Maharashtra

Satara

CC/12/79

NITIN ARJUN RAJE - Complainant(s)

Versus

BANK OF MAHARASHTRA - Opp.Party(s)

24 Aug 2015

ORDER

सातारा जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर

 

उपस्थिती -  मा.सौ.सविता भोसले,अध्‍यक्षा

            मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्‍य.

                                            मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्‍या.

 

                              तक्रार क्र. 79/2012.

                             तक्रार दाखल दि.7-5-2012.

                                   तक्रार निकाली दि. 24-8-2015. 

 

श्री.नितीन अर्जुन राजे.

रा.खटाव,

ता.खटाव, जि.सातारा.                        ....  तक्रारदार

  

         विरुध्‍द

1. शाखा व्‍यवस्‍थापक,

   बँक ऑफ महाराष्‍ट्र, शाखा-खटाव.

2. शाखा व्‍यवस्‍थापक,

   बँक ऑफ महाराष्‍ट्र, शाखा सातारा शहर.     ....  जाबदार

 

                 तक्रारदारातर्फे अँड.एस.एस.बगाडे. 

                 जाबदारांतर्फे- अँड.एम.जी.कुलकर्णी.  

 

                        न्‍यायनिर्णय  

 

(सदर न्‍यायनिर्णय मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्‍या यानी पारित केला)

                       

1.         तक्रारदारांनी प्रस्‍तुत तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा 1986च्‍या कलम 12 नुसार दाखल केला आहे.  तक्रारअर्जातील थोडक्‍यात कथन खालीलप्रमाणे-

       तक्रारदार हा वरील ठिकाणचा कायमचा रहिवासी असून तो मिळेल ती कामे करुन आपला उदरनिर्वाह करतो.   तक्रारदार हा बँक ऑफ महाराष्‍ट्र शाखा खटाव येथील खातेदार असून त्‍यांचे तेथे बचत खाते क्र.20208333004 असा आहे.  सदर तक्रारदारांनी त्‍यांचेकडे आय.सी.आय.सी.आय.बँक शाखा कराड येथील रु.2,50,000/- इतक्‍या रकमेचा चेक क्र.102459 हा वटवणेसाठी दि.16-11-2010 रोजी बँक ऑफ महाराष्‍ट्र शाखा खटाव येथे भरला असता सदर चेकची रक्‍कम तक्रारदारांचे खात्‍यात अद्याप जमा झाली नाही किंवा तो चेक न वटता परत तक्रारदारास मिळाला नाही.  तक्रारदारानी जाबदारांकडे चेकसंबंधी वारंवार विचारणा केली आहे, त्‍यावेळी जाबदारानी सदरचा चेक कुरियरने बँक ऑफ महाराष्‍ट्र शाखा सातारा शहर येथे वटवणेसाठी पाठवला आहे, तेथे चौकशी करणेस सांगितले.  त्‍याप्रमाणे लेखी पत्रही शाखा व्‍यवस्‍थापक, बँक ऑफ महाराष्‍ट्र शाखा सातारा शहर याना तक्रारदाराने दिले, तरीही सदर चेकचा कोणताही तपास लागला नाही.  दरम्‍यान चेकवरील तारीखही उलटून गेली.    तक्रारदाराचे खात्‍यावर कोणतीही रक्‍कम जमा झाली नाही.  तक्रारदार हा सुशिक्षित बेकार असून मिळेल ते काम करुन उदरनिर्वाह करीत असतो.  पै पै जमा करुन त्‍याने सदर रक्‍कम जमवली होती.   आपल्‍या मित्राला त्‍याने हातउसने पैसे दिले होते.  त्‍या रकमेचा चेक त्‍यानी मित्राला दिला होता.  सदर चेक बँकेत गहाळ झाला असल्‍याची पूर्ण जबाबदारी जाबदारांवर आहे.  सदर चेक गहाळ झालेने तक्रारदारांचे रु.2,50,000/-चे कशानेही भरुन न येणारे नुकसान झाले आहे त्‍यामुळे त्‍याला मानसिक धक्‍का बसला आहे. त्‍याची मोठी आर्थिक हानी झाली आहे. त्‍याचे कौटुंबिक स्‍वास्‍थही बिघडले आहे.  तक्रारदारांचे रक्‍कम रु.2,50,000/-चे नुकसानीस पूर्णपणे जाबदार जबाबदार आहे.  जाबदारांचे निष्‍काळजीपणे तक्रारदारांचे रु.2,50,000/-चे नुकसान झाले आहे त्‍यामुळे सदर नुकसानभरपाईसाठी तक्रारदाराने सदर तक्रारअर्ज दाखल केला आहे.   तक्रारदार व जाबदार हे दोघेही सातारा जिल्‍हयात रहातात त्‍यामुळे सदर अर्ज चालवणेचा अधिकार मे.ग्राहक मंचास आहे.  सबब तक्रारदारानी मे.मंचाला पुढीलप्रमाणे विनंती केली आहे-  तक्रारदारास जाबदाराकडून रु.2,50,000/- नुकसानभरपाई देणेचा आदेश व्‍हावा.  अर्ज दाखल तारखेपासून रक्‍कम पदरी पडेपर्यंत सदर रकमेवर 18% व्‍याज देणेचा हुकूम व्‍हावा.  अर्ज दाखल करणेसाठी झालेला खर्च मानसिक त्रासापोटीचा खर्च रु.20,000/- जाबदाराकडून देववावा. 

