जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
तक्रार क्रमांक 825/2010
तक्रार दाखल करण्यात आल्याची तारीखः-11/06/2010.
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 30/10/2013.
श्री.अशोक तुकाराम पाटील,
उ.व.सज्ञान, धंदाः वकीली,
रा.सावकारे बिल्डींग, नवीन स्टेट बँकेसमोर,
भुसावळ,जि.जळगांव. .......... तक्रारदार.
विरुध्द
1. बाटा शुज स्टोअर्स, व्दाराःमॅनेजर,
प्रमिला प्लाझा, राजमंदीर डिस्ट्रीब्युटर्स जवळ,
गांधी चौक,भुसावळ,जि.जळगांव.
2. बाटा इंडीया लि, व्दाराः जनरल मॅनेजर,
बाटा हाऊस, 418-02, गुडगांव, मेहरोली रोड,
गुडगांव, हरयाणा. ......... विरुध्द पक्ष
कोरम-
श्री.विश्वास दौ.ढवळे अध्यक्ष
श्रीमती पुनम नि.मलीक सदस्या.
तक्रारदारातर्फे श्री.ए.एस.शिरसाठ वकील.
विरुध्द पक्ष क्र.1 व 2 एकतर्फा.
निकालपत्र
श्री.विश्वास दौ.ढवळे, अध्यक्षः तक्रारदाराच खराब दर्जाचा बुट विक्री करुन दिलेल्या सेवेतील त्रृटीदाखल तक्रारदाराने प्रस्तुतचा तक्रार अर्ज या मंचासमोर दाखल केलेला आहे.
2. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की,
तक्रारदाराने दि.16/03/2010 रोजी गुढीपाडव्याचे दिवशी त्याचा मुलगा चेतन अशोक पाटील यांचेकरिता विरुध्द पक्ष क्र. 2 कंपनी उत्पादीत बुट अधिकृत विक्रेते विरुध्द पक्ष क्र.1 चे दुकानातुन शु पेअर आर्टीकल नं.8084974 प्रमाणे रक्कम रु.1,399/- किंमतीस खरेदी केला. सदर बुट खरेदीची विरुध्द पक्षाने तक्रारदारास रिसीट दिली. तक्रारदाराचा मुलगा पुणे येथे गेल्यानंतर बुटाचा नियमित वापर सुरु केल्यावर बुटचे पंजाचे वरच्या बाजुचे लेदर मटेरियल योग्य प्रमाणात काटलेले नसल्याने बुट त्या बाजुने निट शिवला न गेल्याने तो वरच्या बाजुने ज्वॉईंट मधुन फाटून पसरु लागला व पायात ग्रीप राहत नसल्याचे तक्रारदाराचे मुलाने तक्रारदारास कळविले. सदरची बाब तक्रारदाराने विरुध्द पक्ष क्र. 1 यांचे दुकानात जाऊन कळविली असता त्यांनी बुट घेऊन येण्याबाबत सुचित केल्यानुसार तक्रारदाराने त्याचे मुलाकडुन पुणे येथुन बुट मागवुन ते दि.25/03/2010 रोजी परत केले व बुट रिपेअर करुन न घेता त्याची रक्कम देण्याची विनंती केली असता विरुध्द पक्षाने तक्रारदारास अपमानास्पद वागणुक देऊन हाकलुन लावले. सबब दि.16/03/2010 रोजी तक्रारदार यांनी आर्टीकल क्र.8084974 प्रमाणे घेतलेले बुट बदलुन पुर्णपणे क्वॉलीटी असलेले बुट देण्याचे आदेश व्हावेत, तक्रारदाराचे मुलास बुट वापरता न आल्याने झालेल्या त्रासाची नुकसान भरपाई मिळावी, तक्रार अर्जाचे खर्चादाखल रु.10,000/- मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने केलेली आहे.
3. सदरची तक्रार दाखल करुन, विरुध्द पक्ष यांना ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 13(1) ब प्रमाणे नोटीसा काढण्यात आल्या. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 हे या मंचाची नोटीस मिळुनही याकामी हजर न झाल्याने त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश पारीत करुन तक्रार निकालासाठी घेतली.
4. तक्रारदार यांची तक्रार, त्यांनी दाखल केलेले कागदपत्रे, तसेच तक्रारदाराचे वकीलांचा युक्तीवाद इत्यादीचे सुक्ष्म अवलोकन केले असता न्यायनिवाडयासाठी पुढील मुद्ये उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालीलप्रमाणे देत आहोत.
मुद्ये उत्तर.
1. विरुध्द पक्षाने तक्रारदारास सेवा देण्यात त्रुटी केली
आहे काय ? होय.
