निकालपत्र :- (दि.02/09/2010) ( सौ. प्रतिभा जे. करमरकर,सदस्या) (1) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:- तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.2 (मोबाईल कंपनीचे डिलर) यांचेकडून सामनेवाला क्र.1 (मोबाईल उत्पादक कंपनी) यांचा मोबाईल Byond-Model-By-500 हा रक्कम रु.4,200/- रोख भरुन दि.08/03/2009 रोजी विकत घेतला. सदर मोबाईल विकत घेतल्यापासून सतत त्याच्या निरनिराळया तक्रारी चालू झाल्या. सामनेवाला क्र.2 ची त्यासंबंधात भेट घेतली असता त्यांनी कानावर हात ठेवले म्हणून तक्रारदार सामनेवाला क्र.3 (सर्व्हीस सेंटर) यांच्याकडे गेले सामनेवाला क्र.3 ने सदर मोबाईल तपासून सदर हॅन्डसेटला सॉफ्टवेअर प्रॉब्लेम आहे व तो परत येण्यास आठवडा लागेल असे सांगितले. तक्रारदार हे इलेक्ट्रीशीयन असून त्यांना आर्थिक अडचणीमुळे लोकांचे भेटीगाठी घेवून काम पहावे लागते व त्याकरिता सदर मोबाईलची अत्यंत आवश्यकता होती. तसेच सदर नवीन मोबाईल आठवडयापूर्वी घेतलेला असलेने तो बदलून नवीन दयावा अशी विनंती सामनेवाला क्र. 2 व 3 यांना केली. परंतु त्यांनी मोबाईल दुरुस्तच करुन मिळेल नवीन मोबाईल मिळणार नाही असे सांगितले. त्यामुळे नाईलाजास्तव सदर नादुरुस्त मोबाईल सामनेवाला क्र.3 यांचेकडे दुरुस्तीसाठी दयावा लागला. (2) तक्रारदार आपल्या तक्रारीत पुढे सांगतात, तक्रारदाराने सामनेवाला क्र.3 याचेकडे वरचेवर मोबाईल दुरुस्त करुन घेतला. परंतु त्यातले दोष परत परत येत राहिले. म्हणून सामनेवाला क्र.3 च्या सांगण्यावरुन पुण्याला पाठवण्यासाठी दि.13/06/2009 रोजी तक्रारदाराने मोबाईल व चार्जर दोन्ही जमा केले. परंतु आजअखेर पर्यंत सामनेवाला क्र.3 यांनी सदर मोबाईल दुरुस्त करुन तक्रारदाराला दिला नाही. त्यामुळे कंटाळून तक्रारदाराने सामनेवाला क्र.3 यांना मोबाईल परत घ्या व माझे पैसे परत दया अशा त-हेची नोटीस दि.03/07/2009 रोजी पाठवली. त्याला सामनेवाला क्र.1 यांनी दि.11/07/2009 रोजी चुकीचे उत्तर दिले. त्यामुळे तक्रारदाराने आपल्यावर झालेल्या या अन्यायाविरुध्द दाद मागण्यासाठी प्रसतुत तक्रार दाखल केली आहे व आपल्या पुढील मागण्या मान्य व्हाव्यात म्हणून विनंती केली आहे. मोबाईल हॅन्डसेटची किंमत रु.4,200/-, मानसिक त्रासापोटी रक्कम रु.50,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.1,000/- असे एकूण रक्कम रु.55,200/- सामनेवाला यांचेकडून वसुल होऊन मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. (3) तक्रारदाराने आपल्या तक्रारीसोबत मोबाईल खरेदी केलेचे बील, दुरुसतीची जॉबशीट, तक्रारदाराने दिलेला अर्ज, त्याची पोहोच व सदर अर्जास सामनेवाला यांनी दिलेले उत्तर इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (4) सामनेवाला