( पारीत दिनांक : 18/07/2014)
( मा. प्रभारी अध्यक्ष, श्री मिलींद आर.केदार यांच्या आदेशान्वये).)
तक्रारकर्ता यांनी प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12 अन्वये विरुध्द पक्ष यांच्या विरुध्द दाखल केली असून, तक्रारीचा आशय खालीलप्रमाणे आहे.
तक्रारकर्ता यांच्या नुसार त्याचे विरुध्द पक्ष बॅंकेत बचत खाते क्रं. 60008500893 हे आहे. त.क. हे बँकेचे नियमित ग्राहक आहे. त.क. यांच्या नुसार त्यांनी दि. 19.06.2013 ला रुपये 5,000/- काढण्याकरिता आर्वी नाका, वर्धा येथील ए.टी.एम. सेंटर मध्ये गेले असता त्यांनी रुपये 5000/- काढण्याकरिता ए.टी.एम.कार्डचा उपयोग केला. परंतु रक्कम निघाली नाही , त्यामुळे ते त्यावेळी थांबले. तेव्हा त्यांच्या खात्यातून ती रक्कम कमी झाली होती व काही वेळाने ती रक्कम परत जमा झाली. सदर व्यवहार हा ATM WDL 4214091389000481546500000000 SBMDA006501 नुसार झाल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
02 तक्रारकर्त्याने पुढे नमूद केले की, काही दिवसानंतर त्याच्या खात्यातून दि. 18.07.2013 रोजी रुपये 5000/- बँकेने आपोआप कमी केले. त्याबाबत त.क. यांनी दि. 19.07.2013 रोजी लेखी अर्ज दिला व बँकेचे मॅनेजर यांची भेट घेतली. त.क. यांच्या तक्रारीची बँकेने कोणतीही दखल घेतली नाही व कोणतीही कारवाई केली नसल्यामुळे त.क. यांनी सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केली असून, बँकेने कमी केलेले रु.5000/- व दस्ताऐवज खर्च रुपये 1500/- तसेच आर्थिक, मानसिक त्रासाकरिता रुपये 5000/-ची मागणी केली आहे.
03 सदर तक्रारीची नोटीस वि.प. यांना मंचामार्फत बजाविण्यात आली. वि.प. यांनी सदर तक्रारीला खालीलप्रमाणे उत्तर दाखल केले.
04 वि.प. यांचे शाखा व्यवस्थापक चंद्रशेखर जनार्दनराव पाठराबे यांनी प्रतिज्ञापत्रावर उत्तर दाखल केले. वि.प. यांच्या म्हणण्यानुसार त.क. यांना दि. 19.06.2013 रोजी एटीएम मधून रोख रक्कम मिळाली परंतु एटीएमच्या तांत्रिक दोषामुळे परत सदर रक्कम त.क. च्या खात्यात जमा दर्शविली. त्यामुळे सदर रक्कम त.क. च्या खात्यातून परत रिवर्स एन्ट्री करुन वळती करण्यात आल्याचे वि.प.चे म्हणणे आहे.
05 वि.प. यांनी आपल्या उत्तरात नमूद केले की, एटीएम कार्डच्या सर्व नोंदी कार्डसेल फोर्ट, मुंबई येथे होत असतात व त्याबाबतचा पाठपुरावा वि.प. यांनी केल्याचे नमूद केले असून सदर बाब तांत्रिक कारणामुळे झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. वि.प. यांनी कोणतीही त्रृटीपूर्ण सेवा दिली नसल्यामुळे तक्रार खारीज करण्याची मागणी केली आहे.
06 सदर तक्रार युक्तिवादाकरिता दि. 09.07.2014 रोजी मंचासमक्ष आली असता, दोन्ही पक्षांचे कथन, युक्तिवाद व त्यांनी दाखल केलेले दस्ताऐवजांचे मंचाने अवलोकन केले असता, खालील बाबी विचारार्थ उपस्थित झाल्या.
