सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर
उपस्थिती - मा.सौ.सविता भोसले,अध्यक्षा
मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्य.
मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्या.
तक्रार अर्ज क्र. 206/2013
तक्रार दाखल दि.31-12-2013.
तक्रार निकाली दि.01-08-2015.
श्री. भास्कर गणपती विघ्ने,
रा. 1020 अ, शनिवार पेठ, सातारा. .... तक्रारदार
विरुध्द
श्री. भगवंतराव रामचंद्र नगरकर,
रा. वाबगांव, ता. खेड, जि.पुणे. .... जाबदार
तक्रारदारातर्फे –अँड.एम.एच.ओक
जाबदार तर्फे– अँड.एन.डी.शिंदे.
न्यायनिर्णय
(सदर न्यायनिर्णय मा.सौ.सविता भोसले, अध्यक्षा यानी पारित केला)
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 नुसार दाखल केला आहे. तक्रारअर्जातील थोडक्यात मजकूर पुढीलप्रमाणे-
तक्रारदार हे सातारा येथील कायमस्वरुपी रहिवाशी आहेत. जाबदार हे डेव्हलपर असून तक्रारदार व त्यांचे भाऊबंदाच्या मालकीची जिल्हा सातारा येथील सातारा शहर नगरपरिषद हद्दीतील सिटी सर्व्हे नंबर व म्यूनिसीपल हद्दीतील सि.स.नं. 64,64/1,64/2 व 65, सदाशिव पेठ,सातारा या मिळकतीवर नमूद तक्रारदार व त्यांचे इतर भाऊबंद यांनी जाबदार यांना विकसीत करणेसाठी दिल्या होत्या. व त्यासाठी विकसन करारनामा (डेव्हलपमेंट अँग्रीमेंट) व स्वतंत्र मुखत्यारपत्र जाबदार यांना करुन दिले होते.
प्रस्तुत झाले विकसन करारपत्रानुसार मिळकत विकसीत केलेनंतर सदर मिळकतीमधील नवीन इमारतीमधील तळमजल्यावरील एक व्यापारी गाळा क्षेत्र 110 चौ. फूट व पहिल्या मजल्यावरील एक विकसी गाळा याचे क्षेत्र 450 चौ. फूट एवढी जागा बांधून देण्याचे जाबदाराने मान्य व कबूल केले होते. तसेच रक्कम रु.2,00,000/’ (रुपये दोन लाख फक्त) जाबदाराने देणेचे मान्य केले होते. सदरचे कुलमुखत्यारपत्र दि.24/7/1996 रोजी करुन दिले होते. तक्रारदार व जाबदार यांचेदरम्यान झालेल्या विकसन करारपत्रानुसार जाबदार यांनी तक्रारदारास तळमजल्यावरील एक व्यापारी गाळा व पहिल्या मजल्यावरील एक निवासी गाळयाचे बांधकाम पूर्ण करुन दिले नाही. अर्धवट व अपुरा असलेला दुकानगाळा व निवासी सदनिका तक्रारदाराचे ताब्यात दिली. याबाबत बांधकामातील त्रुटी दूर करुन द्याव्यात म्हणून तक्रारदाराने जाबदाराला नोटीस पाठवली. ती नोटीस जाबदाराला मिळूनही जाबदाराने कोणतीही कार्यवाही केली नाही म्हणून तक्रारदाराने जाबदारविरुध्द मे. जिल्हा ग्राहक मंचात तक्रार अर्ज क्र. 120/2000 दाखल केला होता. प्रस्तुत तक्रार अर्जाचे काही जाबदार हजर राहीले नाहीत. सदर तक्रार अर्जाचा निकाल दि. 6/9/2000 रोजी झाला व मे. मंचाने दिलेल्या आदेशानुसार जाबदाराने कोणतीही पूर्तता केली नाही म्हणून तक्रारदाराने मे मंचात दरखास्त दाखल केली. प्रस्तुत दरखास्तीच्या कामी दि.24/3/2009 रोजी तडजोड होवून जाबदार यांनी एकंदरीत रक्कम रु.3,11,000/- देवून उभयता मधील देणेघेणेचा हिशोब भागवलेला आहे. त्यावेळी तक्रारदारास उपलब करुन दिले दुकान गाळयाचे व निवासी गाळयाचे खरेदीपत्र कधी करुन देणार अशी विचारणा जाबदाराला केली असता जाबदाराने फक्त तोंडी आश्वासन दिले. परंतु जाबदार यांनी तक्रारदार यांना सदर दुकानगाळयाचे व निवासी गाळयाचे खरेदीपत्र करुन दिले नाही ते करुन देणेस टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे तक्रारदार यांना जाबदाराने सदोष सेवा दिलेने तक्रारदाराने जाबदारांविरुध्द सदरचा तक्रार अर्ज मे. मंचात दाखल केला आहे.
