जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच लातूर यांचे समोर
ग्राहक तक्रार क्रमांक – 24/2012 तक्रार दाखल तारीख –16/02/2012
निकाल तारीख - 27/03/2015
कालावधी - 03 वर्ष , 01 म. 11 दिवस.
1) शशिकलाबाई बापुसाहेब बुके,
वय – 58 वर्षे, धंदा-शेती,
अधिकार पत्रान्वये
द्वारा
मेघराज बापुसाहेब बुके,
वय – 35 वर्षे, धंदा – शेती,
रा. शिवणी (ब्रु), ता. औसा,
जि. लातुर.
2) मेघराज बापुसाहेब बुके,
वय – 35 वर्षे, धंदा - शेती,
रा. शिवणी (ब्रु), ता. औसा,
जि. लातुर. ....अर्जदार
विरुध्द
1) बसंत अॅग्रोटेक इंडिया लि.,
भारतीय भुवन, पंचायत समिती समोर,
अकोला 444004.
2) प्रोपरायटर,
जागृती कृषी सेवा केंद्र,
महाबीज बियाणांचे अधिकृत विक्रेते,
गुळ मार्केट, लातुर. ..गैरअर्जदार
को र म - श्रीमती ए.जी.सातपुते, अध्यक्षा.
श्री अजय भोसरेकर, सदस्य
श्रीमती रेखा जाधव, सदस्या.
तक्रारदारातर्फे :- अॅड. अनिल क. जवळकर.
गैरअर्जदार क्र. 1 तर्फे :- अॅड.आशिष बाजपाई.
निकालपत्र
(घोषितव्दारा - श्रीमती ए.जी.सातपुते, मा.अध्यक्षा )
अर्जदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे गैरअर्जदारा विरुध्द दाखल केली आहे.
अर्जदार हे मौजे शिवणी (ब्रु) येथील रहीवाशी असुन, अर्जदारांचे कुटुंबात अर्जदार क्र. 1 यांच्या नावे गट नं. 229 मध्ये 6 हेक्टर 13 आर एवढी शेतजमीन आहे. अर्जदार क्र. 2 यांच्या नावे गट क्र. 228 मध्ये 5 हेक्टर 40 आर एवढी शेतजमीन आहे. गैरअर्जदार क्र. 2 यांनी अर्जदार क्र. 2 यास सांगितले की, गैरअर्जदार क्र. 1 च्या कंपनीत तयार होणा-या सोयाबीन या बियाणाची भरपुर शेतक-यांनी खरेदी केली आहे. त्यामुळे तुम्ही सुध्दा हे बियाणे घ्या असे खात्रीपुर्वक सांगितल्यामुळे अर्जदार क्र. 2 यांनी दि. 06/07/2011 रोजी सोयाबीन या बियाणाच्या एकुण 14 पाकीट, प्रति पाकीट 1,300/- या प्रमाणे एकुण रु. 18,200/- नगदी दिले.
गैरअर्जदार क्र. 2 यांनी अर्जदारास एकुण 14 पाकीटापैकी 10 पाकीट सोयाबीन याचा लॉट क्र. 8464 व 4 पाकीट सोयाबीन याचा लॉट क्रं. 8470/- चे दिले. गैरअर्जदार क्र. 2 यांनी अर्जदार क्र. 2 यांचेकडुन रक्कम मिळाल्याबाबत दि. 06/07/2011 रोजीचे बिल क्र. 309 दिले. अर्जदार क्र. 2 यांनी पेरणी योग्य रान तयार करुन जमीनीत पुरेसा ओलावा आहे याची खात्री करुन घेऊनच दि. 08/07/2011 रोजी अर्जदार क्र. 1 च्या शेतीत 10 एकर क्षेत्रात व अर्जदार क्र. 2 च्या 4 एकर क्षेत्रात एकरी एक बॅग या प्रमाणे योग्य त्या खोलीवर पेरणी केली. अर्जदाराने पेरणी केल्यानंतर 8 ते 10 दिवसातच अर्जदारास दिसुन आले की, अर्जदारांनी पेरणी केलेल्या सोयाबीनच्या दोन्ही क्षेत्रात अत्यंत तुरळक जवळपास नाही असेच उगवण झालेले आढळुन आले आहे.