कारणे व निष्कर्ष
सदर प्रकरणामध्ये त.क. यांचा वि.प. यांच्याकडे बचत खाता होता व त्याचा खाते क्रं. 60008500893 हा आहे. याबाबत कोणताही वाद नाही. त्यामुळेत.क. हा वि.प. यांचा ग्राहक ठरतो असे मंचाचे स्पष्ट मत आहे. त.क. यांनी दि.19.06.2013 रोजी आर्वी नाका, वर्धा येथील एटीएम मशीन मधून एटीएम कार्डद्वारे रुपये 5000/- काढण्याकरिता गेला परंतु रक्कम निघाली नाही व त.क.च्या खात्यातून रुपये 5000/- कमी झाल्याची नोंद घेण्यात आली होती व काही वेळेतच सदर नोंद दुरुस्त करुन त.क.च्या खात्यात जमा म्हणून दर्शविण्यात आली ही बाब त.क. यांनी दाखल केलेल्या नि.क्रं. 2, दस्ताऐवज 3 वरुन स्पष्ट होते. परंतु याबाबत वि.प. यांचे म्हणणे आहे की, सदर बाब तांत्रिक चुकीमुळे घडली व त्याबाबत पाठपुरावा वि.प. यांनी कार्डसेल फोर्ट, मुंबई यांच्याशी केला व त्याबाबतचे दस्ताऐवज वि.प. यांनी दाखल केले आहे. सदर दस्ताऐवजाचे अवलोकन केले असता त्यामध्ये एक बाब प्रकर्षाने जाणविली की, According to the transaction narration ‘It was doubly cr on 16/07/2013 and then entry is reversed’, but no credit entry has been traced for the captioned a/c on 16/07/2013. ची नोंद स्पष्ट आहे व सदर बाबत पान क्रं. 22 वर नमूद आहे. यावरुन त.क.च्या खात्यात दि. 16.07.2013 ला क्रेडीट एन्ट्री घेतली नसल्याचे स्पष्ट होते. वि.प. यांच्या खात्याचा व्यवहार करण्याकरिता त्यांनी एटीएमची सेवा उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे त्या सेवेतील तांत्रिक बाबीचा लाभ घेऊन ग्राहकांना त्रास होईल व त्यांचे आर्थिक नुकसान होईल अशी कोणतीही बाब वि.प. यांच्याकडून अपेक्षित नाही . वि.प. यांच्या बॅंकेचे प्रतिनि धी श्री. अजितकुमार मंचासमक्ष युक्तिवादाच्या वेळी हजर होते व त्यांनी स्टेटमेंट दाखल केले. वि.प.च्या मते स्टेटमेंटमध्ये कोणताही फरक
नसून त.क. यांना रक्कम मिळाल्याबाबत स्पष्ट होते असे म्हटले आहे. जरी असे असले तरी त.क. च्या खात्यातून रुपये 5000/-ची रक्कम कपात करीत असतांना वि.प.यांनी त.क. यांना दि. 16.07.2013 ला कळविणे गरजेचे होते की, सदर रक्कम त.क.च्या खात्यातून कां वळती करण्यात आली. या संबंधीची कोणतीही बाब वि.प. यांनी केलेली नाही. तक्रार दाखल झाल्यानंतर तांत्रिक कारणामुळे चुकीची नोंद झाली व त्यामुळे नोंद रद्द करण्यात आली ही बाब मंचासमक्ष कथन करण्यापूर्वी त.क. ला त्याबाबतची सूचना देणे गरजेचे होते. तसे न करणे ही वि.प. यांच्या सेवेतील त्रृटी आहे. तसेच त.क. यांनी एटीएम कार्डसेलला पक्षकार करावे ही केलेली सूचना नाकारण्यात येते. कारण ती जबाबदारी वि.प.यांची होती व ती विरुध्द पक्ष यांनी पारपाडली नाही असे मंचाचे मत आहे.
त.क. यांच्या खात्यातून दि. 16.07.2013 रोजी वि.प.यांनी वळती केलेले रुपये 5,000/- परत मिळण्यास त.क. पात्र ठरतो असे मंचाचे स्पष्ट मत आहे. तसेच त.क. यांनी केलेल्या इतर सर्व मागण्या अवाजवी व चुकिच्या असल्यामुळे त्या अमान्य करण्यात येते. परंतु तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 1,000/- मिळण्यास त.क. पात्र ठरतो असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
उपरोक्त सर्व विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यानां रुपये 5000/- द्यावे किंवा त्यांच्या बचत खाते क्रं.60008500893 मध्ये जमा करावे. सदर रक्कम आदेश पारित झाल्याच्या तारखेपासून 30 दिवसाच्या आत द्यावे. अन्यथा सदर रक्कमेवर द.सा.द.शे.6%दराने व्याज प्रत्यक्ष रक्कम त.क. यांना प्राप्त होईपर्यंत किंवा रक्कमेची नोंद बचत खात्यात होईपर्यंत व्याजसह देय राहील.
3) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना तक्रारीचा खर्च म्हणून रु.1000/- द्यावे.
4) मा.सदस्यांसाठीच्या ‘ब’ व ‘क’ फाईल्स संबंधितांनी परत घेवून जाव्यात.
निकालपत्राच्या प्रति सर्व संबंधित पक्षांना माहितीस्तव व उचित कार्यवाहीकरीता पाठविण्यात याव्यात.