निकालपत्रः- श्री.ग.ल.चव्हाण, सदस्य ठिकाणः बांद्रा निकालपत्र तक्रारीचे संक्षिप्त स्वरुप खालीलप्रमाणेः- तक्रारदार हे सेवानिवृत्त राजपत्रित अधिकारी आहेत. ते सामनेवाला क्र.2 –बॅंक ऑफ महाराष्ट्राचे खातेदार आहेत. त्यांनी निवृत्तीवेतन या बँकेमार्फत देण्यासाठी खाते उघडलेले आहे. निवृत्तीवेतन खाते क्र.70751 असा आहे. सामनेवाले क्र.1 व 2 यांनी तक्रारदाराची डिसेंबर, 2010 चे निवृत्तीवेतन त्यांना देण्यास तोंडी नकार दिला असे तक्रारदाराने तक्रारीत नमूद केले आहे. यामध्ये सामनेवाले यांच्या सेवेत कमतरता असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. 2 तक्रारदार हे सन-1998 मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर सामनेवाले क्र.2 या बँकेत त्यांनी सेवानिवृत्त वेतन आहरण करण्यासाठी बचत खाते क्र.70751 उघडले, हे खाते आजतागायत अस्तित्वात आहे. तक्रारदाराच्या मोठया बंधूने मौजे वेलास, ता.मंडणगड, जि.रत्नागिरी या स्वग्रामी डोंगराळ भागातील दहा एकर जमीन खरेदी केली. तक्रारदाराच्या वडीलबंधूचे 1991 मध्ये हृदयविकाराने निधन झाले, त्यामुळे खरेदी केलेली जमीन पडीक स्वरुपात राहीली. तक्रारदार सेवानिवृत्त झाल्यानंतर त्या जमीनीमध्ये आंब्यांची झाडे लावण्याची योजना आखून 200 आंब्यांची झाडे लावली. या योजनेकरिता तक्रारदाराने सामनेवाले यांची आर्थिक मदत घेतली. त्यावेळी, सामनेवाले क्र.1 यांनी जमीनीच्या संदर्भातील आवश्यक ती कागदपत्रं तक्रारदाराकडून ताब्यात घेतली व रु.50,000/- ची आर्थिक मदत कर्जाच्या स्वरुपात केली व मुळ कागदपत्रं तक्रारदाराला परत केली. 3 तक्रारदाराने सामनेवाले यांचेकडे कॅशक्रेडीट खाते सुरु करायचे होते. त्याप्रमाणे, तक्रारदाराने सामनेवाले यांना पत्र दिले व सीसी-1 हे खाते सुरु केले. तक्रारदाराचे निवृत्तीवेतन खाते क्र.70751 व त्याचे वैयक्तिक खाते क्र.15560 या दोन खात्याचा व्यवहार तक्रारदाराला सीसी-1 मार्फत करायचा असल्याने त्याने तसे पत्र सामनेवाले यांना दिले. त्याप्रमाणे सामनेवाले यांनी सीसी-1 खात्याचे धनादेश पुस्तिका तक्रारदाराला दिली. तक्रारदाराला शासनाकडून मिळणा-या निवृत्तीवेतना व्यतिरिक्त उदरनिर्वाहासाठी अन्य साधन उपलब्ध नव्हते म्हणून तक्रार अर्जात नमूद केलेल्या त्यांच्या स्वग्रामी उत्पन्नाचा मार्ग म्हणून आंब्याची झाडे लावण्याची योजना तक्रारदाराने हाती घेतली. त्यानुसार, सात वर्षांपैकी मागील दोन वर्षांत तक्रारदाराला आंब्यांचे अल्प उत्पन्न मिळाले. अद्याप आंब्यांचा व्यापार वरील परिस्थितीत तक्रारदाराला करता आलेला नाही. तक्रारदाराने त्यांच्या आंब्याची झाडे लावण्याच्या योजनेसाठी सामनेवाले यांच्या आधार योजनेचा फायदा घेण्याचे ठरवून तसा अर्ज सामनेवाले यांचेकडे केला. त्याप्रमाणे, मागील वर्षी सामनेवाले यांनी रक्कम रु.50,000/- व्याजाने दिली. 