 

2.        जाबदारानी नि.12 कडे त्‍यांचे म्‍हणणे खालीलप्रमाणे दाखल केले आहे-

        तक्रारदारांच्‍या तक्रारीतील जाबदारांनी मान्‍य केलेल्‍या मजकुराशिवाय इतर सर्व मजकूर खोटा, लबाडीचा असून जाबदाराना तो मान्‍य व कबूल नाही.    तक्रारदारांच्‍या तक्रारीतील तक्रारदारांनी त्‍यांच्‍या बचत खात्‍यात आय.सी.आय.सी.आय.बँक शाखा कराड वरील दि.10-7-2010, चेक क्र.102459 चा जाबदार क्र.1 चे शाखेत दि.16-11-2010 रोजी भरला व सदर चेक जाबदार क्र.1 यांनी जाबदार क्र.2 शाखा सातारा येथे वसुलीसाठी पाठविला इतकाच मजकूर खरा व बरोबर असून बाकी सर्व मजकूर खोटा व लबाडीचा असून जाबदाराना तो मान्‍य व कबूल नाही.  तक्रारअर्जातील सदरचा चेक जाबदारांकडून गहाळ झाला व तक्रारदारानी वारंवार जाबदारांकडे चेकबाबत विचारणा केली इ.सर्व मजकूर खोटा व लबाडीचा असून तो जाबदाराना मान्‍य व कबूल नाही.  तक्रारदाराचा चेक जाबदार क्र.2 या शाखेतून तांत्रिक कारणाने जाबदार क्र.1 कडे परत आलेनंतर जाबदार क्र.1 यानी तक्रारदाराना त्‍वरीत चेक तांत्रिक कारणानी परत आला आहे व आता तो परत वटवणेसाठी पाठवावयाचा का याबाबत वारंवार विचारणा केली असता तक्रारदारांनी सदरचा चेक तुमचेकडेच ठेवा, आता वटवणेसाठी पाठवू नका कारण चेक देणार यांचे खात्‍यामध्‍ये पुरेसे पैसे जमा नाहीत.  पैसे सदर खात्‍यात जमा होताच आम्‍ही तुम्‍हाला कळवितो.  तसेच मुदत संपली असल्‍यास मी दुसरा नवीन चेक देतो किंवा चेकची तारीख बदलून आणतो असे सांगितले, तथापि तक्रारदारानी सदरचा चेक मुदत संपूनही परत नेला नाही किंवा दुसरा नवीन चेक वटवणेसाठी जाबदार क्र.1 चे शाखेत भरला नाही व जाणुनबुजून चेक जाबदार 1 कडे रिटर्न केला.  तथापि जाबदार 1 यानी तक्रारदारांशी वेळोवेळी प्रत्‍यक्ष व फोनवर बोलणी करुन चेक परत नेणेसाठी सांगितले, तरीही तक्रारदारानी जाबदार क्र.1 याना प्रतिसाद दिला नाही व चेक जाबदार 1 यांचेकडून घेऊन गेले नाहीत.  परंतु त्‍यानंतर दि.22-9-2011 रोजीचे पत्राने व दि.13-2-2012 चे  नोटीसीने म्‍हणजे जवळजवळ 1 वर्ष चार महिन्‍यानी नोटीस पाठवून विचारणा केली तेव्‍हा चेक वटवणेची मुदत संपून गेली होती.  त्‍यामुळे सदर चेकच्‍या रकमेच्‍या नुकसानीस तक्रारदार हेच सर्वस्‍वी जबाबदार असलेचे स्‍पष्‍ट होते, त्‍याकारणे तक्रारदारांची तक्रार मे.