(आदेश पारीत द्वारा- श्रीमती जयश्री येंडे, मा.सदस्या) -/// आ दे श ///- (पारीत दिनांक – 02 मे, 2011) तक्रारकर्तीने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अन्वये प्रस्तूत तक्रार मंचासमक्ष दाखल केली आहे. प्रस्तूत प्रकरणातील तक्रारकर्तीचे म्हणण्यानुसार तक्रारकर्तीने गैरअर्जदार यांच्या मौजा वडद, ता. उमरेड, जि. नागपूर. प.ह.नं.12, खसरा नं.155/1 या लेआऊटमधील भूखंड क्र.40, एकूण क्षेत्रफळ 1790 चौ.फुट एकूण रक्कम रुपये 2,32,700/- एवढ्या मोबदल्यात गैरअर्जदाराशी दिनांक 31/10/2008 रोजी सौदा केला. सदर भूखंडाचा सौदा करतेवेळी 25% रक्कम सुरुवातीला भरुन उर्वरित रक्कम 24 महिन्यांत किस्तीद्वारे भरावयाची असे उभय पक्षांत ठरले होते. उभय पक्षात झालेल्या करारानुसार तक्रारकर्तीने दिनांक 27/7/2010 पर्यंत सदर रकमेपैकी एकूण रक्कम रुपये 1,56,500/- गैरअर्जदारास अदा केली. तक्रारकर्तीचे मते सदर भूखंडाची विक्री करतेवेळी जे ब्रोशर दाखविण्यात आले त्यात प्रत्यक्षात विक्रीपत्र व करारनाम्यात विसंगती होती. गैरअर्जदाराने भूखंड बुकींग करतेवेळी ब्रोशरनुसार एक तोळा सोने मोफत द्यावयाचे कबूल करुनही तक्रारकर्तीस एक तोळा सोने दिले नाही. तसेच 21 आकर्षक ईनाम ड्राद्वारे मिळतील असे नमूद करुनही तक्रारकर्तीस एकदाही ड्राला बोलाविले नाही, अथवा त्याची माहिती दिलेली नाही. ब्रोशरमध्ये एनएटिपी (गैरकृषिकरण) मंजूर असा उल्लेख केलेला आहे, तर करारनाम्यात संपूर्ण लेआऊटची गैरकषीकरण करण्याची जबाबदारी ही गैरअर्जदाराची राहिल असे लिहिलेले आहे. गैरअर्जदाराने तक्रारकर्तीचे रुपये 1,56,580/- दोन वर्षे वापरले असून ही रक्कम व्याजासकट तक्रारकर्तीस परत केली नाही. वास्तविक सदर रक्कम देण्यासाठी तक्रारकर्तीने आपले सोने विकले व कर्ज घेतले, त्यामुळे तिला आर्थिक व मानसिक त्रास झाला. वरील सर्व बाबी लक्षात घेता, गैरअर्जदाराने तक्रारकर्तीस दिलेल्या सेवेत कमतरता दिलेली आहे म्हणुन तक्रारदाराने गैरअर्जदाराकडून रुपये 1,56,500/- द.सा.द.शे.24% दराने व्याजासहित देण्यात यावी, तसेच शारीरिक मानसिकत त्रासापोटी रुपये 50,000/- आणि दाव्याचे खर्चाबाबत रुपये 10,000/- मिळावेत म्हणुन सदरची तक्रार या मंचासमोर दाखल केली आहे. तक्रारकर्तीने सदर तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केलेली असून, सोबत आममुख्त्यापत्र, विक्रीपत्राचा करारनामा, लेआऊटचा नकाशा, प्रचारपत्रक, पैसे भरल्याच्या पावत्या, धनादेश, नोटीस व गैरअर्जदाराने नोटीसला दिलेले उत्तर इत्यादी दस्तऐवज मंचासमक्ष दाखल केलेले आहेत. सदर प्रकरणात गैरअर्जदार यांना मंचातर्फे रजीस्टर्ड पोस्टाने नोटीस बजाविण्यात आली, मात्र ते मंचासमक्ष हजर झाले नाहीत, वा त्यांचा लेखी जबाब सुध्दा त्यांनी दाखल केलेला नाही. म्हणुन सदर प्रकरण गैरअर्जदाराचे विरुध्द एकतर्फी चालविण्याचा आदेश मंचाने दिनांक 19/3/2011 रोजी पारीत केला. // का र ण मि मां सा // प्रस्तूत प्रकरणातील एकंदरीत वस्तूस्थिती पाहता, निर्विवादपणे तक्रारकर्तीने गैरअर्जदार यांच्या मौजा वडद, ता. उमरेड, जि. नागपूर. प.ह.नं.12, खसरा नं.155/1 या लेआऊटमधील भूखंड क्र.40, एकूण क्षेत्रफळ 1790 चौ.फुट एकूण रक्कम रुपये 2,32,700/- एवढ्या मोबदल्यात खरेदी करण्याचा गैरअर्जदार यांचेशी करार केला होता. सदर रकमेपैकी रक्कम रुपये 1,56,500/- तक्रारकर्तीने गैरअर्जदारास अदा केल्याची बाब देखील नोटीसचे उत्तरात गैरअर्जदाराने मान्य केलेली आहे. कागदपत्र क्र.40 वरील चेक तसेच कागदपत्र क्र.41 वरील गैरअर्जदाराने तक्रारकर्तीचे नोटीसला दिलेल्या उत्तराचे अवलोकन केले असता मंचाचे असे निदर्शनास येते की, तक्रारकर्तीचे विनंतीवरुन उभय पक्षात झालेला सदरचा करार रद्द करण्यात आला व गैरअर्जदाराने दिनांक 15/10/2010 रोजी तक्रारकर्तीची रक्कम रुपये 1,56,000/- चेकद्वारे तक्रारकर्तीस परत केली होती व तक्रारकर्तीने ती रक्कम कुठलिही अट न ठेवता स्विकारली होती ही बाब लक्षात घेता, तसेच उभय पक्षांत झालेला करार लक्षात घेता तक्रारकर्तीची सदर रकमेवर व्याजाची मागणी या मंचास मान्य करता येणार नाही. परंतू कागदपत्र क्र.22 वरील ब्रोशर (माहितीपत्रक) लक्षात घेता सदर भूखंडाचे बुकींगचे वेळी एक तोळा सोने मोफत मिळेल असे आश्वासन गैरअर्जदार यांनी दिलेले होते. तक्रारकर्तीने सदरचा भूखंड आरक्षित (बुकींग) करतेवेळी गैरअर्जदाराने तक्रारकर्तीस एक तोळा सोने द्यावयास पाहिजे होते ते त्यांनी तक्रारकर्तीस दिले नाही. माहितीपत्रकाद्वारे आश्वासन देऊनही एक तोळा सोने न देणे ही गैरअर्जदाराची कृती अनुचित व्यापारी प्रथेत मोडते असे या मंचाचे मत आहे. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. -/// अं ती म आ दे श ///- 1) तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2) गैरअर्जदार यांनी तक्रारकर्तीस एक तोळा प्रमाणित साने द्यावे. 3) गैरअर्जदार यांनी तक्रारकर्तीस दाव्याचे खर्चापोटी रुपये 2,000/- (रुपये दोन हजर फक्त) द्यावेत. 4) गैरअर्जदार यांनी उपरोक्त आदेशाचे पालन त्यांना आदेशाची प्रत प्राप्त झाल्याचे दिनांकापासून तीस दिवसाचे आत करावे.
| [HONABLE MRS. Jayashree Yende] MEMBER[HONORABLE Shri V. N. Rane] PRESIDENT | |