4 सन-1998 पासून आजपर्यंत तक्रारदार हे त्यांच्या आजारपणामुळे आंतररुग्ण म्हणून वैद्यकीय सेवेखाली होते. तक्रार अर्जात नमूद केल्याप्रमाणे, त्यांच्या आजारपणात सामनेवाले यांच्या कर्मचा-यांकडून तक्रारदाराला सीसी-1 मधून रक्कमेची उलाढाल करण्याकरिता मदत झाली. तक्रारदाराच्या निवृत्तवेतन खात्यात रक्कम रु.10,500/- शिल्लक होते. त्या रक्कमेमधून रक्कम रु.7,000/- सीसी-1 खात्यामार्फत काढण्यासाठी तसा धनादेश सामनेवाले यांचेकडे पाठविला. परंतु सामनेवाले यांचेकडून धनादेशाचे रोखीकरण करण्याकरिता नकार देण्यात आला. तक्रारदाराला उदरनिर्वाहाचा खर्च भागविण्यासाठी सामनेवाले यांनी वंचित केले असे तक्रारदाराचे म्हणणे असून सामनेवाले यांची ही कृती योग्य नसून ही कृती सामनेवाले यांच्या सेवेत कमतरता दर्शविणारी आहे म्हणून तक्रारदाराने सामनेवाले क्र.2 यांना तशी कायदेशीर नोटीस दि.05.01.2011 रोजी पाठविली व नुकसान भरपाईपोटी रु.5,00,000/- मिळावेत अशी मागणी केली तसेच रक्कम काढून घेण्यासाठी जो धनादेश पाठविला होता, त्याप्रमाणे, रक्कम रु.7,000/- मिळावेत अशीही विनंती केली. सामनेवाले यांनी तक्रारदाराच्या मागणी धनादेशाप्रमाणे तत्काळ रक्कम दिलेली नाही, त्यामुळे तक्रारदाराला बराच मानसिक त्रास सहन करावा लागला, त्यामुळे नियमानुसार, सामनेवाले यांचेकडून याकरिता रक्कम रु.5,00,000/- मिळावेत अशी विनंती केली आहे. 5 तक्रारदार व सामनेवाले यांच्या मधील पत्रव्यवहार लक्षात घेता, तक्रारदार हे त्यांचे निवृत्तीवेतन खाते व वैयक्तिक खाते या दोन खात्यांचा व्यवहार ते सीसी-1 मधून करु इच्छित असल्यामुळे ते त्यांच्या आर्थिक व्यवहारासाठी सीसी-1 वर अवंलबून आहेत असे तक्रारदाराचे म्हणणे आहे. तक्रारदाराने सीसी-1 या खात्यात 3.30 लाख एवढी रक्कम ठेवलेली आहे. तक्रारदाराच्या सीसी-1 खात्यामधून जरी अधिकची रक्कम उचलण्यात आलेली असली तरी त्या रक्कमेची परतफेड तक्रारदार यांच्याकडून व्याजासहीत करण्यात येणार आहे, त्यामुळे सामनेवाले क्र.2 यांनी तक्रारदाराचे निवृत्तीवेतन अडवून ठेवले आहे. ही बाब बेकायदेशीर आहे, त्यामुळे नियमानुसार सामनेवाले अशी कृती करु शकत नाही, म्हणून त्यांच्या सेवेत कमतरता आहे. 6 तक्रारदाराचे असे म्हणणे आहे, त्यांनी सामनेवाले यांचेकडून घेतलेले कर्ज हे सव्याज परत करणार आहेत. त्यामुळे सामनेवाले यांनी निवृत्तीवेतन अडवून ठेवणे ही त्यांची चुकीची कृती असून त्यांनी तक्रारदाराच्या उदरनिर्वाहाच्या खर्चाच्या रक्कमेवर अकुंश लावून केलेली कृती नियमबाहय आहे, त्यामुळे तक्रारदाराला बराच मानसिक त्रास सहन करावा लागला. त्यांच्या हक्काच्या निवृत्तीवेतनापासून वंचित रहावे लागले. या अन्यायाबाबत न्याय मिळावा म्हणून शपथपत्रांसह तक्रारदाराने जानेवारी, 2011 तक्रार दाखल करुन खालीलप्रमाणे विनंत्या केलेल्या आहेत. 1 सामनेवाले यांच्या सेवेत कमतरता आहे हे घोषित करावे. 