सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर
उपस्थिती - मा.सौ.सविता भोसले,अध्यक्षा
मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्य
मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्या.
तक्रार अर्ज क्र. 58/2014.
तक्रार दाखल दि.15-04-2014.
तक्रार निकाली दि.05-10-2015.
मे. पद्मावती पॅकेजींग तर्फे
श्री. संभाजी शिवाजी कदम,
तर्फे कुलमुखत्यार श्री. शिवाजी हणमंत कदम
रा. प्लॉट नं.17,विद्यानगर,गोडोली,ता.जि.सातारा. .... तक्रारदार.
विरुध्द
1. शाखाधिकारी
बँक ऑफ महाराष्ट्र,
शाखा कृष्णानगर,
ता.जि.सातारा.
2. महाव्यवस्थापक,
जिल्हा उद्योग केंद्र,सातारा कार्यालय,
प्लॉट नं. 13, एम.आय.डी.सी.,सातारा. .... जाबदार.
तक्रारदारातर्फे –अँड.आर.सी.शिंदे.
जाबदार क्र. 1 तर्फे – अँड.ए.ए.वाळींबे.
जाबदार क्र. 2 तर्फे – प्रतिनिधी
न्यायनिर्णय
(सदर न्यायनिर्णय मा.सौ.सविता भोसले, अध्यक्षा यानी पारित केला)
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 नुसार दाखल केला आहे. तक्रारअर्जातील थोडक्यात मजकूर पुढीलप्रमाणे-
तक्रारदार हे सातारा येथील कायमचे रहिवाशी असून सुशिक्षित बेकार आहेत. त्यामुळे त्यांना उत्पन्नाचे कोणतेही साधन नसलेने कुटूंबाचा चरितार्थ चालवणेसाठी त्यांनी कॉरुगेटेड बॉक्सेस तयार करण्याचा लघुउद्योग सुरु करण्याचे ठरविले. सदर लघुउद्योग सुरु रण्यासाठी आर्थिक मदत कर्ज स्वरुपात मिळण्यासाठी जाबदार क्र. 2 कडे प्रथम चौकशी केली. त्यावर जाबदार क्र. 2 ने तक्रारदार यांना कॉरुगेटेड बॉक्सेस बनविण्यासाठी लघुउद्योगासाठी सुशिक्षीत बेरोजगार वीज भांडवल योजनेअंतर्गत कर्ज मिळत असलेबाबत सांगीतले. त्यावर तक्रारदाराने कोरुगेटेड बॉक्सेस तयार करणेचा लघुउद्योग सुरु करण्यासाठी जाबदार क्र. 2 यांचेकडे कर्ज मागणी अर्ज सादर केला. त्यावर जाबदार क्र. 2 ने सांगीतलेप्रमाणे सर्व कागदपत्रांची पूर्तता तक्रारदाराने केली. सर्व गोष्टींची पूर्तता केलेनंतर तक्रारदाराने लघुउद्योगासाठी मागणी केले वर्गापैकी 15 टक्के कर्ज रक्कम रु.2,31,000/- बीज भांडवल योजनेमार्फत तक्रारदार यांना देण्याचे जाबदार क्र. 2 ने मंजूर केले. तदनंतर तक्रारदाराने उर्वरित 75 टक्के कर्ज मंजूरीसाठी कर्जप्रकरण जाबदार क्र. 1 यांचेकडे दि.1/9/2008 रोजी पाठवून दिले. त्यावर जाबदार क्र. 1 ने तक्रारदाराला दि.23/12/2008 रोजी बोलावून घेवून त्यांची मुलाखत घेतली. सदर मुलाखतीनंतर तक्रारदाराने आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केली. त्यानंतर जाबदार क्र. 1 ने कर्ज मंजूर करुन सदर कर्ज मंजूरीचे पत्र जाबदार क्र. 1 ने जाबदार क्र. 2 ला पाठविला त्याप्रमाणे एकूण रकमेपैकी 75 टक्के रक्कम रु.12,25,00/- (रुपये बारा लाख पंचवीस हजार फक्त) जाबदार क्र. 1 यांनी तक्रारदाराला द्यावयाचे होते व 15 टक्के कर्जाऊ रक्कम रु.2,31,000/- (रुपये दोन लाख एकतीस हजार मात्र) जाबदार क्र. 2 यांनी बीजभांडवल म्हणून तक्रारदारास द्यावयाचे होते. तर उर्वरीत 10 टक्के रक्कम तक्रारदार यांनी स्वतः भरावयाचे होते. तक्रारदाराला लवकरात लवकर व्यवसाय सुरु करणेचा असलेने जाबदार क्र. 1 चे पत्रातील सर्व अटी तक्रारदाराने मान्य केल्या. जाबदार क्र. 2 ने जाबदार क्र. 1 यांचेकडे दि.1/9/2008 रोजी मंजूरीसाठी पाठवलेनंतर कर्ज प्रकरण तब्बल 1 वर्षानंतर म्हणजे दि.8/10/2009 रोजी जाबदार क्र. 2 यांचेकडे परत पाठवले कारणाने दरम्यानच्या काळात वेळ वाया गेला व लघुउद्योगासाठी आवश्यक त्या सुखसोयींची म्हणजे लाईट कनेक्शन, पाणीपरवाना, बांधकाम शेड उभारणी इ. सर्व गोष्टींची पूर्तता करणेसाठी मोठया प्रमाणात तक्रारदाराचे पैसे खर्च झाले. तरीदेखील तक्रारदाराने लवकरात जवकर लघुउद्योग चालू करणेसाठी प्रयत्न चालू ठेवले व जाबदार क्र. 1 व 2 यांनी वेळोवेळी सांगीतले सर्व बाबींची पूर्तता तक्रारदाराने केलेली आहे. तसेच कर्ज मंजूर झालेनंतर तक्रारदाराने जाबदार क्र. 1 यांना कर्ज रकमेसाठी तारण म्हणून पाटखळ, ता. कोरेगांव येथील शेतजमीनीचा रजि.