कोर्टात कायद्याने चालू शकत नाही तरी ती फेटाळणेत यावी. वास्‍तविक खरी वस्‍तुस्थिती अशी की, तक्रारदारांच्‍या देण्‍याघेण्‍याच्‍या बेकायदेशीर व्‍यवहारापोटी संबंधित चेक देणार श्री.जावेद सिराज मुल्‍ला यानी त्‍यांच्‍या आय.सी.आय.सी.आय.बँक लि.शाखा कराड या शाखेतील त्‍यांचे खात्‍यावर चेकच्‍या 10-7-2010 या तारखेस किंवा तदनंतरही दि.28-1-2011 पर्यंत चेकच्‍या रकमेइतकी शिल्‍लक रक्‍कम ठेवलेली नव्‍हती.  या कामी जावेद मुल्‍ला यांच्‍या आय.सी.आय.सी.आय.बँक, शाखा कराड येथील खाते उता-याची दि.16-4-2010 ते 28-1-2011 या काळातील सबंधित बँकेच्‍या शाखाधिकारी यांच्‍या सहीशिक्‍क्‍याची प्रत या कामी दाखल केलेली आहे.  यावरुन संबंधित चेक देणार श्री.जावेद मुल्‍ला यानी तक्रारदारास बोगस चेक दिलेला होता.  त्‍यामुळे या सर्व व्‍यवहाराची कागदोपत्री पुराव्‍यानिशी शहानिशा होणे कायद्याने अभिप्रेत आहे, त्‍याकारणे सदरची तक्रार या मे.कोर्टात चालू शकत नाही, सबब ही तक्रार प्रथमदर्शनीच काढून टाकणेस पात्र आहे.  तक्रारदार व संबंधित चेक देणार श्री.जावे‍द सिराज मुल्‍ला यांचा कायदेशीर देण्‍याघेण्‍याचा व्‍यवहार असलेस तक्रारदार चेकपोटी येणे रक्‍कम मा.दिवाणी कोर्टात दावा दाखल करुन वसूल करु शकतात व सदर दावा दाखल करणेस मुदत असूनही अद्याप तक्रारदारांनी त्‍याप्रकारे चेक देणार यांचेवर कोणतीही कायदेशीर कारवाई केलेचे दिसत नाही.  सबब जाबदारांचे स्‍पष्‍ट म्‍हणणे की, तक्रारदारांचा सदर चेकपोटीचा व्‍यवहार कायदेशीर नव्‍हता व नाही, त्‍यामुळे तक्रारदाराना बेकायदेशीर व्‍यवहाराच्‍या चेकची रक्‍कम जाबदार क्र.1, 2 यांचेकडून कायद्याने मागता येत नाही याही कारणाने तक्रार कायद्याने चालू शकत नाही, तरी ती फेटाळणेत यावी.  तक्रारदारानी सदरचा चेक जाबदार क्र.1 यांनी प्रत्‍यक्ष व समक्ष फोनवर वेळोवेळी सांगूनही परत घेतला नाही, त्‍याकारणे सदर चेक जाबदारानी तक्रारदारांस रजि.पोस्‍ट पावतीने पाठवून दिला आहे.  सबब तक्रारदारांची तक्रारअर्जातील रु.2,50,000/- ची मागणी व त्‍यावरील द.सा.द.शे.18% व्‍याजाची मागणी आणि सदर तक्रार करणेस कोणतेही कायदेशीर कारण घडलेले नसल्‍याने रु.20,000/-च्‍या खर्चाची मागणी फेटाळणेत यावी.  अकारण जाबदाराविरुध्‍द तक्रार दाखल करुन खर्चात पाडले म्‍हणून कॉंपेंसेटरी कॉस्‍ट रु.20,000/- तक्रारदारानी जाबदाराना देणेबाबत आदेश व्‍हावा.  येणेप्रमाणे जाबदारानी म्‍हणणे दाखल केले आहे. 

 

3.      नि.1 कडे तक्रारअर्ज, नि.2 कडे तक्रारदाराचे प्रतिज्ञापत्र,  नि.3 कडे फेरिस्‍त, नि.3/1 कडे जाबदार क्र.1 याना पाठवलेल्‍या रजि.नोटीसची स्‍थळप्रत, नि.3/2 कडे तक्रारदारानी बँकेला धनादेशाची रक्‍कम खात्‍यावर जमा झाली नाही, त्‍याबाबतच्‍या चौकशीचे पत्र, नि.3/3 व ¾ कडे व्‍यवस्‍थापक शाखा सातारा याना बॅक ऑफ महाराष्‍ट्र खटाव यानी तक्रारदाराच्‍या चेकचे रियलायजेशन का झाले नाही याच्‍या चौकशीचे दिलेले पत्र,  नि.3/5 कडे अँड.उत्‍तम रसाळ यानी जाबदारातर्फे तक्रारदाराच्‍या वकीलाना पाठवलेले पत्र, नि.4 कडे तक्रारदाराचा पत्‍तामेमो,  नि.5 कडे जाबदारांचा वकीलपत्र नेमणुकीचा अर्ज, नि.6 कडे अँड.बगाडे यांचे वकीलपत्र,  नि.7 कडे मंचाने जाबदाराना पाठविलेली नोटीस, नि.8 कडे जाबदार क्र.1 ची पोहोचपावती, नि.8/अ कडे जाबदार क्र.2 ची पोहोचपावती,  नि.9 कडे जाबदार क्र.1 व 2 तर्फे म्‍हणणे देणेसाठी मुदतीचा अर्जं, नि.10 कडे जाबदार क्र.1 व 2 तर्फे अँड.एम.जी.कुलकर्णी यांचे वकीलपत्र, नि.11 कडे जाबदारांचा मुदतीचा अर्ज, नि.12 कडे जाबदार 1 तर्फे म्‍हणणे दाखल. नि.13 कडे जाबदार क्र.1 तर्फे फेरिस्‍त दाखल, नि.13/1 कडे जावेद सिराद मुल्‍ला यांचा बँकेचा खातेउतारा,  नि.14 कडे जाबदार क्र.2 ची पुरसीस की, जाबदार क्र.1 यानी दिलेले म्‍हणणे, प्रतिज्ञापत्र हेच जाबदार क्र.2 चे म्‍हणणे व प्रतिज्ञापत्र समजावे,  नि.15 कडे तक्रारदाराचा कागद दाखल करणेसाठी परवानगी अर्ज, नि.16 कडे फेरिस्‍त, नि.16/1 कडे आय.सी.आय.सी.आय.चा मूळ चेक दाखल, नि.16/2 कडे बँकेने तक्रारदारास पाठवलेले पत्र,  नि.17 कडे तक्रारदारांचे पुराव्‍याचे प्रतिज्ञापत्र, नि.18 कडे जाबदार क्र.1 व 2 ची पुरसीस की, जाबदार क्र.1 तर्फे पुराव्‍यासाठी दिलेले प्रतिज्ञापत्र हेच जाबदार क्र.1 व 2 तर्फे पुराव्‍यासाठीचे प्रतिज्ञापत्र म्‍हणून वाचणेत यावे तसेच जादा पुरावा देणेचा नाही अशीही पुरसीस, नि.19 कडे तक्रारदाराचा लेखी युक्‍तीवाद, नि.20 कडे जाबदार क्र.1,2 चा लेखी युक्‍तीवाद, नि.21 कडे सायटेशन्‍स इ.कागदपत्रे दाखल आहेत. 

