सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर
उपस्थिती - मा.सौ.सविता भोसले, अध्यक्षा.
मा.श्री.श्रीकांत कुंभार, सदस्य.
मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्या.
तक्रार क्र. 7/2013.
तक्रार दाखल ता.17-1-2013.
तक्रार निकाली ता.28-7-2015.
सौ.शालन जगन्नाथ वाघमारे,
रा.तळबीड, ता.कराड, जि.सातारा. ....तक्रारदार.
विरुध्द
मॅनेजर/व्यवस्थापक,
बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा उंब्रज,
रा.मातृछाया, साळुंखे बिल्डिंग, उंब्रज,
एस.टी.स्टँडसमोर, उंब्रज,
ता.कराड, जि.सातारा. ..... जाबदार.
तक्रारदारतर्फे – अँड.डी.आर.पाटील.
जाबदारातर्फे- अँड.निर्मला जाधव.
न्यायनिर्णय
(सदर न्यायनिर्णय मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्य यांनी पारित केला.)
1. प्रस्तुतची तक्रार तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 प्रमाणे जाबदारांनी दिलेल्या सदोष सेवेबाबत जाबदाराविरुध्द मंचात दाखल केली आहे.
2. तक्रारदाराचे तक्रारीचा थोडक्यात सारांश खालीलप्रमाणे-
प्रस्तुत तक्रारदार हा मौजे तळबीड, ता.कराड, जि.सातारा येथील कायमचा रहिवासी आहे. तो समाजकार्य करतो. तक्रारदाराचे जादबार बँक, शाखा उंब्रज, ता.कराड, जि.सातारा यांचेकडे सन 1995 पासून बचत खाते क्र.9950 चे खाते असून महाराष्ट्र शासनाच्या नशाबंदी कार्यक्रमाचे ते प्रचारक असून त्या कार्यक्रमासाठी त्यांची नियुक्ती होती व त्यासाठी त्यांना महाराष्ट्रभर फिरावे लागते. महाराष्ट्र शासनाने रु.2,500/-(रु.दोन हजार पाचशे मात्र) चे अनुदान महाराष्ट्र शासनाने तक्रारदारास चालू केले होते व सदर अनुदान तक्रारदाराचे खात्यावर जमा होत होते. तक्रारदार हे त्यांचे बचत खात्यारुन पैसे काढणेसाठी जाबदार बँकेत गेले व रु.590/- त्यानी खात्यावरुन काढले व उर्वरित शिल्लक पाहिली असता तक्रारदारांचे असे लक्षात आले की, जाबदार बँकेने त्यांचे बचत खात्यातून या तक्रारदारास कोणतीही पूर्वसूचना, नोटीस न देता रु.910/- (रु.नऊशे दहा मात्र) कपात केलेचे दिसून आले. याबाबत जाबदाराकडे विचारणा केली असता जाबदारानी योग्य व समर्पक खुलासा न करता तक्रारदारास उडवाउडवीची उत्तरे दिली, त्यामुळे तक्रारदाराने त्यांचे बचत खात्याची पडताळणी केली असता दि.30-6-2011 रोजी रु.110/-, दि.30-9-2011 रोजी रु.91/-, दि.31-12-2011 रोजी रु.1/- असे एकूण रु.1,112/- मात्र कोणतीही पूर्वसूचना न देता कपात केलेचे आढळले. त्याची पावती दिली नाही. जाबदाराच्या या बेकायदेशीर कृतीबाबत तक्रारदारानी दि.23-11-2012 रोजी वकीलामार्फत जाबदाराना नोटीस दिली, त्यास जाबदारानी उत्तर दिले नाही त्यामुळे या जाबदारांचे बेकायदेशीर कृत्यामुळे तक्रारदारांचा जाबदारावरील विश्वासास तडा गेला व जाबदारांचे या सेवेतील त्रुटीमुळे झालेल्या नुकसानीबाबत मे.मंचात तक्रार दाखल केली व प्रस्तुत जाबदाराकडून कपात रक्कम रु.1112/- (रु.अकराशे बारा मात्र) मानसिक, शारिरीक त्रासापोटी रु.5,000/-व अर्जाचा खर्च मिळावा अशी विनंती मे.मंचास केली आहे.