तारण गहाण खत भरुन दिले. प्रस्तुत गहाण खताचे आधारे जाबदार क्र. 1 ने तक्रारदाराने प्रत्यक्ष कर्ज न घेतले रकमेचा रक्कम रु.14,56,000/- चा कर्जाचा बोजा नोंदविला. त्यामुळे तक्रारदाराला सदर मिळकतीवर कर्ज घेता आले नाही. तदनंतर जाबदार क्र. 2 ने दि.5/12/2009 रोजी जाबदार क्र. 1 यांना बिजभांडवलाची तरतूद संपली असलेने तक्रारदार अगर जाबदार क्र. 1 यांनी बिजभांडवलाची रक्कम रु.2,31,000/- सध्या तात्पुरती भरुन उद्योग सुरु करावा व जेव्हा बिजभांडवलाची पूर्तता होईल तेव्हा बिजभांडवलाची रक्कम जाबदार क्र. 2 पुरवतील असे आश्वासन पत्र जाबदार क्र. 2 ने जाबदार क्र. 1 यांना पाठवले. नंतर तक्रारदाराने कर्ज रक्कम व बिज भांडवल मिळण्यापूर्वीच बरीच रक्कम खर्च केलेने तक्रारदारास बिज भांडवलाची 15 टक्के रक्कम भरणे अशक्यप्राय असलेने त्यांनी जाबदाराला कळविले होते. त्यामुळे जाबदार क्र. 1 यांनी बीज भांडवलाची रक्कम भरावी नंतर जाबदार क्र. 2 ने बीजभांडवल उपलब्ध करुन दिलेवर प्रस्तुत रक्कम वळती करुन घ्यावी अशी तक्रारदाराने जाबदार क्र. 1 बँकेस विनंती केली. परंतू जाबदार क्र. 1 यांनी कोणतीही सहानुभूती दाखवली नाही. तदनंतर जवळ-जवळ 10 महिन्यानंतर जाबदार नं.2 यांनी बिज भांडवलाचे 15 टक्के कर्जाऊ रकमेपोटी अनुक्रमे 2 धनादेश दि.14/9/2010 रोजीचा धनादेश नं.763289 रक्कम रु.1,03,494/- चा व दि. 14/1/2011 रोजीचा धनादेश नं.763289 रक्कम रु.1,27,506/- चा जाबदार क्र. 1 यांचेकडे पाठवून दिले. तरीदेखील जाबदार क्र. 1 ने तक्रारदारास 15 टक्के बीज भांडवल रक्कम रु.2,31,000/- अगर 75 टक्के रक्कम रु.12,25,000/- तक्रारदारास अदा केली नाही. उलट कर्ज मंजूर होवून तारणगहाण देऊन, तसेच कर्जाचा बोजा तारण मिळकतींवर चढवूनदेखील कर्ज मंजूर होवून जवळजवळ 1 वर्ष झाले कारणाने परत नवीन कर्ज प्रकरण बनवावे लागेल अशी बेकायदेशीर अट तक्रारदारावर घातली व नव्याने कर्जप्रकरणासाठी कागदपत्रांची जाबदार क्र. 1 चे मागणीप्रमाणे पूर्तता तसेच जामीनदारांची पूर्तता केली. तदनंतर एक जामीनदार विजय कदम यांनी काही कारणास्तव जामीन राहण्यास नकार दिला. परंतू सदर जामीनदाराऐवजी दुसरा जामीनदार देण्याचे आश्वासन तक्रारदार यांनी जाबदार क्र. 1 यांना लेखी स्वरुपात दिले. अशाप्रकारे सन 2008 झालापासून कॉरुगेटेड बॉक्सेस तयार करणेचा लघुउद्योग सुरु करण्यासाठी सुशिक्षित बेरोजगार बीज भांडवल योजनेअंतर्गत कर्ज मिळणेसाठी आवश्यक त्या सर्व गोष्टींची पूर्तता तक्रारदाराने करुनदेखील जाबदार क्र. 1 ने जवळजवळ तीन वर्षानंतर जामीनदार जामीन राहणेस तयार नाहीत व तक्रारदार त्याऐवजी घरतारण देवू शकत नसल्याने कर्जप्रकरण वितरण करु शकत नसल्याचे खोटे कारण दाखवून जाबदार क्र. 1 यांनी कर्ज नामंजूरीकरीता वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविले व त्याबाबत जाबदार क्र. 1 यांनी तक्रारदारास दि.20/4/2011 रोजी कळविले. अशाप्रकारे जाबदार क्र. 1 यांनी तक्रारदाराला ग्राहक या नात्याने योग्य ती सेवा वेळेवर देणे गरजेचे असतानाही ग्राहक सेवेत कसूर करुन तक्रारदाराचे जवळ-जवळ रक्कम रु.11,00,000/- चे नुकसान केले आहे. प्रस्तुत बाबतीत तक्रारदाराने जाबदार क्र. 1 ला वकीलांमार्फत नोटीस पाठवली असता सदर नोटीसला उत्तर दिले नाही उलट न दिले कर्जाचा रक्कम रु.14,56,000/- ची परतफेड तक्रादाराने केली आहे असे पत्र तलाठी कार्यालयात देवून कर्ज तारण मिळकतीवरील बोजा कमी करुन घेतला. अशाप्रकारे जाबदार क्र. 1 ने तक्रारदार यांना सदोष सेवा पुरविली असलेने तक्रारदाराला झाले आर्थिक, मानसिक नुकसानीचे भरपाई मिळणेसाठी सदरचा तक्रार अर्ज तक्रारदाराने मे. मंचात दाखल केला आहे.
2. प्रस्तुत कामी तक्रारदाराने जाबदार क्र. 1 व 2 यांचेकडून रक्कम रु.11,00,000/- आर्थिक, मानसिक व शारिरीक त्रासापोटी नुकसानभरपाई मिळावी तसेच सदर नुकसानभरपाई रकमेवर रक्कम वसूल होऊन मिळेपर्यंत द.सा.द.शे. 18 टक्के व्याज मिळावे अशी मागणी तक्रारदाराने याकामी केली आहे.
