::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, मा. सौ. कल्पना जांगडे (कुटे) मा.सदस्या)
(पारीत दिनांक :- 21/12/2017)
1. तक्रारकर्तीने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली आहे. सदर तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे.
2. विरुद्ध पक्ष क्रमांक 1 ही पंजीबद्ध सहकारी पतसंस्था असून विरुद्ध पक्ष क्र.2 हे संस्थेचे अध्यक्ष आहेत. विरुद्ध पक्ष 3 हे उपाध्यक्ष व विरुद्ध पक्ष क्रमांक 4 सदस्य सचिव तर विरुद्ध पक्ष क्रमांक 5 व 6 हे पतसंस्थेच्या संचालक मंडळाचे सदस्य आहेत. तक्रारकर्तीने विरुद्ध पक्ष क्रमांक 1 या पतसंस्थेमध्ये दिनांक 24/2/2014 रोजी 1077 या क्रमांकाचे दैनिक बचत आवर्ती ठेव खाते उघडून त्यामध्ये दररोज रुपये 50/- याप्रमाणे दिनांक 24.8.2014 पर्यंत 6 महिन्याच्या कालावधीत एकूण रुपये 13,250/- विरुद्ध पक्ष क्रमांक 1 यांचे अभिकर्ता मंदाकिनी दिगंबर कुळकर्णी यांचेमार्फत विरुद्ध पक्ष क्र. 1 पतसंस्थेत भरणा केले. सदर आवर्ती ठेवीचा कालावधी दिनांक 24.8.2014 रोजी पूर्ण झाला. परंतु तक्रारकर्त्याने विरुद्ध पक्षांना वारंवार मागणी करूनही विरुद्ध पक्षांनी ठरलेल्या 2% व्याजासह खात्यातील परिपक्वता रक्कम परत केली नाही. तक्रारकर्तीने अभिकर्त्या मार्फत देखील विरुद्ध पक्षांकडे सदर रकमेची मागणी केली तसेच दिनांक 31.12.2015 रोजी विरुद्ध पक्षांना लेखी अर्ज देखील दिला परंतु विरुद्ध पक्षांनी रक्कम परत केली नाही. त्यामुळे तक्रारकर्तीने अधिवक्त्या मार्फत दिनांक 9.2.2016 रोजी विरुद्ध पक्षांना नोटीस देऊन सदर रकमेची मागणी केली परंतु नोटीस मिळूनही विरुद्ध पक्षांनी त्याची पुर्तता केली नाही व उत्तरही दिले नाही. सबब तक्रारकर्तीने प्रस्तुत तक्रार मंचासमक्ष दाखल केली असून विरुद्ध पक्षांना तक्रारकर्तीच्या खाते क्रमांक 1077 मधील परिपक्वता रक्कम रूपये 13,515/- व त्यावर दिनांक 25.8.2014 पासून दर साल दर शेकडा 18% दराने व्याजासह तक्रारकर्तीस देण्याचे तसेच तिला झालल्या शारीरिक व मानसिक त्रास आणी आर्थीक नुकसानापोटी नुकसान भरपाई रुपये 50,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 10,000/- देण्याचे आदेश व्हावेत अशी मंचास प्रार्थना केली आहे.
3. तक्रारकर्तीची तक्रार स्विकृत करून विरुद्ध पक्ष क्रमांक 1 ते 6 यांना नोटीस पाठविण्यात आला. नोटीस प्राप्त होऊनही विरुद्ध पक्ष क्रमांक 3 हे मंचासमक्ष उपस्थित झाले नाहीत त्यामुळे मंचाने दिनांक 12.12.2017 रोजी विरुद्ध पक्ष क्रमांक 3 यांचे विरुद्ध एकतर्फी कारवाईचा आदेश पारित केला.