2 सामनेवाले यांनी रोखून ठेवलेले निवृत्तीवेतन खाते क्र.70751 ची रक्कम या पूर्वीप्रमाणे सीसी-1 खात्यातून मिळावी. 3 डिसेंबर, 2010 पासून सामनेवाले यांनी रोखून ठेवलेली निवृत्तीवेतनाची रक्कम मिळावी, याकरिता तसे कायमस्वरुपी आदेश सामनेवाले यांनी मंचाला द्यावेत. 4 सामनेवाले यांनी तक्रारदाराला मानसिक त्रास, छळ व अनुचित व्यापारी प्रथेकरिता रु.5,00,000/- ची नुकसान भरपाई मिळावी तसेच या अर्जाचा खर्च मिळावा व अन्य दाद मिळावी. 7 सामनेवाले यांनी कैफियत दाखल करुन तक्रार अर्जातील आरोप नाकारले. तक्रार खोटी बिनबुडाची, बेकायदेशिर व गैरसमजुतीवर आधारलेली आहे. त्यामुळे ती खर्चासह रद्द करण्यात यावी. सामनेवाले हे नियम व नियमावलीचे पालन करीत नाहीत हे तक्रारादाचे म्हणणे सामनेवाले यांनी नाकारले. सामनेवाले यांचे म्हणणे की, बँकेचे कामकाज हे नियमानुसार करण्यात येते व आवश्यक मदत व सहकार्य खातेदारांना देण्यात येते. सामनेवाले हे नियमानुसार काम करीत नाहीत याकरिता कोणताही कागदोपत्री पुरावा दिलेला नाही. सदरहू तक्रार ही या मंचासमोर चालणारी नाही, कारण तक्रारदार हे कायद्यातील तरतुदीनुसार ग्राहक नाहीत. तक्रारदार हे पारदर्शकपणे मंचासमोर चालेले नाहीत, त्यांनी ब-याच गोष्टी मंचापासून लपवून ठेवलेल्या आहेत. सीसी-1 या खात्याला अनुसरुन, तक्रारदाराच्या वयाचा विचार करुन त्यांना या प्रकरणी ब-याच सवलती देण्यात आलेल्या आहेत, त्याचा त्यांनी गैर फायदा घेतला. सामनेवाले हे बॅंकेच्या नियमानुसार, सेवा खातेदारांना देत असल्यामुळे त्यांच्या सेवेत कमतरता नाही. 8 तक्रारदाराच्या विनंतीनुसार, सामनेवाला यांचेकडून सीसी-1 खात्यानुसार, रक्कम रु.50,000/- चे कर्ज देण्यात आले. ही रक्कम सीसी-1 खात्यानुसार रु.3,00,000/- पर्यंत वाढविण्यात आली. या खात्याला अनुसरुन तक्रारदाराला तशी धनादेश पुस्तिका देण्यात आली. 9 तक्रारदाराच्या विनंतीनुसार, आधार कर्ज योजना मंजूर करण्यात आली व त्याप्रमाणे, रक्कम रु.50,000/- चे कर्ज देण्यात आले. या रक्कमेची परतफेड दरमहा रु.1,200/- प्रमाणे तक्रारदाराने करायची आहे, त्याप्रमाणे रु.35,000/- परत करावयाची आहे. 10 तक्रारदाराच्या विनंतीनुसार, सामनेवाले क्र.2 यांनी तक्रारदाराला रु.1,00,000/- चे वैयक्तिक कर्ज मंजूर केले, त्यापैकी दि.05.01.2011 रोजी शिल्लक कर्जाची रक्कम रु.67,460/- एवढी आहे. अटी व शर्तीनुसार या रक्कमेची परतफेड तक्रारदाराने करावयाची आहे. 