3. प्रस्तुत कामी तक्रारदाराने नि. 2 कडे प्रतिज्ञापत्र, नि. 5 चे कागदयादीसोबत नि. 5/1 ते नि. 5/4 कडे अनुक्रमे कर्जप्रकरण नामंजूरीस पाठविलेबाबत जाबदार क्र. 1 ने तक्रारदाराला दिलेले पत्र, जाबदार क्र. 2 ने तक्रारदार यांना पाठवलेले प्रमाणपत्र, तक्रारदाराने जाबदार क्र. 1 व 2 यांना वकीलांमार्फत पाठवलेली नोटीसची स्थळप्रत तक्रारदाराने त्यांचे वडिल यांना दिलेले नोटीराईज्ड कुलमुखत्यारपत्र, नि 18 कडे तक्रारदाराचे पुराव्याचे शपथपत्र, नि. 19 कडे पुरावा संपलेची पुरसीस, नि.29 कडे तक्रारदाराचा लेखी युक्तीवाद, नि. 31 चे कागदयादीसोबत अनुक्रमे जाबदार क्र. 2 ने जाबदार क्र. 1 यांना कर्ज मंजूरीसाठी पाठवलेले पत्र, जाबदार क्र. 1 यांनी कर्ज मंजूरीचे तक्रारदार यांना दिलेले पत्र, जाबदार क्र. 2 ने केलेली Sanction Order, तक्रारदार यांनी जाबदार क्र. 1 यांना दिलेला सर्च रिपोर्ट, तक्रारदार यांनी जाबदार क्र. 1 यांना करुन दिलेले रजिस्टर तारणखत, तक्रारदर यांनी जाबदार क्र. 2 यांना करुन दिलेले रजिस्टर तारणखत, फेरफार नं. 1576 चा उतारा, फेरफार नं.1791 चा उतारा, तक्रारदार यांनी जाबदार क्र. 2 यांनी जाबदार क्र. 1 ला पाठवलेले पत्र, महाराष्ट्र पोलुशन कंट्रोल बोर्डामार्फत तक्रारदार यांनी मिळविलेली परवानगी, तक्रारदार यांनी उद्योगासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी लि. कडून घेतलेल्या लाईट कनेक्शन बाबतचे पत्र, लाईट कनेक्शनचे सेक्युरिटीपोटी तक्रारदार यांनी भरलेल्या डिपॉझीटची पावती, जाबदार क्र. 2 यांनी केलेल्या Sanction Order ची प्रत, उद्योग सुरु करण्यासाठी तक्रारदार यांनी Dashmesh Industries कडे तक्रारदार यांनी मशिन खरेदीपोटी भरलेली अँडव्हान्स ची रक्कम रु.80,000/- ची रिसीट, जाबदार क्र. 2 यांनी जाबदार क्र. 1 ला चेक बाबत दिलेले पत्र, जाबदार क्र. 2 यांनी रकमेबाबत केलेल्या Sanction Order ची प्रत, जाबदार क्र. 2 यांनी बिजभांडवलापोटी जाबदार क्र. 1 कडे दिलेल्या चेकबाबतचे पत्र, जाबदार क्र. 1 यांनी तक्रारदार यांचे मिळकतीवर बोजा चढविणेसाठी दिलेले पत्र, जाबदार क्र. 2 ने जाबदार क्र. 1 यांना बिजभांडवलापोटी पाठवलेल्या चेक संदर्भातील पत्र, जाबदार क्र.2 यांनी तक्रारदार यांना दिलेले प्रमाणपत्र, जाबदार क्र. 1 व 2 यांनी मुदतीत उद्योगासाठी कर्ज पुरवठा न केल्याने तक्रारदार यांचे झालेल्या उद्योगातील नुकसानीबाबत सी.ए.ने दिलेले पत्र, जाबदारांना तक्रारदार यांनी सादर केलेला 25,00,000/- रुपयांचा प्रोजेक्ट रिपोर्ट, जाबदारांनी तक्रारदाराला सादर केलेला 20,00,000/- रुपयांचा प्रोजेक्ट रिपोर्ट, तक्रारदारांनी व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या शेड व बांधकाम केलेल्या कॉन्ट्रॅक्टरचे खर्चासह पत्र व ज्या शेडमध्ये व्यवसाय सुरु करावयाचा होता ते व इलेक्ट्रीक कनेक्शन घेतलेल्या ट्रान्स्फॉर्मरचे 2 फोटो वगैरे कागदपत्रे तक्रारदाराने याकामी दाखल केली आहेत.
4. प्रस्तुत कामी जाबदार क्र. 1 ने म्हणणे/कैफीयत दाखल केली आहे. नि.17 कडे म्हणण्याचे अँफीडेव्हीट, नि.23 कडे पुराव्याचे शपथपत्र, नि.25 चे कागदयादीसोबत नि. 25/1 ते नि.25/5 कडे अनुक्रमे जाबदार क्र. 1 ने जाबदार क्र. 2 ला पाठवले पत्राची स्थळप्रत, तक्रारदाराने जाबदार क्र. 1 यास पाठवलेली प्रत, जाबदार क्र. 1 ने गांवकामगार तलाठी यांना पाठवलेपत्राची प्रत, जाबदार क्र.1 यांनी मा. तलाठी धामणेर यांना पाठवले पत्राची पत्राची प्रत, जाबदार क्र. 1 यांनी तक्रारदाराला पाठवले पत्राची प्रत, जाबदार क्र. 2 ने नि. 12/अ कडे म्हणणे, नि.26 कडे पुराव्याचे शपथपत्र, नि. 27 चे कागदयादीसोबत नि.27/1 ते नि.27/11 कडे अनुक्रमे तक्रारदाराने जाबदार क्र. 2 कडे व्यवसाय सुरु करणेसाठी दिलेला कर्ज मागणी अर्ज, जाबदार क्र. 2 ने कर्ज मंजूरीसाठी जाबदार क्र. 1 ला दिलेले पत्र, जाबदार क्र.1 यांचा कर्ज मंजूरीसाठी जाबदार क्र. 1 ला दिलेले पत्र, जाबदार क्र.1 यांचा कर्ज मंजूर आदेश, जाबदार क्र. 2 यांनी जाबदार क्र.1 यांना बिज भांडवल कर्ज रकमेचा धनादेश दिलेचे पत्र, जाबदार क्र. 1 चा कर्ज मंजूर आदेश जाबदार क्र. 2 ने जाबदार क्र. 1 ला दिलेले पत्र, जाबदार क्र. 1 यांनी जाबदार क्र. 2 बीज भांडवल परत केलेचे चलन, तक्रारदाराने जाबदार क्र. 2 ला दिलेले पत्र, जाबदार क्र. 2 ने तक्रारदार, तलाठी व तहशिलदार यांना दिलेले नादेय प्रमाणपत्र नि. 27 अ कडे पुरावा संपलेची पुरसीस, नि.28 कडे लेखी युक्तीवाद वगैरे कागदपत्रे जाबदार क्र. 1 व 2 यांनी दाखल केली आहे.