 

4.       तक्रारदारांची तक्रार, त्‍यासोबतचे प्रतिज्ञापत्र, जाबदारांचे म्‍हणणे, तक्रारदार व जाबदारांचे पुरावे, तसेच तक्रारदार व जाबदारांचे लेखी युक्‍तीवाद यांचे अवलोकन करुन सदर तक्रारीचे निराकरणार्थ मे. मंचाने खालील मुद्दयांचा विचार केला-

अ.क्र.           मुद्दा                                          निष्‍कर्ष

 

 1.  तक्रारदार व जाबदार यांचेत ग्राहक व सेवापुरवठादार

     असे नाते आहे काय?                                        होय.

 2.  जाबदारानी तक्रारदाराना दयावयाच्‍या सेवेत त्रुटी केली आहे काय?      होय.

 3.  जाबदार हे तक्रारदारांच्‍या रकमा देणे लागतात काय?                होय.

 4.  अंतिम आदेश काय?                                तक्रार अंशतः मंजूर.

विवेचन-  मुद्दा क्र.1 ते 3-        

5.         तक्रारदारांचे जाबदार क्र.1 यांचे बँकेत बचत खाते आहे.  त्‍यावर ते व्‍यवहार करतात.  तक्रारदार हे त्‍यामुळे जाबदार बँकेचे ग्राहक ठरतात व जाबदार बँक ही त्‍यांना सेवा पुरविते म्‍हणून ती सेवापुरवठादार ठरते.  तक्रारदारांनी आय.सी.आय.सी.आय.बँक शाखा कराड येथील रु.2,50,000/-चा चेक जाबदार क्र.1 यांचेकडे दि.16-11-2010 रोजी वटवणेसाठी दिला असता त्‍या चेकची रक्‍कम तक्रारदारांचे खात्‍यात जमा झाली नाही किंवा तो चेक न वटता तक्रारदाराना परतही मिळाला नाही.  तक्रारदारानी जाबदारांकडे वारंवार चौकशी केली असता त्‍यानी सदरचा चेक बँक ऑफ महाराष्‍ट्र सातारा शहर येथे कुरियरने वटवणेसाठी पाठविला आहे असे सांगितले.  त्‍याप्रमाणे लेखी पत्रही शाखा व्‍यवस्‍थापक बँक ऑफ महाराष्‍ट्र शाखा सातारा शहर याना तक्रारदारानी दिले.  परंतु सदरचा चेक वा कोणताही तपास लागला नाही व तोपर्यंत चेकवरील तारीखही उलटून गेली.  तक्रारदाराचे खात्‍यात कोणतीही रक्‍कम जमा झाली नाही किंवा चेकही परत आला नाही.  तक्रारदार सुशिक्षित बेरोजगार असून मिळतील ती कामे करीत असतो.  पै पै जमा करुन त्‍याने सदर रक्‍कम जमवली होती व आपले मित्रास हातऊसने पैसे दिले होते.  त्‍या रकमेचा चेक मित्राने त्‍यास परतावा म्‍हणून दिला होता.  सदरचा चेक बॅकेत गहाळ झालेची पूर्ण जबाबदारी जाबदारांवर आहे.  तक्रारदारास मानसिक धक्‍का बसून आर्थिक हानी झाली आहे, कौटुंबिक स्‍वास्‍थही बिघडले आहे.  

 