4. विरुद्ध पक्ष क्रमांक 1, 2 व 4 ते 6 हे मंचासमक्ष हजर होवून त्यांनी तक्रारीला संयुक्त लेखी उत्तर दाखल करून त्यात विरुद्ध पक्ष क्रमांक 1 ही सहकारी पतसंस्था असून विरूध्द पक्ष क्र.2 ते 6 हे सदर पतसंस्थेचे पदाधिकारी असल्याचे मान्य केले आहे. परंतु तक्रारकर्तीचे तक्रारीतील उर्वरित कथन नाकबूल केले आहे व पुढे आपल्या विशेष कथनात त्यांनी नमूद केले की तक्रारकर्तीने आवर्ती ठेव खात्याच्या परिपक्वता तिथी नंतर विहित मुदतीत तक्रार दाखल केली नाही त्यामुळे सदर तक्रार ही मुदतबाह्य असल्याने खारीज होण्यास पात्र आहे. तक्रारकर्तीच्या कथनाप्रमाणे विरुद्ध पक्ष क्रमांक 1 यांचे अभिकर्ता श्रीमती कुळकर्णी यांचेमार्फत सदर व्यवहार झालेला असल्याने सदर अभिकर्ता तक्रारअर्जात आवश्यक पक्ष आहेत. परंतु सदर अभिकर्ता यांना तक्रारीत पक्षकार केले नसल्यामुळे सदर कारणास्तव प्रस्तुत तक्रार खारीज होण्यास पात्र आहे. याशिवाय तक्रारकर्तीने संस्थेच्या सर्व 19 सदस्यांना पक्ष करणे आवश्यक आहे, परंतु त्यांना तक्रारीत पक्ष केले नसल्यामुळे आवश्यक पक्षाअभावी तसेच प्रस्तुत तक्रारीत settlement of account संबंधी वाद असल्यामुळे सदर वाद हा ग्राहक वाद नाही, या कारणांस्तवसुध्दा प्रस्तुत तक्रार खारीज होण्यास पात्र आहे. तक्रारकर्तीची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे अभिकर्तीसोबत हात मिळवणी करून तिने विरुद्ध पक्षांकडे रक्कम जमा करणे बंद केल्याने ती विरुद्ध पक्षांकडून कोणतीही नुकसान भरपाई मिळण्यास पात्र नाही. विरुद्ध पक्ष क्रमांक 1,2 व 4 ते 6 यांनी कोणतीही सेवेत त्रुटी दिली नाही. सबब तक्रार ही खोटे कथन व खोटया दस्तावेजांवर आधारित असल्यामुळे सदर तक्रार खारीज करण्यात यावी.
5. तक्रारकर्तीची तक्रार, दस्तावेज, शपथपत्र, लेखी युक्तिवाद, विरुध्द पक्ष क्र.1,2 व 4ते 6 यांचे लेखी उत्तर तसेच लेखी उत्तरालाच शपथपत्र व लेखी युक्तिवाद समजण्यात यावे अशी अनुक्रमे नि.क्र.11 दिनांक 30.10.2017 व नि.क्र.14, दिनांक 12.12.2017 रोजी पुरसीस दाखल, उभय पक्षांचा तोंडी युक्तीवाद तसेच तक्रारकर्ता व विरूध्द पक्ष यांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्याबाबतची कारणमिमांसा आणी निष्कर्ष पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
1) तक्रारकर्ती विरूध्द पक्षांची ग्राहक आहे काय ? : होय
2) प्रस्तूत तक्रार मुदतीत आहे काय ? : होय
3) विरूध्द पक्षांनी तक्रारकर्तीप्रति न्युनता पूर्ण सेवा दिली आहे
काय ? : होय
4) आदेश काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे.
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 ः-
6. तक्रारकर्तीने विरुद्ध पक्ष क्रमांक 1 या पतसंस्थेमध्ये दिनांक 24/2/2014 रोजी 1077 या क्रमांकांचे दैनिक बचत आवर्ती ठेव खाते उघडून त्यामध्ये दररोज रुपये 50/- याप्रमाणे दिनांक 24/8/2014 पर्यंत 6 महिन्याच्या कालावधीत एकूण रुपये 13,250/- विरुद्ध पक्ष क्रमांक 1 यांचे अभिकर्ता मंदाकिनी दिगंबर कुळकर्णी यांचेमार्फत विरुद्ध पक्ष क्र. 1 पतसंस्थेत भरणा केले. यासंदर्भात तक्रारकर्तीने दैनिक बचत ठेव खाते पुस्तिका दाखल केलेली आहे. सदर पुस्तिकेवर विरुद्ध पक्ष यांचा शिक्का तसेच व्यवस्थापक यांची सही आहे. सदर दस्तावेजावरून तक्रारकर्ती ही विरुद्ध पक्ष क्रमांक 1 ते 6 यांची ग्राहक आहे हे सिद्ध होते. सबब मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रं. 2 बाबत ः-