2. तक्रारदार कोणता अनुतोष मिळणेस पात्र आहे अंतीम आदेशानुसार
5. मुद्या क्र. 1 – विरुध्द पक्ष क्र.1 कडुन खरेदी घेतलेले, विरुध्द पक्ष क्र.1 बाटा कंपनीने उत्पादीत केलेले बुट सदोष असल्यामुळे तक्रारदाराने व्यथीत होऊन प्रस्तुतचा तक्रार अर्ज या मंचासमोर दाखल केल्याचे सकृतदर्शनी दिसुन येते. तक्रारदाराने विरुध्द पक्ष क्र.2 उत्पादीत बुट त्यांचे अधिकृत विक्रेते विरुध्द पक्ष क्र.1 कडुन शु पेअर आर्टीकल क्र.8084974 अन्वये दि.16/03/2010 रोजी खरेदी केले त्याबाबतची पावती नि.क्र.3 लगत दाखल केलेली आहे. मुलाचे वापरासाठी खरेदी केलेले बुट एका महीन्यातच खराब झाल्यानंतर त्याबाबतची तक्रार ई-मेल व्दारे संबंधीत कंपनीला केल्याबाबतची ई-मेलची मेसेज प्रिंटची प्रत नि.क्र.3 लगत दाखल केलेली आहे. तक्रारदाराने विरुध्द पक्ष क्र.2 कंपनीकडे तक्रार करुनही त्याचे निराकरण न झाल्याने तक्रारदाराने सरतेशेवटी या मंचासमोर सदरची तक्रार दाखल केली. सदर तक्रारीकामी या मंचाने विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांना रजिष्ट्रर पोष्टाने नोटीसा पाठवुन व त्या विरुध्द पक्षांना मिळुनही ते याकामी गैरहजर राहीले. यावरुन विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांना तक्रारदाराची तक्रार एकप्रकारे मान्यच आहे असा निष्कर्ष निघतो. वरील एकुण विवेचन, तक्रारदाराची तक्रार, शपथपत्र, सोबत दाखल केलेले कागदपत्रे, तक्रारदाराचे वकीलांचा युक्तीवाद इत्यादी विचारात घेता विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी तक्रारदारास दोषयुक्त बुट विक्री करुन सदोष सेवा दिल्याचे निष्कर्षाप्रत आम्ही येत आहोत. यास्वत मुद्या क्र. 1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
6. मुद्या क्र. 2 - दि.16/03/2010 रोजी तक्रारदार यांनी आर्टीकल क्र.8084974 प्रमाणे घेतलेले बुट बदलुन पुर्णपणे क्वॉलीटी असलेले बुट देण्याचे आदेश व्हावेत, तक्रारदाराचे मुलास बुट वापरता न आल्याने झालेल्या त्रासाची नुकसान भरपाई मिळावी, तक्रार अर्जाचे खर्चादाखल रु.10,000/- मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने केलेली आहे. तक्रारदाराने दि.16/03/2010 रोजी खरेदी केलेले बुट लगेचच एक महीन्यात खराब झाले व त्याबाबतची तक्रार केल्यानंतर ते दुरुस्त करुन अगर बदलुन देण्याचे औदार्यही विरुध्द पक्षाने दाखविलेले नाही त्यामुळे तक्रारदाराने सदर बुट खरेदीपोटी विरुध्द पक्ष क्र. 1 कडे भरणा केलेली रक्कम रु.1,399/- द.सा.द.शे.11 टक्के व्याजासह मिळण्यास तक्रारदार पात्र आहे. तसेच तक्रारदाराचे मुलास बुटाचा उपभोग घेता न आल्याने झालेल्या त्रासाचे नुकसान भरपाई दाखल रु.10,000/- व तक्रार अर्जाचे खर्चादाखल रु.5,000/- विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 कडुन वैयक्तीक अथवा संयुक्तीकरित्या मिळण्यास तक्रारदार पात्र आहे. सबब वरिल विवेचनावरुन आम्ही खालीलप्रमाणे आदेश देत आहोत.
आ दे श
1. तक्रारदाराचा तक्रार अर्ज मंजुर करण्यात येतो.
2. विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांना वैयक्तीक अथवा संयुक्तीकरित्या असे आदेशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारदारास बुट ची खरेदी किंमत रक्कम रु.1,399/- (अक्षरी रु.एक हजार तिनशे नव्याणऊ मात्र ) दि.16/03/2010 पासुन द.सा.द.शे.11 टक्के व्याजासह या आदेशाच्या प्राप्तीपासुन 30 दिवसांचे आंत द्यावेत.
3. विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांना वैयक्तीक अथवा संयुक्तीकरित्या असे आदेशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारदारास यांना नुकसान भरपाई दाखल रु.10,000/-(अक्षरी रु.दहा हजार मात्र ) व तक्रार अर्जाचा खर्च रु.5,000/- (अक्षरी रु.पाच हजार मात्र ) या आदेशाच्या प्राप्तीपासुन 30 दिवसांचे आंत द्यावेत.
ज ळ गा व
दिनांकः- 30/10/2013.
( श्रीमती पुनम नि.मलीक ) (श्री.विश्वास दौ.ढवळे )
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,जळगांव.