6.        नि.12 कडे जाबदारांनी दिलेले म्‍हणण्‍यामध्‍ये त्‍यानी सदर कामी तक्रारदारानी त्‍यांचे बचत खात्‍यात चेक भरला व तो सातारा येथे वसुलीसाठी पाठवला इतकाच मजकूर मान्‍य केला आहे बाकी सर्व मजकूर मान्‍य व कबूल नसलेचे म्‍हटले आहे.  तसेच जाबदारानी तक्रारदाराने चेकची मुदत संपली असलेस तारीख बदलून आणतो किंवा नवीन चेक देतो असे सांगितले परंतु चेक परत नेला नाही व नवीन चेकही दिला नाही.  तक्रारदारानी जाणीवपूर्वकच चेक जाबदाराकडे ठेवला व वेळोवेळी सांगूनही नेला नाही व त्‍यानंतर जवळजवळ एक वर्ष चार महिन्‍यानी नोटीस पाठवून विचारणा केली.  जाबदार पुढे असे म्‍हणतात की, जावेद सिराद मुल्‍ला यानी तक्रारदारास चेक दिला होता त्‍यांच्‍या बँकेतील खात्‍याचा जाबदारानी खातेउतारा दाखल केलेला आहे व त्‍यात चेकच्‍या तारखेस किंवा नंतरही चेकच्‍या रकमेइतकी रक्‍कम कधीच शिल्‍लक नव्‍हती असे जाबदारांचे म्‍हणणे आहे व तक्रारदारांच्‍या देणेघेणेचा व्‍यवहार हा बेकायदेशीर असणार असे त्‍यांचे म्‍हणणे आहे व त्‍यांचा व्‍यवहार हा कायदेशीर असलेस तक्रारदार दिवाणी कोर्टात दावा दाखल करुन रक्‍कम वसूल करु शकतात.  तक्रारदारानी बँकेत चेक भरला.   तो वटलाही नाही किंवा न वटता परतही आला नाही किंवा त्‍याचे काय झाले याबाबतची माहिती तक्रारदारास वेळेत देणे हे जाबदारांचे कर्तव्‍य होते.  या कर्तव्‍यात जाबदाराकडून कसूर झाली आहे त्‍यामुळे जाबदार क्र.1 व 2 हे तक्रारदाराच्‍या झालेल्‍या नुकसानीस व त्रासास जबाबदार आहेत असे मे.मंचाचे मत आहे.    

 

7.          सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करणेत येत आहेत-

                          आदेश  

1.  तक्रारदारांची तक्रार अंशतः मंजूर करणेत येते.

 

2.  जाबदार क्र.1 व 2 यानी वैयक्तिक व संयुक्‍तीकरित्‍या तक्रारदाराच्‍या चेकवरील रक्‍कम रु.2,50,000/- तक्रारदारास अदा करावी.   

3    जाबदार क्र.1 व 2 यानी वैयक्तिक व संयुक्‍तीकरित्‍या तक्रारदारास दि.7-5-2012 म्‍हणजेच तक्रार दाखल तारखेपासून  रक्‍कम रु.2,50,000/-वर आदेश पारित तारखेपर्यंत द.सा.द.शे.10% ने होणारे व्‍याज अदा करावे.

4.   तक्रारअर्ज दाखल करणेसाठी झालेला खर्च व मानसिक त्रासापोटी झालेला खर्च असे एकूण रक्‍कम रु.15,000/- जाबदार क्र.1 व 2 यानी वैयक्तिक व संयुक्‍तीकरित्‍या तक्रारदारास अदा करावेत.

5.    वरील आदेशाचे पालन जाबदार क्र.1 व 2 यानी आदेश पारित तारखेपासून 45 दिवसांचे आत करावयाचे आहे, तसे न केलेस होणा-या एकूण सव्‍याज रकमेवर तक्रारदाराचे हाती रक्‍कम पडेपर्यंत द.सा.द.शे.6% प्रमाणे व्‍याज द्यावे लागेल.  

 

6.   जाबदारानी विहीत मुदतीत आदेशाचे पालन न केलेस तक्रारदार त्‍यांचेविरुध्‍द ग्राहक संरक्षण कायदा कलम 25 व 27 अन्‍वये दाद मागू शकतील. 

 

7.  सदरचा न्‍यायनिर्णय खुल्‍या मंचात जाहीर करणेत आला. 

 

8.  सदर न्‍यायनिर्णयाच्‍या सत्‍यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्‍य पाठवणेत याव्‍यात.

 

 

ठिकाण- सातारा.

दि. 24 –8-2015.

 

 

        (सौ.सुरेखा हजारे)  (श्री.श्रीकांत कुंभार)   (सौ.सविता भोसले)

           सदस्‍या           सदस्‍य            अध्‍यक्षा.

               जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.

 

 

 

 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.