3. तक्रारदारानी नि.1 कडे तक्रारअर्ज, त्याचेपृष्टयर्थ नि.2 कडे प्रतिज्ञापत्र, नि.3 कडे वकीलपत्र, नि.5 कडे पुराव्याचे एकूण 4 कागद, नि.6 कडे पुराव्याचे प्रतिज्ञापत्र, नि.17 कडे लेखी युक्तीवाद इ.कागदपत्रे दाखल केली आहेत.
4. सदर प्रकरणाची नोटीस यातील जाबदाराना रजि.पोस्टाने मंचातर्फे पाठविण्यात आली. सदर नोटीस जाबदाराना मिळाली, त्याप्रमाणे जाबदार हे त्यांचे वकील अँड.निर्मला जाधव यांचेतर्फे नि.11 कडे दाखल वकीलपत्राने प्रकरणी हजर झाले व त्यांनी त्यांचे म्हणणे नि.13 कडे व त्याचेपृष्टयर्थ नि.15 कडे प्रतिज्ञापत्र दाखल केले असून नि.14 कडे एकूण पुराव्याचे तीन कागदपत्रे दाखल केली असून त्यानी तक्रारदारांचे अर्जास खालीलप्रमाणे आक्षेप नोंदवलेले आहेत. तक्रारदारांचा अर्ज खोटा व लबाडीचा आहे, तो मान्य व कबूल नाही. प्रस्तुत तक्रारदारानी 1995 साली जाबदारांकडे बचत खाते उघडताना जाबदारांचे अटी व शर्तीना मान्यता देऊन खाते उघडलेले होते. त्या सर्व अटी, शर्तींची नोंद तक्रारदाराचे बचत पुस्तकावरही आहेत व त्या अटी व शर्ती याना अनुसरुन या जाबदारानी तक्रारदाराचे खात्यावरुन रक्कम कपात केली आहे व ती कायदेशीर आहे. उभयतामधील अटी व शर्तींची पूर्णतः माहिती तक्रारदारास होती व आहे. त्यामुळे तक्रारदाराचा अर्ज फेटाळणेत यावा अशी विनंती जाबदारानी मंचाकडे केली आहे.
5. यातील तक्रारदारांची तक्रार व त्यातील कथने व जाबदारांची कैफियत व त्यातील कथनांचा सारांश व त्यापृष्टयर्थ दाखल केलेला पुरावा पहाता प्रस्तुत प्रकरण न्यायनिर्गत करणेसाठी आमचेपुढे खालील मुद्दे उपस्थित होतात-
अ.क्र. मुद्दा निष्कर्ष
1. तक्रारदार हा जाबदारांचा ग्राहक आहे काय? होय.
2. सदर कामातील जाबदारानी तक्रारदारांचे बचत खात्यावरुन
परस्पर, विनापरवानगी रक्कम कपात करुन तक्रारदाराना
सदोष सेवा दिली आहे काय? नाही.
3. अंतिम आदेश काय? तक्रार नामंजूर.
6. कारणमीमांसा- मुद्दा क्र.1 ते 3-
प्रस्तुत जाबदार बँक ही आर्थिक उलाढाल करणारी वित्तिय संस्था असून ती आवश्यक व्यक्तींना, ग्राहकाना बचत खात्याची सेवा पुरविते व त्याद्वारे बचत खात्याच्या संदर्भात येणा-या संपूर्ण सेवा ग्राहकाना प्रदान करते. प्रस्तुत तक्रारदारानेही यातील जाबदाराकडून बचत खात्याच्या सेवा जाबदाराकडून स्विकारल्या होत्या व जाबदारांच्या अटी, शर्ती मान्य करुन प्रस्तुत तक्रारदार याने जाबदार बँकेत बचत खाते क्र.9950 हे दि.9-8-1995 रोजी उघडले होते. ही बाब उभयताना मान्य व कबूल आहे. या व्यवहारावरुन तक्रारदार हा जाबदारांचा ग्राहक असलेचे निर्विवादरित्या शाबित होते. त्यामुळे मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देतो.