क्र.3 यांनी आपल्या लेखी म्हणणेत तक्रारदाराच्या सर्व कथनावर तीव्र आक्षेप घेतला आहे. तक्रारदाराने आपल्याला कुठलाही मोबदला दिला नसल्यामुळे सामनेवाला क्र.3 व तक्रारदार यांच्यामध्ये ग्राहकत्वाचे नातेच नाही. सामनेवाला क्र.3 ने तक्रारदारांच्या मोबाईलच्या चार्जरचा प्रॉब्लेम होता तो दुरुस्त करुन दिला. तसेच तक्रारदाराचा मोबाईल हा त्यांच्याकडेच असल्याचेही सामनेवाला क्र.3 ने सांगितले आहे. (5) सामनेवाला क्र.3 ने आपल्या कथनासोबत जॉबशिट दाखल केली आहे. (6) सामनेवाला क्र.1 यांनी आपल्या कथनात तक्रारदाराच्या कथनाला जोरदार आक्षेप घेतला आहे. तक्रारदाराने सदर तक्रार केवळ रचनात्मक, खोटी व पैसे लुबाडण्याच्या हेतुने केली आहे असे सामनेवाला क्र.1 यांनी ठामपणे म्हटले आहे. सामनेवाला आपल्या लेखी महणणेत पुढे सांगतात, खरी वस्तुस्थिती अशी आहे की, सदर तक्रारदार यांनी सामनेवाला क्र;2 यांचेकडून बियॉंड बाय-500 आय एम ई आय नं.355887302418646 या वर्णनाचा हॅन्डसेट खरेदी केलेला आहे. तथापि, सदरचा आय एम ई आय नं.355887302418646 चा हॅन्डसेट सदर तक्रारदार यांने केव्हाही सामनेवाला क्र.3 यांचेकडे दुरुस्तीसाठी केव्हाही दिलेला नव्हता व नाही. सदरची बाब ही सामनेवाला क्र.3 कडील जॉब शीट नं.1887 वरुन स्पष्ट होत आहे. तसेच सदर तक्रारदार यांनी त्यांचे हॅन्डसेटचा आय एम ई आय नंबर तक्रार अर्जात नमुद केलेला नाही. तसेच सदर तक्रारदार यांनी स्वत: बेकायदेशीररित्या जॉब शिटवर सॉफ्टवेअर प्रॉब्लेम नमुद केलेला आहे. यावरुनच सदर तक्रारदार हा स्वच्छ हाताने मे. मंचात आलेला नाही हे स्पष्ट होत आहे. तसेच तक्रारदार यांनी नमुद केलेला सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम धादांत खोटा असून हॅन्डसेट चा आय एम ई आय नंबर बाबत दुरुस्त करणेबाबत नमुद केलेला मजकूर चुकीचा आहे. तक्रारदार यांनी दिेला आय एम ई आय नंबर 355887302410932 चा हॅन्डसेट तक्रारदार यांनी चार्जर रिप्लेस घेऊन परत नेलेला आहे असे दाखल कागदपत्रांवरुन दिसून येत आहे. असे जॉब शिट नं.1887 वरुन दिसून येत आहे.त्यामुळे तक्रारदार यांना कोणताही हॅन्डसेट सामनेवाला यांचे ताब्यात नाही. निव्वळ सदर सामनेवाला यांचेकडून पैसे मिळविणेच्या उद्देशाने सदरचा अर्ज दाखल केलेला आहे. तक्रारदार यांनी आय एम ई आय नंबर 355887302410932 या हॅन्डसेटच्या खरेदीची कोणतीही रिसीट या मंचात दाखल केलेली नाही. त्यामुळे तक्रारदार हा सामनेवाला क्र;1 चा ग्राहक होऊच शकत नाही. तरीही कंपनीचे नावास बाधा येऊ नये म्हणून सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदाराने सामनेवाला क्र.3 कडे दाखल केलेला उपरोक्त नंबरचा हॅन्डसेट दुरुस्त करुन दिला आहे. सदर हॅन्डसेटची दुरुस्ती समाधानकारक असल्याबद्दल तक्रारदाराने जॉबशिट नं. 