जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
तक्रार क्रमांक 754/2009
तक्रार पंजीबध्द करण्यात आले तारीखः – 23/06/2009
सामनेवाला यांना नोटीस लागलेली तारीखः 04/08/2009.
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः-12/10/2009
श्री.मुरलीधर शंकर पाटील,
उ.व.सज्ञान, धंदाः शेती,
रा.मुदखेडे, पो.पातोंडे, ता.चाळीसगांव,
जि.जळगांव. .......... तक्रारदार
विरुध्द
भगवान बी.चौधरी,
प्रो.व व्यवस्थापक,
भगवती बोअरवेल एजन्सी,
वीटभटटी बसस्थानकासमोर,
देवपुर धुळे (आर.के.प्लायवूड चे वर )
(समन्स श्री.भगवान बी.चौधरी बोअरवेल एजन्सी च्या
नावाने काढावे ) .......... सामनेवाला.
न्यायमंच पदाधिकारीः-
श्री. बी.डी.नेरकर अध्यक्ष.
अड. श्री.चंद्रकांत मोहन येशीराव सदस्य.
अंतिम आदेश
( निकाल दिनांकः 12/10/2009)
(निकाल कथन न्याय मंच अध्यक्ष श्री. बी.डी.नेरकर यांचेकडून )
तक्रारदार तर्फे श्री.एस.के.कौल वकील हजर
सामनेवाला एकतर्फा.
सदर प्रकरण तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केलेले आहे. संक्षिप्तपणे प्रकरणाची हकिकत खालीलप्रमाणे आहेः-
1. तक्रारदाराने मुदखेडा, ता.चाळीसगांव येथे केलेल्या बोअरवेल मध्ये पुन्हा रिबोर करण्याकरिता सामनेवाला यांचेकडुन रिबोअर करण्यासाठी प्रति फुटास दर ठरवुन करारनामा दि.19/4/2008 रोजी केला व त्यानुसार रक्कम रु.5,000/- अडव्हान्स दि.19/4/2008 रोजी सामनेवाला यास रोखीने दिले. सामनेवाला यांनी दोन / तीन दिवसात रिबोअर करुन देऊ असे तक्रारदारास आश्वासन दिले. तथापी कबुल केल्याप्रमाणे सामनेवाला यांनी तक्रारदारास रिबोअर करुन दिले नाही. दि.16/5/2008 रोजी तक्रारदार हे धुळे येथे सामनेवाला यांचेकडे गेले असता एकतर रिबोअर करा नाहीतर रक्कम परत करणेची विनंती केली असता सामनेवाला यांनी तक्रारदारास केवळ आश्वासन दिले तथापी आजतागायत रिबोअरही केले नाही व तक्रारदाराकडुन अडव्हान्स घेतलेली रक्कमही परत न करुन तक्रारदारास सदोष व दोषयुक्त सेवा प्रदान केलेली आहे. सबब सामनेवाला यांनी तक्रारदाराकडुन दि.19/4/2008 रोजी स्विकारलेली रक्कम रु.5,000/- व्याजासह परत मिळावी, आर्थिक, मानसिक व शारिरिक नुकसानीपोटी रु.10,000/- व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रु.2,000/- मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने केली आहे.
2. सदरची तक्रार पंजीबध्द करण्यात आल्यानंतर, सामनेवाला यांना ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 13(1) ब प्रमाणे नोटीस काढण्यात आली. सामनेवाला हे मंचाची नोटीस मिळुनही प्रस्तुत प्रकरणी हजर झालेले नसल्याने सामनेवाला विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आले.
3. तक्रारदार यांची तक्रार, त्यांनी दाखल केलेले कागदपत्रे, याचे अवलोकन केले असता व तक्रारदाराचा युक्तीवाद ऐकला असता न्यायनिवाडयासाठी पुढील मुद्ये उपस्थित होतातः-
1. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना योग्य ती सेवा न
देऊन आपल्या सेवेत कसूर केला आहे काय ? ...... होय
म्हणून आदेश काय अंतिम आदेशाप्रमाणे
निष्कर्षाची कारणेः-
4. तक्रारदाराने त्याचे मुदखेडा, ता.चाळीसगांव येथील बोअरवेल मध्ये रिबोअर करणेकामी सामनेवाला यांचेशी संपर्क साधुन तक्रारदार व सामनेवाला यांचेत त्याअनुषंगाने करार झाला व सामनेवाला यांनी तक्रारदाराकडुन दि.19/4/2008 रोजी रिबोअर करणेसाठी अडव्हान्स म्हणुन रक्कम रु.5,000/- स्विकारलेबाबतची पावतीची सत्यप्रत तक्रारदाराने नि.क्र.1 लगत दाखल केलेली आहे. सबब तक्रारदार हा सामनेवाला यांचा ग्राहक होतो या निष्कर्षाप्रत हे मंच आलेले आहे.
