::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये किर्ती गाडगीळ (वैदय) मा.सदस्या)
१. गैरअर्जदार यांनी, तक्रारदारांस ग्राहक संरक्षण अधिनियम अन्वये तरतुदीनुसार सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याने प्रस्तूत तक्रार दाखल केली आहे.
२. अर्जदार हा बँकेच्या नियमित ग्राहक आहे असून त्याचे बचत खाते क्रमांक ६००६३०९४५८० असा आहे. तक्रार करता हा दारिद्रय रेषेखाली नागरिक असून तो राजीव गांधी ग्रामीण विकास क्रमांक २ सुधारित घरकुल बांधकाम योजनेचा लाभधारक आहे अर्जदारास सदर योजने मार्फत राजीव ग्रामीण विकास क्रमांक २ सुधारीत बांधकाम योजने अंतर्गत रक्कम रु. १,००,०००/- चे कर्ज मंजूर झालेले होते. सदर कर्ज गैरअर्जदार क्रमांक १ च्या शाखेतून फेड होण्याचे होते. सदर योजनेची अंमलबजावणी संवर्ग विकास अधिकारी, पंचायत समिती चिमूर यांच्यामार्फत परीसरात राबवण्यात येत होती व योजनेच्या पूर्ततेसाठी लाभधारक घटकांना कर्जाऊ रकमेचे वितरण गैरअर्जदार क्रमांक १ चे शाखेतून केले जात होते. सदर योजनेनुसार अर्जदाराने आवश्यक ती संपूर्ण कार्यवाही मुदतीत पार पाडली. तसेच योजनेकरीता लागणारे गहाण खत गैरअजदार क्रमांक १ ला अर्जदाराने करून दिले तसेच गैरअर्जदार क्रमांक १ ने केलेल्या मागणीनुसार जामीनदाराची पूर्तता करुन अर्जदारला मंजुर झालेले कर्ज रक्कम रु. ९०,०००/- उचल करण्याकरीता वारंवार गैरअर्जदार क्र. १ कडे विनवणी केली. सदर कर्ज मंजुरीकरता आवश्यक असलेले गहाणखत अर्जदाराने दिनांक १७.०६.२०१५ रोजी करून दिले तसेच दिनांक १८.०६.२०१५ रोजी १ जामीनदार उपलब्ध करुन दिला. दिनांक १९.०६.२०१५ रोजी स्थानिक तीन वेगवेगळ्या बँकेचे ना-देय प्रमाणपत्र गैरअर्जदार क्र. १ कडे सादर केले. गैरअर्जदार क्र. १ च्या सांगण्यानुसार कर्जाचा हप्ता मिळण्याबाबत साध्या कागदावर लेखी अर्ज दिनांक २०.०६.२०१५ रोजी अर्जदाराने गैरअर्जदार क्र. १ कडे सादर केला त्यानुसार गैरअर्जदार क्र. १ ने दिनांक २२.०६.२०१५ रोजी अर्जदाराचे बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा चिमूर येथील खाते क्रमांक ६००६३०९४५८० मध्ये रक्कम रु. ४०,०००/- जमा करतो असे सांगितले. परंतु अर्जदाराच्या म्हणण्यानुसार रक्कम रु. ४०,०००/- जमा केली नाही. त्याबद्दल अर्जदाराने गैरहजर क्र. १ ला विचारले असता गैरअर्जदार क्र. २ यांच्या कार्यालयात हे प्रकरण पाठवलेले असून त्यांच्याकडून आठ ते दहा दिवसांत प्रकरण मंजूर होऊन आल्यानंतर अर्जदाराच्या खात्यात रक्कम जमा होईल असे उत्तर गैरअर्जदार क्र. १ ने सांगितले पुन्हा
आठ ते दहा दिवसानंतर अर्जदाराने चौकशी केल्यास गैरअर्जदार क्र. १ ने परत दुसरा जामीनदार आणण्यास अर्जदाराला सांगितले. उपरोक्त गैरअर्जदार क्र. १ ची वागणूक पाहून गैरअर्जदार क्र. १ हे अर्जदाराला मानसिक व शारिरीक त्रास देत आहे असे वाटल्यामुळे दिनांक १८.०८.२०१५ रोजी गैरअर्जदार क्र. २ च्या कार्यालयात जाऊन भेटला. गैरअर्जदार क्र. २ ने सुद्धा प्रकरणात आठ ते दहा दिवसात कळवतो असे अर्जदारास सांगितले. परंतु त्यानंतरही काहीही न झाल्यामुळे अर्जदार व्यथित होऊन सदर तक्रार महाराष्ट्र शासनाचे मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे लेखी तक्रार सादर केली त्यानंतर लगेच गैरअर्जदार क्र. १ ने कर्जाउ रकमेचा हप्ता अर्जदाराच्या खात्यात जमा केला. गैरअर्जदार १ व २ हेतुपुरस्पर त्यांच्या सेवेत खंड पाडीत असुन पर्याप्त सेवा देण्यास सपशेल अपयशी ठरले असे अर्जदारांचे म्हणणे असल्यामुळे तसेच योजनेनुसार तक्रारकर्त्यास रक्क्म रु. ९०,०००/- मंजूर करण्यात आले होते. परंतु नियमानुसार अर्जदाराने सर्व बाबींची पूर्तता केली असून सुद्धा गैरअर्जदार यांनी हेतुपुरस्पर पुरेशी सेवा अर्जदारास दिली नाही. त्यामुळे अर्जदाराने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केलेली आहे. अर्जदाराची मागणी अशी आहे की गैरअर्जदार क्र. १ व २ यांनी अर्जदारास त्रृटी व अनुचित व्यापार प्रथा अवलंबली आहे असे घोषित करावे तसेच अर्जदारास झालेल्या आर्थिक, शारीरिक, मानसिक भरपाईची मागणी खालीलप्रमाणे करीत आहे. अर्जदारास गैरअर्जदार क्र. १ व २ यांनी मानसिक त्रासाबद्दल रक्कम रु. २५,०००/-, शारिरीक त्रासाबद्दल रक्कम रु. २५,०००/- व प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी खर्च रु. १०,०००/- व तक्रारीस लागणारा खर्च रक्कम रु. २०,०००/- अर्जदारास देण्यात यावा.
३. अर्जदाराची तक्रार गैरअर्जदार क्र. १ व २ यांना मंचातर्फे नोटीस पाठवण्यात आले. सदर प्रकरणात गैरअर्जदार क्र. १ व २ यांना नोटीस प्राप्त होऊन दिनांक १६.०३.२०१६ रोजी गैरअर्जदार क्र. १ व २ यांनी त्यांचे वकिलामार्फत सदर तक्रारीत होउन त्यानंतर लेखी उत्तर दाखल करण्याकरीता वेळ मागीतला. परंतु गैरअर्जदार क्र. १ व २ यांनी प्रकरणात प्रकरणात उपस्थित होवुन सुध्दा लेखी उत्तर दाखल मुदतीत न केल्यामुळे सदर प्रकरण गैरअर्जदार क्र. १ व २ यांच्या लेखी उत्तराशिवाय पुढे चालविण्याचा आदेश दिनांक ०५.०५.२०१६ रोजी पारीत करण्यात आले. गैरअर्जदार क्र. १ व २ यांनी अर्जदारांनी केलेले आरोप खोडून काढून त्यांचे शपथपत्रात असे नमूद केले की, गैरअर्जदार क्र. १ यांनी अर्जदारास वरील उपरोक्त योजनेनुसार या दारिद्ररेषेखालील लाभार्थींना सदर सरकारी योजनेअंतर्गत घरकुल बांधण्याकरीता रक्कम रु. ९०,०००/- अटी व शर्ती सह मंजूर केले होते. त्याप्रमाणे गैरअर्जदार क्र. १ यांनी कर्जाची सदर रक्कम अर्जदार ह्यांना कर्जाचे सुरक्षा कागदपत्रे बॅंकेत गैरअर्जदार क्र. १ कडे त्यावर हस्ताक्षर करून तसेच इतर कागदपत्रांची पूर्तता करावयाची होती. यांनी गैरअर्जदार क्र. १ बँकेला सदर कर्जाची रक्कम घरकुल बांधकाम करतांना वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये अर्जदाराला उचल करायची होती. त्याकरीता अर्जदाराने पहिला हप्ता मिळण्याकरता लेखी स्वरुपात मागणी अर्ज गैरअर्जदार क्र. १ कडे सादर करणे आवश्यक होते. अर्जदार हे कर्जमंजुर झाल्यानंतर बँकेत बरेच दिवस आले नाही किंवा मागणीसुद्धा अर्जदाराने केली नाही तसेच कर्जाचे सुरक्षा कागदपत्र व दस्तावेज सुद्धा अर्जदाराने बँकेत येऊन भरून दिले नाही. त्यामुळे गैरअर्जदार क्र. १ हे सदर कर्जाचे वाटप करू शकत नव्हते. गैरअर्जदार क्र. १ यांनी वेळोवेळी अर्जदार यांना विचारणा केल्यानंतर अर्जदार यांनी दिनांक ०२.०९.२०१५ रोजी सदर मंजूर कर्जाच्या पहिला हप्त्याची उचल देण्याबद्दल लेखी मागणी अर्ज गैरअर्जदार क्र. १ कडे सादर केला व त्यानंतर गैरअर्जदार क्र. १ ने पुढील कारवाई करून दिनांक २६.१०.२०१५ रोजी सदर कर्जाचे सुरक्षा दस्तावेज व कागदपत्रे यामध्ये नामे डिमांड प्रॉमिसरी नोट व इतर कागदपत्रे यांच्याकडून भरून घेऊन नियमानुसार अंमलबजावणी करून घेतली. त्याच दिवशी दिनांक २६.१०.२०१५ रोजी सदर मंजूर कर्जाचा पहिला हप्ता रक्कम रु. ४०,०००/-अर्जदाराच्या बचत जमा केला व त्यांच दिवशी अर्जदार यांनी कर्जाच्या बॅकेतून रकमेची उचल केली. परंतु त्यानंतर आजपर्यंत अर्जदार यांनी उर्वरित कर्जाचा हप्ता मिळण्याबाबत गैरअर्जदार क्र. १ कडे कोणतीही मागणी अर्ज सादर केला नाही. त्यामुळे कर्जाचे पुढील हप्ते अर्जदार यांना देऊ शकत नाही. अर्जदार यांच्या मागणी नंतर बांधकामाची प्रत्यक्ष भेट तपासणी करुनच बँकेद्वारे कर्जाचा पुढील हप्ता देण्यात येतो. त्यानंतर पुढच्या हप्त्याकरीता बँकेच्या सुरक्षा कागदपत्रावर अर्जदाराचे हस्ताक्षर करून दिल्यानंतरच पुढील हप्ता देण्यात येतो. तसेच अर्जदाराच्या मागणी अर्जानंतर उर्वरित कर्जाचा हप्ता अर्जदार यांना देण्यास गैरअर्जदार क्र. १ आजही तयार आहे. सबब अर्जदार यांना कर्ज वाटप करण्याच्या सेवेमध्ये गैरअर्जदार क्र. १ व २ यांनी कोणतीही न्यूनता निर्माण केलेली नाही किंवा सेवेमध्ये कोणताही कसूर केलेला नाही. सबब अर्जदार यांनी केलेली सदर तक्रार खोटी व बनावट असल्यामुळे खारीज करण्यात यावी.
४. तक्रारदाराची तक्रार कागदपत्रे, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद, गैरअर्जदार यांचे कागदपत्रे, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद यांचे अवलोकन केले असता तक्रार निकाली कामी खालील मुद्दे कायम करण्यात येत आहे.
मुद्दे निष्कर्ष
१. गैरअर्जदार क्र. १ व २ यांनी कर्ज कराराप्रमाणे
सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याची बाब
तक्रारदार सिद्ध करतात काय ? होय
२. गैरअर्जदार क्र. १ व २ नुकसान भरपाई अदा
करण्यास पात्र आहेत काय ? होय
३. आदेश ? अंशत: मान्य
कारण मिमांसा
मुद्दा क्र. १ ते ३ बाबत :-
५. अर्जदार हा गैरअर्जदार क्र. १ च्या राजीव ग्रामीण विकास क्रमांक २ सुधारीत घरकुल बांधकाम योजनेचा लाभधारक असून अर्जदाराला सदर योजने अंतर्गत रक्कम रु. १,००,०००/- चे कर्ज मंजूर झालेले होते. ही बाब दोन्ही पक्षांना मान्य असून त्यासंबंधीचे दस्तऐवज प्रकरणात दाखला आहे. अर्जदार यांचे तक्रारीत म्हणणे आहे की, अर्जदार यांनी सदर योजनेनुसार सर्व दस्तावेजाची पूर्तता करून सुद्धा गैरअर्जदार क्र. १ व २ यांनी उपरोक्त कर्जाऊ रकमेचे वाटप वेळेत केले नाही. परंतु योजनेनुसार पहिला हप्ता रक्कम रु. ४०,०००/- दिनांक २६.१०.२०१५ रोजी गैरअर्जदार क्र. १ यांनी अर्जदाराच्या खात्यात जमा केला. अर्जदाराने त्या रकमेची उचलही केली याबाबत दस्तऐवज प्रकरणात दाखल असून ही बाब अर्जदाराला मान्य आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदाराला पहिल्या हप्त्याची रक्कम त्यांच्या खात्यात जमा केल्यानंतर अर्जदारांनी नियमानुसार दिनांक १५.१२.२०१५ रोजी दुसरा हप्ता मिळण्याप्रकरणी गैरअर्जदार यांना नियमानुसार अर्ज सादर केला. सदर अर्ज प्रकरणात दिनांक १४.०९.२०१७ रोजी अर्जदाराने दाखल केलेल्या यादीनुसार दस्त क्रमांक १ वर दाखल आहे. गैरअर्जदाराच्या शपथपत्रात असे कथन केले की, अर्जदार यांच्या मागणी अर्जानंतर तसेच दस्तऐवजाची पूर्तता केल्यानंतरच उर्वरित कर्जाचा हप्ता अर्जदार यांना देण्यास गैरअर्जदार तयार आहेत. अर्जदार व गैरअर्जदार यांच्या परस्पर विरोधी कथनावरून व दस्तावेजाचे अवलोकन केले असता, अर्जदाराच्या उपरोक्त योजनेचा दुसरा हप्ता मिळावा यासाठी गैरअर्जदार क्र. १ कडे अर्ज सादर केलेला असतांना ही गैरअर्जदार क्र. १ ने त्यानुसार रकमेचे वाटप अर्जदाराला का केले नाही याबद्दल गैरअर्जदाराने प्रकरणात कोणतेही कथन केलेले नाही किंवा दस्ताऐवज मंचात दाखल केलेले नाही. सबब, गैरअर्जदार क्र. १ व २ यांनी अर्जदाराला वेळेत सदर योजनेचे नियमानुसार कागदपत्रांची पूर्तता करून सुद्धा कर्जाची रक्कम न देऊन अर्जदाराप्रती न्यूनता या पद्धतीचा अवलंब केला आहे हे सिद्ध होत आहे. तसेच या आदेशान्वये गैरअर्जदार क्र. १ व २ यांना आदेशित केले जात आहे की, उपरोक्त योजनेच्या संदर्भात अर्जदाराने गैरअर्जदाराकडे केलेल्या मागणी अर्जानुसार दस्तावेजाची पूर्तता करून योजनेच्या अटी व शर्तीनुसार उर्वरीत रक्कम अर्जदाराला नियमानुसार देण्यात यावी. तसेच गैरअर्जदार क्र. १ व २ यांनी अर्जदाराला योजने अंतर्गत सदर रक्कम वेळेत न दिल्यामुळे अर्जदाराला मानसिक, शारीरिक त्रास सहन करावा लागला त्यापोटी गैरअर्जदार क्र. १ व २ यांनी रक्कम रु. २०,०००/- अर्जदारास द्यावे असा आदेश करणे योग्य राहील. सबब मुद्दा क्र. १ ते ३ च्या विवेचनावरून मंच खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
आदेश
१. ग्राहक तक्रार क्र. २३५/२०१५ अंशत: मान्य करण्यात येते.
२. गैरअर्जदार क्र. १ वे २ यांनी, अर्जदार यांना योजनेप्रमाणे कर्ज रक्कम वेळेत न दिल्याने, ग्राहक संरक्षण अधिनियम अन्वये तरतुदीनुसार सेवासुविधा पुरविण्यात कसुर केल्याची बाब जाहीर करण्यात येते.
३. गैरअर्जदार क्र. १ व २ यांनी अर्जदाराने दिलेल्या मागणी अर्जानुसार
तक्रारीत नमूद असलेल्या योजनेचा दुसरा हप्ता योजनेच्या नियमानुसार
अर्जदाराकडून दस्ताऐवजाची पुर्तता झाल्यानंतर या आदेश प्राप्तीच्या
दिनांकापासून ३० दिवसाच्या आत द्यावा.
४. गैरअर्जदारानी योजनेनुसार पहिला हप्ता अर्जदाराला वेळेत न दिल्यामुळे झालेल्या शारीरिक, मानसिक व आर्थिक नुकसान भरपाईपोटी रक्कम रु. २०,०००/- गैरअर्जदार क्र. १ व २ यांनी वैयक्तिक किंवा संयुक्तरीत्या अर्जदाराला या आदेश प्राप्ती दिनांकापासून ३० दिवसाच्या आत द्यावी.
५. न्यायनिर्णयाची प्रत उभय पक्षाना तात्काळ पाठविण्यात यावी
श्रीमती.कल्पना जांगडे श्रीमती. किर्ती गाडगीळ श्री.उमेश वि. जावळीकर
(सदस्या) (सदस्या) (अध्यक्ष)