जाबदार क्र. 1 यांनी तक्रार अर्जातील सर्व कथन फेटाळलेले आहे. त्यांनी प्रस्तुत कामी पुढीलप्रमाणे आक्षेप नोंदवलेले आहेत. जाबदार क्र. 1 बँकेने तक्रारदाराचे कर्ज मागणी अर्जासोबतच्या सर्व कागदपत्रांची छाननी करुन त्यांना किती कर्ज मंजूर होऊ शकते याची कल्पना दिली होती. जाबदार क्र. 1 ने रक्कम रु.12,50,000/- कर्ज स्वरुपात तक्रारदाराला द्यावयाची होती हा मजकूर खोटा आहे. तसेच जाबदाराने कर्ज मार्जिनसाठी तक्रारदाराकडून उपलब्ध न झाल्यास कर्ज वितरीत होवू शकणार नाही याची स्पष्ट कल्पना तक्रारदाराला जाबदाराने दिली होती. तक्रारदाराने दि.9/7/2009 रोजी जाबदार यांचेकडे जमा केली त्याची छाननी करुन व तक्रारदाराचे उत्पन्नाचा स्त्रोत बघून जाबदार यांनी तक्रारदार यांना कर्ज मंजूर केले. दि.3/10/2009 रोजी कर्ज मंजूर करुन त्याबाबतचे पत्र आणि बीजभांडवलासाठीचा क्लेम जाबदार क्र. 2 यांचेकडे पाठविला. जाबदाराने तक्रारदार यांना कर्ज मंजूर होईपर्यंत काम सुरु करा असे कधीही सांगीतले नव्हते त्यामुळे तक्रारदाराने लघुउद्योगासाटी लाईट कनेक्शन, बांधकाम पाणी परवाना शेड उभारण्यासाठी खर्च केला याकरीता हे जाबदार जबाबदार नाहीत. तसेच याबाबतचा कोणताही पुरावा तक्रारदाराने मे मंचात दाखल केलेला नाही. जाबदाराने तक्रारदाराला कर्ज मंजूरीचे पत्र दिले होते. परंतू तक्रारदाराचे मिळकतीचे रजि. गहाणखत करुन घेणेस कधीही सांगितले नव्हते. तक्रारदाराने दि. 21/11/2009 रोजी केले सदरचे गहाणखतावर जाबदार बँकेची सही नाही. तसेच प्रस्तुत गहाणखतावर जाबदार क्र. 1 यास पार्टी केलेले नाही. गहाणखत करणेस जाबदाराने सांगीतलेच नाही. त्यामुळे प्रॉपर्टी वर बोजा नोंदवणेचा प्रश्न येत नाही. कर्ज अदा न करता बँक कधीही मिळकतीवर बोजा चढवणार नाही. त्यामुळे मिळकतीवर जाबदार बँकेने बोजा रक्कम रु.14,56,000/- चा चढविला हे म्हणणे खोटे आहे. तथापी, जाबदार क्र. 2 ने जाबदार क्र. 1 यांना दि.5/12/2009 रोजी बीजभांडवलाची तरतूद संपली असून तक्रारदाराने तात्पुरते बीजभांडवल वापरुन व्यवसाय सुरु करावा असे कधीही कळविले नव्हते. जाबदार क्र. 1 यांचे बँकींग नियमाप्रमाणे बीजभांडवलाची व मार्जिनमनिची रक्कम कर्ज खात्यात भरल्याशिवाय बँक पुढील कर्ज देऊ शकत नाही. सदरची बाब जाबदाराने वेळोवेळी तक्रारदाराला सांगीतली होती. परंतू तक्रारदाराने कोणतीही पूर्तता केली नाही. व सहानुभूती दाखविली नाही. तदनंतर तक्रारदाराचे कर्जाचे जामीनदार श्री. विजय दिनकर कदम यांनी जामीन राहणेस नकार दिला हा मजकूर खरा आहे. परंतू त्यावेळी तक्रारदाराने सदर जामीनदाराचे बदल्यात दुसरा जामीनदार देण्याचे लेखीस्वरुपात मान्य केले होते हा मजकूर खोटा आहे. वस्तुतः कर्ज मंजूर झाल्यापासून तक्रारदाराने वीजभांडवलाची व मार्जीन रकमेची तरतूद सुमारे वर्षभर केली नाही त्यामुळे कर्ज मंजूर होऊनही ते वितरीत करता आले नाही. तसेच कर्ज मंजूर होऊन 1 वर्ष लोटल्याने कर्ज प्रकरणासंबंधी कागदपत्रांची पूर्तता, सहया घेणे, जाबदार क्र. 1 यांना नियमाप्रमाणे आवश्यक बनले होते. सबब जाबदार यांनी तक्रारदार यांना तसे कळविले व त्यावेळी जामीनदार विजय कदम याने कर्ज प्रकरणावर सहया केल्या नाहीत व जामीन राहणेस नकार दिला व शेवटपर्यंत तक्रारदाराने दुसरा जामीनदार दिली नाही त्यामुळे कर्ज वितरीत करता आले नाही. तक्रारदाराचे रक्कम रु.11 लाख रुपयांचे नुकसान झाले हे खोटे आहे. तक्रारदाराने जाबदार क्र. 1 यांना आवश्यक असलेल्या कागदपत्रांची बीजभांडवलाची, मार्जीन रकमेची कधीही वेळेत पूर्तता केली नाही हा तक्रारदाराचा निष्काळजीपणा असलेने कर्ज मंजूर होणेस अगर वितरीत होणेस विलंब लागला. तक्रारदाराने त्याचे आईवडिलांनी एच.डी.एफ.सी. बँकेचे गृहकर्ज घेतले आहे त्याची परतफेड व्यवस्थीत असलेचे जाबदाराला सांगीतले होते. परंतू कागदपत्रावरुन आईच्या गृहकर्जाव्यतिरिक्त प्राथमीक शिक्षक बँकेचे सुमारे रक्कम रु.4,06,000/- कर्ज असल्याचे दिसून येत होते. त्यामुळे तक्रारदाराचे आईचे उत्पन्न विचारात घेता गृहकर्ज टेकओव्हर करणे शक्य नव्हते. सबब तक्रारदार यांना दि. 20/4/2011 रोजी पत्र देऊन कर्जप्रकरण नामंजूर केलेचे पत्र जाबदाराने पाठवले व त्यानंतर सन 2014 मध्ये सदर तक्रार अर्ज मे. मंचात दाखल केला तो वेळेत व मुदतीत केलेला नाही त्यामुळे तक्रार अर्ज फेटाळणेस पात्र आहे असे म्हणणे जाबदार क्र. 1 यांनी दाखल केले आहे.