1887 वर लिहून देऊन स्वत: सही करुन सदरचा मोबाईल हॅन्डसेट समाधानकारक दुरुस्त करुन दिला असल्याबद्दल दिेले आहे. ही बाब सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदाराला लिहीलेल्या पत्रावरुनही अधोरेखीत होत आहे. तक्रारदाराने अशी खोटी तक्रार केल्याबद्दल त्यांची तकार फेटाळून लावून त्यांना कॉम्पेंसेंटरी कॉस्ट लावावी अशी मागणी सामनेवाला क्र.1 यांनी सदर मंचास केली आहे. (7) सामनेवाला क्र.2 यांनी आपल्या तक्रारीसोबत सामनेवाला क्र.1 चा युक्तीवाद स्विकृत केल्याचे निवेदन सदर मंचासमोर केले आहे. (8) सदर मंचाने दोन्ही बाजूंच्या वकीलांचा युक्तीवाद ऐकला. तसेच त्यांनी दाखल केलेले कागदपत्र तपासले.
(9) तक्रारदाराने सामनेवाला क्र.2 कडून खरेदी केलेल्या मोबाईल हॅन्डसेटचे बील, निशानी क्र.3-ए ला दाखल केले आहे. सदर हॅन्डसेटचा आय एम ई आय नंबर 355887302418646 असा असून त्यांनी सामनेवाला क्र.3 कडे दुरुस्तीसाठी दिलेला हॅन्डसेटचा आय एम ई आय नंबर 355887302410932 असा होता. त्यामुळे दुरुस्तीसाठी दिलेला उपरोक्त मोबाईल सामनेवाला क्र.2 कडून घेतल्याचा कुठलाही पुरावा तक्रारदाराने दाखल केला नाही. त्यामुळे तक्रारदार हे सामनेवाला क्र. 2 व सामनेवाला क्र.1 चे ग्राहक असल्याचा तक्रारदाराचा दावा ग्राहय मानता येत नाही. हा सामनेवाला यांचा युक्तीवाद हे मंच ग्राहय मानत आहे. सामनेवाला क्र.3 हे सर्व्हीस सेंटर आहे व त्यांच्याकडे तक्रारदाराने कुठलाही मोबदला भरला नाही. त्यामुळे सामनेवाला क्र.3 व तक्रारदार यांच्यामध्ये ग्राहकत्वाचे नातेच नाही हे सामनेवाला क्र.3 चे कथन हे मंच ग्राहय मानत आहे. तसेच तक्रारदाराने दाखल केलेल्या जॉबशीटच्या झेरॉक्स प्रतीची सामनेवाला यांनी दाखल केलेल्या अस्सल प्रतीशी पडताळणी करुन पाहता त्यामध्ये software problem हा शेरा तक्रारदाराने स्वत: घुसडलेला दिसून येत आहे. वरील सर्व गोष्टींचा विचार करता तक्रारदार हे मंचासमोर स्वच्छ हाताने आले नाहीत हे सामनेवाला यांचे म्हणणे आम्ही ग्राहय धरत आहोत. त्यामुळे वरील सर्व बाबींचा विवार करता ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 26 प्रमाणे सदरची तक्रार ही केवळ सामनेवाला यांना लुबाडण्याच्या दृष्टीने दाखल केली आहे अशा निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे व पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश (1) तक्रारदाराची तक्रार फेटाळणेत येते. (2) सामनेवाला यांचेविरुध्द खोटी तक्रार केल्याबद्दल तक्रारदाराने सामनेवाला यांना रक्कम रु.2,000/-(रु.दोन हजार फक्त) दयावे.
(3) खर्चाबद्दल आदेश नाही.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |