::: आ दे श :::
( पारित दिनांक : 28/06/2017 )
माननिय अध्यक्षा सौ. एस.एम. उंटवाले, यांचे अनुसार : -
1. तक्रारकर्ता यांनी सदरहू तक्रार, ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम 12 अन्वये, विरुध्द पक्षाने द्यावयाच्या सेवेत त्रुटी ठेवली व अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला, म्हणून नुकसान भरपाई मिळण्यासाठी दाखल केली आहे.
तक्रारकर्ते यांची तक्रार, विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 चा संयुक्त लेखी जबाब, उभय पक्षाने दाखल केलेले सर्व दस्तऐवज, उभय पक्षांचा लेखी व तोंडी युक्तिवाद यांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन, खालील निर्णय पारित केला.
तक्रारकर्ते यांचा युक्तिवाद असा आहे की, ते पेशाने शिक्षक आहेत, त्यांना दोन चाकी वाहनाची आवश्यकता होती. त्याकरिता त्यांनी विरुध्द पक्ष क्र. 1 च्या वाशिम येथील शाखेत (विरुध्द पक्ष क्र. 2) वाहन घेण्याकरिता कर्ज मागणी अर्ज, सर्व कागदपत्रांसह दिनांक 14/02/2015 रोजी केला होता. परंतु विरुध्द पक्ष क्र. 2 यांनी कर्ज मागणी फाईल विरुध्द पक्ष क्र. 1 कडे पाठवण्याच्या कारणावरुन व विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी फाईल अजून पास केली नाही या कारणावरुन, तक्रारकर्त्यास अनेकवेळा वापस / परत पाठविले. त्यामुळे तक्रारकर्ते त्रस्त झाले होते. या दरम्यान तक्रारकर्ते यांना त्यांच्या शाळेच्या पतसंस्थेकडून दोन चाकी वाहन घेण्याकरिता कर्ज मिळाले. त्यानंतर तक्रारकर्ते यांनी वाहन क्र. एम.एच./37/पी-4809 हे वाहन दिनांक 14/02/2014 रोजी श्रीराम सिटी फायनान्स व्दारे घेतले. असे असतांना, विरुध्द पक्ष क्र. 2 यांनी बळाचा वापर करुन, अनधिकृतपणे व बेकायदेशिरपणे गाडीची चावी मागीतली व वाहन घेवून गेले. तक्रारकर्ते सदर वाहन परत मागण्यास गेले असता, त्यांनी ते कर्जापोटी जप्त केले, असे सांगितले व हर्रास केल्याचे पण सांगितले. पण त्याबाबतीत कोणतेही विवरण, लेखी अथवा तोंडी दिले नाही, परंतु आलेली रक्कम कर्जापोटी कर्जखात्यात जमा केली, असे तक्रारकर्त्याला सांगितले. हे एैकून तक्रारकर्त्याला मानसिक धक्का बसला व तो गंभिर आजारी झाला. यानंतर दिनांक 17/03/2016 रोजी विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी तक्रारकर्त्याला नोटीस पाठवून असे कळविले की, तक्रारकर्ते यांनी त्यांच्या कार्यालयातून जी गाडी क्र. एम.एच./37/पी-5545 त्यांच्याकडून कर्ज घेवून घेतली असून, गाडीची विक्रीची रक्कम वजा जाता रुपये 23,189/- ईतकी रक्कम तक्रारकर्त्याकडे बाकी असल्याचे दर्शविले आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याची तब्येत अधिक बिघडली. विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी दुसरी नोटीस वकिलामार्फत पाठवली व त्यात तक्रारकर्त्याचे कोरे धनादेश जे विरुध्द पक्षाकडे होते, ते बॅंकेत लावून, धनादेश अनादरीत झाल्याबद्दल कळविण्यात आले. वास्तविक तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 कडून कोणतेही दोन चाकी वाहन घेण्याकरिता कर्ज घेतलेले नव्हते. तरी विरुध्द पक्षाने असे कृत्य केले व तक्रारकर्त्याच्या त्यांच्याजवळ असलेल्या कागदपत्रांचा दुरुपयोग करुन, अनुचित व्यापार प्रथा अवलंबिली. तक्रारकर्त्याने नोटीस ऊत्तर पाठवलेले आहे, म्हणून प्रार्थनेनुसार तक्रार मंजूर करावी, अशी विनंती तक्रारकर्त्याची आहे.
2) यावर विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांचा युक्तिवाद असा आहे की, तक्रारकर्त्याने दुचाकी वाहनाकरिता कर्ज मिळण्याकरिता दिनांक 14/02/2015 रोजी कागदपत्रांसह विरुध्द पक्षाकडे अर्ज केला होता. कारण तक्रारकर्ता माहे ऑक्टोंबर 2014 मध्ये श्री. बालाजी होंडा अॅटोबाईक, वाशिम यांचे शो-रुम मध्ये आला व कर्जावर दुचाकी घेण्याची ईच्छा दर्शविली. त्यानुसार शोरुमचे कर्मचारी यांनी अधिकृत कर्ज देणा-या कंपनीची माहिती तक्रारकर्त्याला घेण्याचे सांगितले, त्यानुसार तक्रारकर्ता यांनी त्यांचे मर्जीनुसार श्रीराम सिटी फायनन्सची निवड केली व तक्रारकर्त्याने श्रीराम सिटी फायनन्सचे कर्मचारी यांचेशी संपर्क साधून चर्चा केल्यानंतर श्रीराम सिटी फायनन्सने कर्ज देण्याची संमती दर्शविल्यामुळे सदर दुचाकी वाहन तक्रारकर्त्याचे ताब्यात दिले. परंतु तक्रारकर्त्याची कर्जाची फाईल श्रीराम फायनन्सचे वाशिम येथे कार्यालयात गेली असता, तक्रारकर्ता हा श्रीराम फायनन्सचा थकबाकीदार ग्राहक आढळून आल्याने तक्रारकर्त्याची कर्ज केस मंजूर केली नाही. परंतु श्रीराम फायनन्स व ग्राहकावर विश्वास ठेवून श्री बालाजी होंडा यांचे अधिकारी यांनी मा. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, वाशिम यांचे कार्यालयात दिनांक 10/10/2014 रोजी तक्रारकर्त्याचे नावाने श्रीराम सिटी फायनन्सचे गहाण कर्जात सदर वाहनांची नोंदणी केली. परंतु, सदर वाहनांची नोंदणी केल्यानंतर सुध्दा श्रीराम सिटी फायनन्स, वाशिम यांनी कर्ज केस मंजूर न केल्यामुळे कर्जाची रक्कम रुपये 45,000/- मे. श्री बालाजी होंडा अॅटोबाईक वाशिम यांना अदा केली नाही. म्हणून शोरुम व्यवस्थापकाने तक्रारकर्त्याला समज देऊन तक्रारकर्त्याचे संमतीने कर्ज केस गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांचे फायनन्स कंपनीकडे दिली व कंपनीचे अधिकृत प्रतिनिधी मोसिम खान वाशिम यांनी बेरार फायनन्स व तक्रारकर्त्या सोबत सविस्तर चर्चा करुन दिनांक 14/02/2015 रोजी रितसर कायदेशीर करारनामा करुन घेतला व तक्रारकर्त्याच्या दुचाकी वाहन कर्जाची रक्कम रुपये 45,000/- मे. श्री बालाजी होंडा अॅटोबाईक वाशिम यांना अदा केली. परंतु सुरुवातीपासुनच तक्रारकर्ता यांनी कर्जाची परतफेड कंपनीचे नियमानुसार केली नाही, त्यामुळे कंपनीचे कर्मचारी यांनी तक्रारकर्त्याला वारंवार कर्ज मागणी सुचना देऊन सुध्दा तक्रारकर्ता यांनी या बाबींकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर कंपनी कर्मचारी यांनी तक्रारकर्त्याला कर्जाची थकीत रक्कम अदा करण्यास सुचना दिली असता, तक्रारकर्ता यांनी दुचाकी वाहन क्र. एम.