प्रस्तुत कामी जाबदार क्र. 2 ने पुढीलप्रमाणे म्हणणे सादर केले आहे. सुशिक्षीत बेरोजगारासाठी उद्योग व्यवसाय सुरु करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत दि. 1/10/1993 पासून बीज भांडवल योजना राबविली जाते. सदर योजनेअंतर्गत शासनाचे बीजभांडवल 15 टक्के व स्गुंतवणूक 10 टक्के व उर्वरीत 75 टक्के कर्ज दिले जाते. तक्रारदाराने कॉरुगेटेड बॉक्सेस बनविण्यासाठी लघुउद्योगासाठी कर्जप्रकरण बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा कृष्णानगर, जि.सातारा यांना पाठवले होते. सदर बँकेने 15.04 लक्ष प्रकरणास मंजूरी दिली व त्यापोटी रक्कम रु.2,31,000/- (रुपये दोन लाख एकवीस हजार मात्र) ची मंजूरी व मागणी केली होती त्याचे दि.26/2/2009 अन्वये त्यानुसार या कार्यालयाने बँकेच्या मंजूरीच्या आधारे दि. 30/09/2009 रोजी रक्कम रु.2,31,000/- बीजभांडवल कर्ज दिले होते. सदर योजनेअंतर्गत प्रकरण बँकेकडे दि. 1/9/2008 मध्ये पाठविण्यात आले होते या योजनेमध्ये कर्ज मंजूरीचे अधिकार, संबंधीत बँकेस आहेत. दि.26/9/2009 रोजी बँकेने कर्ज मंजूर केलेनंतर या कार्यालयाने त्वरीत दि. 30/9/2009 रोजी बीज भांडवल कर्ज मंजूर केले व विहीत कालावधीत निर्णय घेतला. शासनाने विहीत केलेले दुय्यम तारण गहाण खत दि.27/11/2009 रोजी या कार्यालयास सादर केले आहे. सदर गहाणखत हे शासनाने दिलेल्या रक्कम रु.2,31,000/- रकमेसाठी लागू आहे. परिच्छेदामध्ये नमूद केले 14.56 लक्ष रकमेवर बोजा नोंद केलेला नाही. सन 2008-09 मधील सदर योजनेची उपलब्ध तरतूद संपल्यानंतर बीजभांडवल रक्कम संपल्याने संबंधीत बँकेची रक्कम कर्जाची रक्कम वितरण करावी व शासनाची बीजभांडवल रक्कम उपलब्ध झालेनंतर बँकेकडे वर्ग करण्यात येईल, या कार्यालयामार्फत वितरण केलेली रक्कम दि.28/9/2010 रोजी धनादेश क्र. 57005 दि.14/9/2010 रक्कम रु.1,03,494/- व दि.24/1/2011 रोजी धनादेश क्र. 76763298 रक्कम रु.1,27,506/- अशी एकूण रक्कम रु.2,31,000/- जाबदार क्र. 1 बँकेकडे वर्ग करणेत आली आहे. या कार्यालयाशी संबधीत आवश्यक कार्यवाही पूर्ण केली आहे. प्रस्तुत जाबदार क्र. 2 ने जाबदार क्र. 1 बँकेने मंजूर केले कर्जासाठीचे योग्य ते बीजभांडवल अदा केले आहे. त्यामुळे जाबदार क्र. 2 ने कोणतीही सेवात्रुटी तक्रारदाराला दिलेली नाही. सबब जाबदार क्र. 2 ला जबाबदार धरु नये असे म्हणणे जाबदार क्र. 2 ने दिले आहे.
5. प्रस्तुत कामी वर नमूद तक्रारदार व जाबदार यांनी दाखल केले सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन प्रस्तुत तक्रार अर्जाच्या निराकरणार्थ मे. मंचाने पुढील मुद्दयांचा विचार केला.
अ.क्र. मुद्दा उत्तर
1. तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक आहेत काय? होय.
2. जाबदार यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा
पुरविली आहे काय? होय.
3. अंतिम आदेश काय? खाली नमूद
आदेशाप्रमाणे.