अर्जदारांनी प्रत्यक्ष शेतीतील सोयाबीन या बियाणाची उगवण न झाल्यामुळे ताबडतोब गैरअर्जदार क्र. 2 यांना कळविले. अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांच्या प्रतिनिधीची वाट पाहिली. अर्जदारांना असे दिसुन आले की, गैरअर्जदारांना वेळोवेळी बियाणे न उगविल्याबद्दल वेळोवेळी कल्पना देऊनही प्रत्यक्ष शेतावर येऊन पाहणी करत नाहीत. कृषी अधिकारी यांनी केलेल्या दि. 21/07/2011 च्या पाहणीवरुन त्यांनी तपासणी अहवाल तयार केला. अर्जदाराने दि. 11/08/2011 रोजी गटविकास अधिकारी पंचायत समिती औसा यांना लेखी पत्र देवून तपासणी अहवालाची मागणी केली. त्या अनुषंगाने दि. 18/08/2011 रोजी गटविकास अधिकारी पंचायत समिती औसा यांनी अर्जदारांना तपासणी अहवाल दिला. अर्जदार क्र. 1 च्या शेतात एकुण उगवण टक्केवारी 8 टक्के व अर्जदार क्र. 2 यांच्या शेतात एकुण उगवण टक्केवारी 14 टक्के झाली आहे. असा अहवाल उल्लेख करुन सदरच्या तपासणी अहवालावर गटविकास अधिकारी पंचायत समिती औसा व त्यांच्या सदस्यांनी सहया केल्या.
सदरचे बियाणे अर्जदारांनी दि. 29/08/2011 रोजी गव्हर्नमेंन्ट ऑफ महाराष्ट्र डिपार्टमेंट ऑफ अॅग्रीकल्चर सिड टेस्टींग लॅबरोटरी परभणी येथे तपासणीसाठी दिले. दि. 22/09/2011 रोजी सिड टेस्टींग लॅबरोटरी अर्जदारास बियाणाचा रिपोर्ट दिला. सदरच्या रिपोर्टमध्ये 70 टक्के बियाणे हे मृत झालेले आहेत असा उल्लेख केला. कंपनीच्या नियमाप्रमाणे व अर्जदाराच्या अंदाजाप्रमाणे अर्जदारांना 1 एकर क्षेत्रातुन 15 क्विंटल उत्पन्न मिळणार होते. पण गैरअर्जदारांच्या दोषयुक्त बियाणामुळे अर्जदारांना ते मिळाले नाही. त्यामुळे अर्जदार क्र. 1 च्या 10 एकर क्षेत्रातुन किमान 150 क्विंटल सोयाबीन मिळाले असते. अर्जदार क्र. 1 चे 150 क्विंटलचे नुकसान झाले आहे. अर्जदार क्र. 1 यांनी सदरचे उत्पन्न मिळवण्यासाठी खालीलप्रमाणे खर्च केला.
मेहनत मशागत प्रति एकरी रु. 1,200/-
बियाणे खरेदी रु. 1,300/-
खते खरेदी रु. 500/-
रु. 3,000/-
अर्जदाराने एकुण 10 एकर क्षेत्रासाठी प्रति एकरी रु. 3,000/- या प्रमाणे एकुण रु. 30,000/- खर्च आला. अर्जदार क्र. 1 यास एकुण 150 क्विंटल उत्पादन मिळणार होते. प्रति क्विंटल रु. 2,350/- या प्रमाणे 150 क्विंटलचे रु. 3,52,500/- मिळणार होते व अर्जदार क्र. 1 ने केलेला खर्च रु. 30,000/- वजा जाता अर्जदार क्र. 1 चे निव्वळ नुकसान रु. 3,22,500/- झालेले आहे.
अर्जदार क्र. 2 यांनी सदरचे उत्पन्न मिळवण्यासाठी खालीलप्रमाणे खर्च केला.
मेहनत मशागत प्रति एकरी रु. 1,200/-
बियाणे खरेदी रु. 1, 300/-
खते खरेदी रु. 5,00/-
रु. 3,000/-
अर्जदाराने एकुण 4 एकर क्षेत्रासाठी प्रति एकरी रु. 3,000/- या प्रमाणे एकुण रु. 12,000/- खर्च आला. अर्जदार क्र. 2 यास एकुण 60 क्विंटल उत्पादन मिळणार होते. प्रति क्विंटल रु. 2,350/- या प्रमाणे 60 क्विंटलचे रु. 1,41,000/- मिळणार होते व अर्जदार क्र. 2 ने केलेला खर्च रक्कम रु. 12,000/- वजा जाता अर्जदार क्र. 2 चे निव्वळ नुकसान रु. 1,29,000/- झालेले आहे.
गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी दोन्ही अर्जदारांचे नुकसान झालेले रक्कम रु. 4,51,500/- व त्यावर बियाणे खरेदी केलेल्या तारखेपासुन 15 टक्के दराने व्याज संपुर्ण रक्कम मिळेपर्यंत देण्याचा आदेश करण्यात यावा. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी अर्जदारास झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु. 20,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु. 10,000/- असे एकुण रक्कम रु. 30,000/- देण्याचा आदेश करण्यात यावा.
गैरअर्जदार क्र. 1 यांच्या म्हणण्यानुसार गैरअर्जदार ही उत्तम व दर्जेदार बियाणे तयार करणारी कंपनी असुन, सदरहु तक्रारीमधील सोयाबीन बियाणे बीज प्रमाणिकरण यंत्रणेद्वारा प्रमाणित झाल्यानंतर वितरीत करण्यात आले होते, असे या ठिकाणी विशेषत्वाने नमुद करण्यात येते. अशा प्रकारे प्रमाणित करुन मिळालेलेच बियाणे टॅग सीलसह विक्रेत्यास वितरीत करण्यात आल्याने या गैरअर्जदाराविरुध्द बियाणाच्या प्रतीबद्दल कोणताही वाद तक्रारकर्त्यास या गैरअर्जदाराविरुध्द करता येत नाही. अर्जदाराने तक्रारीमध्ये सोयाबीन जे.एस.335 लॉट नं. 8464 व 8470 मधील अ.क्र.4 पिशव्या व 10 पिशव्या खरेदी केल्या असे नमुद केले आहे. परंतु या एकुण 14 पिशव्या पैकी सोयाबीन विक्रांत जे बिलामध्ये नमुद केले आहे. त्याचा लॉट क्र. नमुद केला नाही. त्यामुळे सदरहु तक्रार मुळातच खोटया तथ्यावर आधारीत असल्याचे निदर्शनास येते, व त्या कारणास्तव खारीज होण्यास पात्र ठरते. अर्जदाराचे तक्रार ग्रस्त क्षेत्राची तक्रार निवारण समितीद्वारा प्रत्यक्ष तपासणी केली असता तपासणी पंचनामामध्ये सोयाबीनचे पेरणी क्षेत्र अर्जदार क्र. 1 चे 5.50 एकर व क्र. 2 चे 8 एकर असे एकुण 13.50 एकर क्षेत्र नमुद केले आहे. सबब उर्वरीत 6.50 एकर (एकुण 21 एकर वजा 13.50 एकर) क्षेत्रांमध्ये कोणत्या बियाणाचा पेरा होता व त्यापासुन कीती उत्पन्न झाले त्याचा तपशिल नमुद केलेला नाही. तक्रार निवारण समितीद्वारा क्षेत्रीय तपासणी होताना इतर संबंधित शेतक-यांनी या लॉटचे बियाणे पेरले असल्यास त्यांच्या क्षेत्राची सुध्दा पहाणी करणे अनिवार्य आहे. अर्जदाराचे दि. 13/10/2011 रोजी कृषी अधिकारी, लातुर यांना पत्र पाठवुन गटविकास अधिकारी, पंचायत समिती, औसा यांनी जो अहवाल दिला तो अपुर्ण व त्रुटी असलेला असल्याने त्रुटी नसलेल्या अहवालाची प्रत देण्याकरीता विनंती केली आहे. अर्जदाराने श्री. मेघराज बापुसाहेब बुके यांना वर्ष 2010-11 मध्ये सोयाबीनेचे 58.75 क्विंटल उत्पन्न झाल्याचे कृषी उत्पन्न बाजार समिती, लातुर यांचे दि. 09/02/2011 चे बिल संलग्न केले आहे. त्यामधील सोयाबीन विक्री बियाणाचा रु. 2350/- प्रति क्विंटलचा दर या वर्षीचे काल्पनीक उत्पन्न 150 क्विंटल व 60 क्विंटल यास गृहीत धरुन क्लेम केलेला आहे.