एच./37/पी-4809 हे कंपनीचे कर्मचारी यांचे समर्पणाने ताब्यात दिले व वाहन विकून थकीत कर्जाची रक्कम वसूल करावी व उर्वरित थकीत रक्कम तक्रारकर्त्याकडून वसुल करावी असे सांगितले. त्यानुसार गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांचे कर्मचारी यांनी मे. श्री बालाजी होंडा अॅटोबाईक वाशिम यांचेकडून सदर वाहनाचा नोंदणी क्र. कळविण्यास सांगितले असता शोरुमचे कर्मचारी यांचे नजर चुकीने एम.एच./37/पी-5545 असा चुकीचा क्रमांक गैरअर्जदार क्र. 1 ला सांगितले असल्यामुळे चुकीचा नोंदणी क्रमांक असलेली परंतु वास्तवात एम.एच./37/पी-4809 क्रमांक असलेली दुचाकी वाहन कंपनीने दिनांक 17/03/2016 रोजी 25,000/- रुपयास विक्री केल्याबाबतव 23,189/- रुपये तक्रारकर्त्याकडे थकीत बाकी असल्याबाबतची नोटीस तक्रारकर्त्याला पाठविली व थकीत रक्कम अदा करणेबाबत व खाते बंद करण्यात कळविले होते. त्यानुसार तक्रारकर्ता यांनी दिनांक 16/05/2016 रोजी बेरार कंपनीचे नावाने 20,000/- रुपयाचा अलाहाबाद बॅंक शाखा रिसोडचा धनादेश दिला. व बॅंकेत धनादेश लावता क्षणी वटविला जाईल अशी हमी दिली त्यानुसार कंपनीचे कर्मचारी यांनी कंपनीच्या खाते असलेल्या बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखा वाशिम येथे वटविण्याकरिता सादर केला असता, तक्रारकर्त्याच्या बॅंकच्या खात्यात पुरेशी रक्कम नसल्याबाबतचे कारण दर्शवुन सदर धनादेश अनादरीत झाले बाबतची सुचना रिटर्न मेमोव्दारे बॅंकेने दिनांक 16/05/2016 रोजी गैरअर्जदार क्र. 2 यांचे कंपनीचे कर्मचारी यास दिली. सदर सुचनेनुसार गैरअर्जदार क्र. 1 यांनी दिनांक 04/06/2016 रोजी धनादेश अनादरणाची सुचना तक्रारकर्त्याला देऊन थकीत रक्कम मागणीची कायदेशीर नोटीस पाठविली. सदर नोटीस तक्रारकतर्याने दिलेल्या पत्यावर तक्रारकर्त्याला मिळाली परंतु तक्रारकर्त्याने थकीत रक्कम अदा करण्याची कोणतीही तसदी घेतली नाही, त्यामुळे नोटीस मिळाल्याचे 15 दिवसाचे कालावधीमध्ये तक्रारकर्त्याने रक्कम अदा केली नसल्यामुळे वि. न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी वाशिम यांचे न्यायालयामध्ये संक्षिप्त फौजदारी खटला धनादेश अनादरणाबाबतचा तक्रारकर्त्याने गुन्हा केला असल्यामुळे पराक्रम्ये दस्ताऐवज अधिनियमाचे कलम 138 अन्वये दाखल केला असुन सदरचे प्रकरण प्रलंबित आहे.