11 तक्रारदाराचे सन-1998 पासून निवृत्तीवेतन खाते सामनेवाले यांचेकडे आहे. सन-2005 च्या जुलैपासून तक्रारदाराने या खात्यातून रक्कम काढून घेतलेली नाही आणि सीसी-1 मधून आर्थिक उलाढाल करत आलेले आहेत. तक्रारदाराने सामनेवाले यांना असे लेखी लिहून दिले आहे की, त्यांच्या निवृत्तीवेतन खात्यातील रक्कम सामनेवाले यांनी तक्रारदाराच्या सीसी-1 मध्ये हस्तांतरीत करावी व सीसी-1 मधून निवृत्तीवेतनाची रक्कम काढण्यात येईल. त्याप्रमाणे, सामनेवाले यांचेकडून कृती करण्यात आली असे त्यांनी कैफियतीत नमूद केले आहे. 12 तक्रारदाराला कॅश क्रेडीट फॅसीलीटी रु.3,00,000/- पर्यंत देण्यात आली आहे. यामध्ये वाढ करण्यात आलेली नाही. तरी देखील तक्रारदाराने या योजनेनुसार रु.16,000/- ची अधिकची रक्कम घेतलेली आहे. यामुळे तक्रारदाराने निवृत्तीवेतनाची रक्कम त्यांच्या निवृत्तीवेतन खात्यातून काढावी अशा त्यांना तोंडी सुचना देण्यात आल्या.तक्रारदाराच्या वयाचा विचार करता, त्यांना चांगली वागणूक सामनेवाले यांचेकडून देण्यात येते. तरी देखील तक्रारदार हे त्यांच्या निवृत्ती खात्यातून त्यांची देय रक्कम काढू इच्छित नाहीत, यासाठी सामनेवाले यांना जबाबदार धरता येणार नाही. कारण तक्रारदार हे सामनेवाले यांचेवर वजन वापरुन निवृत्तीवेतनाची रक्कम सीसी-1 खात्यातून काढण्यासाठी सामनेवाले यांना भाग पाडतात. ही तक्रारदाराची कृती योग्य नाही असे सामनेवाले यांचे मत आहे. 13 सामनेवाले यांचेकडे तक्रारदाराचे असलेल्या सीसी-1 खात्यामध्ये रु.16,000/- ची अधिकची रक्कम तक्रारदाराने घेतलेली असल्यामुळे या खात्यामधून रक्कमेची तक्रारदाराला उलाढाल करण्यास सामनेवाले क्र.2 यांना परवानगी देता येणार नसल्यामुळे तक्रारदाराने त्यांच्या निवृत्तीवेतनाची रक्कम त्यांनी निवृत्तीवेतनाच्या संबंधीत खात्यातून म्हणजे 70751 मधून काढावी अशा सुचना तक्रारदाराला देण्यात आल्या परंतु तक्रारदार तसे करण्यास तयार नाहीत म्हणून या प्रकरणी सामनेवाले यांच्या सेवेत कमतरता नाही असे त्यांचे म्हणणे आहे. तक्रारदाराने निवृत्तीवेतनाची रक्कम सीसी-1 मधून काढण्यासाठी सामनेवाले यांना भाग पाडण्याचा प्रयत्न केला परंतु वरील परिस्थितीत त्या खात्यातून रक्कम काढण्यासाठी सामनेवाले यांना परवानगी देता आली नाही यामध्ये त्यांची कृती चुकीची नाही. थोडक्यात, तक्रारदाराच्या तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे तक्रारदाराचे निवृत्तीवेतन खात्यातून त्यांनी रक्कम काढण्याकरिता सामनेवाले यांनी त्यांना मनाई केलेली नाही किंवा त्यांचे ते खाते गोठविलेले नाही, त्यामुळे संबंधीत तक्रारीत तथ्य नाही असे सामनेवाले यांचे म्हणणे आहे. 