविलेले दिसून येतात व सदर ठेवी परिपक्व झाल्या असून, तक्रारकर्ती विरुध्दपक्षाकडून रु. 2,91,540/- ( दोन लाख एक्यान्नव हजार पांचशे चाळीस ) व्याजासह, मिळण्यास पात्र असल्याचे मंचाच्या निदर्शनास आलेले आहे. तसेच सदर ठेव परिपक्व झाल्यावरही विरुध्दपक्षाने तक्रारकर्तीला त्यांची रक्कम व्याजासह परत न दिल्याने सेवा देण्यात त्रुटी केल्याच्या निष्कर्षाप्रत सदर मंच आले आहे. त्यामुळे तक्रारकर्ती ही विरुध्दपक्षाकडून शारीरिक, मानसिक व आर्थिक नुकसान भरपाईपोटी रु. 5000/- व सदर प्रकरणाचा खर्च रु. 3000/- मिळण्यास पात्र असल्याचे निष्कर्षाप्रत सदर मंच आलेले आहे.
सबब अंतिम आदेश पारीत केला तो खालील प्रमाणे……
::: अं ति म आ दे श :::
1) गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी वैयक्तीक व संयुक्तपणे तक्रारकर्तीस रु. 2,91,540/- ( रुपये दोन लाख एक्यान्नव हजार पांचशे चाळीस ) निकाल तारखेपासून, म्हणजे दि. 08/01/2016 पासून ते देय तारखेपर्यंत द.सा.द.शे. 8 टक्के व्याजासह द्यावे.
2) तक्रारकर्तीला सहन कराव्या लागलेल्या शारीरिक, आर्थिक व मानसिक नुकसान भरपाईपोटी रु. 5000/- ( रुपये पांच हजार ) व प्रकरणाच्या खर्चापोटी रु. 3,000/- ( रुपये तिन हजार ) विरुध्दपक्ष क्र. व 1 व 2 यांनी वैयक्तीक व संयुक्तपणे तक्रारकर्तीला द्यावे.
3) सदर आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसात करावी.
सदर आदेशाच्या प्रती उभयपक्षांना नि:शुल्क देण्यात याव्या.