6.2- यातील तक्रारदाराने नि.5/1 कडे त्याचे बचत खाते क्र.9950 ची बचत पुस्तिकेचे कव्हरचे पानाची झेरॉक्स नि.5/2 कडे खातेपुस्तिकेत घ्यावयाच्या नोंदीची संक्षेप यादी नि.5/3 कडे बचत खात्यावरील व्यवहाराची सूची दाखल केली आहे. या तक्रारदारानी वरील कागदपत्राशिवाय खाते पुस्तिकेतील शेवटची सहा पानांची झेरॉक्स मात्र प्रकरणी दाखल केलेली नाही, वगैरे बचत खातेसंबंधी नियम व अटी नमूद केलेल्या आहेत. त्यातील नियम क्र.7 नुसार बचत खात्याच्यासंबंधी केलेले नियम कोणतीही पूर्वसूचना न देता जाबदाराला बदलता येतात व कलम 10 प्रमाणे सेवाभार Service Charges /Incidental Charges Particulars प्रमाणे ग्राहकाचे खात्यावर कमितकमी बॅलन्स न ठेवणे व खात्याचा वापर नियमित न करणे इत्यादी कारणासाठी ग्रामीण भागात प्रति तिमाही रु.100/-, व खात्यावर किमान बॅलन्स न ठेवणेबद्दल प्रति तिमाही रक्कम रु.250/- याप्रमाणे जाबदार सेवाशुल्क आकारतात. प्रस्तुत जबदारांनी त्याप्रमाणे तक्रारदाराचे अपरोक्ष दि.30/6/2011 रोजी रु.110/- दि.30/9/11 रोजी रु.91/-, दि.31/12/11 रोजी रु.1/- व दि.23/10/2012 रोजी रु.910/-इतकी सेवाशुल्काची रक्कम तक्रारदाराचे खात्यावरुन घेतलेली दिसते. तक्रारदाराच्या खात्याचे अवलोकन करता त्यावर दि.31/3/2010 पासून 22/10/2012 अखेर काहीही व्यवहार झालेचे दिसून येत नाहीत व प्रस्तुत तक्रारदाराने जाबदाराकडे बचत खाते उघडताना त्यावरील लिहीलेल्या नियम अटीस तो बांधील राहतो हे स्पष्ट होते. व त्या अटी नियमांना मान्य करुनच प्रस्तुत तक्रारदार याने जाबदारांकडे खाते उघडलेले होते. त्यामुळे प्रस्तुत तक्रारदार यास जाबदारांनी त्याच्या खात्यावरुन घेतलेले सेवाशुल्कबाबत तक्रार करता येणार नाही व त्यामुळेच प्रस्तुत जाबदाराने या तक्रारदार यास कोणतीही सदोष सेवा दिलेली नाही हे स्पष्ट होते. एकदा जाबदारांच्या अटी व शर्ती या तक्रारदाराने मान्य करुन त्याप्रमाणे बचत खाते जाबदारांकडे उघडल्यावर त्या अटींबाहेर जावून या तक्रारदाराला कोणतीही कृती करता येणार नाही. त्यामुळे जाबदारांनी सेवा शुल्कापोटी रक्कम कपात करणेची कृती ही नियमाला धरुनच आहे. त्यामुळे प्रस्तुत तक्रार नामंजूर करणेस पात्र आहे असे आमचे स्पष्ट मत आहे. तक्रारदाराने त्याची तक्रार ठोस पुराव्यानिशी शाबीत केलेली नाही. त्यामुळे प्रस्तुत तक्रार नामंजूर करणे आम्हास योग्य वाटते. त्यामुळे मुद्दा क्र. 2 व 3 चे उत्तर आम्ही नकारार्थी देतो.
7. सबब वरील सर्व कारणमीमांसा व विवेचन यास अधीन राहूनखालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येतात.
आदेश
1. तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात येते.
2. प्रस्तुत जाबदाराने तक्रारदार यांना सदोष सेवा दिली नाही असे घाषित
करण्यात येते.
3. सदर न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
4. सदर न्यायनिर्णयाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य पाठविण्यात
याव्यात.
ठिकाण- सातारा.
दि. 28-7-2015.
(सौ.सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ.सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.