2. प्रस्तुत कामी तक्रारदार यांची जाबदार यांनी सातारा शहर नगरपरिषद हद्दीतील सिटी सर्व्हे नंबर व म्युनिसीपल कमिटी नंबर 64,64/1,64/2 व 65, सदाशिव पेठ, सातारा यामधील इमारतीमधील तळमजल्यावरील एक व्यापारी गाळा व पहिल्या मजल्यावरील एक निवासी गाळयाचे खरेदीपत्र डिड ऑफ डिक्लरेशननुसार एक महिन्याचे आत नोंदवून द्यावे असे आदेश जाबदारविरुध्द करणेत यावेत, सदर दस्त नोंदवून न दिलेस कोर्ट कमिशनर नेमून सदरचे खरेदीपत्र नोंदवून मिळावे, प्रस्तुतचे दस्त करुन व नोंदवून न दिल्यास सदरचे खरेदीपत्र मा. दुय्यम निबंधक, सातारा यांनी स्वतः नोंदवून घ्यावेत असे आदेश दुय्यम निबंधकसो,सातारा यांना द्यावेत, तक्रारदारास झाले मानसीक व शारीरिक त्रासापोटी रक्कम रु.25,000/- जाबदारकडून मिळावे, तक्रार अर्जाचा खर्च रु.10,000/- जाबदारकडून मिळावा अशी विनंती तक्रारदाराने याकामी केली आहेत.
3. तक्रारदाराने प्रस्तुत कामी नि. 2 कडे अँफीडेव्हीट, नि.5 चे कागदयादीसोबत नि. 5/1 ते 5/5 कडे अनुक्रमे तक्रारदाराने जाबदाराला लिहून दिलेली पावती, झेरॉक्स, सातारा नगर भूमापन क्र. 64 चे मालमत्तापत्रक, सातारा येथील मे. ग्राहक मंचातील तक्रार अर्ज क्र.120/2000 चे निकालपत्र, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सातारा यांचेकडे दाखल केलेला अर्ज, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी दिलेली ऑर्डर,नि. 15 कडे तक्रारदाराने तक्रार अर्जासोबत दाखल केले प्रतिज्ञापत्र हाच पुरावा समजणेत यावा म्हणून दिलेली पुरसिस वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत.
4. प्रस्तुत कामी जाबदार यांनी नि. 12 कडे त्यांचे म्हणणे/कैफियत दाखल केली आहे. प्रस्तुत म्हणण्यामध्ये जाबदाराने पुढील आक्षेप नोंदवले आहेत. प्रस्तुत तक्रार अर्जातील महेश गुंडेराव पाटील बाबतचा मजकूर मान्य व कबूल नाही. उर्वरीत मजकूर मान्य केला आहे. परंतु तक्रारदाराने दस्ताची अंमलबजावणी करणेसाठी जाबदारबरोबर कधीही संपर्क केला नव्हता व नाही. तसेच तक्रारीबाबत महेश गुंडेराव पाटील यांचा कोणताही संबंध नव्हता व नाही. त्यानी कधीही जाबदाराचे वतीने शब्द दिलेला नव्हता व नाही. आजरोजीसुध्दा जाबदार सदरचा दस्त करुन देणेस तयार आहेत व मे. कोर्टाचे आदेशाप्रमाणे जाबदार तक्रारदाराला खरेदीदस्त करण्यास तयार आहेत. तसेच प्रस्तुत अपार्टमेंटमधील जाबदाराचे मालकीचे तीन गाळे अनाधिकृतपणे व परवानगी न घेता विक्री केलेचे आढळून आले आहे. तरी सदर व्यवहाराचे पैसे जाबदाराला देण्याचे तक्रारदाराला आदेश व्हावेत असे म्हणणे जाबदाराने दाखल केले आहे.
5. वर नमूद तक्रारदार व जाबदार यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे व म्हणणे यांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन प्रस्तुत तक्रारअर्जाचे निराकरणार्थ मे मंचाने पुढील मुदद्यांचा विचार केला.
अ.क्र. मुद्दा उत्तर
1. तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक आहेत काय? होय.
2. जाबदार यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा
दिली आहे काय? होय.