5. तक्रारदाराकडुन रिबोअर करणेकामी अडव्हान्स म्हणुन रक्कम स्विकारुनही तक्रारदारास सदरचे काम करुन न दिल्याने तक्रारदाराने सामनेवाला यांची दि.16/5/2008 रोजी धुळे येथे प्रत्यक्ष भेट घेण्याचा प्रयत्न केला असता सामनेवाला यांचे नातेवाईकांनी रककम परत करण्याचे केवळ आश्वासन दिल्याचे कथन तक्रारदाराने केलेले आहे. शिवाय तक्रारदाराने सामनेवाला यास दि.10/4/2009 रोजी पाठविलेल्या नोटीस वजा पत्राची सत्यप्रत नि.क्र.1 लगत दाखल केली आहे. तक्रारदाराने सदर नोटीसीव्दारे सामनेवाला यास रक्कम रु.5,000/- द.सा.द.शे.18 टक्के व्याजासह परत करण्याबाबत कळविलेचे स्पष्ट होते. या मंचाने पाठविलेली रजिस्ट्रर ए.डी.नोटीस प्राप्त होऊन देखील सामनेवाला हे प्रस्तुतकामी गैरहजर राहीले. तक्रारदाराने तक्रारीसोबत दाखल केलेले कागदपत्रे, शपथपत्र इत्यादीचे अवलोकन केले असता सामनेवाला यांनी तक्रारदाराकडुन ठरल्याप्रमाणे कामाचे अडव्हान्सपोटी रक्कम स्विकारुन ते वेळेत करुन न दिल्याने तक्रारदारास नाहक मानसिक शारिरिक व आर्थिक त्रास सहन करावा लागल्याचे स्पष्ट होते. सामनेवाला यांनी तक्रारदारास सदोष व त्रृटीयुक्त सेवा दिल्याचे निष्कर्षाप्रत हे मंच आलेले आहे. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
( अ ) तक्रारदार यांचा तक्रारी अर्ज मंजूर करण्यात येतो.
( ब ) सामनेवाला यांनी तक्रारदाराकडुन अडव्हान्सपोटी स्विकारलेली रक्कम रु.5,000/- (अक्षरी रक्कम रु.पाच हजार मात्र ) दि.19/04/2008 पासुन द.सा.द.शे.9 टक्के व्याजासह तक्रारदारास परत करावी.
( क ) सामनेवाला यांना असेही निर्देशित करण्यात येते की त्यांनी तक्रारदार यास झालेल्या मानसिक, शरिरिक व आर्थिक त्रासापोटी रक्कम रुपये 1,000/-(अक्षरी रक्कम रु.एक हजार मात्र) नुकसान भरपाई म्हणून देण्यात यावे.
( ड ) सामनेवाला यांना असेही निर्देशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारदार यास सदरील तक्रारीचे खर्चापोटी रक्कम रुपये 500/-(अक्षरी रक्कम रु.पाचशे मात्र) देण्यात यावे.
( इ ) सामनेवाला यांना असेही निर्देशित करण्यात येते की, त्यांनी वरील आदेशाची पुर्तता सदरील आदेश पारीत केल्यापासून एक महिन्याच्या आत करावी.
( ई ) सदरील तक्रारीच्या आदेशाची पुर्तता मुदतीत न केल्यास सामनेवाला हे ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 25 व 27 प्रमाणे कार्यवाहीस पात्र ठरतील.
( फ ) उभयपक्षकारांना आदेशाची सही शिक्क्याची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
ज ळ गा व
दिनांकः- 12/10/2009
(श्री.चंद्रकांत मोहन येशीराव ) ( श्री.बी.डी.नेरकर )
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव