ग्राहक तक्रार अर्ज क्र.८४/२०१८
तक्रार नोंद तारीख : १४/०५/२०१८
तक्रार दाखल तारीख : ११/०७/२०१८
निकाल तारीख : ०७/०६/२०१९
कालावधी : ० वर्षे १० महिने २६ दिवस.
…………………………………………
तक्रारदार तर्फे : अॅड.व्ही.पी.रावळ
जाबदार क्र.१ व २ : अॅड.बी.एस.जाधव
तक्रार ग्राहक संरक्षण अधिनियम कलम-१२ नुसार.
- आ दे श –
द्वारा : मा. अध्यक्ष – श्री मुंकुद बी. दात्ये (दि.०७/०६/२०१९)
तक्रारदाराने जाबदारांकडून मानसिक त्रासाबद्दल रु.३,०७,०००/-, तक्रार खर्च रु.७,०००/- मिळण्यासाठी ही तक्रार दाखल केली आहे.
२. तक्रारदारांचे थोडक्यात म्हणणे पुढीलप्रमाणे आहे,
तक्रारदार यांचा शेती हा व्यवसाय आहे. जाबदार क्र.१ बँकीग व्यवसाय करणारी राष्ट्रीयीकृत बँक आहे. जाबदार क्र.२ त्याच्यावर देखरेख करणारे क्षेत्रीय कार्यालय आहे. तक्रारदारांनी जाबदार क्र.१ कडे शेतजमीनीतील उभ्या पिकाच्या जोपासणीसाठी रु.३,००,०००/- पतमर्यादा कर्जाची मागणी केली. जाबदार क्र.१ ने कागदपत्रांची शहानिशा करुन रु.२,७२,०००/- पतमर्यादा २०१७-२०१८ सालासाठी मंजूर केली. रक्कम तक्रारदाराच्या बचतखाते क्र.६०२८७५१५१२० या बचतखात्यावर वर्ग करण्याचे मान्य केले. जाबदार क्र.१ ने ती रक्कम तक्रारदाराच्या निवृत्ती वेतन खात्यात दि.१४.०८.२०१७ ला वर्ग केली. तक्रारदाराने जाबदार क्र.१ कडे वेळोवेळी रु.१,५२,०००/- ची मागणी केली. जाबदार यांनी ७/१२ उता-यावर बँककर्ज नोंदवल्याखेरीज उर्वरीत रक्कम वितरण करता येत नाही असा नियम असल्याचे कळविले. दि.३१.१२.२०१७ ला जाबदार क्र.१ यांनी जाबदार क्र.२ यांचे सुचनेनुसार बचतखाते क्र.६०२८७५१५१२० मध्ये रु.१,५२,०००/- वितरीत केले.
३. ऊस तोडणीसाठी तयार झाला होता. त्यामुळे त्या रक्कमेचा उपयोग झाला नाही. तक्रारदार यांनी इतरत्र आर्थिक व्यवस्था करुन ऊसाची जोपासना करुन दि.०७.११.२०१७ पासून ऊस गळीतासाठी पाठविला. त्यामुळे तक्रारदारचे नुकसान झाले. कर्ज वितरण करताना कर्जदारास धनादेश पुस्तक देणे जाबदारवर बंधनकारक आहे. तक्रारदारांनी जाबदार यांना दि.२८.१०.२०१७ ला नोटीस पाठविली. जाबदारने पाकीट न स्विकारल्याने पाकीट परत आले. जाबदाराने मनमानी कारभार करुन नसलेला नियम दाखवून सेवेत त्रुटी केली. तक्रारदाराने तक्रार दाखल केली.
४. मंचाने तक्रार दाखल करुन घेतली. जाबदारास नोटीसा पाठविल्या. जाबदार क्र.१ व २ तर्फे मनोज रमेश लोखंडे, अॅड.बी.एस.जाधव यांचेमार्फत हजर झाले. त्यांनी तक्रारीस लेखी म्हणणे दिले. तक्रार चालण्यास पात्र नाही. तक्रारदारचे पती कर्जास जामीनदार आहेत त्यांना पक्षकार केले नाही असे ते म्हणतात. कर्ज खाते क्र.६०२८७५१५१२० खात्यात वर्ग करण्याचे मान्य केले होते हे त्यांनी नाकारले. रु.१,५२,०००/- तक्रारदार यांच्या सुचनेवरुन खाते क्र.६००९९४३३८६२ वर वर्ग केले. त्याची तक्रारदार यांनी पावती दिली आहे असे म्हटले आहे. रु.१,००,०००/- दि.१४.०८.२०१७ ला वर्ग केले. जुलै-ऑगस्टमध्ये ऊसाची लागवणी केली जाते, सप्टेंबरच्या शेवटच्या आठवडयापासून किंवा ऑक्टोबरमध्ये ऊस तोडणी चालू होती. ऑगस्टनंतर पीक जोपासणीसाठी कोणताही खर्च नसतो. तक्रारदार यास ७/१२ पत्रकी डिक्लेरेशन बोजाची नोंद करण्यास सांगितले होते. तक्रारदार यांनी ऊसपीक तोडणीस आल्यानंतर पीक कर्ज मागितले होते. तक्रारदार यांचे रु.३,०७,०००/- चे नुकसान झाले नाही. तक्रार रद्द करावी असे त्यांनी म्हटले.
५. तक्रार, कागदपत्र व जाबदारांचे म्हणणे यावरुन पुढील मुद्दे मंचाचे विचारार्थ उपस्थित होतील. त्यांची कारणासह उत्तरे पुढीलप्रमाणे आहेत.
क्र. | मुद्दे | उत्तरे |
१ | तक्रारदार हे जाबदार यांचे ग्राहक असल्याचे सिध्द करतात काय ? | होय. |
२ | जाबदार यांनी तक्रारदारास पीककर्जाचे वितरण वेळेवर न करुन सेवेत त्रुटी केली असे तक्रारदार सिध्द करतात काय ? | होय. |
३ | तक्रारदार हे जाबदार यांचेकडून नुकसानभरपाई रक्कम रु.३,०७,०००/-, तक्रार खर्च रु.७,०००/- मिळण्यास पात्र आहेत काय ? | अंतिम आदेशाप्रमाणे. |
४ | आदेश काय ? | तक्रार अंशत: मंजूर केली. |
कारणे
६. मुद्दा क्र.१:- तक्रारदार यांनी जाबदार क्र.१ यांचेकडून रु.३,००,०००/- पीककर्जाची मागणी केली. जाबदार क्र.१ ने रु.२,५२,०००/- मंजूर केले. ते जाबदार यांनी नाकारले नाही. तक्रारदार यांनी जाबदार क्र.१ बरोबर दि.२०.०७.२०१७ रोजी केलेल्या करारपत्राची प्रत दाखल केली आहे. कर्ज योजनेचे नाव “महाबँक किसान क्रेडीट कार्ड” असे होते. करारपत्राच्या कलम-५ प्रमाणे बँकेने दहा चेकचे चेक पुस्तक, क्रेडीट कार्ड किंवा कृषीपत पुस्तक द्यावयाचे होते. जाबदाराने तक्रारदारास कर्ज दिले. तक्रारदाराने जाबदारांकडून सेवा घेतली. जाबदार क्र.१ ही शाखा आहे. जाबदार क्र.२ हे अंचलीय कार्यालय आहे. तक्रारदार जाबदार यांचे ग्राहक होतात. मंच पहिल्या मुद्दयाचे होकारार्थी उत्तर देत आहे.
७. मुद्दा क्र.२:- जाबदार यांनी बचत खात्यात कर्ज जमा करावयाचे होते. त्यांनी रु.१,००,०००/- पेंन्शन खात्यात जमा केले व नंतर रु.१,५२,०००/- बचत खात्यात जमा केले आहे असे म्हटले. तक्रारदाराने त्यांच्या खाते क्र.६०२८८४७०१४१ या बचतखात्याचा खातेउतारा दाखल केला आहे. त्यामध्ये दि.१४.०८.२०१७ रोजी खाते क्र.६००९९४३३८६२ मधून रु.१,००,०००/- वळते केले असे दिसते व दि.१२.१०.२०१७ रोजी रु.१,५२,०००/- काढले असे दिसते. खाते क्र.६०२८७५१५१२० च्या उता-यावरुन दि.३१.१०.२०१७ ला रु.१,५२,०००/- जमा झाले असे दिसते. यावरुन दोन्हीं रक्कमा एका दिवशी जमा झाल्या नाहीत असे दिसते. ७/१२ उता-यावर नोंद झाल्याखेरीज दुसरा हप्ता देता येत नाही असे जाबदार यांनी म्हटले. कर्ज करारपत्रात तसे काहीही नमुद नाही. जाबदारांनी तसे दाखवणारा रिझर्व्ह बँकेचा नियम दाखवलेला नाही. कर्ज मंजूर केल्यानंतर ते एकदम देण्यास काहीच हरकत असण्याचे कारण नाही. ७/१२ उता-यावर कर्जाची नोंद करण्याचे काम कर्जदाराचे आहे असे जाबदार यांनी दाखवलेले नाही. जाबदार यांनी एका वेळेत पूर्ण कर्ज दिले नाही, कर्ज दोन वेगवेगळया खात्यात जमा केले, ते तक्रारदार यांच्या सांगण्यावरुन केले असे जाबदार म्हणतात. तसे दाखवणारा पुरावा नाही. म्हणजे सेवेत त्रुटी केली असे दिसते. मंच दुस-या मु्द्दयाचे होकारार्थी उत्तर देत आहे.
८. मुद्दा क्र.3:- जाबदार यांनी एक कर्ज ऑगस्टमध्ये व दुसरे कर्ज डिसेंबरमध्ये दिले. त्यामुळे रु.३,०७,०००/- चे नुकसान झाले असे तक्रारदार म्हणतात. उशिरा कर्ज मिळाल्यामुळे नुकसान झाले हे दाखवणे तक्रारदाराचे काम आहे. तक्रारदार यांनी कर्ज वितरणाबाबत व ऊस बिलाबाबत कागदपत्रे दाखल केली आहेत. त्यामध्ये ऊसाचे वजन, बिलाची रक्कम व फरकाची रक्कम असे लिहीले आहे. फरकाची रक्कम म्हणजे एकूण द्यावयाचे बिल व एकदा दिलेले बिल यातील फरक असे दिसते. ऑगस्टला कर्ज दिले असते तर जास्त ऊस आला असता व रु.३,०७,०००/- जास्त मिळाले असे हे दाखवणारा एकही कागद नाही. किंबहूना तक्रारदार यांनी दाखल केलेल्या बिलाच्या कागदपत्रांमध्ये रु.३,०७,०००/- हा आकडाच नाही.
९. कर्ज एका वेळेस न दिल्यामुळे ऊस कमी आला, जोपासणी झाली नाही असे तक्रारदार यांचे म्हणणेच नाही. तर जाबदार यांनी एकावेळेस कर्ज न दिल्यामुळे तक्रारदारास इतरत्र आर्थिक व्यवस्था करुन ऊस पीकाची जोपासना केली असे त्यांचे म्हणणे आहे. त्या व्यवस्थेस रु.३,०७,०००/- जास्त लागले असे तक्रारदार यांनी दाखविलेले नाही. दोन्हीं कर्ज ऑगस्ट व डिसेंबर २०१७ ला दोन्हीं कर्ज दिली. ऊस त्या अगोदरच्या वर्षात लावलेला असला पाहिजे. ऊस गळीपासाठी नोव्हेंबर २०१७ ला पाठविला. ऑगस्ट व डिसेंबरमध्ये कर्ज घेऊन जोपासणीत फरक पडला असता असे तक्रारदारांनी दाखवलेले नाही.
१०. तक्रारदारास जाबदारांच्या चुकीमुळे काही नुकसान झाले असेल त्यासाठी मंच जाबदार क्र.१ व २ यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या रक्कम रु.१०,०००/- नुकसानभरपाई द्यावी असा निष्कर्ष मंच काढत आहे. तक्रारीचा खर्च जाबदार क्र.१ व २ यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या रु.३,०००/- द्यावेत असे मंच ठरवत आहे व या मुद्दयाचे अंतिम आदेशाप्रमाणे असे उत्तर देत आहे.
११. मुद्दा क्र.४:- जाबदार यांनी वेळेवर कर्ज न देऊन सेवेत त्रुटी केली हे तक्रारदार यांनी दाखवले आहे. नुकसान किती झाले हे निश्चितपणे सिध्द केलेले नाही. तक्रारदार नुकसानभरपाई म्हणून रु.१०,०००/- व तक्रारीचा खर्च रु.३,०००/- मिळणेस पात्र आहेत. तक्रार अंशत: मंजूर होईल. मंच या मुद्दयाचे तसे उत्तर देऊन पुढील आदेश करीत आहे.
आदेश
- तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते आहे.
- जाबदार यांनी तक्रारदाराचे कर्ज एकदम न देऊन सेवेत त्रुटी केली आहे.
- तक्रारदार यांना जाबदार क्र.१ व २ यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या शारिरीक व मानसिक त्रासापोटी रु.१०,०००/- तसेच तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रु.३,०००/- आदेशाची प्रत मिळाल्यापासून ३० दिवसांत द्यावेत.
- आदेशाची प्रत तक्रारदार यांनी जाबदार यांस ग्राहक सरंक्षण नियमावली २१ प्रमाणे विनामुल्य द्यावेत व तसे केल्याचे नियम- १८(६) नुसार या आदेशाखाली नमुद करावे.
-
जिल्हा-सांगली
दि. ०७/०६/२०१९