3. अंतिम आदेश काय? खाली नमूद
आदेशाप्रमाणे.
विवेचन-
6. वर नमूद मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत. कारण- तक्रारदार व जाबदार यांचेदरम्यान विकसन करार झाला. प्रस्तुत तक्रार अर्जात नमूद केलेल्या मिळकती संदर्भातील सर्व बाबी जाबदाराने मान्य केल्या आहेत. तसेच मे. मंचाने दिले आदेशाप्रमाणे तक्रारदाराचे खरेदीपत्राचे दस्त करुन देणेस जाबदार तयार आहेत असे त्यांनी म्हणण्यामध्ये कथन केले आहे. परंतू मे. मंचाचे आदेशानंतर वेळोवेळी तक्रारदाराने जाबदाराला खरेदी दस्ताबाबत विचारणा केली असता जाबदाराने दस्त करुन देणेस टाळाटाळ केली आहे. या सर्वांचा विचार करता तक्रारदार हे जाबदाराचे ग्राहक आहेत व जाबदाराने तक्रारदाराला करारात ठरलेप्रमाणे दुकानगाळयाचे व निवासी गाळयाचे खरेदीपत्र व तक्रारदाराने वारंवार मागणी करुनही जाबदाराने ते नोंदवून/करुन दिलेले नाही. म्हणजेच जाबदाराने तक्रारदाराला सदोष सेवा पुरविलेली आहे हे स्पष्ट व सिध्द होते. तसेच प्रस्तुत कामी जाबदाराने त्याचे म्हणण्यामध्ये घेतलेला आक्षेप की, प्रस्तुत अपार्टमेंटमधील जाबदाराचे मालकीचे तीन गाळे तक्रारदाराने जाबदाराचे संमत्तीशिवाय विक्री केलेबाबत विक्रीची सर्व रक्कम जाबदाराला तक्रारदाराने ‘द्यावी असे केलेने विधान सिध्द करणेसाठी जाबदाराने कोणताही लेखी अथवा तोंडी पुरावा मे. मंचात दाखल केलेला नाही. सबब प्रस्तुत कामी जाबदाराने खरेदी दस्त करुन देणेचे मान्य केलेले आहे. परंतु ते करुन देणेस टोलवाटोलवी करण्याचे जाबदाराचे धोरण म्हणजेच सेवेतील त्रुटी आहे असे आम्हास वाटते. सबब प्रस्तुत कामी जाबदाराने तक्रारदार यांना सातारा शहर नगरपरिषद हद्दीतील सिटी सर्व्हे नंबर व म्युनिसीपल कमिटी नंबर 64, 64/1, 64/2 व 65, सदाशिव पेठ, सातारा या इमारतीमधील तळमजल्यावरील एक व्यापारी गाळा व पहिल्या मजल्यावरील एक निवासी गाळा यांचे खरेदीपत्र डिड ऑफ डिक्लरेशननुसार नोंदवून देणे न्यायोचीत होणार आहे.
9. सबब आम्ही खालीलप्रमाणे अंतीम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1. तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2. जाबदार यांनी तक्रारदार यांना डिस्टि्रक्ट सातारा, सब डिस्ट्रीक्ट सातारा शहर
नगरपरिषद हद्दीतील सिटी सर्व्हे नंबर व म्युनिसिपल कमिटी नंबर 64,64/1,64/2 व
65, सदाशिव पेठ, सातारा या इमारतीतील तळमजल्यावरील एक व्यापारी गाळा व
पहिल्या मजल्यावरील एक निवासी गाळयाचे खरेदीपत्र डिड ऑफ डिक्लरेशननुसार
नोंदवून द्यावे.
3. तक्रारदाराला झाले मानसिक त्रास व अर्जाचे खर्चापोटी साठी रक्कम
रु.25,000/- (रुपये पंचवीस हजार फक्त) जाबदार यांनी तक्रारदारास अदा
करावेत.
4. वरील सर्व आदेशाचे पालन जाबदार यांनी आदेश पारीत तारखेपासून 45
दिवसांचे आत करावे.
5. विहीत मुदतीत आदेशाचे पालन न केलेस तक्रारदाराला ग्राहक संरक्षण
कायद्यातील कलम 25 किंवा 27 नुसार वसुलीची प्रक्रिया करणेची मुभा
राहील.
6. पस्तुत आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य द्याव्यात.
7. सदरचा न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
ठिकाण- सातारा.
दि. 01-08-2015.
(सौ.सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ.सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.