विवेचन-
6. वर नमूद मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत. कारण-तक्रारदार हे सुशिक्षित बेकार असलेने त्यांनी कॉरुगेटेड बॉक्सेस उत्पादन करणेसाठी लघुउद्योग सुरु करणेच्या प्रकल्पासाठी जाबदार क्र. 1 कडे कर्जमागणी केली व प्रस्तुत कर्जमागणी रकमेच्या 15 टक्के रक्कम ही जाबदार क्र. 2 यांनी बीजभांडवलापोटी तक्रारदाराला देण्याचे होते. तर 75 टक्के कर्ज रक्कम जाबदार क्र. 1 यांनी देणेसाठी कर्ज मागणी अर्ज तक्रारदाराने जाबदार क्र. 1 यांचेकडे सादर केला. जाबदार क्र. 2 ने 15 टक्के बीज भांडवल तक्रारदाराला देणेचे मंजूर केले होते. तसेच जाबदार क्र. 1 नेही सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन तक्रारदाराचे 75 टक्के कर्ज मंजूर केले होते व 10 टक्के रक्कम तक्रारदाराने स्वतः भरावयाची होती. जाबदार क्र. 1 ने तक्रारदाराचे कर्ज मंजूर केले. तसेच जाबदार क्र. 2 ने बीजभांडवलापोटी रक्कम रु.2,31,000/- तक्रारदाराला देणेचे मान्य केले व प्रस्तुत रकमेचे धनादेश जाबदार क्र.2 ने जाबदार क्र. 1 कडे दिलेले होते. या सर्व बाबी दाखल कागदपत्रांवरुन स्पष्ट झाल्या आहेत. सबब तक्रारदार हे जाबदार क्र. 1 व 2 यांचे ग्राहक आहेत हे निर्विवाद स्पष्ट होते. तसेच तक्रारदाराने जाबदार क्र. 1 व 2 यांचेकडे कर्ज रक्कम व बीजभांडवल मिळणेसाठी अर्ज दाखल केला. सोबत योग्य ती सर्व कागदपत्रांची पूर्तता केली होती. त्यानंतर जाबदार क्र. 2 ने कर्ज मागणीच्या 15 टक्के रक्कम रु.2,31,000/- बीजभांडवल योजनेमार्फत तक्रारदाराला देण्याचे मंजूर/मान्य केले. तदनंतर जाबदार क्र. 2 ने उर्वरीत 75 टक्के कर्ज प्रकरण मंजूरीसाठी जाबदार क्र.1 कडे दि. 1/9/2008 रोजी पाठवून दिले. त्यावर जाबदार क्र. 1 यांनी तक्रारदार यांना दि.23/12/2008 रोजी बोलावून घेऊन त्यांची मुलाखत घेतली. सदर मुलाखतीनंतर तक्रारदाराने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता केली. त्यानंतर तक्रारदाराचे कर्ज मंजूर करुन कर्ज मंजूरीचे पत्र जाबदार क्र. 1 बँकेने तक्रारदाराला व जाबदार क्र. 2 यांना पाठवले. त्याप्रमाणे एकूण रकमेपैकी 75 टक्के रक्कम रु.12,25,000/- (रुपये बारा लाख पंचवीस हजार मात्र) जाबदार क्र. 1 बँकेने तक्रारदाराला द्यावयाचे होते व 15 टक्के रक्क्म रु.2,31,000/- (रुपये दोन लाख एकतीस हजार मात्र) जाबदार क्र. 2 यांनी बीजभांडवल म्हणून तक्रारदार यांना द्यावयाचे होते व उर्वरीत 10 टक्के रक्कम तक्रारदाराने स्वतः भरावयाची होती. तक्रारदाराने लवकरात लवकर उद्योग सुरु करणेसाठी जाबदार सांगतील त्या-त्या बाबींची पूर्तता केली व जाबदार क्र. 1 चे पत्रातील सर्व अटी तक्रारदाराने मान्य केल्या. जाबदार क्र. 2 ने दि. 1/9/2008 रोजी कर्ज प्रकरण मंजूरीसाठी जाबदार क्र. 1 बँकेकडे पाठविलेनंतर तब्बल एक वर्षानंतर म्हणजे दि.8/10/2009 रोजी जाबदार क्र. 1 ने प्रकरण जाबदार क्र. 2 कडे परत पाठविले. दरम्यानच्या काळात मोठा वेळ वाया गेला. तसेच तक्रारदाराने लघुउद्योगासाठी आवश्यक त्या सोयींची म्हणजेच लाईट कनेक्शन, पाणीपरवाना, बांधकाम,शेड उभारणी इ. सर्व गोष्टींची पूर्तता करण्यासाठी मोठया प्रमाणात रक्कम खर्च केली. तसेच कर्जासाठी तक्रारदाराने त्याचे मौजे पाटखळ, ता.जि.सातारा हा व मौजे धामणेर, ता. कोरेगांव, जि.सातारा येथील शेतमिळकतीचे गहाणखत रजि.दस्त दि.21/11/2009 रोजी तक्रारदार यांनी जाबदार क्र. 1 यांना करुन दिला. तसेच जाबदार क्र. 2 यांनादेखील दि.25/11/2009 रोजी गहाणाचा रजि.दस्त तक्रारदाराने करुन दिला. प्रस्तुत गहाण खताचे आधारे जाबदार यांनी तक्रारदार यांना कोणतीही रक्कम कर्जाऊ देणेपूर्वीच बेकायदेशीरपणे सदर तारण दिले मिळकतींवर रक्कम रु.14,56,000/- चा कर्जाचा बोजा नोंदवला. दि. 5/12/2009 रोजी जाबदार क्र.2 यांचेकडील बीज भांडवलाची रकमेची तरतूद संपली असलेने जाबदार बँकेने सदरची रक्कम रु.2,31,000/- तात्पुरती भरावी व जाबदार क्र. 2 कडे बीज भांडवल उपलब्ध होताच सदर रक्कम जाबदार क्र.1 यांना परत देतील असे आश्वासनाचे पत्र जाबदार क्र. 2 ने जाबदार क्र. 1 यांना दिले होते. तक्रारदाराचा बराच खर्च झालेने त्यास बीजभांडवलाची 15 टक्के रक्कम भरणे शक्य नसलेने सदर रक्कम जाबदार क्र. 1 बँकेने भरावी व जाबदार क्र. 2 कडून मिळणा-या रकमेतून वळती करुन घ्यावी असे तक्रारदाराने जाबदार क्र. 1 ला विनंती केली. परंतू जाबदार क्र. 1 ने कोणतीही सहानुभूती दाखवली नाही. त्यामुळे बराच कालावधी निघून गेला. तदनंतर 10 महिन्यांनंतर जाबदार क्र. 2 यांनी बीज भांडवलाचे 15 टक्के रकमेपोटी दोन धनादेश अनुक्रमे दि.14/1/2010 चा धनादेश क्र. 570005 रक्कम रु.1,03,494/- व दि. 14/1/2011 रोजीचा धनादेश क्र.763289 रक्कम रु.1,27,506/- चा जाबदार क्र. 1 बँकेकडे पाठवून दिले. तरीदेखील जाबदार क्र. 1 बँकेने सदर बीजभांडवलाची रक्कम रु.2,31,000/- तसेच कर्जाची 75 टक्के रक्कम रु.12,25,000/- तक्रारदाराला लघुउद्योगासाठी अदा केली नाही. याऊलट कर्ज मंजूर होऊन तारणगहाणखत होऊन, तसेच कर्जाचा बोजा कर्ज देणेपूर्वीच तारण मिळकतींवर चढवूनदेखील कर्ज मंजूर होऊन जवळजवळ 1 वर्ष झाले कारणाने परत नवीन कर्ज प्रकरण बनवावे लागेल अशी बेकायदेशीर अट तक्रारदार यांचेवर घालून नवीन कर्जप्रकरणासाठी कागदपत्रांची पूर्तता करणेची मागणी जाबदार क्र. 1 बँकेने तक्रारदार यांना केली व तक्रारदाराने कर्जमंजूरीसाठी तसेच बीजभांडवलासाठी आवश्यक ती सर्व पूर्तता केली असतानाही जाबदार क्र. 1 बँकेने जाणूनबुजून जवळजवळ अडीच ते तीन वर्षानंतर जामीनदार जामीन राहणेस तयार नाहीत व तक्रारदार घरतारण ठेऊ शकत नसल्याने कर्ज वितरीत करु शकत नसलेचे खोटे कारण दाखवून कर्ज नामंजूरीसाठी जाबदार क्र. 1 बँकेने वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवले व त्याबाबत जाबदार क्र. 1 ने तक्रारदाराला दि. 20/4/2011 रोजी कळविले. परंतू जाबदार क्र.1 यांचे वरिष्ठ कार्यालयाकडून तक्रारदार यांचे कर्ज मंजूर केलले प्रकरण नामंजूर केलेबाबत काहीही कळविण्यात गेलेले नाही. प्रस्तुत कामी नि. 31 कडे जाबदार क्र. 2 ने जाबदार क्र. 1 कडे कर्जमंजूरीसाठी पाठवलेले पत्र, जाबदार क्र. 1 ने कर्ज मंजूरीचे तक्रारदाराला दिलेले पत्र, सर्चरिपोर्ट, तक्रारदाराने जाबदार क्र. 1 ला करुन दिलेले रजिस्टर तारण गहाणखत, फेरफार उतारे वगैरे कागदपत्रे दाखल करुन, दिलेले रजिस्टर तारण गहाण खत, फेरफार उतारे, वगैरे कागदपत्रे दाखल आहेत. सर्व कागदपत्रांची पूर्तता करुनही जाबदार क्र. 1 यांनी कर्ज रक्कम तक्रारदाराला अदा केली नाही. तसेच जाबदार क्र. 2 यांनी बीज भांडवलापोटी जाबदार क्र. 1 यांना अदा केलेले धनादेश रोखीकरण बँकेच्या (जाबदार क्र. 1च्या) कर्ज वितरणापूर्वी करु नये अशी स्पष्ट अट जाबदार क्र. 2 यांनी जाबदार क्र. 1 यांना बीज भांडवलापोटी धनादेश देताना दिले पत्रामध्ये बीजभांडवलाची रक्कम हाताळण्याबाबत अटी व शर्थीमध्ये दिले असतानाही जाबदार क्र. 1 बँकेने प्रस्तुत बीजभांडवलापोटी दिले धनादेशाचे रोखीकरण झालेनंतर बीजभांडवलाची रक्कम तक्रारदाराला देण्याची सर्वस्वी जबाबदारी जाबदार क्र. 1 बँकेवर असतानाही बँकेने ती तक्रारदाराला अदा केली नाही. तसेच धनादेशांचे रोखीकरण करणेपूर्वी जाबदार क्र. 2 यांना जाबदार क्र. 1 बँकेने कर्ज नामंजूरीबाबत कोणतेही पत्र दिलेले नाही. तसेच जाबदार क्र. 1 बँकेने कोणतेही अटी शर्तींचे पालन केलेले नाही. तसेच जाबदार क्र. 1 ने तक्रारदाराने दिले तारण गहाण मिळकतीवर तक्रारदाराला कर्ज अदा न करताच बोजा चढविला होता (फेरफार क्र. 2690) तो बोजा तक्रारदाराने कर्ज फेडलेमुळे कमी करावा असे जाबदार क्र. 1 बँकेने खरेदीपत्र देऊन बोजा कमी केलेचे दिसून येते. या सर्व नि.31 कडील कागदपत्रांचे तसेच जाबदार क्र. 1 यांचे सेवा पुरविण्याची पध्दत याचा विचार करता तसेच तक्रारदार व जाबदार यांचे पुरावे, लेखी युक्तीवाद व तोंडी युक्तीवाद यांचा उहापोह करता, प्रस्तुत तक्रारदार यांना जाबदार क्र. 1 बँकेने सदोष सेवा पुरविलेचे स्पष्ट होत आहे आणी त्यामुळे तक्रारदाराचे प्रचंड नुकसान झालेचे स्पष्ट व सिध्द होत आहे. जाबदार क्र. 2 यांनी 15 टक्के बीजभांडवलाचे धनादेश जाबदार क्र. 1 बँकेकडे सुपूर्द केलेचे स्पष्ट होत आहे. परंतू त्याचे रोखीकरण कर्ज वितरणापूर्णी करणेचे नाही अशी अट असतानाही जाबदार क्र. 1 बँकेने सदरचा धनादेशाचे बेकायदेशीर रोखीकरण केले आहे. जाबदार क्र. 2 यांनी प्रस्तुत तक्रारदाराला सदोष सेवा दिलेली नाही असे दिसते. सबब जाबदार क्र. 2 हे तक्रारदाराचे झाले नुकसानीस कारणीभूत व जबाबदार नाहीत तर जाबदार क्र. 1 हेच प्रस्तुत तक्रारदाराला दिले सदोष सेवेबाबत जबाबदार आहेत असे या मे मंचाचे स्पष्ट मत आहे. तक्रारदाराने लघुउद्योगासाठी केले खर्चाच्या पावत्या नि. 