14 तक्रारदाराला सामनेवाले यांचेकडून देण्यात आलेल्या कॅशक्रेडिट फॅसिलीटीचा ते गैरवापर करत आहेत, ते त्याचा वापर एक हत्यार म्हणून करीत आहेत. याकरिता, ते सामनेवाले यांना धमकविण्याचाही प्रयत्न करीत आहेत हे बरोबर नाही. सामनेवाले यांचेकडे सार्वजनिक रक्कमेचा वापर करण्यात येत असल्यामुळे ही रक्कम कशी वापरण्यात यावी याबाबतची नियमावली असून प्रचलित नियमानुसार या सार्वजनिक रक्कमेचा वापर कसा करावा याकरिता सामनेवाले हे नेहमी कार्यदक्ष असतात. याकरिता, रिझर्व्ह बँक यांचेकडून देण्यात येणा-या मार्गदर्शक सुचनाप्रमाणे बँकींग व्यवहार करण्यात येतो. तक्रारदाराच्या विनंतीनुसार, सीसी-1 खात्यातील रक्कम त्यांनी अधिकची घेतलेली असल्यामुळे, या खात्यातून तक्रारदाराच्या विनंतीप्रमाणे निवृत्तीवेतनाची रक्कम काढण्यासाठी परवानगी देता येणे शक्य नाही. मूळातच तक्रारदाराने निवृत्तीवेतनाची रक्कम त्याच खात्यातून काढणे गरजेचे आहे परंतु त्यांनी दिलेल्या स्पष्ट सुचनांमुळे निवृत्तीवेतनाची रक्कम सीसी-1 मधून तक्रारदार काढतात. परंतु वरील परिस्थितीमुळे त्यांनी निवृत्तीवेतनाची रक्कम संबंधीत खात्यातुन काढणे आवश्यक आहे. त्यामुळे संबंधित तक्रारीमध्ये काही तथ्य नसल्यामुळे ती खर्चासह रद्द करण्यात यावी. 15 तक्रार अर्ज, त्यासोबत जोडण्यात आलेली अनुषांगिक कागदपत्रं, तक्रारदाराचे प्रतिनिवेदन, सामनेवाले यांची कैफियत, इत्यादी कागदपत्रांचे पाहणी व अवलोकन करुन वाचन केले. उभय पक्षकारांचा युक्तीवाद ऐकला. 16 तक्रारदाराने सेवानिवृत्ती वेतन हे सामनेवाले बँकेकडून मिळावे, म्हणून निवृत्तीवेतन बचत खाते क्र.70751 सन-1998 मध्ये उघडले. आजतागाय हे खाते सामनेवाले बँकेमध्ये कार्यरत आहे. तक्रारदाराचे त्या बँकेत असलेले त्याचे दुसरे जॉईंट खाते क्र.15660 व निवृत्तीवेतन बचत खाते क्र.70751 या खात्यातील रक्कमांची उलाढाल ते सीसी-1 खात्यातून करतील अशा प्रकारच्या लेखी सुचना तक्रारदाराने बँकेला दिल्या आहेत असे तक्रारदाराचे म्हणणे आहे. या सुचना दिल्यानंतर, सन-2004 ते आजतागायत वर नमूद केल्याप्रमाणे दोन्हीं खात्याच्या रक्कमा सीसी-1 मध्ये सामनेवाले यांचेकडून वळवून सीसी-1 मधून निवृत्तीवेतनाची रक्कम काढीत होते. ही रक्कम सीसी-1 च्या खात्यातून काढण्यासाठी सामनेवाले यांचेकडून तक्रारदाराला मनाई करण्यात आली असे तक्रारदाराचे म्हणणे असून सामनेवाले अशी मनाई तक्रारदाराला करु शकत नाहीत अशी त्याची तक्रार आहे. तक्रारदाराच्या उदरनिर्वाहासाठी त्याला मिळणा-या निवृत्तीवेतनाची रक्कम वेळोवेळी काढून घेणे गरजेचे असून या कृतीला सामनेवाले यांचेकडून मनाई करण्यात आली यामध्ये त्यांच्या सेवेत कमतरता असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. 17 तक्रारदाराने निवृत्तीवेतन आहरण करण्यासाठी बचत खाते क्र.70751 उघडलेले आहे तसेच संयुक्तिक परंतु वैयक्तिक असे दुसरे खाते क्र.15560 तक्रारदाराचे त्याच बँकेत आहे. तक्रारदाराने या बँकेत सीसी-1 हे खाते काही हेतुने उघडलेले आहे. 