अर्जदाराचे तक्रारी मधील सोयाबीन जे.एस. 335 लॉट क्र. 8470 चे सॅम्पल उपविभागीय कृषी अधिकारी, लातुर यांनी लातुर मार्केट मधील गणेश ट्रेडींग कंपनी यांचे दुकानातुन दि. 14/06/2011 रोजी काढुन शासकीय बिजपरीक्षण प्रयोगशाळेतुन तपासणी केली असता सदर बियाणे 77 टक्के उगवण शक्ती असल्याचा रीपोर्ट दिलेला आहे. याबाबत पंचनाम्यामध्ये पेरणीनंतर पाणी किती वेळा व केव्हा दिले या रकान्यामध्ये नाही असे नमुद करण्यात आलेले आहे. तक्रार खर्चासहीत खारीज करुन गैरअर्जदारस झालेल्या मानसिक त्रासाबद्दल रु. 10,000/- अदा करण्याचे आदेश देण्यात यावे.
मुद्दे उत्तरे
- अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय
- गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत त्रूटी केली आहे काय ? अंशत: होय
- काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
मुद्दा क्र. 1 चे उत्तर होय असून, अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे. त्याने गैरअर्जदार क्र. 2 च्या दुकानातुन दि. 06/07/2011 रोजी सोयाबीन लॉट क्र. 8464 व 8470 असे दोन प्रकारचे लॉट अर्जदाराने 8464 लॉटचे 10 नग रु. 1300/- प्रति बॅग रु. 13000/- चे व लॉट क्र. 8470 चे 4 नग रु. 1300/- प्रमाणे रु. 5200/- चे खरेदी केले होते. एकूण – 18,200/- माल अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 2 कडुन विकत घेतल्यामुळे अर्जदार हा गैरअर्जदारक्र. 2 चा ग्राहक होतो.
मुद्दा क्र. 2 चे उत्तर अंशत: होय असुन, अर्जदाराने शेतात गट क्र. 229 मध्ये सोयाबीन 8470 लॉट क्र. बियाणे दि. 08/07/2011 रोजी अर्जदार क्र. 1 च्या शेतीत 10 एकर क्षेत्रात व अर्जदार क्र. 2 च्या 4 एकर क्षेत्रात एकरी एक बॅग या प्रमाणे योग्य त्या खोलीवर पेरणी केली. परंतु उगवण तुरळक झाली, म्हणून त्यांनी गैरअर्जदार क्र. 1व 2 यांना तसे ताबडतोब कळवले. तसेच त्यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती औसा यांना देखील क्षेत्राची पाहणी करण्यासाठी यावे, पिकांची उगवण झाली नाही असे लेखी अर्ज दिला असता कृषी अधिकारी व इतर सदस्यांनी दि. 21/07/2011 रोजी अर्जदाराच्या प्रत्यक्ष शेतीत येऊन पाहणी केली. अर्जदाराने बियाणे खरेदीच्या पावत्या रिकाम्या बॅग व टॅग दाखविला सदरच्या कृषी अधिका-यांनी पंचनामा केला असता सदर पंचनाम्यानुसार सदर सोयाबीन जे.एस. – 335 या बियाणांची खरेदीची तारीख त्यावर दि; 08/07/2011 असून, लॉट क्र. 8470 विक्रांत याबद्दल नमुद केलेले असून, या अहवालावर सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांच्या सहया आहेत. मात्र एकाही कृषी अधिकारी व तत्सम अधिका-यांच्या सहया दिसुन येत नाही. सदरचा पंचनामा हा दि. 21/07/2011 रोजी मेघराज बापुसाहेब बुके याच्या गट क्र. 228 चा आहे. पेरणी क्षेत्रात 2 हेक्टर 20 आर असुन, मात्र त्याच पंचनाम्यावर 3 हेक्टर 20 आर लिहिलेले दिसुन येते. म्हणून विश्वासार्ह कागदपत्र नाही. 