31 सोबत दाखल केल्या आहेत. तक्रारदाराने प्रिंटींग मशिन खरेदीसाठी दशमेश इंडस्टि्रीज यांना रक्कम रु.80,000/- अँडव्हान्स दिलेची पावती, म.रा.वि.वि.कं कडून वीज कनेक्शन घेणेसाठी रक्कम रु.10,433/- या दोन पावत्या, म.रा.वि.वि.कं.कडून वीजकनेक्शन घेणेसाठी रक्कम रु.10,433/- या दोन पावत्या दाखल केले आहेत. तसेच लघुउक्षेगास जाबदार क्र. 1 ने कर्जपुरवठा न केलेने तक्रारदाराचे झालेले नुकसान दाखविण्यासाठी एम.आर.पी.आर.एस अँन्ड असोसिएटस् या चार्टर्ड अकौंटंट यांचा Loss of Revenue due to non commencement of Business ची Work Sheet दाखल केली आहे. परंतू त्याच्या स्पेसीफीक पावत्या मे मंचात दाखल केल्या नाहीत. सदर रिपोर्ट Project Report वरुन दिलेचे म्हटले आहे. त्यामुळे तक्रारदाराने प्रस्तुत कामी जाबदार यांनी सेवेत कसूर केलेने जवळजवळ 11,00,000/- चे नुकसान झालेचे कथन विश्वासाई वाटत नाही. तरी परंतू प्रस्तुत तक्रार अर्जातील सर्व कागदपत्रे तक्रारदाराने लघुउद्योग सुरु करणेसाठी केलेली धावपळ, कागदपत्रांची जमवाजमव, तसेच मशिन खरेदीसाठी अॅडव्हान्स म्हणून दिलेली रक्कम रु.80,000/- व्यवसायासाठी बांधलेले शेड, इलेक्ट्रीकसीटी (वीजेचे कनेक्शन), पाण्याची सोय याकरीता तक्रारदाराने रक्कम खर्च केलेचे स्पष्ट होते. परंतू तक्रारदाराने प्रस्तुत कामी सी.ए. यांचे अँफीडेव्हीट, फोटोग्राफरचे अँफीडेव्हीट व खर्चाची मूळ बीले दाखल केलेली नाहीत त्यामुळे तक्रारदार यांना रक्कम रु.11,00,000/- नुकसान झालेची बाब स्पष्ट होत नाही. तरीही सारासार विचार करता तक्रारदार यांचे जाबदार क्र. 1 यांनी सदोष सेवा पुरविली असून त्यांनी वेळेवर कर्जपुरवठा न केल्याने नुकसान होणे स्वाभाविक आहे व तक्रारदाराने स्वतः खर्च केलेले पैसे व श्रम वाया गेले हे स्पष्ट होत आहे. जाबदार क्र. 1 यांनी त्यांचे म्हणणेच्या शाबीतीसाठी कोणताही पुरावा मे. मंचात दाखल केलेला नाही. सबब सदर कामी जाबदार क्र. 1 बँकेने तक्रारदाराला सदोष सेवा दिली आहे हे स्पष्ट व सिध्द होते. सबब मुद्दा क्र.2 चे उत्तर होकारार्थी दिले. तक्रारदार यांना जाबदार क्र. 1 ने यांनी नुकसानभरपाईपोटी रक्कम रु.5,00,000/- (रुपये पाच लाख मात्र) अदा करणे न्यायोचीत होणार आहे असे या मे. मंचाचे स्पष्ट मत आहे. सबब प्रस्तुत कामी जाबदार क्र. 1 बँकेस तक्रारदार यांना सदोष सेवा पुरविले प्रकरणी जबाबदार धरणेत येते व जाबदार क्र. 2 यांनी तक्रारदाराला कोणतीही सदोष सेवा दिलेली नाही. त्यामुळे जाबदार क्र. 2 यास या जबाबदारीतून वगळणेत येते.
8. सबब प्रस्तुत कामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1. तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2. जाबदार क्र. 1 बँकेने तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली असलेने जाबदार क्र. 1
बँकेने तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली असलेने जाबदार क्र. 1 ने तक्रारदाराला
नुकसानभापाई पोटी रक्कम रु.5,00,000/- (रुपये लाख मात्र) अदा करावेत.
प्रस्तुत रकमेवर अर्ज दाखल तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष हाती पडेपर्यंत
द.सा.द.शे. 9 व्याज अदा करावे.
3. वरील नमूद सर्व आदेशाचे पालन/पूर्तता जाबदार क्र. 1 बँकेने आदेश
पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावे.
4. विहीत मुदतीत आदेशाचे पालन न केल्यास तक्रारदार यांना ग्राहक संरक्षण
कायदा कलम 25 व 27 नुसार जाबदारांविरुध्द कारवाई करणेची मुभा राहील.
5. जाबदार क्र. 2 यांना प्रस्तुत जबाबदारीतून वगळणेत येते.
6. सदर न्यायनिर्णयाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य पाठवणेत याव्यात.
7. सदर न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
ठिकाण- सातारा.
दि. 05-10-2015.
(सौ.सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ.सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.