7. तक्रारकर्तीने विरुद्ध पक्ष क्रमांक 1 या पतसंस्थेमध्ये दिनांक 24/2/2014 रोजी दैनिक बचत आवर्ती ठेव खाते उघडून त्यामध्ये दिनांक 24/8/2014 पर्यंत एकूण रुपये 13,250/- भरणा केले व सदर खात्याची परिपक्वता तिथी 25/8/2014 ही होती, हे तक्रारकर्तीने दाखल केलेल्या दैनिक बचत ठेव खाते पुस्तिकेवरून सिध्द होते. परंतु परिपक्वता तिथी नंतर तक्रारकर्तीने मागणी करूनही विरुद्ध पक्षांनी सदर रक्कम परत केली नाही. त्यामुळे तक्रारीला कारण सतत घडले असून तक्रार मुदतीत दाखल करण्यांत आली असे मंचाचे मत आहे. सबब मुद्दा क्रमांक 2 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रं. 3 बाबत ः-
8. तक्रार अर्जात दाखल केलेल्या दस्तावेजांचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की तक्रारकर्तीने दिनांक 24.2.2014 रोजी दैनिक आवर्ती ठेव बचत योजनेअंतर्गत विरुद्ध पक्ष क्रमांक 1 यांच्याकडे दररोज रुपये 50 याप्रमाणे 6 महिन्याच्या कालावधीत एकूण रूपये 13,250/- विरुद्धपक्ष क्रमांक 1 यांची अभिकर्ता मंदाकिनी कुळकर्णी यांचेमार्फत भरणा केलेला आहे. सदर खात्याची परिपक्वता तिथी दिनांक 25.8.2014 ही होती. सदर पुस्तिकेमध्ये फेरतपासणीनंतर दिनांक 22/12/2014 रोजी जमा रक्कम रू.13,250/- असे नमूद आहे. यावरून तक्रारकर्तीचे वि.प.कडे रू.13,250/- जमा आहेत हे सिध्द होते. खात्याच्या खातेपुस्तिकेप्रमाणे जमा रक्कम रु. 13,250/- मागणी करूनही विरुद्ध पक्षांनी तक्रारकर्तीला परत केली नाही. सदर अभिकर्तीने सुद्धा दिनांक 7.9.2015 रोजी, ग्राहक संरक्षण परिषदेत, विरुद्ध पक्ष संस्थेने तक्रारकर्ती व इतर खातेदारांची रक्कम परत न केल्याबद्दल तक्रार केली होती. त्या तक्रारीसोबत असलेल्या खातेदारांच्या यादीमध्ये तक्रारकर्तीचे देखील नाव आहे. सदर तक्रारीला विरुद्ध पक्षाने दिनांक 22.8. 2015 रोजी उत्तर दिले असून जसजशा रकमा जमा होतील व कर्जवसुली होईल तसतशी खातेदारांची रक्कम परत करण्यात येईल असे नमूद केलेले आहे. तसेच दिनांक 26.8.2015 रोजी विरुद्ध पक्षाने ग्राहक संरक्षण परिषदेला दिलेल्या पत्रामध्ये सुद्धा खातेदारांना रक्कम परत करण्याची कारवाई करण्यात येईल तसेच खातेदाराला दैनीक बचत ठेवीच्या रकमा परत देणेबाबत कळविण्यांत येईल असे नमूद आहे. त्यामुळे विरुद्ध पक्ष तक्रारकर्तीला रक्कम देणे लागतात हे सिद्ध होते. परंतु परिपक्वता तिथी नंतर तक्रारकर्तीने वारंवार मागणी करूनही विरुद्ध पक्षांनी तक्रारकर्तीला रक्कम परत न करुन तक्रारकर्तीप्रती सेवेत न्यूनता दर्शविली आहे हे दाखल दस्तावेजांवरून सिध्द होते असे मंचाचे मत आहे.. सबब मुद्दा क्रमांक 3 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रं. 4 बाबत ः-
9. मुद्दा क्रं. 1 ते 3 च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
1. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. विरुद्ध पक्ष क्रमांक 1 ते 6 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरीत्या तक्रारकर्तीचे आवर्ती ठेव खाते क्रमांक 1077 मधील परिपक्वता रक्कम रुपये 13,250/- त्यावर दिनांक 24.8.2014 पासून दरसाल दर शेकडा 10 टक्के दराने व्याजासह, प्रस्तुत आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसांचे आंत तक्रारकर्तीला परत करावी.
3. विरुद्ध पक्ष क्रमांक 1 ते 6 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारकर्तीला मानसिक व शारीरिक त्रासापोटी नुकसान भरपाई रुपये 10,000/- व तक्रारखर्च रुपये 5,000/-, प्रस्तुत आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसांचे आंत तक्रारकर्तीला द्यावे.
4) उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामूल्य पाठविण्यांत यावी.
चंद्रपूर
दिनांक – 21/12/2017
( अधि.कल्पना जांगडे (कुटे) ) ( अधि. किर्ती गाडगिळ (वैदय) )( श्री उमेश व्ही.जावळीकर)
मा.सदस्या. मा.सदस्या. मा. अध्यक्ष