सदर प्रकरणामध्ये तक्रारकर्ता यांनी एका ठिकाणी असे कथन केले आहे की, सदर वाहन श्रीराम सिटी फायनन्स, वाशिम यांचे कडुन कर्जावर घेतले व दुस-या ठिकाणी शिक्षक पतसंस्थेकडून कर्जावरघेतले, असे विसंगत कथन केलेले आहे. परंतु वरील दोन्ही बाबींबाबत कोणत्याही प्रकारचे पुरावा सदृश्य दस्तऐवज दाखल केलेले नाही. तसेच श्रीराम सिटी फायनन्स, वाशिम यांनी तक्रारकर्ता हा आमचे कंपनीचा ग्राहक नसून चुकीने गहानखत नोंदविले असलेबाबत व गहानखत रद्द करण्यास कंपनीची हरकत नसलेबाबत मा. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, वाशिम यांना दिनांक 15/06/2016 रोजीचे पत्रान्वये सह फॉर्म नं. 35 ने कळविले आहे. व श्री बालाजी होंडा अॅटोबाईक वाशिम यांने सुध्दा वाहन क्र. एम.एच./37/पी-4809 हा नोंदणी क्रमांक असून एम.एच./37/पी-5545 असा क्रमांक कर्मचारी यांच्या नजरचुकीने गैरअर्जदार यांचे कंपनीला कळविण्यात आला असल्याबाबत व सदर वाहन कर्ज रुपये 45,000/- बेरार फायनन्स कंपनी कडून अदा करणे आल्याबाबत दिनांक 15/09/2016 रोजीचे पत्रान्वये कळविले आहे.
3) कारणे व निष्कर्ष ::
अशाप्रकारे उभय पक्षांचा युक्तिवाद आहे, यावर मंचाचे असे मत आहे की, तक्रारकर्त्याचे असे म्हणणे आहे की, त्यांनी विरुध्द पक्षाकडून सदर वाहन खरेदीकरिता कर्ज घेतलेलेच नाही. मग अशा परिस्थितीत तक्रारकर्ते विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 चे ग्राहक कसे होवू शकतात ? तक्रारकर्ते एका ठिकाणी म्हणतात की, त्यांना त्यांच्या शाळेच्या पतसंस्थेने कर्ज दिले तर दुसरीकडे म्हणतात श्रीराम सिटी फायनान्स कंपनीने कर्ज दिले. परंतु तक्रारकर्त्याने, श्रीराम सिटी फायनान्स कंपनीला, प्रकरणात पक्ष केले नाही, तसेच तक्रारकर्त्याने सदर वाहन जेथुन घेतले त्यांच्याकडील बील हा दस्त रेकॉर्डवर दाखल केला नाही. याऊलट विरुध्द पक्षाने जे दस्त रेकॉर्डवर दाखल केले जसे की, लेजर अकाऊंट, दिनांक 14/02/2015 चा तक्रारकर्त्याचा व विरुध्द पक्षाचा करारनामा प्रत, रिटेल पावती, श्रीराम सिटी फायनान्स NOC with Form No. 35, डिलर पत्र, तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडील EMI भरल्याच्या पावत्या, प्रमाणपत्र वगैरे, यातील कथनांवरुन मंचाला विरुध्द पक्षाच्या युक्तिवादात तथ्य आढळले आहे. तसेच मंचाला असे आढळले की, तक्रारकर्ते यांचे कथन असे आहे की, त्यांनी सदर वाहन हे दिनांक 14/02/2014 रोजी घेतले व विरुध्द पक्षाकडे त्यांना सदर वाहन खरेदीसाठी लोन मिळण्याबद्दलचा अर्ज हा दिनांक 14/02/2015 रोजी केला, यावरुन सुध्दा, तक्रारकर्ते यांचे कथन संशयास्पद वाटते. कारण यावरुन विरुध्द पक्षाच्या युक्तिवादाला पुष्टी मिळाल्यासारखे दिसते. सबब विरुध्द पक्षाने दाखल केलेल्या दस्तऐवजांवरुन तक्रारकर्ते यांची तक्रार सिध्द न होता उलट, तक्रारकर्ते मंचात स्वच्छ हाताने आले नाही, असे मंचाला वाटते. म्हणून तक्रारकर्ते यांची तक्रार खारिज करणे योग्य राहील, असे मंचाचे एकमत आहे.
सबब, अंतिम आदेश पारित केला तो पुढीलप्रमाणे.
अंतिम आदेश
- तक्रारकर्ता यांची तक्रार खारिज करण्यांत येते.
- न्यायिक खर्चाबाबत कोणताही आदेश पारित करण्यांत येत नाही.
- उभय पक्षांना या आदेशाच्या प्रती निशुल्क पुरवाव्या.
(श्री. कैलास वानखडे ) ( सौ. एस.एम. उंटवाले )
सदस्य. अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, वाशिम.
svGiri