10 बॅग पेरणीसाठी वापरलेले बियाणे आहे. त्याचा दर प्रती बॅग रु. 250/- असा दिलेला आहे. पेरणी केल्यानंतर पाणी किती वेळेस व केव्हा दिले ? या प्रश्नावर उत्तर नाही असे पंचनाम्यात नमुद आहे. जमीनीची मशागत पेरणीपुर्वी ट्रॅक्टरने केलेली आहे. जमीनीची मशागत पेरणीपुर्वी ट्रॅक्टरने केलेली आहे. पेरणीचे अंतर 45 CM आहे. ओलीची खोली 11 से.मी व बियाणे खोली 4 से.मी आहे. जमीनीची प्रत भारी असून, माती भुसभुशीतआहे. यात केवळ 14 टक्के उगवण झालेली दिसुन येते. दुसरा पंचनामा हा अर्जदार क्र.1 चा असुन, तिचा गट क्र. 229 आहे. यावर देखील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व त्या गावातील नागरिक शिवणी यांच्या सहया आहेत. या अर्जदाराने बियाणे खरेदीची तारीख दि. 08/07/2011 असून, त्यावर खाडाखोड स्पष्ट होते बियाणांची जात सोयाबीन J.S- 335 असून लॉट क्र. 8464 असा आहे. अर्जदाराचे पेरणी क्षेत्र 1 हेक्टर 20 आर आहे. पेरणी दि. 10/07/2011 अशी आहे. पेरणी केल्यानंतर पाणी केव्हा व किती दिले ? उत्तर नाही असे आहे. बियाणे 4 से.मी असून ओलीची खोली 11 से.मी आहे. व 8 टक्के बियाणांची उगवण झाली आहे. हे दोन्ही कृषी अधिकारी व तत्सम अधिका-यांच्या निगराणीखाली हा पंचनामा व्हावयास हवा मात्र असे झालेले दिसुन येत नाही. तसेच सदरचा अहवालावर कोणत्याही मोठया अधिका-याच्या सहया नाहीत. तसेच सदर अहवालाचा निष्कर्ष नाही. तसेच बियाणे चाचणी अहवालावर देखील dead seed म्हणून 70 टक्के असे असून, त्याची जात ही J.S- 335 सोयाबीन याबद्दल आहे. व त्यावर मेघराज बुके यांचे नाव दर्शवलेले आहे. अर्थातच हा बियाणे अहवाल पाहता हा लॉट क्र. 8470 असा दिसतो. परंतु 8470 ची अर्जदार मेघराज याने केवळ 4 पोतेच बियाणे घेतलेले आहे. व अर्जदार क्र.1 ने लॉट क्र; 8464 चे सोयाबीन हे बियाणे घेतलेले आहे याचाच अर्थ 10 पोते बियाणे मेघराज बुके यांनी लावले त्यातील केवळ 4 पोते हे J.S-335, लॉट क्र. 8470 असा आहे. मग उरलेले 6 पोते हे 8464 चे दिसुन येतात व सदरचा dead seed चा रिपोर्ट देखील 8470 चा आढळून येतो. गैरअर्जदाराने दिलेल्या मुक्तता अहवाल हा दि. 08/04/2011 रोजीचा असून त्यानुसार 79 टक्के उगवण क्षमता दर्शवलेली आहे. 100 टक्के शुध्दता लॉट नं. 8470 बद्दलचा आहे. सोयाबीन J.S-335 चा दि. 08/04/2011 रोजीचा आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकातील ‘घ’ यात असे नमुद केलेले आहे. उगवण कमी झाली असल्यास ती बियाणाच्या दोषामुळे झाली की पेरणीच्या पध्दतीमुळे जमिनीच्या परिस्थितीमुळे ही कारणे नमुद करावीत. तसेच पेरणीपुर्वी पाऊस, प्रत्येक दिवसाचे पावसाचे प्रमाण काय होते, झालेला पाऊस, भीज पाऊस होता की जोराचा पाऊस असल्यामुळे उगवणीवर विपरीत परिणाम झाला. सदर चौकशी समितीस हजर बियाणे कंपनीचे प्रतिनिधी व विक्रेता यांना सदर तपासणी दौ-याचे वेळी उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात याव्यात तपासणीनंतर बियाणे प्रतिनिधी व शेतक-याची साक्ष घेणे बंधनकारक राहिल. सदरच्या पंचनाम्यावर बियाणे प्रतिनिधी हजर असल्याचे नमुद केलेले नाही. यावरुन सर्व कागदोपत्री पुरावा पाहता लॉट क्र. 8470 या बियाणांचा अहवाल गैरअर्जदाराने दिलेला दि. 