18 तक्रारदाराने निवृत्तीवेतन खाते क्र.70751 मध्ये जमा होणारी निवृत्तीवेतनाची रक्कम त्यांनी सामनेवाले यांना दिलेल्या लेखी सुचनेप्रमाणे सीसी-1 मधून काढण्याची सवलत आहे तसी पुढे चालू रहावी असे तक्रारदाराचे म्हणणे आहे. परंतु सामनेवाले यांनी आता सीसी-1 मधून पेन्शनची रक्कम काढण्याची सवलत तक्रारदाराला देत नाही, ही त्यांची कृती संयुक्तिक नाही असे तक्रारदाराचे म्हणणे आहे. निवृत्तीवेतनाची रक्कम सीसी-1 मधून काढण्यासाठी तक्रारदाराने कोणताही नियम दाखल केला नाही किंवा उपलब्ध असल्याबाबतची माहिती दिली नाही. तसेच तक्रारदार निवृत्ती वेतनाची रक्कम हे सीसी-1 खात्यामधून का काढू इच्छितात याबाबतची कारणमिमांसा तक्रारीत केलेली नाही, त्यामुळे तक्रारदाराची ही मागणी ग्राहय असल्याचे दिसून येत नाही. 19 प्रचलित कार्यपध्दतीनुसार, शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाल्यानंतर, मिळणारी सेवा निवृत्तीवेतनाची रक्कम ही संबंधीत निवृत्तीवेतन धारकाला नियमितपणे काढता यावी, यासाठी स्वतंत्र बचत खाते उघडावे असे शासनाचे निर्देश आहेत. जरी एखाद्या निवृत्तीवेतनधारकाचे त्याच बँकेत त्याचे स्वतःचे बचत खाते असले तरी त्याचा वापर निवृत्तीवेतनाची रक्कम त्या खात्यातून घेण्यासाठी त्याला वापर करता येत नाही. निवृत्तीवेतनाची रक्कम त्याच बँकेतील अन्य कोणत्याही खात्यामध्ये हस्तांतरीत करुन अन्य खात्यामधून निवृत्तीवेतन काढून घेण्यासाठी कोणताही नियम उपलब्ध असल्याचे दिसून येत नाही व तसा कागदोपत्री पुरावा तक्रारदाराने सोबत दाखल केलेला नाही. सामनेवाले यांनी त्यांच्या कैफियतीत नमूद केले आहे की, तक्रारदाराच्या निवृत्तीवेतन खात्यामधून निवृत्तीवेतनाची रक्कम काढून घेण्यासाठी त्याला आडकाठी केलेली नाही किंवा तशी मनाईही केलेली नाही. उलटपक्षी, निवृत्तीवेतन खात्यातून तक्रारदाराला निवृत्तीवेतनाची रक्कम काढता येईल असे कैफियतीमध्ये सामनेवाले यांनी नमूद केले आहे. सामनेवाले यांनी तक्रारदाराचे निवृत्तीवेतन, निवृत्तीवेतन खात्यामधून काढण्यास मनाई केलेली नाही, त्यामुळे सामनेवाले यांच्या सेवेत कमतरता असल्याचे म्हणता येणार नाही. तक्रारदाराने सामनेवाले यांचे सेवेत कमतरता असल्याचे सिध्द केलेले नाही. त्यामुळे, त्यांच्या अन्य कोणत्या मागण्यां मान्य करता येणार नाहीत. सबब, तक्रारीत काही तथ्य नसल्यामुळे सदरची तक्रार रद्दबातल करण्यास पात्र असल्यामुळे खालीलप्रमाणे आदेश देण्यात येतो. आदेश (1) तक्रार क्र.85/2011 रद्दबातल करण्यात येते. (2) या प्रकरणी उभय पक्षकारांनी आपापला खर्च सोसावा. (3) आदेशाच्या प्रमाणिंत प्रतीं दोन्हीं पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.
| [HONABLE MR. G L Chavan] Member[HONABLE MRS. S P Mahajan] PRESIDENT | |