08/04/2011 असून, अर्जदाराने बियाणे चाचणी अहवाल हा दि. 22/09/2011 चा दिलेला आहे. त्यावर अवलंबून राहता व अर्जदाराने ज्या लॉटचे बियाणे खरेदी केलेले पाहता फक्त 4 पोते मेघराज बुके याचे लॉट क्र. 8470 असून, ते त्याने गट क्र. 228 मध्ये लावलेले 10 बॅग असून, त्यातच लॉट क्र. 8470 विक्रांत लावलेल्या दिसुन येत आहेत. पंचनामे पाहता त्यावर अधिका-यांच्या सहया नाहीत, त्या सहया नाहीत म्हणून अर्जदारांनी गटविकास अधिकारी यांना पंचनाम्याची देखील कागदपत्रे मागितलेली आहेत. तरीही सुध्दा संपुर्ण अहवाल न्यायमंचा पुढे नसल्यामुळे व केसही अर्जदाराची पुर्णत: सिध्द होत नसल्यामुळे ती केवळ लॉट क्र. 8470 पुरतीच मर्यादीत अंशत: मंजुर करत आहोत. गैरअर्जदाराने 79 टक्के dead seed युक्त दि. 22/09/2011 च्या J.S-335 सोयाबीन 8470 च्या बियाणे प्रयोग शाळेचा रिपोर्ट पाहून आदेश खालील प्रमाणे देत आहे. श्री मेघराज बुके अर्जदार क्र. 2 यास गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी रु. 5200/- बियाणे खरेदीचे दयावेत. तसेच त्याला झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासापोटी गैरअर्जदार क्र. 1 व 2 ने रु. 5,000/- दयावेत. व दाव्याचा खर्च रु. 2,000/- दयावेत. अर्जदार क्र. 1 ची तक्रार रद्द करण्यात येत आहे. खर्चाबाबत आदेश नाही.
सबब हे न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करत आहे.
आदेश
1) अर्जदार क्र. 2 ची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येत आहे.
2) गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, अर्जदार क्र. 2 यांना रक्कम रु.
5200/-(अक्षरी पाच हजार दोनशे रुपये फक्त) आदेशाची प्रत प्राप्तीपासुन 30
दिवसाच्या आत देण्यात यावेत.
3) गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, आदेश क्र. 2 चे पालन मुदतीत
न केल्यास तक्रार दाखल तारखेपासुन त्यावर द.सा.द.शे. 9 टक्के व्याज
देण्यास जबाबदार राहतील.
4) गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, अर्जदार क्र. 2 यांना मानसीक व
शारिरीक त्रासापोटी रु. 5,000/- (अक्षरी पाच हजार रुपये फक्त) व तक्रारीच्या
खर्चापोटी रु. 2,000/-(अक्षरी दोन हजार रुपये फक्त) आदेशाची प्रत प्राप्तीपासुन 30
दिवसाच्या आत देण्यात यावेत.
5) अर्जदार क्र. 1 ची तक्रार रद्द करण्यात येत आहे. खर्चाबाबत आदेश नाही.
(श्री.अजय भोसरेकर) (श्रीमती ए.जी.सातपुते)
सदस्य अध्यक्षा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, लातूर.